IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

विंडोज ऑफ द वर्ल्ड

9 mins. read

केवळ खिडकीतून दिसणार्‍या पॅनोरमिक व्ह्यूसाठीच ती ‘खिडकी’ मला खूप आवडते असं नाही, तर कधी कधी ती ‘खिडकी’च इतकी सुंदर असते की खिडक्यांचेच फोटो काढावेसे वाटतात. तर काहीवेळा ही ‘खिडकी’च आपल्या हॉलिडेमधलं एक ‘बेस्ट साइटसिईंग’ ठरते. अनेकवेळा आपला हॉलिडे कसा होणार हे हॉटेलची ‘खिडकी’ ठरवते असे म्हणायला हरकत नाही.

हॉटेलमध्ये आम्ही चेक-इन केले आणि रूम्सकडे निघालो तेव्हा मला जरा घामच फूटला. पर्यटकांसाठी सर्व ट्रॅव्हल अरेंजमेंट्स करणे अगदी सोपे असते, पण जेव्हा आपल्या घरच्याच मंडळींसाठी हॉटेल बुकिंगसारखी नित्याची कामं करायची असतात तेव्हाही दहावेळा विचार करावा लागतो. त्यात आपल्या कुटुंबातला प्रत्येकजण, ‘ट्रॅव्हल एक्सपर्ट आणि वीणा वर्ल्डचा डायरेक्टर’असला की विचारायलाच नको. वीणा आणि नीलला त्यांच्या रूम्सच्या चाव्या देत मी माझ्या रूमवर सामान घेऊन पोहोचले. त्यांना नक्की रूम आवडेल नं!, हाच विचार सारखा माझ्या मनात घोळत होता. बॅग्ज् अनपॅक करून तयारी करता-करता फोनवर इन्स्टाग्रामचे नोटिफिकेशन दिसले. तेव्हा तिथे लंडन शहराच्या स्कायलाईनचा सुंदर फोटो आणि ‘द कूलेस्ट व्ह्यू’ अशी नीलची इन्स्टाग्राम पोस्ट बघून बरे वाटले. नव्या पिढीच्या ह्या आधुनिक कम्युनिकेशनच्या माध्यमाद्वारे नीलला रूम आवडल्याचे कळले. तेवढ्यात वीणाचा व्हॉट्स अ‍ॅप मेसेज बघितला, ‘वॉव! नाईस रूम अ‍ॅन्ड ग्रेट व्ह्यू’. तिच्या रूममधून समोरच लंडनच्या प्रसिद्ध हाईड पार्कचा व्ह्यू होता. रूममधून थेट दिसणारी ती हिरवळ डोळ्यांना सुखद वाटत होती. ‘आता खिडकीचे पडदे बंद करून बसायची गरज नाही. आणि आता रूममध्ये बसल्या बसल्या ऑफिसचे कामसुद्धा उत्तम प्रकारे करता येईल’, असा तिचा मेसेज वाचून माझा जीव भांड्यात पडला. आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहतो तेव्हा त्या रूमचे इंटिरियर डेकोरेशन, तिथले बाथरूम, तिथला बेड ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतातच,पण तितकीच महत्त्वाची असते ती म्हणजे ‘हॉटेलच्या रूमची खिडकी आणि त्या खिडकीतून दिसणारा नजारा’.

आपण केवळ एक-दोन दिवसांचा मुक्काम करत असलो, तरीसुद्धा आपल्या रूमसमोर कुणा दुसर्‍या इमारतीची भिंत किंवा इतर लोकांची हॉटेल रूम दिसत असेल तर आपल्या वास्तव्यापुरते खिडकीचे पडदे बंद करुन राहण्याशिवाय गत्यंतर नसतं. पण त्याऐवजी खिडकीतून एखादे सुंदर दृश्य दिसत असेल तर पडदे बंद करण्याची गरजच भासत नाही. अनेकवेळा आपला हॉलिडे कसा होणार हे हॉटेलची खिडकी ठरवते असे म्हणायला हरकत नाही. तर काहीवेळा ही खिडकीच आपल्या हॉलिडेमधलं एक बेस्ट साइटसिईंग ठरतं. ऑस्ट्रेलिया हॉलिडेवर निघालेल्या आमच्या एका मित्राने खास मागणी केली की, ‘सिडनी शहरात असे हॉटेल निवड, जिथल्या खिडकीतूनच मला हार्बर ब्रिज व सिडनी ओपेरा हाऊस बघता येईल. एकतर मला चालायचा कंटाळा आहे आणि मुंबईत आराम मिळत नाही त्यामुळे हॉलिडेवर भरपूर आराम करायचा आहे. पण आपण ऑस्ट्रेलियामध्ये आहोत या गोष्टीची जाणीवसुद्धा झाली पाहिजे’. अशीच हनिमून किंवा अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी निघालेल्या जोडप्यांची मागणी असते की, ‘आम्हाला रूममधूनच आयफेल टॉवर पाहता आला पाहिजे’. योग्य हॉटेल निवडल्यास आपल्या हॉटेल रूम्सच्या खिडकीतूनच इतका सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो की आपण रूममध्येच ब्रेकफस्ट मागवून त्या व्ह्यूचा पुरेपूर आनंद अगदी आरामात घेऊ शकतो. म्हणूनच मला वाटू लागलंय नव्हे खात्रीच पटलीय की, ‘आपल्या हॉटेल रूमची खिडकी चांगली असली की हॉलिडे उत्तम होणारंच’.

