हनिमून या शब्दाचा अर्थ लागतो तो ५व्या शतकापासून सुरू असलेल्या एका प्रथेमुळे. आज हनिमूनसाठी भारतात व भारतापलिकडे जगभरात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण काही ठिकाणे इतकी सुंदर आहेत की फक्त हनिमूनसाठीच नव्हे तर कधीही, कुठल्याही सेलिब्रेशनसाठी कपल्सना तिथे जायला नक्की आवडेल. काही ठिकाणांच्या हवेतच प्रेमाची नशा असते. तिथे पोहोचताच आपणसुद्धा सहज म्हणून जातो की लव्ह इज इन द एअर. यापेक्षा रोमँटिक हॉलिडे दुसरा कोणता ठरेल बरं!
हयुनोत्समनाथर हा प्राचीन स्कॅन्डिनेव्हियामधल्या नॉर्डिक भाषेतला शब्द, उच्चारही करता येणार नाही अशा ह्या जड शब्दाचा अर्थ आहे हनिमून. अर्थात कैक वर्षांपूर्वी हनिमूनचा अर्थच काहीसा वेगळा असायचा. नॉर्डिक लोकं म्हणजेच प्राचीन स्कॅन्डिनेव्हियातील लोकं ही मुळातच वॉरियर्स. बोटी बांधून ही मंडळी जगावर राज्य करायला निघाली होती,मग लग्न जमवायचे असेल तर कुणाची संमती कशाला घ्यायला हवी? लग्न करायचा विचार मनात येताच एखादा युवक निघायचा मुलीच्या शोधात. मग शेजारच्या गावात जाऊन आवडेल त्या मुलीचे चक्क अपहरण करून तिला पळवली जायची. घोड्यावर सवार होऊन आपल्याला आवडेल ती मुलगी पळवणे ह्यापासूनच बहुतेक Sweeping her off her feet हा इंग्रजी वाक्यप्रचार आला असावा. आता पळवलेल्या आपल्या जीवनसाथीला आपल्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने लपविले जायचे. मुलीच्या घरच्या मंडळींकडून तिचा शोध थांबला की मग त्यांच्या संसाराला सुरुवात व्हायची. हा शोध सुरू असलेल्या काळाला ह्युनोत्समनाथर किंवा हनिमून म्हणून ओळखले जायचे. नशीबाने ही प्रथा नाहीशी झाली आणि हनिमून हा काळ खरंच नवरा-नवरीने एकमेकांशी नीट ओळख करून घेण्याचा कालावधी म्हणून हळूहळू प्रचलित होऊ लागला. १९व्या शतकाच्या सुरुवातीला तर ब्रिटनमध्ये ही ओळख नवरा-नवरीपूर्ती मर्यादित न ठेवता लग्नात हजर न राहू शकलेल्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी नवीन नवरीची व्यवस्थित ओळख करून देण्यासाठी टूरचे आयोजन केले जायचे. लग्नानंतरचे असे हनिमून नक्कीच कुठल्याही नवरीला हवेहवेसे वाटणे कठीण आहे. हनिमून या शब्दाचा अर्थ लागतो तो ५व्या शतकापासून सुरू असलेल्या एका प्रथेमुळे. तेव्हा बॅबीलोनियन कॅलेंडर वापरले जायचे जे चंद्राच्या लुनर सायकलवर आधारित होते. चंद्र आपले भ्रमण पूर्ण करेपर्यंतच्या या एका संपूर्ण महिन्यात लग्न झालेले जोडपे मधाच्या एका प्येयाचे सेवन करीत असे,जे एक प्रेमाचे प्रतिक समजले जायचे आणि ह्याचे सेवन केल्याने एका सुंदर सुदृढ बाळाच्या जन्माची शाश्वती मिळायची. ह्या सर्व पद्धती काळाच्या ओघात मिटल्या आणि आपल्या ओळखीच्या हनिमूनची कल्पना प्रसिद्ध होऊ लागली. लग्नात होणारी दमछाक आणि थकवा घालविण्यासाठी सर्व जगापासून लांब जाऊन आपले स्वतःचे जग तयार करण्याच्या ह्या गुलाबी वेळेला आज हनिमून म्हटले जाते. आणि ही केवळ हौस नसून गरजच समजावी, कारण काही केल्या ही वेळ आपल्या आयुष्यात परत येणार नाही.
