Published in the Saturday Lokasatta on 29 June, 2024
मे जून महिन्यात वृत्तपत्रात येणाऱ्या लेखांचं लिखाण मी केलं नाही. `वाह! वाह! आत्ता डेडलाइनचं टेन्शन नाही, मजा करूया. पण आता लिहायला घेतल्यावर मला जास्त आनंद होतोय त्या सुट्टीपेक्षा.
अरे तू इतनी बिझी क्यूँ है? स्लो डाऊन यार! जस्ट चिल्’ हे माझं सध्याचं नवं गिल्ट फीलिंग. आयुष्य अधूनमधून अशा अनेक गिल्ट फीलिंग्ज्मधून जात असतं. आपण करतोय ते चूक की बरोबर ह्या मानसिक द्वंद्वात आपण अडकलेलो असतो. माझी शेजारीण रीना आणि आम्ही तशा सोसायटीतल्या बऱ्याचजणी समवयीन. आम्ही `एम्प्टी नेस्टर्स’. मुलं बाहेर त्याचं आयुष्य जगताहेत आणि आम्ही आमचं. प्रत्येकजण वा जोडपं आपापल्या परीने आयुष्याच्या उत्तरार्धाचा आनंदी प्रारंभ करताहेत. काहीजण जॉब्जवाले तर काहीजण बिझनेसवाले. जॉब्जवाले ऑफिशियली रीटायर झाल्यावर कन्सल्टन्सी वा सोशल वर्क ह्यामध्ये स्वत:ला व्यस्त करताहेत तर आम्ही बिझनेसवाले हळू हळू एक एक जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवत समाधानाची मार्गक्रमणा करीत आहोत. पण तरीही काम काही संपत नाहीये. कामाचं स्वरूप बदलतंय त्यामुळे उत्साह आणखी वाढतोय मग आणखी काहीतरी नव्याने करायचा हुरूप येतोय. पण त्यामुळे होतंय काय की वयाच्या साठीला सोमवार ते शुक्रवार आम्ही दहा ते सहा बिझी. कोविडनंतर शनिवारी ऑफिसची पायरी चढायची नाही हा निश्चय केला, पस्तीस वर्षांच्या `कर्मण्ये वाधिकारस्ते’ नंतर, शनिवारच्या सुट्टीचं फळ पदरी पडलं. तरीही माझं भारतीय व्यावसायिकेचं मन कधी कधी गिल्टमध्ये जातंच, कारण शनिवारी आमची सर्व ऑफिसेस सुरू असतात आणि टीममधले सर्वजण प्रचंड बिझी असतात. लोकांना म्हणजेच आमच्या पर्यटकांना शनिवारी सुट्टी असते त्यामुळे आमच्या ऑफिसेसना गर्दी. मग वाटतं की, `अरे आपली सर्व टीम आज काम करतेय आणि आपण घरी?’ बहुत नाइन्साफी है! आदतसे मजबूर दुसरं काय. `चलो लंच के लिए बाहेर जाते हैं’ असा कुणाही मैत्रिणीचा फोन आला की, `नाही यार, ऑफिस आहे, मिटिंग्ज आहेत‘ हे सांगताना अपराधीपणाची भावना नकळत उत्पन्न होते. त्यातून बाहेर यायला थोडे प्रयत्न करावे लागतात पण ॲट द एन्ड ऑल इज वेल!
मे जून महिन्यात दर आठवड्याला दोन वृत्तपत्रात येणाऱ्या ह्या लेखांचं लिखाण मी केलं नाही. `वाह! वाह! लेखनाला सुट्टी, आत्ता डेडलाइनचं टेन्शन नाही, मजा करूया’. पण दीड महिन्याच्या ह्या लेखन सुट्टीनंतर आता लिहायला घेतल्यावर मला जास्त आनंद होतोय त्या सुट्टीपेक्षा. मग ते दीड महिन्याचं छोटंसं स्लो डाऊन चांगलं होतं की लिखाण करण्याचा आणि त्याच्या डेडलाइनचं टेन्शन घेण्याचा आनंद माझ्यासाठी जास्त होता? एक लेख लिहायला किमान तीन तास लागतात. मग गेला दीड महिना वा त्यातल्या प्रत्येक आठवड्यातल्या ह्या वाचलेल्या वेळाचं मी नेमकं काय केलं? तसं बघायला गेलं तर ते तीन तास आले आणि गेले. म्हणजे ऑफिसचं काम, लेखन, जगाचा प्रवास, ओटीटी वरची एन्टरटेनमेंट, एखादं लंच आऊट, थिएटरमध्ये जाऊन एखादा सिनेमा हे पुर्वीही चालू होतं आणि आत्ताही. आतातर आमची नील हेताची राया म्हणजे आमची नात आल्यावर आठवड्यातले किमान तीन दिवस जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवून आनंद मिळवतोय. सांगण्याचा मतितार्थ, पुर्वीपेक्षा ड्युटीज् वाढल्यात तरी जास्त कामं होताहेत, चांगल्या तऱ्हेने कामं होताहेत. आता असं वाटायला लागलंय की जेवढ्या जास्त ड्युटीज् तेवढे आपण जास्त ऑर्गनाइज्ड होतो आणि जास्त काम करतो किंवा मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. कुणीतरी म्हटलंय, `जो सर्वात जास्त बिझी असतो तोच सर्वात जास्त कामांचा फडश्या पाडू शकतो‘. आणि ह्याची प्रचिती आपल्याला आयुष्यात अनेकदा येते. गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही स्पेन आणि इटलीत होतो. कोविडनंतर पर्यटनक्षेत्राची गाडी रूळावर येताना दिसत होती आणि आम्ही ठरवलं की, `चला आता ॲडव्हर्टेोरियल्स सुरू करूया वृत्तपत्रांमध्ये आणि पर्यटकांशी आपला गेली पंचवीस वर्ष सुरू असलेला संवाद जो कोविडमध्ये खंडित झाला होता तो रीज्युविनेट करूया’. ह्यावेळी पॅटर्न थोडे बदलले. प्रवासात असताना मार्केटिंग टीमसोबत ले आऊट्स केले. इथे अर्ध पान आणि दुसऱ्या वृत्तपत्रात पूर्ण पान आम्हाला सेट करायचं होतं. थोडक्यात दीड पानाचं लेखन करायचं होतं, पण त्या बिझनेस ट्रॅव्हलमध्ये, बिझनेस मीटिंग्ज्, असोसिएट्ससोबत भेटीगाठी, हॉटेल इन्स्पेक्शन्स ह्या सर्व गडबडीत ह्या दोन्ही लेखमाला सुरू झाल्या आणि सहा महिने त्या सुरू आहेत. आता वेगवेगळ्या वृत्तपत्रात माझे दोन, नीलचे तीन आणि सुनिलाचे दोन लेख आम्ही स्वत: लिहितो आणि बाकी सगळा भार आमची मार्केटिंग-प्रॉडक्ट टीम आणि आमचा लेखक मित्र मकरंद जोशी सांभाळतोय. जनरली आताचा रोल म्हणजे, सेट करून द्यायचं आणि आपण बाजुला व्हायचं. सांगायचा मुद्दा, ह्या इटली स्पेनच्या सहलीत अगदी गच्च कार्यक्रम असला तरी आम्ही लेखमाला सुरू केली, ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन केली आणि हे कुठेही न दमता न थकता. म्हणजेच बिझी होतो तरीही आम्ही जास्त काम करीत होतो.
`स्लो डाऊन विथ द एज’ ह्याचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न करतेय. थोडं थोडं आकलन होतंय त्यात, असं जाणवतंय की स्लो डाऊन म्हणजे काम पूर्ण थांबवणे नव्हे किंवा काम स्लो करणे नव्हे. स्लो डाऊन म्हणजे जास्त करून कामाचं स्वरूप बदलणे. पूर्वी मी टूर्स करीत होते, टूर मॅनेजर म्हणून. तेच आजपण करीत राहिले तर ती चूक ठरेल. पण माझ्या चाळीस वर्षांच्या पर्यटन अनुभवातून मी काही नव्याने करू शकले तर तो स्लो डाऊनचा भाग असेल. गेल्या चाळीस वर्षांचं अवलोकन करणं, त्यापासून शिकणं, ते आचरणात आणणं, त्याकडे तटस्थपणे पाहणं हाही स्लो डाऊनचा भाग म्हणता येईल. नाहीतरी गेल्या अनेक वर्षात असं अवलोकन करायला कुठे फुरसत मिळालीय. आता नवनवीन ट्रेंड्स आणि आपला तजूरबा ह्याचा मेळ घालत नव्या जमान्यासाठी नवीन काही निर्माण करता येईल. माझ्यामते हे आहे स्लो डाऊन. आपल्यातल्या उत्साहाला, जिज्ञासेला, कुतुहलाला जागृत ठेवणं, त्याला सतत खाद्य पुरवणं हे आहे स्लो डाऊन. आणि हो हे स्लो डाऊन प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल. कुणाला सर्व काही सोडून मुखी सतत हरिनाम घ्यावसं वाटेल, दॅट्स ऑल्सो फाईन. आयुष्याच्या उत्तरार्धात जी सकारात्मक गोष्ट आपल्याला यथेच्छ आनंद देईल ती करावी.
