बीट्वीन द लाईन्स काय सांगतंय हे पत्र? सहल चांगली झाली, इट वॉज ओके!, इट वॉज सुपर्ब! फॅन्टास्टिक एक्स्पीरियन्स!... आमच्या पर्यटकांच्या कोणत्याही पत्रातून त्यांनी काय लिहिलंय यापेक्षा ते पत्र काय बोलतंय आपल्याशी हे जाणण्याची सवय लागलीय. प्रॉमिस केल्याप्रमाणे पर्यटकांना सगळं मिळालं का? हे बघायची गरज नसते कारण ते देणं क्रमप्राप्त असतं. पण त्यांना मजा आली का? ते मनापासून खूश झाले का? हा प्रश्न असतो.
पहले का नामोनिशान मिटा दो! म्हटलं तर ही थोडीशी नकारात्मकतेकडे झुकणारी लाईन. म्हणजे नेहमीच्या संवादात, किसीको मिटाने के बजाय आप खुद ऊँचे उठो सबसे। असं म्हणणं ही संस्कृती आहे किंवा ती सर्वांचीच असायला हवी. तरीही हे वाक्य माझं आवडतं वाक्य आहे आमच्या टूर मॅनेजर्सच्या ट्रेनिंग सेशनमधलं. आणि हे नकारात्मक वाक्य खूप सकारात्मक असा परिणाम करुन जातं म्हणून ते आम्ही ब्रीद वाक्य बनवलंय. आपली प्रत्येक सहल चांगली झाली पाहिजे. पर्यटकांना त्यांच्या आधीच्या सहलीपेक्षा जास्त आनंद त्यात मिळाला पाहिजे. सहल कार्यक्रमानुसार ठरलेल्या सर्व्हिसेस देणं हे वीणा वर्ल्डचं काम, त्यात कोणतीही चूक न होण्यासाठी प्रोडक्ट टीम, एअर रीझर्व्हेशन्स टीम, डेस्टिनेशन मॅनेजमेंट टीम, व्हिसा टीम आणि लॉजिस्टिक्स टीम ह्या सतत कार्यरत असतात. त्यामुळे ठरलेला कार्यक्रम पार पडतो. ऑपेरा हाऊस म्हणा, नायगरा फॉल्स म्हणा, आयफेल टॉवर असो किंवा राजस्थानचा चित्तोडगड, मनालीचं हिडिंबा टेंपल किंवा सिंगापूरचा मर्लायन हे सगळं पर्यटकांना आम्ही दाखवलं काय किंवा आणखी कोणत्या सहल कपंनीने, ते तसंच दिसणार आहे, तिथल्या अॅक्टिव्हिटीज् तशाच असणार आहेत, वीणा वर्ल्ड म्हणून आम्ही त्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही. सहल कार्यक्रमानुसार सहली पार पाडणं ह्यात वेगळं काहीच नाही तरीही पाच वर्षात वीणा वर्ल्डकडे भारतातले सर्वात जास्त पर्यटक ग्रुप टूर्सद्वारे पर्यटन करताना जगातल्या प्रत्येक पर्यटनस्थळी का दिसतात? हा प्रश्न आहेच. आता त्यासाठी संस्था, संस्कृती, नैतिक मूल्य, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, पर्यटनक्षेत्र हेच अंतिम ध्येय मानणारी डेडिकेटेड कमिटेड पॅशनेट अशी टीम, प्रत्येक गोष्टीसाठी फोकस्ड डीपार्टमेंट्स आणि पर्यटक सर्वश्रेष्ठ ही भावना जपणारं सभोवताल ह्या गोष्टी आहेतच. पण तरीही त्या मला तशा तांत्रिकच वाटतात कारण आजच्या जागतिकीकरणात टिकून रहायचं असेल तर ह्या गोष्टी बेसिक आहेत. कोणत्याही कंपनीसाठी- प्रगतीसाठी त्या अत्यावश्यक आहेत. मग नेमका तो कोणता डिफ्रन्शिएटिंग फॅक्टर आहे जो वीणा वर्ल्डला पर्यटकांमध्ये मोस्ट पॉप्युलर बनविण्यात सिंहाचा वाटा उचलतोय? तर तो आहे वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर. ती