Published in the Saturday Lokasatta on 08 February, 2025
...मी सुप्रीम कोर्ट जज असल्याने निर्णय मला घ्यायचा होता. हू इज द वन? आणि मग ह्या दोन देशांमध्ये घमासान युध्द झालं. दोघंही प्राण पणाला लावून लढत होते. कधी ह्याची सरशी तर कधी त्याची, पण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो आणि तो असायलाच पाहिजे...
आमच्या इथे ऑर्गनाझेशनमध्ये ओपन हाऊस असा एक प्रकार आहे. जेव्हा मी मुंबईत असते तेव्हा आठवड्यातून एकदा वीणा वर्ल्डमधल्या ज्यांना कुणाला मला भेटायचंय त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. कोणत्याही अजेंड्याशिवाय बोलायचं आणि कामाचं काही बोलायचं नाही हा अलिखित नियम. जस्ट गप्पा मारायच्या. अशीच एकदा गप्पा मारायला कस्टमाईज्ड हॉलिडेज ची टीम आली होती. गप्पांच्या ओघात तन्वी चुरीने प्रश्न केला, ‘तुमचा आवडता देश कोणता?’ कठीण असतात नं असे प्रश्न. आईला जर कोणी विचारलं, तुला तुझ्या मुलांमधलं जास्त कोण आवडतं तर जी अवस्था होईल तीच अवस्था माझीही झाली. कारण प्रत्येक देश वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतो. यावर आम्ही थोडावेळ चर्चा केली. पण माझ्या उत्तरावर मीच समाधानी नव्हते. कुणी प्रश्न केला तर अचूक उत्तर तर द्यायला पाहिजे असं वाटलं आणि हा प्रश्न तसाच मनात घोळत राहिला. आयुष्याच्या उत्तरार्धात एक चांगली सवय लागलीय. चांगल्या सवयी एवढ्या उशीरा का लागतात हा प्रश्न आहेच. तर ही सवय म्हणजे मनात चलबिचल करणारा एखादा प्रश्न असेल तर घरी जायचं, सकाळपर्यंत मोबाईलसोबत घटस्फोट घ्यायचा, एका जागी शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि त्या प्रश्नावर एकचित्ताने विचार करायचा. मी तेव्हाही तसंच केलं आणि मनाला प्रश्न केला, ‘खरंच कोणता देश आवडतो मला?’ पीटर पॅन किंवा अल्लाउद्दीनचं जादूचं कार्पेट घेऊन मी सप्तखंडांवरून विहार करू लागले. सगळे देश ‘आय ॲम द वन’ म्हणत हात वर करताना दिसायला लागले. कठीण होतं ते, कारण प्रत्येक देशाने कितीतरी चांगल्या आठवणी माझ्यासाठी आनंदी बनविल्या होत्या. त्यांना, ‘नाही नाही, यू आर नॉद द वन’ हे कसं सांगायचं? बहौत ना इन्साफी है! पण मला आज या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच होतं. विनर एकच हवा होता त्यामुळे कठोर व्हावं लागत होतं प्रत्येक देशाप्रती. ‘निर्णय झालाच पाहिजे’ ही दुसरी चांगली सवय तशी बऱ्यापैकी आधी लागली होती व्यवसायात असल्यामुळे. त्यामुळे याही वेळी निर्णय झालाच पाहिजे हे माझ्या मनात बसलेल्या त्या परीक्षकांच्या तुकडीला मी बजावून सांगत होते. परीक्षकांमध्येही मतमतांतरं होत होती, पण ते हळूहळू करीत उत्तराकडे मार्गक्रमणा करीत होते. ऑडिशन्स, सिलेक्शन, क्वॉलिफाईंग मॅचेस, क्वार्टर फायनल, सेमी फायनल करीत परिक्षकांनी फायनलला दोन देश माझ्यासमोर ठेवले. एक ऑस्ट्रिया आणि दुसरा जपान. आता मी सुप्रीम कोर्ट जज असल्याने निर्णय मला घ्यायचा होता, ‘हू इज द वन?’ आणि मग ह्या दोन देशांमध्ये घमासान युध्द झालं. दोघंही प्राण पणाला लावून लढत होते. कधी ह्याची सरशी तर कधी त्याची, पण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो आणि तो असायलाच पाहिजे त्याप्रमाणे इस्त्राइल-पॅलेस्टाईन, रशिया -युक्रेनसारखं हे युद्ध ‘नेव्हर एंडिंग स्टोरी’ करायचं नव्हतं. इसपार या उसपार नो डायलेमा, नो कन्फ्यूजन आणि जपान आणि आस्ट्रियामध्ये युद्धविराम झाला. जपानने बाजी मारली. ऑस्ट्रिया मागे हटला आणि माझा आवडता देश ठरला ‘जपान’. मी डोळे उघडले. मला उत्तर मिळालं होतं. निर्णय झाला होता आणि मन एकदम मोकळं, हलकं झालं होतं. एखाद्या फुलपाखरासारखं आनंदाने विहार करायला लागलं.