केवळ खिडकीतून दिसणार्‍या पॅनोरमिक व्ह्यूसाठीच ती खिडकी मला खूप आवडते असं नाही, तर कधी कधी ती खिडकीच इतकी सुंदर असते की खिडक्यांचेच फोटो काढावेसे वाटतात. युरोपमध्ये बर्‍याचठिकाणी पण त्यातल्या त्यात उल्लेख करावं, अशा स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये फिरताना अनेक घरांच्या खिडक्या इतक्या सुंदर दिसतात की कौतुक करावे तेवढे थोडे. मुख्यत: थंडीनंतर वसंत ॠतुत व उन्हाळ्यात इथल्या प्रत्येक लाकडी खिडकीवर जणू निसर्गाच्या रंगांची उधळण झालेली दिसते. विंडो बॉक्सेसमध्ये सुंदर अरेंजमेंट करून, दोन-तीन रंगांची फुले लावून, घरे व इमारती सुशोभित केलेल्या या देशांमध्ये दिसतात. बहुतेक खिडक्यांना लाकडी शटर्स असतात, जे अनेक आकर्षक रंगांनी रंगविलेले असतात. जुन्या व नवीन बिल्डिंग्स्वर या विविध रंगांनी नटलेल्या खिडक्या व तिथे लावलेली फुले अगदी मनमोहक वाटतात आणि अनेकांना फोटोग्राफीसाठी प्रवृत्त करतात. गंम्मत म्हणजे, विंडो बॉक्सेस ठेवण्याची रीत ही रोमन काळापासून सुरू झाली. आर्थिकरित्या गरीब असलेल्या लोकांनी आपल्या कुटुंबासाठी भाज्या, औषधी वनस्पती इ.उगविण्यासाठी ह्या विंडो बॉक्सेसचा प्रयोग सुरू केला. यांची घरं लहान असल्याने श्रीमंत लोकांसारखं घराला अंगण नसायचं, त्यामुळे आपली गार्डनची इच्छा त्यांनी असे विंडो बॉक्सेस लावून पूर्ण केली. काळाच्या ओघात भाज्यांची जागा फुलांनी घेतली आणि आजसुद्धा ह्या खिडक्या युरोपमधील एक महत्त्वाचं वैशिष्ठ्य ठरतात.

खिडकीचे महत्त्व आपल्याला युरोपमध्ये फिरताना ठीक-ठिकाणी जाणवते. खासकरून इंग्लंड, स्कॉटलंड आणि फ्रान्सच्या इतिहासातसुद्धा खिडकीने फार महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. तिथे फार पूर्वी एखाद्या व्यक्तीची श्रीमंती घरातल्या खिडक्यांवरून ठरवली जात असे. साधारण १७व्या शतकात किंग विलियम III ने विंडो टॅक्सची अंमलबजावणी केली. इनकम टॅक्स भरण्याची लोकांची तयारी नव्हती हे ओळखून प्रत्येकाला घरातल्या खिडक्यांवरून टॅक्स लावण्यात आला. साधारण दहा खिडक्यांच्यावर घरातल्या इतर खिडक्यांवर टॅक्स लागू होत असे. हा टॅक्स चूकवण्यासाठी अनेक बिल्डिंग्स्मध्ये खिडक्यांवर विटांचे बांधकाम केलेलेसुद्धा दिसते. एका

