काय छान नंबर आहे हा! ह्या नंबरने आज मी नक्की लॉटरी खेळेन. माझा पासपोर्ट तपासत गालातल्या गालात हसत त्या इमिग्रेशन ऑफिसरने माझा पासपोर्ट नंबर लिहून घेतला. अनेक वर्षांपूर्वी मलेशियाच्या इमिग्रेशन काऊंटरवर घडलेला हा किस्सा. मग त्या पुढे, तुझा व्यवसाय काय? तू इथे किती दिवासांचे वास्तव्य करणार आहेस? इ. प्रश्न-उत्तरे झाल्यानंतर माझा पासपोर्ट घेऊन मी प्रवासाला सुरुवात केली. आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास करून दुसर्या देशात प्रवेश करतो तेव्हा एअरपोर्टवर किंवा रस्त्यावरून गाडीने प्रवास करत असल्यास, आपल्याला एअरपोर्टवरच्या किंवा बॉर्डरवरच्या इमिग्रेशन काऊंटरवर तपासणी करून पुढे जावे लागते. बरेच वेळा, त्यांना आपली भाषा कळेल का? बॉर्डर कंट्रोलवर खूप मोठी रांग असेल का? अशा एक ना अनेक प्रश्नांनी कधी-कधी उगाचच इमिग्रेशनवर आपल्याला थोडेसे का होईना टेंशन येते. मग फॅमिलीसोबत एकत्र जाणे बरे पडते किंवा लहान मुलांना आधी पाठवून त्यांच्या मागून जाणे उपयुक्त ठरते. पण आपल्याकडे जर सर्व डॉक्युमेंट्स म्हणजेच हॉटेलचा पत्ता, एअर तिकिट आणि व्हिसा व्यवस्थित असल्यास इमिग्रेशन करताना आपल्याला खरंतर काहीच काळजी करायला नको. बहुतेक वेळी हे इमिग्रेशन सुरळीतपणे आणि पटकन पार पडतं आणि कधी कधी मलेशियामधल्या त्या इमिग्रेशन ऑफिसरसारखे काही दिलखुलासपणे बोलणारे अतिशय फ्रेंडली इमिग्रेशन ऑफिसर सुद्धा भेटतात. आपल्याला एखादा देश कसा वाटला हे जेवढे त्या देशाच्या इतिहास आणि मॉन्युमेंट्स व इतर स्थलदर्शनाच्या आकर्षणांवर अवलंबून असते तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त ते तिथल्या लोकांची आपल्याशी वागणूक कशी आहे ह्यावर ठरते असे मला वाटते. आणि त्यात पहिला टप्पा असतो तो बॉर्डर कंट्रोल किंवा इमिग्रेशन चेकचा. अशी गम्मत एकदा अमेरिकेच्या लॉस एँजीलीस शहरात उतरताच घडली. इमिग्रेशनसाठी भली मोठी रांग होती आणि जवळजवळ दोन तास थांबल्यानंतर माझा नंबर लागला. एवढ्या हजारो लोकांशी संभाषण करून तो इमिग्रेशन ऑफिसर किती वैतागला असेल असा विचार माझ्या मनात आला कारण रांगेत थांबून मी पण खूप वैतागले होते. पण लॅटिन अमेरिकन दिसणारा तो ऑफिसर त्याच्या स्पॅनिश अॅक्सेंटमध्ये माझ्याशी बोलू लागला. त्याचे इंग्रजी इतके पक्के नाही मग आपण का बरं एवढी काळजी करतो असाही विचार मनात आला. पासपोर्ट तपासत त्याने मला बोटांचे ठसे घेण्यासाठी बायोमेट्रिक मशिनमध्ये हात पुढे करायला सांगितला. ओके, आता डावा हात, आणि आता उजवा पाय पुढे कर. आपण नक्की व्यवस्थित ऐकले का असा विचार करत मी थांबले तेव्हा हसत-हसत तो म्हणाला, तू जागी आहेस का की दोन तास रांगेत थांबून झोपलीस हे तपासत होतो. आम्ही दोघेही हसलो आणि त्याच्या या वातावरण हसतं-खेळतं बनवण्याच्या कलेमुळे मी चक्कं सर्व थकवा विसरले आणि आनंदात पुढे गेले.