खरंच कसा देश आहे हा आणि का बरं त्याने अव्वल नंबर मिळवला माझ्या मनात आणि इतर देशांच्या तुलनेत? एका बाजूला शांत, हळूवार, नम्रतेच्या सर्व कसोट्या पार करणारा तर दुसऱ्या बाजूला एवढासा चिमुकला असूनही बलाढ्य अमेरिकेशी दोन हात करणारा, क्वालिटी आणि प्रिसिजनच्या बाबतीत जगात अग्रेसर असणारा, अत्याधुनिकतेची आस असणारा पण संस्कृती आणि परंपरांचा आदर करणारा जपान मला माझ्यासाठी आदर्श वाटतो. प्रेरणा फक्त एखाद्या व्यक्तीकडूनच मिळते असं नाही, ती कधी निसर्गाकडून, कधी एखाद्या वस्तूकडून तर कधी अशा जपानसारख्या देशाकडूनही मिळू शकते किंवा मिळवता येते. जपान हा देश एखाद्या छानशा व्यक्तीसारखा वाटतो मला. त्याची अगणित वैशिष्ट्यं पाहून खरंच म्हणावसं वाटतं, ‘क्या है रे तू!’. एक बाजू अतिशय नम्र तर दुसरी बाजू अतिशय कणखर. जे मिळालंय त्यात समाधान, पण जे स्वत:ला निर्माण करायचंय त्यात कायम असमाधानी. कर्तृत्वात आणि कर्तव्यात तडजोड नाही. वयाची शंभरी गाठली तरी जपानी माणसाची कार्यमग्नता लीन पावत नाही, किंवा कार्यमग्न असल्यामुळेच जास्तीत जास्त जपानी माणसं आयुष्याची शंभरी गाठतात. दीर्घायुषी बनण्याचा फॉर्म्युलासुद्धा त्यांनी खूप सोप्या पद्धतीने जगाला दिलाय. भरपूर भाज्या खा. अन्न शिजवताना स्टीमिंग, फर्मेन्टिंग, स्लो कुकिंग, ग्रिलिंगचा वापर करा. फ्रेश ताजं अन्न खा. छोट्या प्लेट्समधून खा, हळू हळू खा, पोट थोडं रिकामं ठेवा. भरपूर चाला. रोजचा सकाळचा व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. सुशी, किमोनो, सुमो रेसलिंग, बेसबॉल, सामुराई, बुद्धीझम, शिंतोईझम सारख्या गोष्टींचा आभिमान बाळगा.
स्टीव्ह जॉब्ज जपानी तत्वज्ञानाचा चाहता झाला, त्याने झेन मेडिटेशन बुद्धीझमचा आयुष्यात शिरकाव करून घेतला आणि असं म्हटलं जातं की ॲपल प्रॉडक्टसच्या सिम्प्लिस्टिक डिझाइनचं इन्स्पिरेशन तिथूनच आलं. आतातर जग वेडं झालंय ‘जापनीज फिलॉसॉफी’ आणि ‘जापनीज वे ऑफ लाइफ’ च्या पाठी. सोप्या भाषेत सर्वांना समजेल उमजेल आणि आत्मसात करता येईल अशा जापनीज फिलॉसॉफीची मी सुद्धा खूप चाहती आहे. त्यावर आधारित किमान वीसेक पुस्तकं तरी आमच्या लायब्ररीत असतील. आयुष्याचं, प्रत्येक दिवसाचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे हे सांगणारं ‘इकिगाई’, हा क्षण पुन्हा येणार नाही म्हणून तो पूर्णपणे जगूया असं सांगणारं ‘इचिगो इचि’, चेंज ही गोष्ट आयुष्यातला एक अपरिहार्य भाग बनवा आणि न थकता, न दमता सातत्याने सुधारणा करीत रहा हे सांगणारं ‘कायझेन’, कितीही संकटं आली तरी धीराने आणि धैर्याने त्याचा सामना करा सांगणारं ‘गामन’, अपूर्णतेचं सौंदर्य जाणून त्यात आनंद मिळवायला सांगणारं ‘वाबीसाबी’, चला, उठा, सोडून देऊ नका आणि मिळालेल्या आयुष्याचं काहीतरी छानसं करा हे सांगणारं ‘गनबात्ते वा गम्बारे’, फुटलेल्या वस्तूला चांदी किंवा सोन्याचा वर्ख लावून ती अधिक सुंदर करता येते असं सांगणारं ‘किन्स्तुगी’, स्वत:ची दुसऱ्याशी तुलना करू नका सांगणारं ‘ओहबायटोरी’, सिम्प्लिसीटी माईडफूलनेस आणि क्लटर फ्री आयुष्याचं महत्व सांगणारं ‘कान्सो’, प्रत्येक रिसोर्स मग ती वेळ असेल वस्तू वा अन्न ते वाया जाऊ देऊ नका सांगणारं ‘मोट्टाईनाई’, निसर्गाचं महत्व सांगणारं ‘शिनरिन योको’... ही लिस्ट मोठी आहे पण खूपच प्रेरणादायी आहे हे सर्व काही.
जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, सर्वात महागडा देश, समर आणि विंटर ऑलिम्पिक्स भरविणारा पहिला आशियाई देश, उच्च राहणीमानाचा देश, सर्वात जास्त आयुर्मान असलेला देश, बालमृत्यूचं प्रमाण नगण्य असणारा देश, जगातलं आठवं मोठ्ठं मिलिटरी बजेट असणारा देश, आयात निर्यातीच्या बाबतीत जगातल्या चौथ्या क्रमांकावर असलेला देश, जगातली तीन नंबरची इकॉनॉमी म्हणून मिरवणारा देश, आजच्या मॉडर्न जगातही सम्राटाला मानणारा, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की सांभाळणारा देश, 98.5% जापनीज लोकांचा देश, बाँबहल्ल्यात बेचिराख होऊनही पुन्हा उसळून उठणारा देश, स्वत:च्या जपानी भाषेचा गर्व असणारा देश, जागतिक महायुद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावलेला देश, प्रतिचौरस किलोमीटर्समध्ये माणसांची जास्तीत जास्त घनता असलेला देश, भूकंप आणि त्सुनामीशी सतत दोन हात करणारा देश, देशाचा पंच्याहत्तर टक्के भाग जंगलांनी आणि पर्वतांनी व्यापलेला असूनही निसर्गाची हानी न करणारा देश, जवळजवळ सातशे आयलंड्सचा देश, सायंटिफिक रिसर्चमध्ये अग्रस्थानी असलेला देश, प्लॅनिंग एक्झिक्यूशन डेडीकेशन परफेक्शनच्या बाबतीत कुणीही हात धरू शकणार नाही असा देश, छोटा असूनही एकशे पंच्याहत्तर एअरपोर्टस असलेला देश, बुद्धिझम मानणारा देश, संस्कृती परंपरा जपणारा देश, भरपूर कॉफी पिणारा देश, ऑटोमोबाइलचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश, जगातलं सर्वात मोठं फिश मार्केट असणारा देश, 99% साक्षर लोकांचा देश, 96% एम्लॉयमेंट असलेला देश... असा हा जपान जगाचं आकर्षण ठरला आहे.
सहा ते सात इंच उंच उंबरठ्यावाली घरं, कमीतकमी फर्निचरवाली घरं, बाहेरून आल्यावर घराबाहेर चपला काढायची पद्धत, जमिनीवर बसून जेवणं, जेवणाआधी ‘इतादाकीमासू’ म्हणजे आपलं ‘वदनी कवळ घेता’... अशा अनेक गोष्टी जपानचं भारताशी नातंही सांगतात. कमरेत वाकून आपल्या नम्रपणाचं दर्शन घडवणारी पण बिझनेसच्या बाबतीत तेवढीच श्रूड असणारी, वेळ पाळणारी, शिस्तबद्ध जीवन जगणारी जपानी माणसं हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येक देश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. जपानमध्ये सगळचं काही आलबेल आहे असं नाही, पण आपण टूरिस्ट म्हणून जातो तेव्हा त्या देशाकडून जेवढं चांगलं घेता येईल ते घ्यायचा आपला महत्वाचा रोल असतो आणि तो आपण पार पाडावा. प्रत्येक ठिकाणी जास्त खोलात जायची गरज नसते.
भारत रशिया अमेरिका चायना या देशांच्या तुलनेत आकाराने छोटा असलेला जपान, इंग्लिश भाषेचा अंकित न होता स्वत्व राखत, स्वत:ची भाषा जोपासत मोठा झाला. हिरोशिमा नागासाकीच्या अणूसंहारावर मात करत जपान आणखी ताकदीने उभा राहिला. ‘कितीही संकटं येऊ दे, आम्ही सतत त्यावर मात करू!’ हा संदेश जपान सदैव जगाला देत राहीला. आणि म्हणूनच मनापासून म्हणावसं वाटतं, ‘आय लव्ह यू जपान!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.