‘बंद खिडकीची’ आख्यायिका इथे मला आवर्जून सांगाविशी वाटते ती अशी की, रोममध्ये ट्रेवी फाऊंटनच्या बिल्डिंगमध्ये आपल्याला एक खोटी रंगविलेली खिडकी दिसते. असे म्हणतात, की एका प्रसिद्ध घराण्यातल्या युवकाने इथून आत्महत्या केली आणि या खिडकीत लोकांनी भूत बघितल्याचे वर्णन केले, तेव्हा खिडकी कायमची बंद करून त्या बिल्डिंगचा लूक मेंटेन करायला त्यावर खिडकीचे चित्र काढले गेले. युरोपमध्ये फिरताना आपल्याला हे सुद्धा जाणवते की, एखाद्या बिल्डिंगच्या खालच्या मजल्यावरील खिडक्या मोठ्या आहेत व वरच्या मजल्यांवर खिडक्या लहान आहेत. त्या काळात ‘लिफ्ट्स’चा शोध लागला नव्हता, त्यातच घराचे गार्डन आणि अंगण ह्यांना समृद्धीचं लक्षण मानलं जायचं, त्यामुळे खालच्या मजल्यांना जास्त महत्त्व असायचं, तर वरच्या खोल्या ह्या घराची देखभाल करणार्‍या व्यक्तींना दिल्या जायच्या. ह्याच अनेक हेरिटेज इमारतींचं आज हॉटेल्समध्ये रूपांतर झालंय. ह्या हेरिटेज हॉटेल्सना लिफ्ट्स लागल्या आहेत पण हेरिटेज लूक जपण्यासाठी पूर्वीच्या बांधकामात मात्र बदल केलेला नाही. अजूनही खालच्या मजल्यावरील खिडक्या आकाराने मोठ्या व वरच्या मजल्यावरील खिडक्या लहानच दिसतात. आज आपल्याला टॉप फ्लोर किंवा हायर फ्लोर्स मागण्याची सवय आहे. पण हेरिटेज् हॉटेल्समध्ये राहताना मात्र वरच्या मजल्यापेक्षा खालचे मजले कधी कधी योग्य ठरतात ते ह्याच कारणामुळे.

आपण युरोपला भेट देतो तेव्हा अनेक वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहण्याचा योग येतो. जेवढी वेगळी हॉटेल्स तेवढ्या वेगळ्या पद्धती आणि तितक्याच वेगवेगळ्या खिडक्या. आधुनिकीकरणानेसुद्धा या खिडक्यांमध्ये विविधता आणली आहे. स्वित्झर्लंडच्या खिडक्या आतल्या बाजूला उघडतात तर इंग्लंडमधल्या बाहेरच्या बाजूला. काही खिडक्या उघडण्यासाठी वर ओढाव्या लागतात तर काही तिरक्या उघडतात. ‘टिल्ट-टर्न’ म्हणजेच तिरक्या खिडक्या पहिल्यावेळी उघडताना, ‘आपण ही खिडकी तोडली का? आणि हॉटेलचे नुकसान केले का?’ असे भितीवजा प्रश्‍न पडणे साहजिक आहे. ‘ही खिडकी परत बंद तर होईल ना?’, ही पुढची काळजी. पण ह्या ‘टिल्ट टर्न’ खिडक्या हवा खेळती राहण्यासाठी उत्तम ठरतात आणि बर्‍याच ऑफिसेस आणि घरांमध्येसुद्धा वापरल्या जातात, कारण त्यातून वारा सोडून इतर काही आत येऊ शकत नसल्याने अगदी बिनधास्त खुल्या ठेऊन जाता येते.

अ‍ॅम्सटरडॅमच्या कॅनलभोवती बांधलेल्या घरांमध्ये तर बर्‍याचवेळा खिडकीतून फर्निचरसारखे मोठे सामान आजसुद्धा घरात घेतले जाते. जुन्या काळात अरूंद जिन्यावरून सामान वरच्या मजल्यावर नेणे अशक्य होते. ह्याचा सोपा मार्ग म्हणजे, अ‍ॅम्सटरडॅमच्या घरांवर लावलेल्या ‘पुलीज्’वरून दोरी टाकून खिडकीतून सामानाची चढ-उतार करायचे, आजसुद्धा अशापद्धतीने सामानाची चढ-उतार करताना लोकं दिसतात. अ‍ॅम्सटरडॅमच्या खिडक्या बर्‍याच मोठ्या असल्या तरी सौंदर्याचे प्रतिक समजल्या जातात, त्या ‘ फ्रेंच विंडोज् किंवा फ्रेंच डोर्स’. एका दाराला संपूर्ण काच लावून भल्या मोठ्या फ्रेंच विंडोज् तयार झाल्या. सोळाव्या-सतराव्या शतकात फ्रान्स व इटलीचे युद्ध झाल्यावर इटलीवरून रेनेसॉन्स आर्टबरोबर काही रेनेसॉन्स आर्किटेक्चरसुद्धा फ्रेंच लोकं घेऊन आले, त्यातलीच एक खासियत म्हणजे हे ‘फ्रेंच डोर्स’. इलेक्ट्रिसिटीचा शोध लागण्यापूर्वी, घरात दिवसा पडलेला काळोख घालविण्यासाठी ‘फ्रेंच विंडोज् किंवा फ्रेंच डोर्स’परफेक्ट ठरले. आजसुद्धा घराला फ्रेंच डोर्स असले तर ते घर स्टायलिश समजले जाते.

