‘हा व्हिसाच बंद झाला तर किती बरे होईल ना!’ असे पर्यटन क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असते. व्हिसाच काय, देशांमधल्या ह्या बॉर्डर्सच नसत्या तर किती बरे झाले असते, असंही बर्याचदा वाटून जातं. पण कधी-कधी नैसर्गिक असो की मनुष्याने बनविलेली असो, ह्या सीमा किंवा बॉर्डर्सना भेट देणे हेसुद्धा पर्यटनातले एक अनोखे स्थलदर्शनच असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
‘इंडिया! वॉव! तुमचा देश फार सुंदर आहे आणि लोकंही फार छान आहेत. आमचाही देश छोटा असला तरी तितकाच सुंदर आहे, मग तुमच्याकडची लोकं का बरं आमच्या देशाला भेट देत नाहीत!’ आमचे पासपोटर्र् घेत इमिग्रेशन ऑफिसरने आम्हाला प्रश्न केला. ‘तुम्हाला आमचा देश नक्की आवडेल. हॅव अ ग्रेट स्टे’ असे म्हणत पासपोर्ट परत करताना चक्क फ्लाइंग किस देत त्याने आमची रजा घेतली. क्रोएशियाच्या दक्षिणेकडील मॉन्टेनेग्रो या छोट्याशा देशात इतकं प्रेमळ वेलकम झाल्याने आम्ही खरोखरच मॉन्टेनेग्रोच्या प्रेमात पडलो. परदेशवारी म्हटली की जर कुठली गोष्ट सर्वात जास्त त्रासदायक वाटत असेल तर ती म्हणजे ‘व्हिसा’ मिळवणे आणि त्या देशाचे ‘इमिग्रेशन’ पार पाडणे. सर्वप्रथम आपला पासपोर्ट किमान सहा महिने तरी वॅलिड आहे ना? मग त्यात व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी पुरेशी पानं आहेत ना? व्हिसासाठी आवश्यक असणारी सर्व डॉक्युमेन्ट्स नक्की दिली आहेत ना? व्हिसा मिळविण्यासाठी स्वतः जावे लागेल का? बायोमेट्रिक्ससाठी जावे लागेल नं? इंटरव्ह्यु तर द्यावा लागणार नाही नं?... केवढ्या त्या कटकटी आणि केवढे ते समोर उभे राहणारे प्रश्न. बरं एवढं सगळं करून व्हिसा मिळविल्यावर इमिग्रेशन ऑफिसरसमोर सर्व प्रश्नांची उत्तरे तर नीट देता येतील नं! हा वेगळाच धास्तावणारा विषय. ‘हा व्हिसाच बंद झाला तर किती बरे होईल ना!’ असे पर्यटन क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असते. व्हिसा काय, देशांमधल्या ह्या बॉर्डर्सच नसत्या तर किती बरे झाले असते. पण मॉन्टेनेग्रोच्या इमिग्रेशन काऊंटरवर पासपोर्टसह फ्लाइंग किस स्विकारताना प्रत्येक बॉर्डर क्रॉसिंग अशीच असली तर काय मजा येईल, असा विचार माझ्या मनात लगेच येऊन गेला.