प्रवासात असे गमतीशीर किस्से घडतच असतात. मग ते विमानतळ असो किंवा गाडी चालवत बॉर्डर ओलांडतानाचे इमिग्रेशच काऊंटर. जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी आपल्या पर्यटकांना घेऊन, स्कॅन्डिनेव्हिया-रशिया टूर मॅनेज करत होते तेव्हा फिनलँड सोडून आम्ही रशियामध्ये प्रवेश करत होतो. फिनलँडच्या बॉर्डरवर सर्व ऑफिसर हसरे होते. त्यांनी आमचे पासपोर्ट तपासून आम्हाला रशियामध्ये पाठवले. चालता येईल इतक्या अंतरावरच रशियाचा एंट्री पॉईंट होता. अचानक वातावरणच बदलले आणि आमच्या ग्रुपला एका रूममध्ये बोलावले गेले. तिथे टूरवर आलेली इतर देशांची मंडळी सुद्धा होती. आधीच भरलेले फॉर्म्स आम्हाला परत भरावे लागले आणि अचानक एक महिला ऑफिसर आत आली आणि आमचे सगळे फॉर्म व पासपोर्ट घेऊन आतल्या खोलीत निघून गेली. तिला इंग्रजीचा एकही शब्द येत नव्हता त्यामुळे काही विचारायची सोय नव्हती आणि पुढचा अधार्र् तास तर आम्ही त्या खोलीत बंद होतो. चौकशी करावी तरी कुणाकडे. एकही ऑफिसर उपस्थित नव्हता. त्यामुळे नको नको ते विचार मनात येत होते. पण पाऊण तासाने दार उघडले आणि ती ऑफिसर सर्व पासपोर्ट घेऊन माझ्याकडे आली. तिचा चेहरा फार गंभीर होता आणि माझ्याकडे पासपोर्ट देत ती ऑल ओके! म्हणत तितक्याच वेगाने परतली. हुश्शऽऽऽ! सुटलो एकदाचे! आता पुढे निघायला हरकत नाही! त्या आठवड्यात तिकडे जरा सक्त तपासणी करण्याचा आदेश होता हे नंतर कळले आणि त्यात त्या काळात फार कमी भारतीय पर्यटक त्यांनी बघितले होते त्यामुळे दोन्हीकडून एकमेंकावर जास्त संशय असणे साहजिक होते. पण आज भारतीय पर्यटक जगाच्या कानाकोपर्यात सगळीकडे प्रवास करताना दिसतात आणि रशियासारखे देश सुद्धा पर्यटकांना वेलकम करण्यासाठी तयार आहेतच. असाच एक किस्सा झाला तो तीन वर्षापूर्वीं मी क्रोएशियाला भेट दिली तेव्हा. पूर्वीचे युगोस्लाविया न राहता आता हे बाल्कन देश अगदी प्रगत व पर्यटनासाठी तयार दिसतात. क्रोएशियाच्या दक्षिणेकडे मॉन्टेनेग्रो हा तसा छोटा पण नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण देश आहे आणि त्याचा अविष्कार करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीसोबत स्वत: गाडी चालवत इथे प्रवास करत होते. आधीच लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह गाडी चालवायची सवय नसल्याने मी स्वत:ला सावरत होते आणि तेवढ्यातच मॉन्टेनेग्रोचा चेकपॉईंट दिसला. गाडीच्या लेनमध्ये व्यवस्थितपणे गाडी पार्क करत मी गाडीचे पेपर व आमचे पासपोर्ट त्या ऑफिसरच्या हातात दिले. तेव्हा, भारतातले फार कमी टूरिस्ट आमच्या देशात दिसतात, असे सांगत त्याने भारतीय पर्यटकांना मॉन्टेनेग्रोला भेट देण्याचे आव्हान केले. तुमच्या देशाएवढा मोठा नसला तरी आमचा देश सुद्धा फार सुंदर आहे. हे तुमच्या देशातल्या लोकांसाठी आमचे आमंत्रण समजा! असे म्हणत त्यांने चक्कं आम्हाला फ्लाइंग किस देत रवाना केले. हल्ली तर युरोपमध्ये फिरताना आपण एखादा देश सोडून दुसर्या देशात प्रवेश केला आहे हे पटकन कळत सुद्धा नाही. शेंजेन व्हिसा असला की युरोपमधल्या 26 देशांना भेट देता येते आणि अनेक बॉर्डर्सवर चेकपोस्टच नसतात, केवळ रस्त्यावरचे रंग बदलतात किंवा साईन बोर्डस्ची भाषा बदलते.