दोन दिवसांपूर्वी इवान कारमायकलचा पॉडकास्ट ऐकत होते. अनेक यशस्वी व्यक्तीमत्वांच्या मुलाखतीतले महत्वाचे मुद्दे एकाच पॉडकॉस्ट मध्ये एकत्र करण्याचं काम करून तो आपल्यावर उपकारच करतो म्हणायचं. त्या पॉडकास्टमध्ये ॲमेझॉनचे जेफ बेसोज च्या भाषणातलं एक वाक्य होतं, `स्लो इज स्मूथ अँड स्मूथ इज फास्ट’. पाठी जाऊन ते पुन्हा ऐकलं. आवडलं. पहिल्यांदाच ऐकत होते हे अप्रतीम वाक्य. केवढा गहन अर्थ भरलाय त्यात. ह्या वाक्याचा प्रणेता जेफ बेसोजच आहे की आणि दुसरा कोणतरी म्हणून गुगलबाबाला विचारलं आणि लक्षात आलं की, अमेरिकन मिलिटरीतली खास करून `नेव्ही सील्स’ त्यांच्या ट्रेनिंगसाठी वापरात येणारी ही टर्म आहे. नेव्ही सील्सना नेहमी सांगितलं जातं की, स्पीड पेक्षा ॲक्युरसी, अचूकता, तपशील, कार्यपद्धती ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आधी नीट करा. एकदा का तुम्ही बेस किंवा पाया मजबूत बनवला तर सर्व काही स्मूथ होतं आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाता. जास्त स्पीडने पुढे जाता. पण जर का तुम्ही प्रथम स्लो नाही गेलात, धिसाडघाई केलीत, तर कदाचित तुमच्या मार्गात तुम्हाला अडचणींना आणि अपघातांना सामोर जावं लागेल आणि तुमचं काम वा तुमचा प्रोजेक्ट फेल जाऊ शकेल किंवा तो डीले होईल. अमेरिकन रायटर लॉरेल हॅमिल्टननेही लिहिलंय,`स्लो इज स्टेडी, स्टेडी इज स्मूथ, स्मूथ इज फास्ट, फास्ट इज डेडली’. मला एकदम आपल्या शाळेतली ससा कासवाची शर्यत आठवली. कासवाचं स्लो स्टेडी स्मूथ कन्सिस्टंट अशा प्रयत्नांचं फळ त्याला मिळालं. ससा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये अडकला. दुसऱ्याला अंडरएस्टिमेट करणारा निघाला, त्याच्या वागण्यात धिसाडघाई होती, कोणतेही प्लॅनिंग वा प्रीकॉशन नव्हती आणि व्हायचं तेच झालं. ससा भरपूर वेगात पळाला, नंतर स्लो डाऊन झाला, तिथपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर तो झोपला इथे त्याची चूक झाली. स्लो डाऊन म्हणजे झोपणं नव्हे तर शांतपणे विश्रांती घेत सभोवतालचा, भूत वर्तमान आणि भविष्याचा आढावा घेण. काय मस्त आहे नं ही थिअरी. म्हणजे आपण अनेकदा ही वापरलीय किंवा वापरतो. म्हणतात नं जगात नवीन काही नसंत, सगळं सार भगवद्गीतेत आहे. आपण नव्याने प्रेझेंट करतो एवढंच.
`स्लो डाऊन’ चे मला दोन अर्थ वाटतात.एक शाब्दिक अर्थ, लिटरली स्लो डाऊन. म्हणजे जेवणाच्या खाण्याच्या बाबतीत खरोखरच हळू खा, कमी खा, चावून चावून खा. काम सोडून ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये घाई घाई नको. अगदी मनसोक्त आनंद घ्या प्रत्येक गोष्टीचा. मग ते पेंटिंग असेल, ड्रॉईंग असेल, म्युझिक, डान्स, कुकिंग, वॉकिंक, स्विमिंग, वाचन काहीही जे आपल्याला आवडत असेल त्याचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगूया. अब्राहम लिंकननी छान म्हटलंय, `द बेस्ट थिंग अबाऊट द फ्युचर इज दॅट इट कम्स वन डे ॲट अ टाइम‘. प्रत्येक क्षण, प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवसाचं सोनं करणं आपल्या हातात आहे. आणि स्लो डाऊनचाच दुसरा अर्थ म्हणजे, ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्यात मात्र `स्लो डाऊन इज व्हेरी स्ट्रॅटेजिक’. हे स्लो डाऊन आपल्याला वापरायचंय ते अभ्यासासाठी, निरिक्षणासाठी, अवलोकनासाठी. जेणेकरून कोणत्याही कामाचं, प्रोजेक्टचं जे स्क्रिप्ट रायटिंग असेल ते परफेक्ट होईल, गोष्टी स्मूथली पुढे जातील आणि कोणताही अडथळा न येता स्पीड पकडता येईल. `स्लो डाऊन टू गो फास्टर’ हे मात्र कायम स्मरणात राहील आणि आचरणात आणलं जाईल.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.