क्रोएशिया, मॉन्टेनेग्रो, स्लोव्हेनिया या देशांचा आविष्कार पाहायला मी आणि माझी मैत्रिण स्वतः गाडी चालवत निघालो होतो. लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह गाडी चालवत जी.पी.एसवर रस्ते शोधत आमचा प्रवास मजेत चालू होता. या ट्रिपवर बॉर्डर क्रॉसिंगचा अनेक वेळा अनुभव घेता आला. एके ठिकाणी तर क्रोएशियाच्या मधोमधच ‘बॉस्निया’ हा देश ओलांडून पुढे जावे लागते. बॉस्नियाच्या इमिगे्रशनचा एन्ट्री स्टॅम्प घेऊन मी गुगल मॅप्सप्रमाणे गाडी काढली, तितक्यातच माझ्या मैत्रिणीचे, ‘थांब... थांब... थांब’ हे बोल कानावर पडले. चार पावलांवरच बॉस्नियाचे इमिग्रेशन काऊंटर परत दिसले. आता कुठे एन्ट्री केली इतक्यातच एक्झिट घ्यायची? काहीवेळा तर ही देशाची बॉर्डर आहे हेसुद्धा कळत नाही. हा अनुभव मला फ्रान्स आणि मोनॅकोमध्ये फिरताना घेता आला. रस्त्याच्या एका बाजूला होते ‘प्रिन्सिपॅलिटी ऑफ मोनॅको’, तर रस्ता ओलांडल्यावर आम्ही फ्रान्समध्ये होतो. आपण कुठल्या देशाचा टॅक्स भरतो, हे आपण रस्त्याच्या कुठल्या बाजूला राहतो ह्यावरून ठरविले जाते. तसेच इटलीच्या रोम शहराच्या मधोमधच एक छोटासा देश आहे, जो आहे ‘व्हॅटिकन सिटी’. सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये प्रवेश केला की, आपण इटली सोडून व्हॅटिकन सिटी या देशात प्रवेश करतो. आजसुद्दा असे इमिग्रेशन न करता काही देशांमध्ये ये-जा करणे शक्य आहे. काही बॉर्डर्स नैसर्गिक असतात तर काही दोन देशांनी आपापसात ठरवून बांधलेल्या आहेत. आपल्या सीमेमध्ये राहणार्या नागरीकांचे संरक्षण करणे हे देशाचे कर्तव्य आहे. ही कल्पना आज-कालची नव्हे तर अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अगदी प्राचीन काळापासून लोकांचा प्रवास सुरू आहे. विचारांचे व सामानाचे देवाण-घेवाण करण्यासाठी अनेक संशोधक आणि अभ्यासक प्रवास करीत असत. ग्रीक साम्राज्यात हवे तसे प्रवास करणे नागरीकांचा अधिकार समजला जात होता. रोमन साम्राज्यात लोकांना ‘दास’ बनवण्याची प्रथा सुरू झाली आणि त्यांच्या मुक्त हालचालींवर बंदी आली. रोमन एम्परर ‘कॉन्सटनटाईन द ग्रेट’ने इसवी सन पूर्व ३०६-३३७ च्या दरम्यान या दासांच्या हालचालींवर बंदी आणली आणि केवळ युद्धासाठी नागरीकांचे स्थलांतर होऊ लागले. अशावेळी लोकांच्या सुखरूप प्रवासासाठी रोमन लोकांनी ‘पासपोर्ट’ची कल्पना आणली. ज्या लोकांना दास बनविले जायचे त्या लोकांना गरम लोखंडी सळीचा चटका दिला जायचा आणि त्यानंतर शरीरावरील तो चटका त्यांचं ओळखपत्र ठरायचा. आता तेव्हाच्या ‘पासपोर्ट’साठी आवश्यक असणार्या ह्या वेदनादायी ओळखपत्रापेक्षा आताच्या पासपोर्टसाठी आवश्यक ओळखपत्रांची जमवाजमव करणं कैकपटीनं सुखदायी.
