फ्रेंच लोकांचे इथे राज्य होते, त्या पूर्वी इथे मुस्लिम परंपरेचा वारसा होता व त्यापूर्वीही इथे जे ‘बरबर’ ट्राईब्ज होते, ते मुळातच फार अगत्यशील असल्याने ही परंपरा मोरोक्कोभर दिसते व प्रत्येक रियाद, रेस्टॉरन्ट किंवा स्थलदर्शनाच्या ठिकाणी बरबर हॉस्पिटॅलिटी, इस्लामिक आर्ट व डिझाइनसोबत फ्रेंच स्टाईलचे एक अनोखे मिश्रण बघायला मिळते.
अरूंद रस्त्याच्या त्या भुलभूलैयामध्ये फिरता फिरता एका घराचे दार उघडे दिसले. सकाळच्या कोवळ्या उन्हात घराच्या भिंतींवर लावलेल्या सुंदर कोरीव सिरॅमिक टाईल्स चमकत होत्या. जसं सुट्टीच्या दिवशी साग्रसंगीत भोजन तयार होत असतं तसा स्वादिष्ट स्वयंपाकाचा सुगंध दरवळत होता. क्षणभर त्या सुवासाचा आनंद घेण्यासाठी आम्ही थांबलो. ‘‘आज शुक्रवार, म्हणजे सुट्टीचा दिवस, म्हणून घरात कुसकुस बनत असेल’’, असं अहमद म्हणाला. अहमद आम्हाला फेझ शहराच्या मदिनाची सैर घडवत होता. आपल्या पारंपरिक पोशाखात अहमद त्या वातावरणाशी एकरूप वाटत होता. मोरोक्कोे या देशाच्या फेझ शहरात आदल्या रात्री आल्यापासून काळाची काही वर्षं नव्हे तर काही युगं मागे फिरल्यासारखी वाटत होती. सातव्या शतकात बांधलेले फेझ शहराचे मदिना म्हणजे एकात एक गुंफणार्या चिंचोळ्या गल्ल्यांचे एक प्रचंड मोठे जाळे. आजही ही जगातली सर्वात मोठी कार-फ्री शहरी जागा (अर्बन एरिया) समजली जाते. कुठे कुणी ब्रासचे दिवे व कंदील विकत होते, तर पुढे जाता जाता दुसरीकडे सिरॅमिकच्या वस्तूंचे दुकान दिसले.
ते मदिना आपला एक-एक खजिना समोर आणत होतं, अगदी अलिबाबाच्या गुहेसारखं. या मदिनामध्येच आजतागायत अस्तित्वात आणि कार्यरत असलेली जगातली सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे. आठव्या शतकात बांधलेल्या मद्रसाबरोबर अल करावीन युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त करता येते. फेझ शहरातच सर्वात सुंदर लेदरच्या पर्सेस, बॅग्ज, बेल्टस्, इ. वस्तू बनविल्या जातात. या वस्तूंसाठीचं लेदर प्रोसेस होताना आणि वेगवगेळ्या रंगांनी रंगवलं जाताना इथल्या लेदर फॅक्टरीज्मध्ये आपण पाहू शकतो. रंगवण्यासाठी इथले लाल, पिवळ्या, निळ्या इ. रंगांनी भरलेले हौद देखील आपल्याला पाहता येतात. इंस्टाग्रामवर फेझ शहराचे हे चित्र अनेकदा पाहिले होते. फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावरंच पुदिन्याची काडी देऊन आमचे स्वागत करण्यात आले. पुदिना कशासाठी तर, चामड्याच्या वासाचा प्रभाव कमी करण्यासाठी. मोरोक्कोमध्ये पुदिन्याला फार महत्व आहे व कुठेही जाताच इथल्या मोरोक्कन मिंट टी ने आपले स्वागत केले जाते. काळ्या चहामध्ये ताज्या पुदिन्याची पाने घालून हा गोड चहा मोरोक्कन ग्लासेसमध्ये ठिकठिकाणी मिळतो. त्या मदिनामध्ये ऑलिव्हज्, ब्रेड, फळे, भाज्या व रोजच्या अनेक गृहउपयोगी वस्तू विकणार्या विक्रेत्यांची गडबड सुरू होती. प्रत्येक दुकानाकडे कुतूहलाने बघतोय हे पाहून ‘मदिनाच्या गल्ल्यांमध्ये हरवू नका हं’, अशी चेतावणी अहमदने दिली. गाईडबरोबर फिरत असल्याने आपण हरवणार नाही याची खात्री होती पण तिथल्या अनेक विलक्षण गोष्टींमध्ये आपण आपले भान हरवून बसू असेही वाटत होते. पुढे रस्ता वळताच अहमदने आम्हाला एका साध्या दिसणार्या दारासमोर थांबवले. अगदीच साध्या दिसणार्या त्या भिंतींच्या मागे एक जुने, कुणीही राहत नसलेले पण अतिशय सुंदर असे घर होते. मोरोक्कोच्या प्रसिद्ध सिरॅमिक टाईल्स व लाकडी कोरीव कामाने सजलेल्या त्या आलिशान घराची बाहेरून काहीच कल्पना येत नव्हती. अहमद म्हणाला, ‘‘आमच्या धर्मात आणि खासकरून फेझमध्ये लोकांना दिखावा आवडत नाही व सगळ्यांमध्ये समानता असावी म्हणून मदिनामधली ही सगळी घरं बाहेरून एकसारखी व साधी दिसतात. एखाद्या गरिबाचे किंवा श्रीमंताचे घर बाहेरून सारखेच दिसते.’’ श्रीमंतांच्या या पारंपरिक घरांना किंवा पॅलेसेस्ना ‘रियाद’ म्हणतात. या रियादमध्ये अनेक खोल्यांच्या मधोमध फवार्यांनी सजलेले अंगण व बाग बगिचे असतातच. त्याचबरोबर सिरॅमिक व ‘मोझॅक’ कामाचे अनेक वॉटर फाउंटन्ससुद्धा त्या रियादची शोभा वाढवतात. माझे रात्रीचे वास्तव्य होते ते अशाच एका रियादमध्ये. रीले शॅट्यू हा लक्झरी हॉटेल ग्रुप जगभरात असलेल्या आपल्या अनोख्या प्रॉपर्टीज्साठी प्रसिद्ध आहे. तसंच त्यांचं इथे रियाद फेस हे पॅलेस हॉटेल आहे. इथे वास्तव्य करताना आपल्याला हॉटेलमध्ये नव्हे तर आपल्या शुभचिंतकाच्या घरी पाहुणे म्हणून राहण्याचा आनंद प्राप्त होतो. रियाद फेसच्या छतावरून सभोवती पसरलेल्या फेझ शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. किंग्डम ऑफ मोरोक्को हा आफ्रिकेच्या उत्तराकडचा एक देश आहे जिथे अरेबिक, फ्रेंच आणि स्पॉनिश संस्कृतीचे सुंदर मिश्रण दिसते. फ्रेंच लोकांचे इथे राज्य होते, त्या पूर्वी इथे मुस्लिम परंपरेचा वारसा होता व त्यापूर्वीही इथे जे ‘बरबर’ ट्राईब्ज होते, ते मुळातच फार अगत्यशील असल्याने ही परंपरा मोरोक्कोभर दिसते व प्रत्येक रियाद, रेस्टॉरन्ट किंवा स्थलदर्शनाच्या ठिकाणी बरबर हॉस्पिटॅलिटी, इस्लामिक आर्ट व डिझाइनसोबत फ्रेंच स्टाईलचे एक अनोखे मिश्रण बघायला मिळते. मोरोक्कोच्या जडणघडणीत इथे राज्य केलेल्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. मोरोक्कोमध्ये प्रवास करताना निदान एखाद्या शहरात तरी एका रियादमध्येे रहायलाच हवे. आपल्या राजस्थानात जसे आपण एखाद्या हवेलीत राहू शकतो तसेच या रियादमध्ये राहण्याचा अनुभव मोरोक्कोेच्या अनेक शहरांमध्ये आपण घेऊ शकतो. काही रियादमध्ये केवळ पाच-सहा रूम्संच असतात तर काही थोडे मोठे असून आज त्यांचे रुपांतर फाईव्ह स्टार हॉटेल्समध्येसुद्धा झाले आहे. हॉलिडे म्हणजे स्थलदर्शन व पायी भटकणे आलेच आणि त्याचबरोबर आपला थकवा घालवण्यासाठी आजकाल छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये स्पाज् असतातच. मोरोक्कोमध्ये प्रसिद्ध आहेत ते हमाम. एका मार्बलच्या प्लॅटफॉर्मवर इथल्या स्पेशल साबणांच्या पेस्टने व एका हातमोज्याने आपल्याला पूर्णपणे अंघोळ घातली जाते. पब्लिक व प्रायव्हेट हमामचे ऑप्शन्स आपल्याला मोरोक्कोमध्ये सगळीकडे दिसतात. फेझ ही मोरोक्कोची प्राचीन राजधानी होती. आज मोरोक्कोची राजधानी रबात ही समुद्रकिनारी असून इथला फोर्ट म्हणजे कसबा ऑफ उदयास व हुसेन टॉवर आणि मोहम्मद मॉसोलियम ही मुख्य आकर्षणं आहेत. रबात नंतरचे मोरोक्कोचे दुसरे महत्वाचे शहर म्हणजे माराकेश. माराकेश शहरात मी एका ट्रॅव्हल कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी भेट देत होते. आपल्या हॉटेलमध्ये चेक-इन करण्याआधी माराकेशची खरी ओळख करून घ्यावी म्हणून मी माराकेशच्या मदिना मधल्या एका रियादमध्ये एका रात्रीचे वास्तव्य केले. मेन रोडवर गाडी थांबवून एका हातगाडीतून आमच्या सुटकेसेस एका पोर्टरने ढकलत मदिनामधून