आज हनिमूनसाठी भारतात व भारतापलिकडे जगभरात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण काही ठिकाणे इतकी सुंदर आहेत की फक्त हनिमूनसाठीच नव्हे तर कधीही कपल्सना तिथे जायला नक्की आवडेल. काही ठिकाणांच्या हवेतच प्रेमाची नशा असते. तिथे पोहोचताच आपणसुद्धा सहज म्हणून जातो की ल इज इन द एअर. असेच एक अतिशय सुंदर डेस्टिनेशन म्हणजे ब्रुजेस. युरोपातल्या फ्रान्स आणि नेदरलँडस्ला लागून बेल्जियम देशातले हे छोटेसे शहर. हे संपूर्ण शहरच इतके रोमँटिक आहे की इथे फिरताना या शहराच्या प्रेमात न पडणे अशक्यच आहे. मखमली हिरवेगार गवताचे गालिचे, हिरवीगार झाडे, त्यावरून लोंबणार्या झाडांच्या वेली, शहराची सैर करण्यासाठी असलेली चार्मिंग-ट्रेडिशनल राजेशाही घोडागाडी व ऐकू येणारे घोड्यांच्या टापांचे आवाज तसंच इथे शहरांच्या वॉटर सिस्टमला बांधून तयार केलेले अनेक कॅनल्स व त्यामधली बोटीची सैर हे सगळे स्वप्नवतच वाटते. इथल्या मिनेवॉटर पार्कला भेट द्यायलाच हवी कारण इथे आहे ब्रुजेसचं लेक ऑफ लव्ह. सभोवती हिरव्यागार झाडांनी सजलेलं हे लेक, त्यात पोहणारे पांढरेशुभ्र हंसांचे कळप व त्यावरचा लव्हर्स ब्रिज हा हनिमूनसाठी परफेक्ट ठरतो. या लेकशी सबंधित मीना नावाच्या मुलीची प्रेमकथा आहे. आपल्या प्रियकराशी लग्न करायची परवानगी वडिलांकडून न मिळाल्याने मीना पळून गेली व तिच्या प्रियकराला या लेकमध्ये ती थकून अंतिम श्वास घेताना सापडली व या लेकला लेक ऑफ लव्ह या नावाने ओळखले जाऊ लागले. बेल्जियमजवळच फ्रान्सची राजधानी पॅरिस तर मोस्ट रोमँटिक सिटी इन द वर्ल्ड म्हणून जगभर प्रसिद्द आहे. इथले कॉबल्ड स्टोन रस्ते, छोट्या-छोट्या गल्ली बोळांमधली ट्रेडिशनल दुकाने, पार्कस्, कॅबरे शो, रिव्हर क्रुझ, पॅलेस हॉटेल्स, जगप्रसिद्द म्युझियम्स व पेंटिंग्स्, अनोखे रेस्टॉरंट्स, सुंदर इमारती आणि पॅरिसचेच नाही तर संपूर्ण युरोपचे प्रतिक बनलेले आयकॉनिक आयफेल टॉवर, रात्री होणारी शहराची सुंदर रोशणाई या सर्व गोष्टींमुळे पॅरिसला जगातल्या सर्वात रोमँटिक शहराचे मुकूट अनेक वर्ष घातले जातेय. तुमच्या पॅरिसीयन रोमँटिक हॉलिडेवर सीन नदीवर डिनर क्रुझ अविस्मरणीय ठरेलच पण आपण चक्क आयफेल टॉवरवरसुद्दा जेवणाचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता. आयफेल टॉवरला बघत आपली सकाळ, संध्याकाळ रंगवायची असेल तर इथल्या लक्झरी हॉटेल शांग्री-ला मधल्या आयफेल व्ह्यू रूम्सची निवड करा. यापेक्षा रोमँटिक हॉलिडे दुसरा कोणता ठरेल बरं? इथल्या रूफ टॉप स्वीट रूमला जोडलेल्या टेरेसमध्ये फ्रेंच शॅमपेनबरोबर आयफेलची रोशणाई बघत प्रत्येक हॉलिडे एक रोमँटिक हनिमूनच बनेल. पॅरिसमधली आपली संध्याकाळ अविस्मरणीय करण्यासाठी नेहमी पैसे मोजावे लागत नाहीत. सीन रिव्हरच्या काठी फिरायला निघा आणि इथे घडणार्या टँगो डान्सची मजा लुटा. उन्हाळ्यात सीन रिव्हरच्या काठी अनेक लोकल्स एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोमँटिक टँगो डान्स करताना दिसतात. आपल्याला टँगो डान्स आवडत असल्यास आपण आपल्या पार्टनरसोबत त्यात सहभाग घेऊ शकतो किंवा पायर्यांवर बसून वाईन ग्लास हातात धरत हा डान्स बघून लोकल्सचे कौतुक करीत एक अनोखी संध्याकाळ एन्जॉय करू शकतो. पॅरिसमध्ये काही ठिकाणी तर टँगो आणि सालसाचे निःशुल्क प्रशिक्षण घेत आपल्या हॉलिडेवर आपले डान्सिंग स्किल्स अधिक चांगले करण्याची संधीसुद्धा मिळते. इथली वॉल ऑफ लव्ह हेसुद्दा विशेष आकर्षण. ४३० स्क्वेअर फीटच्या ह्या वॉलवर आय लव्ह यू हा प्रेमसंदेश वेगवेगळ्या २५० भाषांमध्ये लिहिलाय,तर काही अगदीच दुर्मिळ भाषांमध्येही आय लव्ह यू चा अर्थं लिहिलेला दिसतो. या वॉलसमोर फोटो काढून आपल्या जोडीदारासोबतची एक रोमँटिक संध्याकाळ नक्कीच आठवणींच्या कॅमेर्यात बंदिस्त करता येईल.