खिडकीचे व दाराचे संगम उत्तम ठरते, पण माझी सर्वात आवडती खिडकी फिनलँडमधल्या सारिसेल्का भागातल्या काक्सलाउतानेन आर्क्टिक रीसॉटर्समध्ये दिसते. दार काय, इथे चक्क आपल्या रूमचे छतच एक मोठी खिडकी आहे. ऑक्टोबर ते मार्चदरम्यान फिनलँडच्या ह्या आर्क्टिक भागात नॉर्दन लाईट्स बघायला मिळतात. तेव्हा बोचर्‍या थंडीपासून सुरक्षितपणे आणि अगदी आरामात आपल्या बेडवर पडूनच नॉर्दन लाईट्स बघण्याची संधी ही इथल्या ग्लास इग्लूस्च्या काचेच्या छतामुळे मिळते.

काही वेळा खिडकीचे काम हे आपल्याला निसर्गाच्या अतिरेकी हवामानापासून वाचवण्याबरोबरच, आपल्याला करावा लागणारा अति आणि अनावश्यक खर्च वाचवणे हे सुद्धा असतं बरं का! लंडन, न्यूयॉर्क, पॅरिसमधल्या लक्झरी मॉल्स व दुकानांमध्ये डिस्प्लेसाठी प्रसिद्ध असलेल्या शॉप विंडोज्बाहेर उभे राहून विंडो शॉपिंग करण्यातसुद्धा एक अनोखा आनंद आहे. प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची गरज नसताना त्या वस्तूंची सुंदर मांडणी बघणे हे सुद्धा एक स्थलदर्शन ठरले आहे. लंडनच्या सेल्फरिजेस्, हॅरड्ससारख्या दुकानांच्या खिडक्यांचे ख्रिसमस डेकोरेशन पाहण्यासाठी जगभरातून लोक गर्दी करतात.

दुकानांच्याच नव्हे तर ट्रेन, बस, क्रुझ ह्या सर्वांच्या पॅनोरमिक विंडोजची डिमांड आहे. स्वित्झर्लंडच्या सीनिक ट्रेन्स असो, करिबीयन क्रुझ असो किंवा युरोपमधली रीव्हर क्रुझ असो, आपण कर्म्फटेबल राहून आपल्याभोवती जग बदलताना पाहतो ते ह्या पॅनोरमिक खिडक्यांमधूनच! राजस्थानी झरोक्यांमधून तर पुरातन काळात महिला स्वत:ला न दाखवता सर्वकाही पाहू शकत होत्या. हे झरोके उन-पावसांपासून संरक्षण करतच होते, शिवाय शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठीसुद्धा उपयोगी ठरायचे. अतिशय बारीक कोरीव कामाने हे झरोके त्यांच्या पॅलेसेस व हवेलींचे सौंदर्य नक्कीच वाढवतात.

आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाप्रमाणे तिथल्या खिडकीतून आपण निसर्गसौंदर्य, स्थलदर्शनाचे ठिकाण, लोकल्स व त्यांचे आयुष्य ह्या सर्व गोष्टींची झलक पाहू शकतो. ‘विंडो’ या इंग्रजी शब्दाचा उगम हा प्राचीन स्कॅन्डिनेव्हियन नॉर्स भाषेतील शब्द ‘विनदाऊगा म्हणजेच ‘आय ऑफ द विंड’पासून झाला आहे.

सो, लेट्स डिस्कव्हर द वर्ल्ड थ्रू दीज् आईज्!

October 28, 2018

Author

Sunila Patil
Sunila Patil

Sunila Patil, the founder and Chief Product Officer at Veena World, holds a master's degree in physiotherapy. She proudly served as India's first and only Aussie Specialist Ambassador, bringing her extensive expertise to the realm of travel. With a remarkable journey, she has explored all seven continents, including Antarctica, spanning over 80 countries. Here's sharing the best moments from her extensive travels. Through her insightful writing, she gives readers a fascinating look into her experiences.

More Blogs by Sunila Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top