पासपोर्ट देण्याची सुरुवात झाली ती प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र म्हणून नव्हे तर लोकांच्या सुखरूप प्रवासासाठी दिलेले कागदपत्र म्हणून. म्हणजेच सुरुवातीला पासपोर्ट आणि व्हिसा हे एकच कागदपत्र होते असे म्हणायला हरकत नाही. या आधी साधारण इसवी सन पूर्व ४५० मध्ये पर्शियाच्या राजाने ‘नेहेमीया’ या त्याच्या दरबारातील अधिकार्याला राज्या पलिकडील जागेला भेट देण्यासाठी काही कागदपत्रे बनवून दिली, ज्यात त्या देशाच्या लोकांनी त्याची यात्रा सुखरूप होण्यास मदत व्हावी असे लिहिले होते. कदाचित ही पासपोर्टची सुरुवात होती. चीनी व जपानी साम्राज्यांमध्येसुद्धा अशा प्रकारचे कागदपत्र प्रदान करण्याची पद्धत होती. पासपोर्ट या शब्दाचा अर्थच ‘टू पास द गेट(पोर्ट)’ असा आहे. मीडीवल युरोपमध्ये हे पासपोर्ट मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागले. युरोपमध्ये ‘रेल्वेस्’चे इन्फ्रास्ट्रक्चर वाढले तसा पासपोर्टचा उपयोग कमी झाला व व्यवसायासाठी लोकांची ये-जा वाढू लागली, आणि युरोपमधल्या बॉर्डर्सना तसे फारसे महत्त्व उरले नाही. पहिल्या महायुद्धानंतर लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा ‘पासपोर्टस्’ अत्यंत महत्त्वाची गरज म्हणून समोर आले व त्यानंतर ‘व्हिसा’ची एन्ट्री झाली. ‘व्हिसा’ हा शब्द लॅटिनमधल्या ‘चार्टा व्हिसा’ म्हणजेच ‘पेपर दॅट हॅज बीन सीन’. आज व्हिसा हे आपल्या पासपोर्टवर स्टिकर रुपाने लावले जातात किंवा पेपर प्रिंट आऊट रुपाने दिले जातात. अनेक व्हिसा त्या देशाला पोहोचल्यावर ‘ऑन-अरायवल व्हिसाच्या’ रुपात घेता येतात. या देशांना भेट देणे अगदी सोपे ठरते. मालदीव, सेशल्स अशा सुंदर बीच डेस्टिनेशन्सना ऑन अरायवल व्हिसामुळेच आपण लास्ट मिनिट हॉलिडेज् घेऊ शकतो.
व्हिसा आणि इमिग्रेशनचे काम जसे देशाची बॉर्डर सुरक्षित ठेवणं आहे तसंच कस्टमसुद्धा हेच काम करतं याची जाणीव ऑस्ट्रेलियामध्ये होते. बॅगेज बेल्टवरून सामान येताच आपल्या बॅगांची तपासणी सर्वप्रथम कुत्रे त्या बॅगांना हुंगून करतात. ऑस्ट्रेलियामध्ये कुठलेही न शिजवलेले खाद्यपदार्थ नेताना सर्वप्रथम ते कस्टम्स्ला डिक्लेअर करावे लागतात नाहीतर साध्या फळासाठीसुद्धा चारशे-पाचशे डॉलर दंड भरावा लागतो. आयलंड कॉन्टिनेंट असलेल्या ऑस्ट्रेलियाला फुट अॅन्ड माऊथ आणि जगातील इतर आजारांपासून लांब ठेवण्याचे हे प्रयत्न आहेत हे लक्षात घेतले की तो दंडसुद्धा कमी वाटतो. व्हिसा, इमिग्रेशन, कस्टम्स् हे सगळे जर देशाच्या बॉर्डर्स जपण्यासाठी तैनात असले तरी अनेकवेळा आपण बॉर्डर पार करतोय हे लक्षातसुद्धा येत नाही. शेवटी काय, मनुष्याने बनविलेल्या ह्या मॅपवरच्या रेघा आहेत त्या दरवेळी निसर्गाला पटतीलच असे नाही. फिनलँड-स्वीडन-नॉर्वे ह्या देशांच्या बॉर्डर्स कदाचित जगातल्या सर्वात सुंदर व सर्वात फ्रेंडली बॉर्डर्स मानल्या जातात. अनेक ठिकाणी तर सुंदर लेक्स व नद्यांनी या बॉर्डर्स ठरल्यात व त्या ठिकाणी गेट काय, तार किंवा साधी भिंत सुद्धा नाहीये, अगदी आरामात आपण एका देशातून दुसर्या देशात जाऊ शकतो. नॉर्वे आणि स्वीडनमधली बॉर्डर दर्शवण्यासाठी त्या बर्फाच्छादित पर्वतांवरची काही झाडे काढण्यात आली, तेव्हा दोन्ही देशांच्या नागरिकांनी हा आयता बनविलेला रस्ता बर्फावर स्नोमोबाईल चालवून स्नो स्पोर्ट्सचा आनंद घेण्यास वापरला.