आहे आमची मोठी शक्ती. चारशे पन्नास जणांची दे दणादण टीम फडकवतेय वीणा वर्ल्डचा झेंडा देशविदेशात, साता समुद्रापार, अगदी सप्तखंडांवर. ही टूर मॅनेजर्स टीम ही आमची स्वतःची आहे, फुल्ली होम ग्रोन, कल्चर्ड, टोटली कमिटेड आणि अनुभवी. आता चारशे पन्नास जणांची टीम असल्याने त्यांच्यामध्ये नॅचरली एक अदृश्य अशी स्पर्धा आहे. ती हेल्दी कॉम्पीटिशन म्हणून राहिली पाहिजे ह्याकडे आमचा आणि त्यांचा म्हणजे संपूर्ण टूर मॅनेजर्स टीमचाच कटाक्ष आहे. एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ हा मार्ग सारेजण चोखाळताहेत. तरीही मला एक टूर मॅनेजर म्हणून माझ्या टीममधल्या चारशे पन्नास जणांपेक्षा सरस बनायचं आहे हे माझं टूर मॅनेजर म्हणून मिशन आहे. मी माझ्या कर्तृत्वाने, लगनने, बोलण्याने, वागण्याने, सेवा देण्याने, पर्यटकांना त्यांच्या सहलीचा पूर्ण आनंदी मोबदला देऊन सर्वांपेक्षा सरस ठरेन ही आकांक्षा आणि स्पर्धा असायलाच हवी आणि त्याला मी सुद्धा खतपाणी घालतेय कारण शेवटी प्रश्न पर्यटकांचा आहे, त्यांच्या आनंदाचा आहे, खुशीचा आहे. हल्ली पर्यटक वर्षातून तीन ते चार सहली करतात छोट्या मोठ्या देशातल्या किंवा परदेशातल्या. प्रत्येक वेळी आमच्या टूर मॅनेजर्स टीममधला वेगळा टूर मॅनेजर पर्यटकांच्या दीमतीला असतो, अशावेळी पर्यटक आधीच्या टूर मॅनेजरचे गोडवे गात ह्या टूर मॅनेजरचं स्वागत करतात. पहिल्या भेटीपासून त्यांची आधीचे वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स आणि आजच्या सहलीचा हा टूर मॅनेजर अशी तुलना चालू राहते मनातल्या मनात किंवा खुलेआमही. सत्वपरीक्षा असते अशावेळी, प्रेशरही येतं की मी जर ह्या अपेक्षांना पुरा पडलो नाही किंवा पुरी पडले नाही तर कसं होईल? कारण अल्टिमेट ध्येय हे पर्यटकांना त्यांच्या आधीच्या सर्व सहलींपेक्षा अधिक अशी खूशी द्यायचं काम हे माझ्यावर आलेलं असतं. मी स्वतः माझ्या आयुष्यातली पंधरा वर्ष भारतात आणि भारताबाहेर टूर मॅनेजर म्हणून पर्यटकांच्या दिमतीला होते त्यामुळे हे आधीच्या टूर मॅनेजरचं प्रेशर काय असतं ते मी चांगलंच अनुभवलंय. माझी तुलना तर डायरेक्ट वडिलांशीच व्हायची. ही एवढीशी पोर काय कपाळ आपली टूर करणार? हे पर्यटकांच्या मनातलं वाक्य मला पहिल्या दिवशी खासकरून सीनियर पर्यटकांच्या चेहर्यावर दिसायचं. केवढं प्रेशर येत असेल विचार करा. पहिल्या दिवसापासून मग लिटमस टेस्ट सुरू व्हायची. एकच वाक्य ऐकायला कान आसुसलेले असायचे जेव्हा सहलीच्या शेवटी पर्यटक म्हणायचे, तू सहल करणार हे पहिल्यांदा बघितल्यावर आम्ही जरा साशंक झालो होतो पण काम चोख बजावलंस ग बाई, वुई आर व्हेरी हॅप्पी! मी, सुधीर, सुनिला, नील आम्ही सगळेच टूर मॅनेजर्स होतो आणि सर्वांनीच हे प्रेशर अनुभवलंय. आता आमची जागा