आपल्या प्रवासात अनेक मॉन्युमेन्ट्स, म्युझियम्स, चर्चेस व इतर साईटसिइंगने गच्च भरलेल्या हॉलिडे प्रोग्रामपासून जेव्हा आपल्याला विसावा हवा असतो तेव्हा एरिस्कासारख्या स्कॉटलंडमधल्या कुठल्याही कंट्री हाऊस किंवा लक्झरी कॅसल हॉटेलची निवड करा. जगापासून लांब जाऊन आपण आपल्या स्वत:च्याच जगात वावरतोय याचा आनंद इथे मिळतो.
हायवे मागे टाकून आता मी त्या छोट्या गावात शिरले होते. समोरचा रस्ता बराच अरुंद असल्याने मी गाडीचा वेग कमी केला. भारतासारखीच राइट हँड ड्राईव्ह गाडी इथे असली तरी शेवटी परदेशी एका परक्या शहरात मी गाडी चालवत होते. ही गोष्ट वेगळी की गाडीचे जी.पी.एस अर्थातच ग्लोबल पोजिशनिंग सॅटेलाईट जेव्हा ‘ट्रॅफिक अहेड’ अशी चेतावनी देत होते तेव्हा माझ्यापुढे केवळ तीन गाड्या होत्या. समोरचा रस्ता फारच अरुंद होता म्हणजे त्या रस्त्यावर एका वेळी एकच गाडी मावू शकत होती. माझी गाडी पाहताच समोरुन येणार्या वॅनने तिथे बनविलेल्या ‘रेस्ट’ एरियामध्ये थांबून मला पुढे जाऊ दिले, याबद्दल त्याला मनातल्या मनात धन्यवाद देऊन मी पूलावर चढले. पूल ओलांडताच समोर त्या रिसॉर्टची पाटी दिसली व परत एकदा माझ्या रेंटल गाडीचे जी.पी.एस बोलू लागले, ‘यू हॅव अराईव्हड अॅट युवर डेस्टिनेशन’. ‘वेलकम टू एरिस्का’. चेक-इन केल्या केल्या हॉटेल रिसेप्शनवर माझे स्वागत झाले. इतका वेळ गाडी चालवण्यात मग्न असल्याने त्या जागेच्या निसर्गसौंदर्याकडे माझे तसे दुर्लक्षच झाले होते. वसंत ॠतुचे आगमन झाल्याने झाडाला पालवी फुटली होती आणि फुले देखील बहरु लागली होती. ऐटीत डोलणार्या डॅफोडिल्सना बघून विलियम वर्डस्वर्थच्या ‘डॅफोडिल्स’ कवितेची आठवण झाली, Ten Thousand saw I at a glance, Tossing their heads in sprightly dance. हिरव्यागार गवतावर अगदी उठून दिसणार्या त्या पिवळ्या धमक फुलांकडे पाहून ही फुले वर्डस्वर्थ सारख्या कवीची प्रेरणा का ठरले हे प्रकर्षाने जाणविले.
एरिस्का हे स्कॉटलंडच्या पश्चिमेकडचं एक छोटंसं खाजगी बेट. ‘आईल ऑफ एरिस्का स्पा हॉटेल’हे या बेटावरचे १८८४ पासून उभे असलेले एकमेव हॉटेल. अर्थात हे सुरुवातीला एक खाजगी घर म्हणून बांधण्यात आले होते. क्लार्क हचीसन्स या कुटुंबाचे वास्तव्य इथे १९३० पर्यंत राहिले व अनेक मालकी हक्क बदलल्यानंतर बुकॅनन स्मिथ या कुटुंबाने १९७३ मध्ये ही जागा विकत घेऊन या सुंदर स्कॉटिश बरोनियल शैलीत बांधलेल्या घराचे स्कॉटलंडच्या एका सर्वात सुंदर कंट्री हाऊस हॉटेलमध्ये रुपांतर केले. तसे एरिस्का हे नाव दहाव्या शतकात नॉर्वेमधून पश्चिम स्कॉटलंडवर झालेल्या अनेक हल्ल्यांपैकी ‘एरिक द रेड’ या हल्लेखोरावरुन ठेवले गेले. दहाव्या शतकामध्ये या बेटाने अनेक आक्रमणं सोसली असली तरी झाडं-फुलांनी समृद्ध लॉक लिनी मधल्या या तीनशे एकरच्या बेटावर नीरव शांततेत निसर्ग सौंदर्याचा लाभ घेण्यासाठी पर्यटक वारंवार भेट देतात.
खाजगी बेटांभोवती निसर्गाने एक जादूचे वलय टाकले आहे असे मला नेहमी वाटते आणि एरिस्कामध्ये तर हे प्रकर्षाने जाणवत होते. अशी हॉटेल्स ही केवळ रात्रीपुरते वास्तव्य करण्यासाठीच नं राहता स्वत:च त्या डेस्टिनेशनचे एक आकर्षण ठरतात. आपल्या प्रवासात अनेक मॉन्युमेन्ट्स, म्युझियम्स, चर्चेस व इतर साईटसिइंगने गच्च भरलेल्या हॉलिडे प्रोग्रामपासून जेव्हा आपल्याला विसावा हवा असतो तेव्हा एरिस्कासारख्या स्कॉटलंडमधल्या कुठल्याही कंट्री हाऊस किंवा लक्झरी कॅसल हॉटेलची निवड करा. जगापासून लांब जाऊन आपण आपल्या स्वत:च्याच जगात वावरतोय याचा आनंद इथे मिळतो. हॉटेल ‘स्पा’ असले तरीही कुठलीच ट्रीटमेन्ट न घेता इथल्या वातावरणात आपले सर्व ताणतणाव दूर होऊन मनाने आणि तनाने पूर्णपणे आपण त्या डॅफोडिल्स सारखेच ताजेतवाने होतो. एरिस्कामध्ये दोन रात्रींचे वास्तव्य करून अशा ‘slow tourism’ चा आनंद अतुलनीय होता. तसे इथे हवे तसे करण्यासारखे बरेच काही होते.