जगातली सर्वात मोठी बॉर्डर आहे, ती अमेरिका आणि कॅनडामधली तब्बल ५५०० मैल लांब पसरलेली. अमेरिका-कॅनडातील नैसर्गिक बॉर्डर आपल्याला दिसते ती नायगरा फॉल्सकडे. अमेरिकन व कॅनेडियन नायगरा फॉल्स दोन्हीही सुंदर आहेत व इथे बॉर्डरंच एक पर्यटन स्थळ बनले आहे. तसेच साउथ अमेरिकेत ब्राझिल व अर्जेंटिनामध्येसुद्धा इग्वासु फॉल्स ही नैसर्गिक बॉर्डर ठरते. नेदरलँड्स आणि बेल्जियमची बॉर्डर फार गमतीशीर आहे. बार्ले हे गाव नेदरलँड्स आणि बेल्जियम ह्या दोघांच्यामध्ये आहे. नेदरलँड्समध्ये याचे नाव ‘बार्ले नसाऊ’ आहे तर बेल्जियममध्ये याचे नाव ‘बार्ले हरट़ॉग’ आहे. रस्त्यावर पांढरे क्रॉसेस पेंट केले आहेत व एका बाजूला ‘NL’ लिहिलंय तर दुसर्या बाजूला ‘B’. आपण कुठल्या देशात आहोत हे ओळखायला आपल्या रस्त्यावर काढलेल्या खुणा पाहाव्या लागतात. जर एखादे घर बेल्जियम आणि नेदरलँड्स ह्या दोघांमध्ये असेल तर घराचे दार ज्या देशात असेल त्या देशात ते घर आहे असे समजले जाते. टॅक्स वाचवायला लोकांनी घराची दारेसुद्धा बदलली आहेत. बार्लेसारखे एखादे शहर दोन देशांमध्ये असते तर कधी-कधी एका शहरातच दोन खंड असतात. टर्कीची सुंदर राजधानी इस्तानबुलमध्ये तिथल्या बॉसफरस स्ट्रेटच्या एका बाजूला युरोप तर दुसर्या बाजूला एशिया खंड आहे. बॉसफरसवर क्रुझ राईड एन्जॉय करताना आपण एकाचवेळी युरोप व एशिया दोन्ही ठिकाणी भेट देऊ शकतो. नैसर्गिक असो की मनुष्याने बनविलेली असो, ह्या सीमा किंवा बॉर्डर्सना भेट देणे हेसुद्धा पर्यटनातले एक अनोखे स्थलदर्शनच आहे. अमृतसरच्या वाघा बॉर्डरवर दररोज पार पडणारी बीटिंग व रीट्रीट सेरेमनी ही बघायलाच हवी. मावळत्या दिनकराबरोबरच फ्लॅग खाली घेत बॉर्डरचे द्वार बंद केले जाते तेव्हा आपल्या जवानांना बघून त्यांच्यासाठी आदराने व कौतुकाने मन भरून येते. आपल्या बॉर्डर्सवर ते तैनात आहेत म्हणूनच आपण देशात सुरक्षित आहोत. जगाच्या प्रत्येक बॉर्डरवर शांतता बनवून ठेवणार्या जवानांना माझा भावपूर्ण सलाम!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.