रस्ता काढत आम्हाला आमच्या रियादपर्यंत पोहोचवले. केवळ सहा रूम्स असलेल्या त्या रियादमध्ये छोटेसे स्विमिंग पूलसुद्धा होते. माराकेशच्या मदिनाला लागूनच माराकेशचा केंद्रबिंदू म्हणजे इथला ‘जेमा एल एफना’ चौक. या भल्यामोठ्या चौकात ऑयस्टर्स पासून ज्यूस स्टॉल व अनेक व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचे स्टॉल्स लागले होते. काही फन-फेअरसारखे खेळ सुद्धा सुरू होते. इथे लोकल्स व टूरिस्ट या खेळांची मजा लुटत पेटपूजा करताना दिसले. माराकेशचा तो चौक म्हणजे वर्षभर कायम असलेली जत्राच! मग आपणसुद्धा या जत्रेत शामिल होऊया असा विचार करत आम्ही ज्यूस स्टॉलपासून सुरुवात केली. या देशात इतकी ताजी फळे आहेत की इथल्या लोकांना फळांचा काढलेला ताजा ज्यूसच माहिती आहे; टेट्रा-पॅक हा प्रकारच नाही. मोराक्कोमध्ये संत्र्याचा ज्यूस असला तर त्याला कधीच नाही म्हणायचे नाही हे मला कळले. अतिशय गोड संत्र्याचा प्युअर ज्यूस हा फाईव्ह स्टार पासून रस्त्याच्या स्टॉलपर्यंत सगळीकडे दिसला. आम्हाला ज्यूस बनवून देणार्या मोहम्मदला भारताच्या प्रती भारी प्रेम असल्याने त्याने आम्हाला त्याच्या स्टॉलवर चढून ज्यूस घेण्यासाठी आमंत्रित केले. पुढे जेवणाच्या स्टॉलवरसुद्धा असाच अनुभव आला. आम्ही जेवायला रस्त्यावरच्या त्या स्टॉलवर बसताच तेथे असलेल्या अब्दुल व त्याच्या मित्राने नाच गाण्याने आमचे स्वागत केले. ठिकठिकाणी भारताबद्दल प्रेम व अभिमान दिसत होता आणि बॉलीवूड सिनेमांचे वेड देखील काही औरच होते. प्रत्येकाला ‘मी शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनला ओळखते का?’ याचे उत्तर देता देता अनेक गप्पा झाल्या. माराकेशच्या गजबजणार्या जीवनापासून एखादा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचा असेल तर अनेक पर्याय आहेत. केवळ एक-दीड तासांवर एका बाजूला आहेत इथले प्रसिद्ध अॅटलस माऊंटन्स तर दुसरीकडे एसाविरा हे सीसाईड फिशिंग व्हिलेज आणि तिसरीकडे इथले वाळवंट. एकाच ठिकाणी अनेक वेगवेगळे अनुभव आपण घेऊ शकतो. अॅटलस माऊंटन्सवर राहण्यासाठी सर रिचर्ड ब्रॅनसन ह्यांचे लक्झुरियस कसबाह तामादॉत सुसज्ज आहे तर वाळवंटात सुंदर टेन्ट स्टे सुद्धा आहेत.
सिरॅमिकसाठी प्रसिद्ध असलेल्या मोरोक्कोमध्ये सिरॅमिक फॅक्टरीला भेट देऊन आपण सिरॅमिकची खरेदी करू शकता. तसे इथल्या प्रत्येक मदिनामध्येसुद्धा सिरॅमिक्स, लेदर, लॅम्पस्, बबूश (मोजडी) या सर्व वस्तूंबरोबर इथले लिक्वीड गोल्ड म्हणून ओळखले जाणारे ‘आर्गन ऑईल’ हे नक्कीच विकत घ्या. आर्गन फळांच्या बियांपासून बनवलेले हे ऑईल सुंदर केसांसाठी व त्वचेसाठी जगभर प्रसिद्ध आहेच पण ऑलिव्ह ऑईलप्रमाणे हे जेवणातसुद्धा वापरतात. मोरोक्कन जेवणामध्ये ‘तजिन’चा वापर केला जातो. भाज्या, लॅम्ब, चिकन इ. गोष्टींना हलके मसाले लावून या त्रिकोणी भांड्यात गॅसवर शिजवतात. जेवण बनवायचे नसले तरी हे तजीन शो-पिस म्हणून फार सुंदर दिसते. ह्या सर्व वस्तूंकडे पाहून आपल्याला आपल्या मोरोक्को ट्रिपची नेहमीच आठवण येईल हा विचार करत मी सिरॅमिकचे तजीन, लेदर बॅग, मोजडी, आर्गन ऑईलसारख्या अनेक वस्तूंचे मनसोक्त शॉपिंग केले. एक्सेस लगेजची चिंता असनाताच मी विचार करत होते की आता मात्र विमानाच्या चेक-इन काऊंटरवरचा कर्मचारीही भारताचा व शाहरुख खानचा फॅन असला म्हणजे मिळवलं!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.