जुलेय... सुंदर, मनमोहक, निसर्गरम्य... अणि बरंच काही. भारताच्या सर्वात उत्तरेकडे लपलेल्या ह्या हिऱ्याबद्दल बोलताना प्रवास प्रेमींना विशेषणं कमी पडू लागतात. पूर्वी जास्त करून विदेशी पर्यटकांकडून Explore केला जाणारा हा प्रांत Bollywood अणि social media मुळे बहूसंख्य भारतीयांचे पसंतीचे पर्यटन स्थळ बनला. Bike Riders चे नंदनवन असेलेला हा दूर्गम आणि थंड हवेचा प्रदेश.
मी एका अश्या ठिकाणाबाबत बोलतोय जिथे निसर्गाने स्वताचेच नियम धाब्यावर बसवलेत. एक अनोखा भूभाग जो हिमालयातील बाकी निसर्गरम्य प्रदेशापेक्षा खूप आगळावेगळा आहे. त्याला म्हणतात The Land of high passes - लडाख.
लडाख ला पडलेलं असे नाव हे तिथे असलेल्या High Altitude Passes मुळे आहे, जे जम्मू आणि काश्मीर राज्यांतील अनेक ठिकाणांना आणि बाकीच्या राज्ज्यांना जोडतात. लेह ला पहाटे पोचणारे विमान घेतल्यास मनमोहक सूर्योदय बघायला मिळतो. सूर्यकिरणांनी लखाकून उठलेले बर्फाच्छदित पर्वत आकाशातून बघणं हा मी घेतलेला आत्तापर्यंतचा एक अतिशय अविस्मरणीय अनुभव होता.
शांती स्तुप, लेह पॅलेस, मॅग्नेटिक हिल, इंडस-झंस्कार नद्यांचा संगम, Hall Of Fame Museum ही प्रमुख आकर्षणं असून ठिकसेय, Spituk, Shey ह्या मोनॅस्टरी पर्यटकांना मनमोहीत करतात. इंडस-झंस्कार या येथील दोन प्रमुख नद्यांचा संगम हे एक अतिशय लोकप्रिय आकर्षण असून त्याचा फोटो काढणं हे तुमच्या To Do लिस्ट चा भाग असलाच पाहिजे. दोनिही नद्यांच्या पाण्याचा विभिन्न रंग अचानक एक होऊन एक तिसराच रंग पुढील प्रवाहाला येतो. हे ठिकाणं रिव्हरराफ्टिंग साठी प्रसिद्ध असल्याने Adventure Sports प्रेमींसाठी महत्वाचं ठरतं. उथळ प्रवाहांमध्ये आणि बर्फाऐवढ्या थंडगार पाण्यात रिव्हरराफ्टिंग करताना तुमची Adrenaline Rush पूर्णपणे Satisfy होते. धीम्या प्रवाहात आल्यावर आम्हाला ट्रेनरनी नदीमध्ये पोहायची परवानगी दिली. पाणी बर्फाइतके थंड असल्याने हा एक चित्तथरारक अनुभव ठरला.
[gallery type="slideshow" link="none" size="full" ids="5539,5537,5536,5535,5541"]
लेह मध्ये सूर्यास्त पहायचा असेल तर तो शांती स्तूप येथून पहावा. शहरापासून जवळ एका टेकडीवर बांधलेल्या ह्या पांढऱ्याशुभ्र स्तूपावर आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या तेथील बुद्ध मूर्तीवर मावळत्या सूर्याची किरणे पडली की त्याची सुंदरता अजून उठून दिसते. आजुबाजूला डोंगररांगा, लेह शहराचा panaromic view, शांतता, वारा अणि सूर्यास्ताचे गुलाबी केशरी रंग अश्या रमणीय वातावरणात आमच्या मित्रांच्या गप्पाही चांगल्याच रमल्या. Hall of Fame Museum मधील भारतीय सैनीकांच्या पराक्रमाच्या गाथा ,छायचित्रे ,पाक सैन्याची जप्त केलेली शस्त्रास्त्रे बघताना अंगावर काटा येतो आणि बर्फाच्चदीत डोंगरांच्या कॅनवास समोर उभ्या असलेल्या आपल्या तिरंग्याला वंदन करताना छाती अभिमानाने भरून येते.
पुढे प्रवास सुरू होतो तो बर्फाचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुब्रा व्हॅलीकडे. नुब्रा व्हॅली ला जगातला सगळ्यात उंचीवरचा रस्ता खारदूंग ला Pass वरून जातानाचा प्रवास संस्मरणीय आहे. उत्तुंग पर्वत रांगा, वळणावळणाचे रस्ते, आणि रुक्ष उजाड जमीन असे वाळवंटी सौंदर्य अनुभवास येतं. प्रचंड अफाट निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत याचाही प्रत्यय येतो. खारदूंग ला Pass Photostop ला बर्फ वृष्टीचा अनुभव येण्याची शक्यता असते.