दोन देशांमधल्या या बॉडर्सचे मला नेहमीच आकर्षण वाटते. आणि बर्याच ठिकाणी तर ह्या बॉर्डर्स स्वत:च एक आकर्षणाचे ठिकाण असतात. यात पहिला नंबर असावा तो अमृतसरला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेचा. इतर वेळी वादात अडकलेल्या ह्या दोन देशांचे इथे मात्र वेगळे रूप बघायला मिळते. आणि संध्याकाळी घडणार्या बीटींग द रीट्रीट सेरेमनीमध्ये वागाह-अटारी बॉर्डर व भारताच्या बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आणि पाकिस्तान रेंजर्स आपापल्या देशात डान्स सारखी परेड करतात आणि हे दृश्य आयुष्यात एकदा तरी आपण बघायलाच हवे. दोन देशांमधली सर्वात मोठी बॉर्डर ही सुद्धा जगातल्या सर्वात पॉवरफुल देशाचीच आहे. अमेरिका आणि कॅनडा या देशांची सीमारेशा ही जवळपास 9000 किलोमीटर इतकी असून ही जगातील सर्वात लांबलचक बॉर्डर असण्याचा खिताब पटकवते. अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या उत्तरेकडे त्यांच्या सीमेवर तर जगातले सर्वात लोकप्रिय वॉटरफॉल्स बघायला मिळतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टेटमधल्या बफेलो शहरात आणि कॅनडाच्या ऑंटॅरियो प्रांतात नायगरा घाटाच्या दक्षिणेकडे नायगरा फॉल्स हा तीन धबधब्यांचा समूह आपण बघू शकतो. भारतातूनच कॅनडा व्हिसा प्राप्त केल्यास आपण अमेरिकेत राहून सुद्धा कॅनेडियन बाजूला भेट देऊन नायगरा फॉल्सचा हॉर्सशू शेप बघू शकतो.
गम्मत म्हणजे दक्षिण अमेरिका खंडात सुद्धा दोन देशांच्या बॉर्डरवर जगातला सर्वात मोठा वॉटरफॉल बघायला मिळतो. आर्जेंटिना आणि ब्राझिल देशांच्या सीमारेशेवर इग्वासू फॉल्स बघता येतात. 2.7 कि.मी. ची लांबी असलेल्या या इग्वासू फॉल्सचे सौंदर्य हे त्याच्या स्टेअरकेस अर्थातच पायर्यांसारख्या फॉर्मेशनमध्ये आहे. दोन देशांच्या बॉर्डरवर वॉटरफॉल्स असले की एक नैसर्गिक बॉर्डर तर तयार होतेच, शिवाय हा पर्यटकांसाठी डबल फायदा आहे असे मला वाटते. कुठल्याही देशाला भेट दिली तरी आपण या वॉटरफॉल्सना भेट देऊ शकतो!
जगातली सर्वात गम्मतशीर बॉर्डर ही नक्कीच पोपच्या वास्तव्याच्या ठिकाणाची असावी कारण व्हटिकन सिटीला तशी बॉर्डरच नाही. रोम शहराच्या मधोमध व्हॅटिकन सिटी हा देश आहे व सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये चालत जाताच आपण इटली सोडून व्हॅटिकन सिटीमध्ये प्रवेश करतो. या देशाच्या ओपन बॉडर्स पाहून नेहमी एक विचार मनात येतो की, जगात देशांच्या सीमारेशाच नसत्या तर जगाचा नकाशा कसा दिसला असता? प्रवासाला निघताना व्हिसा प्राप्त करण्याची गरजच नसती! मग संपूर्ण जगात एकच देश असला असता. दी युनायटेड स्टेट्स ऑफ अर्थ असे काहीतरी त्याचे नाव असले असते. अशीच काहीशी भावना दर्शवण्यासाठी पोलंड व युक्रेनच्या सीमेवर लँड ऑर्ट प्रदर्शनाच्या दरम्यान पोलीश आर्टिस्ट जारोस्लाव कोझियाराने शेतात या सीमेवर दोन मोठे फिश शेप तयार केले. एका माश्याचे डोके पोलंडमध्ये आहे तर दुसर्याचे युक्रेनमध्ये. या आर्टद्वारे निसर्गाला व केलेला कोणत्याही सीमा नसतात हा संदेश आर्टिस्ट उत्तमप्रकारे पोहचवतो. शेवटी सीमा तर मनुष्यानेच बनवलेल्या आहेत ना? निसर्गात याला जागा नाही आणि हे दरवर्षी कुठला ही व्हिसा न काढता टांन्झानिया आणि केनिया या देशातल्या सेरेंगेटी आणि मसाइ मारा नॅशनल पार्कच्या सीमा ओलांडणारे हजारो विल्डबीस्ट, झेब्रा आणि इतर पशुपक्षी आपल्याला दाखवून देतातच. इथे मला आठवताहेत रेफ्युजी चित्रपटातल्या गाण्याच्या ह्या ओळी, पंछी नदियाँ पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके सरहद इंसानों के लिए है सोचो तुमने और मैंने क्या पाया इंसान होके...
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.