आपल्या हनिमूनवर शहरापासून लांब निसर्गाच्या सान्निध्यात जावेसे वाटले तर बाली हे सर्वात उत्तम ठरते. इंडोनेशियातले बाली प्रसिद्ध आहे ते सर्वात सुंदर बीचेस व हिंदू परंपरेत रंगलेल्या मंदिरांसाठी. पण बीचेस बरोबरच बालीच्या उबुड भागातल्या राईस पॅडीस्मध्ये केलेली भाताची लागवड आणि इथल्या रेनफॉरेस्टमुळे अगदी आगळ्यावेगळ्या वातावरणात निसर्गाच्या कुशीत एक अतिशय रोमँटिक हनिमून सेलिब्रेट करता येऊ शकतो, त्यामुळे या जागेची निवड नक्की करा. खळाळणारे झरे व लांबवर दिसणारी हिरवळ मन प्रसन्न करते. त्यात बालीनीस स्पा ट्रीटमेन्ट्स तर जगातल्या सर्वात उत्तम मसाजेस व स्पा ट्रीटमेन्टस् म्हणून ओळखल्या जातात. उबुडमधल्या बहुतेक हॉटेल्समध्ये आपण व्हिला रूम्सची निवड करू शकता. या व्हिला रूम्सला स्वतःचा प्रायव्हेट पूल अटॅच्ड आहे. रात्री लुकलुकत्या तार्यांखाली आपल्या प्रायव्हेट पूलमध्ये मनसोक्त तरंगण्याची मजा ही उबुडमध्ये अनुभवायला हवीच. अॅडव्हेंचर प्रेमी मंडळींसाठी उबुडमधल्या आयुंग नदीवर व्हाईट वॉटर राफ्टिंग हा सुंदर ऑप्शन आहे. इंडोनेशियाचे बाली, थायलंडमधले फुकेत, क्राबी, को सामुई, मॉरिशस सेशल्स, फिलीपिन्स ह्या सर्व ठिकाणी पांढर्याशुभ्र वाळूवर चालत निळ्याशार पाण्यात पोहत बीच हनिमूनची मजा आपण घेऊ शकता. एखाद्या बीचने आपले मन भरत नसेल तर आपण संपूर्ण आयलंडदेखील स्वतःचे करू शकता. भारताच्या दक्षिणेकडच्या मालदिव्हज् बेटांचा समूह हा हनिमूनसाठी बीच व आयलंड हॉलिडेज्मध्ये जगभरात पहिल्या क्रमांकावर आपली जागा बनवून आहे. इथले अतिशय सुंदर रंगीबेरंगी कोरल रीफ सगळ्यांना आकर्षित करते. त्यात प्रत्येक बेटावर एकच हॉटेल रीसॉर्ट बांधल्यामुळे आपोआपच हे एक अनोखे एक्सक्लुसिव्ह ठिकाण बनले आहे. मालदिव्हस्ची खासियत आहे इथले वॉटर व्हिलास्. समुद्रात बांधलेल्या या वॉटर व्हिलास्मधील आपल्या स्वतःच्या व्हिलामधून थेट समुद्रात आपण उतरू शकतो. आपल्या वॉटर व्हिलामधल्या प्रायव्हेट पूलमध्ये बसून सूर्यास्ताचे रंग बघताना तुमची संध्याकाळ रोमँटिक बनली नाही तर नवलंच. मालदिव्हसचे अनेक लक्झरी रीसॉर्टस् आपल्याला एका बेटावर सोडून काही वेळ का होईना ते बेट आपल्यासाठी खाजगी करून देऊ शकतात. आपल्यासोबत पिकनिक बास्केट घेऊन आपण आपल्या प्रायव्हेट आयलंडवर आपला हनिमून साजरा करू शकतो.
भारतातसुद्धा आपला हनिमून अविस्मरणीय करण्यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत. उदयपुरच्या ताज लेक पॅलेसमध्ये पिचोला लेकच्या मधोमध जणू ते पॅलेस हॉटेल तरंगतेय असेच वाटते. तिथे बसून समोरचा प्रकाशित सिटी पॅलेस बघत लाईव्ह म्युझिकचा आस्वाद घेत हवेत दरवळणार्या मधुमालतीचे सुगंध अनुभवताना नक्कीच आपल्याला वाटेल की लव्ह इज इन द एअर. कर्नाटकातील कूर्गमधल्या कॉफी प्लान्टेशनमध्ये, केरळच्या वैथरी रेनफॉरेस्टमध्ये तर हम्पीच्या इवॉल्व्ह बॅक या नव्याकोर्या पॅलेस हॉटेलमध्ये आपला हनिमून नक्कीच अविस्मरणीय ठरेल. तसा हा फ्रेबुवारी महिना व्हॅलेंटाईन्सचा. त्यात नुकताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेलाय, पण जर का आपल्या पार्टनरला सरप्राईस द्यायची संधी हुकली असेल तर आता मात्र पुन्हा ती संधी दवडू नका आणि निघा एक रोमँटिक हॉलिडे घ्यायला, आफटरऑल लव्ह इज इन द एअर...
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.