आमच्या विवेक आणि टीम टूर मॅनेजर्सनी घेतलीय. त्यांच्यावर असलेलं प्रेशर मी ही समजू शकते पण म्हणूनच पूर्वतयारीनिशी स्वतःच्या अनुभवविश्वावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ही सहल म्हणजे पर्यटकांना त्यांच्या आयुष्यातला एक अतीव आनंदाचा कालावधी असेल अशी प्रत्येक टूर मॅनेजरची मानसिकता प्रत्येक सहलीच्या वेळी असली पाहिजे आणि आधीच्या टूर मॅनेजर्सना त्यांनी विसरलं पाहिजे एवढी ही सहल चांगली झाली पाहीजे हा प्रत्येक सहलीचा अंतिम गोल असला पाहिजे आणि म्हणूनच मी म्हणते नेहमी, ट्रेनिंग सेशन्सच्या वेळी, पहले का नामोनिशान मिटा दो। माहोल जर सकारात्मक असेल तर नकारात्मक वाक्यही किती पॉझिटिव्ह आणि शक्तीवर्धक बनून जातं बघा.
आमचे स्वतःचे टूर मॅनेजर्स हे आमचं वेगळेपण. आमचा हा प्रत्येक टूर मॅनेजर वीणा वर्ल्डचा एक मजबूत पीलर आहे ज्यावर वीणा वर्ल्ड उभं आहे. आधी भारतातील सहलींवर असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून ह्या टीम मेंबरचा वीणा वर्ल्डमध्ये शिरकाव होतो. त्यानंतर आधी सीनियर मोस्ट आणि मोस्ट पॉप्युलर अशा टूर मॅनेजर्सकडून आणि आमच्याकडून त्यांना क्लासरूम ट्रेनिंग दिलं जातं. भारतात काश्मिर कुलू-मनालीपासून नॉर्थ ईस्ट आसाम भूतान नेपाळपर्यंत तसेच गुजरात राजस्थानपासून केरळ अंदमानपर्यंत तेथील सहलीवर असलेल्या टूर मॅनेजरसोबत ह्या असिस्टंट टूर मॅनेजरला प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. अनेक सहली अशा असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून पर्यटकांची वाहवा मिळविल्यानंतर त्यांना थोडासा इझी सेक्टर बघून टूर मॅनेजर म्हणून जबाबदारी दिली जाते. टूर मॅनेजर म्हणून त्याची ही परीक्षा तो पास झाला की मग भारतातील वेगवेगळ्या सहलींवर टूर मॅनेजर म्हणून त्याचा कस लागतो. एकदा का हा मुलगा अतिशय चांगला परफॉर्मन्स द्यायला लागला की त्याला त्यांच्या भाषेत सांगायचं तर प्रमोशन मिळतं ते इंटरनॅशनल टूर्सवर. साउथ ईस्ट एशिया, मॉरिशस, चायना, दुबई झाल्यानंतर जपान, ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर मग युरोप, अमेरिका, साउथ अमेरिका अशी दारं त्यांच्यासाठी खुली होतात. अर्थात ह्यामध्ये आम्ही मी इंडियन टूर मॅनेजर, तू इंटरनॅशनल टूर मॅनेजर अशी उच्च-नीचता ठेवली नाही. युरोपला जाणारा टूर मॅनेजर अष्टविनायक टूरही करतो किंवा अमेरिकेला जाणारा भूतानलाही जातो. अनुभवानुसार सहलींची अलॉटमेंट होत असते. सगळे एका लेव्हलवर टूगेदर वुई ग्रो ने बांधलेले. काम हे काम आहे त्यात छोटं मोठं असं काही नाही. मी ही कधातरी ज्युनियर होतो तेव्हा मलाही कुणीतरी वर यायला मदत केलीय ह्या गोष्टींचा विसर पडता कामा नये. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं शिक्षण भारताच्या मातीत झालंय, आज मी युरोप अमेरिका करीत असलो तरी मला माझ्या मातीचा-माझ्या देशाचा विसर पडता कामा नये आणि जगात कितीही मोठ्या देशात माझं फिरणं होत असलं तरी मला माझा देश कधीही छोटा वाटला नाही पाहिजे, माझ्याकडून चुकूनही कधीही भारताविषयी अपशब्द किंवा कोणतीही नकारात्मक तुलना झाली नाही पाहिजे ही कसोशीने पाळली जाणारी काही मूल्य, जी आधी शिस्त म्हणून प्रत्येकाच्या अंगी बाणवली जाते आणि नंतर ती त्यांच्या आचारविचारांचा भाग बनून जाते. दरवर्षी दोन ते तीन ट्रेनिंग- रीफ्रेशिंग सेशन्स ह्यासाठी घेतली जातात. वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर वा टीम मेंबरचा शिक्का डोक्यावर लागला की मग त्या संस्कृतीला-नीतीमत्तेला- पारदर्शकतेला अंगी बाणवावंच लागतं. आमची टूर मॅनेजर मंडळी ह्या ट्रेनिंग सेशनला शाळा म्हणतात. नाईलाज आहे. पर्यटक त्यांचे कष्टाचे पैसे भरून सहलीला येतात त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणं आमचं म्हणजे टूर मॅनेजर्सचं काम आहे, बाय अॅन्ड लार्ज ते पार पाडलं जातं, पण कुठे जर कुणी डीरेल झालंच तर त्याला लागलीच लाईनवर आणणं हे आमचं काम. शिस्तीला पर्याय नाही. अर्थात अशी वेळ खूपच कमी येते आमच्यावर हे आमचं सौभाग्य.
नेमकं काय करतो वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर पर्यटकांसाठी? हा प्रश्न पर्यटनक्षेत्रातल्या कंपन्यांना पडतो. तर तो मुंबई ते मुंबई तसेच सहलीवर सर्व ठिकाणी तुमच्यासोबत असतो. तुम्ही कुठे अडलात-गोंधळलात तर तुम्हाला मार्गदर्शन करायला तो असतो. कुणाला इंग्लिश येत नाही, कुणाचा पहिला विमानप्रवास असतो, कुणी पहिल्यांदाच भारताबाहेर जायला निघालेलं असतं, मनात थोडी भिती असते अशावेळी मनापासून तुम्हाला साथ द्यायला तो तुमच्यासोबत असतो. डिस्नीलँड पार्क असो वा बालीवूड पार्क, युनिव्हर्सल स्टुडिओज् असो की अॅमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डन्स तो पार्कच्या आतमध्येही तुमच्या मार्गदर्शनासाठी तुमच्यासोबत असतो. संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जी टाईम मॅनेजमेंट लागते त्यात तो एक्सपर्टचा रोल निभावत असतो. थोडक्यात तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, तुमची धावपळ होऊ नये ह्यासाठी दिवसरात्र मेहनत असते. आणि त्याच्या साथीला आम्ही सगळे असतो दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे बारा महिने. गेल्या वर्षी काहे दिया परदेस ह्या टीव्ही मालिकेत वीणा वर्ल्ड टूर मॅनेजरचं नाव होतं मैं हूँ ना! तुम्ही का काळजी करताय? तोच मैं हूँ ना! आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक टूरला सोबत करणार आहे. हॅप्पी जर्नी!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.