नुब्रा व्हॅली मध्ये शिरताना एक चित्तथरारक अनुभव आम्हाला आला. अचानक वादळी वातावरण होऊन थोडा पाऊसही पडू लागला. नुब्रा खोऱ्यातून नुब्रा नदी वाहते त्याच्या भोवती वाळवंट आहे. वादळी हवेमुळे तेथील वाळू उडून जणू आकाशाला मिळाली होती. मुळात वाळवंटात नदी ही कल्पनाच किती विलक्षण. निसर्गाने स्वतःचा नियम सिद्ध करताना दिलेला तो जणू अपवादच होता. असं हे कधी न पाहिलेलं दृश्य बघत आम्ही Sand Dunes ला पोचलो ते Double Humped उंटांच्या सफारीसाठी. हुंदर गावाजवळ हे Sand Dunes असून तेथील Diskit मोनॅस्टरी आणि १०६ फूट उंचीचा मैत्रेयी बुद्धाचा पुतळा ही येथील आकर्षणाची स्थळं. पॅनामिक भागात गरम पाण्याचे झरे आहेत. थंड वातावरणात ह्या औषधी झऱ्यांच्या पाण्यात स्नान करण्याची मजा काही वेगळीच. शिवाय येथून २ तासांच्या अंतरावर असलेले तुर्तुक गाव हे भारत पाकिस्तान सीमेवरील भारताचे शेवटचे गाव आहे.
तिथून पुढे आमची स्वारी निघाली आमच्या सहलीच्या सगळ्यात संस्मरणीय भागाकडे. वाळवंटातील मृगजळासारखं, डोळ्याचं पारणं फेडणारा पॅनगॉन्ग त्सो. येथे पोचताना आजूबाजूला निसर्गाची विलक्षण विविधता पाहायला मिळते. हिमाच्छादित शिखरं, छोट्या मोठ्या तपकिरी मातकट रंगांच्या टेकड्या, धो-धो वाहणाऱ्या नद्या, गवताची कुरणे, आणि तिथे चरणाऱ्या याक अश्या विविध द्रूष्यांमधून अचानक पॅनगॉन्ग त्सो च्या निळ्याशार पाण्याचा तुकडा तुम्हाला दिसू लागतो. हे दृश्य मी शब्दांमध्ये व्यक्त करू नाही शकत पण तेव्हा योगायोगाने आमच्या गाडीत लागलेल्या पेह्ली नजर मे कैसा जादू कर दिया हे गाणं त्या भावनांच्या जवळपास पोचू शकतं. हा तलाव पृथ्वीवरील सर्वात उंचीवरचा आणि मोठा तलाव असून त्याच्या अजस्रतेची कल्पना आपण करूच शकत नाही. नजर जाईल तिथपर्यंत न संपणारा, गर्द निळ्याशार पाण्याचा तलाव, शिवाय पाठी टेकड्यांची आणि श्वेतढगांची बॅकग्राऊंग असेलेला असा हा पॅनगॉन्ग त्सो चा देखावा हा स्वर्गीय अनुभवच म्हणावा लागेल. येथील सूर्यास्त आम्ही सर्व कधीच विसरू नाही शकणार.
अश्याच आणखीन एक तलावाला आम्ही भेट दिली जो अजून फार लोकांकडून explore केला जात नाही. “त्सो मोरिरी”. येथे पोचताना त्सो कार सारखे काही छोटे पण सुंदर तलाव पाहायला मिळतात. त्सो मोरिरी ही अतिशय लांब वर पसरलेला गोड्या पाण्याचा तलाव असून त्याच्या आजूबाजूला अनेक हिमाच्छादित शिखरे दिसतात. अश्या ह्या शिखरांच्या पुढे तलावाच्या वर इंद्रधनुष्याचे रंग अचानक प्रकटले आणि माझ्यासारख्या फोटोग्राफी प्रेमींसाठी एक बहुमोल छायाचित्र काढण्यासाठी पर्वणीची निर्माण झाली. या दोनीही तलावांजवळ Hotels नसल्याने तंबू मध्ये राहण्याचा अनुभव तुम्हाला मिळतो.
लडाख जसा सुंदर आहे तसा कठीण पण. म्हणून येथे काही काळजी घेणं तेव्हढंच आवश्यक असतं. भुसपाटीपासून खूप उंचीवर असल्यामुळे इथे पोचल्यावर oxygen ची कमी जाणवते. म्हणूनच पाहिल्या दिवशी आराम करून तेथील हवेला acclimatize होणं फारच महत्वाचं आहे. High Altitude चा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही प्रवास श्रीनगर वरून सुरु करू शकता. सोनमर्ग वरून कारगिल मार्गे लेह ला जाण्याचा महामार्ग खूपच सुंदर. शिवाय जास्त दिवस वेळ असलेले पर्यटक त्सो मोरिरी अथवा लेह वरून हिमाचल प्रदेशात जाऊ शकतात. रोहतांग पास वरून मनालीला जायच्या आधी वाटेत जिस्पा या गावात तुम्ही एक रात्र वास्तव्य करू शकता. स्वित्झर्लंड मधील छोट्या गावासारखाच हे गाव. लेह मधून हिमाचल मध्ये जाताना आजूबाजूला बदलणारी भौगोलिक परिस्थिती हे या प्रवासाचं वैशिष्ठ म्हणावं लागेल. दूर्गम वाळवंटातून हिरव्यागर्द दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवेश घेताना तुमचं मन प्रसन्न होतं.
परदेशातील निसर्गसौंदर्य पाहणे हे तुमच्या बकेट लिस्ट वर असेलच पण त्या आधी आपल्याच देशात असलेल्या या जगावेगळ्या भूभागाला नक्की भेट द्या. बौद्ध धर्माच्या शांतिमय वातावरणात वसलेला हा नैसर्गिक विविधतेने नटलेला प्रदेश तुम्हाला आयुष्यभराची आठवण देईल एवढं मात्र नक्की.
आणि मग तुम्हीही म्हणाल ... जुलेय लडाख..!!!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.