ह्या कॅसल हॉटेल्समध्ये आपण गोल्फचा आनंद घेऊ शकतो. तसेच अनेक वॉटर स्पोर्टस, कयाकिंग, यॉट्स, फिशिंग, आर्चरी, क्ले पीजन शूटींग, माऊंटन बायकिंग सारख्या अनेक अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ शकतो. पण कायमच धावपळ करत असल्याने एरिस्का बेटावर मी काहीच करायचे नाही असे ठरविले आणि या बेटावर फेरफटका मारायला निघाले. हॉटेलला लागूनच हिरवेगार गोल्फ कोर्स पसरले होते. थोडे पुढे जाताच अचानक मला तिथे हरिण बागडताना दिसले. अजून पुढे गेल्यावर मी जेट्टीजवळ उभे होते तेवढ्यात समोरच्या लॉकमध्ये सील्स व ऑटर्स पाण्यात खेळताना दिसले. इतक्या सहजपणे इथे वाइल्ड लाईफ दिसत होतं की त्या हॉटेलच्या लक्झरी रूमपेक्षाही हीच खरी लक्झरी आहे हे जाणवलं. फार कमर्शियल न झालेल्या स्कॉटलंडच्या रांगड्या पण विलोभनीय निसर्गसौंदर्याची ओळख फारच मनमोहक वाटली.
स्कॉटलंडमध्ये आपण कुठल्याही भागात वास्तव्य केले तरी दीड-दोन तासांवर कुठले ना कुठले आकर्षण नक्कीच दिसते आणि एरिस्काही ह्याला अपवाद नव्हतं. एरिस्काला पोहोचण्याआधी लागते ते ओबन. हे इथले महत्वाचे पोर्ट टाऊन. इथे अनेक बोटी लागल्या होत्या. टूरिझम बरोबरच सामानाच्या वाहतूकीसाठी सुद्धा बर्याच बोटी लागल्या होत्या. ओबन-बे वर उभे असताना मागे टेकडीवर रोमच्या कोलोसीयमची आठवण करून देणारे ‘मॅक केग्ज टॉवर’ दिसत होते. ओबनला भेट दिल्यास इथल्या हार्बरला लागून अनेक छोट्या रेस्टॉरंट्समध्ये अगदी फ्रेश सी-फूडचा आस्वाद जरूर घ्या. भारतीय जेवणाची आवड केवळ लंडनपुरतीच मर्यादित नाही हे ओबन सारख्या छोट्या शहरातसुद्धा इथल्या भारतीय रेस्टॉरंट्सना पाहिलं की जाणवतं. ओबन शहर हे स्कॉटलंडच्या
हेब्रिड्ज बेटांच्या समूहाला भेट देण्यासाठी उत्तम ठरते. ‘आईल ऑफ मल’आणि ‘आईल ऑफ स्काय’ ही इनर हेब्रिड्ज आयलंड्स मधली काही प्रसिद्ध बेटं आहेत. तसेच ओबन आणि एरिस्काच्या उत्तरेकडे पश्चिमेकडच्या स्कॉटिश हायलंड्सच्या फोर्ट ‘विलियम बेन नेविस’, ‘ग्लेन नेविस’ व ‘ग्लेन को’ ह्या सर्व प्रसिद्ध आकर्षणांना अगदी आरामात एका दिवसात भेट देता येते. इथेच फोर्ट विलियम ते मलेगपर्यंत ‘जॅकोबाइट एक्सप्रेस’ही सीनिक स्टीम ट्रेन चालते जी हॅरी पॉटरमुळे ‘हॉगवर्टस् एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध झाली. ग्लासगो किंवा एडिनबरामधून आपला स्कॉटलंडचा प्रवास सुरू होतो. इथून आपण स्कॉटिश हायलंड्स, सुप्रसिद्ध ‘लॉक लोमाँड’ किंवा ‘लॉक नेस’ या लेक्स किंवा एरिस्कासारख्या एखाद्या स्कॉटिश आयलंडवर वास्तव्य करून आपला स्कॉटलंड हॉलिडे पूर्ण करू शकता. प्रवासात इथल्या अनेक कॅसल्सपैकी बॉलीवूड सिनेमांमध्ये गाजलेल्या एकसेएक कॅसल्सना भेट द्या, स्कॉटिश बॅगपाईप्स ऐका व जगातल्या एका प्रगत देशात आजही मानवी अतिक्रमणापासून वाचलेल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या. पहिल्याच भेटीत स्कॉटलंड हे कायमचं तुमच्या मनात घर करून राहिल. माझं सुद्धा तेच झालं. आजही डोळे मिटताच डॅफोडिल्स दिसतात आणि कवितेच्या शेवटच्या दोन ओळी आठवतात...
And then my heart with pleasure fills,
And dances with the daffodils.
-William Wordsworth
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.