सातही खंडांवरील अनेक देशांना भेट दिल्यानंतर काही ठिकाणांच्या आठवणी ह्या पुसटश्या झाल्यात. स्थलदर्शनांच्या जागा आणि त्यांची नावंही अनेकदा विसरायला होतात पण लक्षात राहतात ती अहमदसारखी माणसं. फाईव्ह स्टार व लक्झरी हॉटेल्समध्ये नेहमीच आपले लाड केले जातात व सर्व्हिस उत्तमच मिळते. पण शिकवलेल्या वागणुकीपेक्षा जेव्हा मनापासून केलेलं आदरातिथ्य अनुभवायला मिळतं, तेव्हा हीच खरी ‘हॉस्पिटॅलिटी’ आहे हे प्रकर्षाने जाणवतं.
‘अगं, आपण इकडे ज्यूस घेतला तर अहमद रागवेल का आपल्यावर?’ माझ्या मैत्रिणीने मला प्रश्न केला. पण आम्हाला तहान लागली होती आणि अहमदच्या ज्यूसचा स्टॉल थोडा लांब होता. मोरोक्कोच्या माराकेश शहरातील ‘जेम्मा-एल्-फना’ चौकातील अनेक ज्यूस स्टॉल्सपैकी एक ज्यूसचा स्टॉल अहमद चालवित होता. त्याची आमची ओळख तशी केवळ पाच मिनिटांची, पण कायम लक्षात राहील अशी. आदल्या दिवशी चौकात फिरताना आम्ही त्याच्या स्टॉलवर ज्यूस घ्यायला थांबलो. ‘जेम्मा-एल्-फना’चौकात रोजच जत्रा भरल्यासारखे अगदी मौज-मस्तीचे वातावरण असते. संध्याकाळ होताच ह्या चौकाचे रूपांतर एका गजबजलेल्या, चमचमत्या, धगधगत्या, हॅपनिंग चौकात होते. सुक्या मेवापासून ऑर्गन ऑइलपर्यंत प्रत्येक वस्तुची इथे विक्री होते. अगदी सुंदररित्या फळांची मांडणी करून सजविलेल्या ज्यूस स्टॉलपासून ते सी-फूडपर्यंत प्रत्येक प्रकारचे जेवणाचे स्टॉल इथे दिसतात. ट्रेडिशनल पोशाखात कुणी डान्स करून मनोरंजन करतंय, कुणी डोंबार्याचे खेळ खेळतंय, कुणी हातावर मेंदी काढतंय तर काही ठिकाणी टूरिस्टबरोबर लोकलसुद्धा फनफेअरसारख्या खेळांमध्ये मग्न झालेले दिसतात. ह्या सर्व चहल-पहलमध्ये आपल्या स्टॉलकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घ्यायचे कठीण काम प्रत्येक स्टॉलवर अहमदसारखे सगळेच विक्रेते करीत होते. ‘फ्रेश ज्यूस, फ्रेश ज्यूस’ असे बोल ऐकतानाच सलमान खान, शाहरूख खान यांची नावं मध्येच कानावर पडली आणि आमचे लक्ष अहमदकडे गेले. ‘इंडिया, ब्युटिफुल करीना कपूर, काजोल’ अशी अजून काही नावं घेत, आपले बॉलीवूडचे ज्ञान दाखवत अहमदने आमचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतले. त्याच्या स्टॉलवर डाळिंब, संत्री व इतर फळे अगदी पद्धतशीरपणे एका रांगेत एकावर-एक अशी रचली होती. अहमदला भारताबद्दल खरंच आकर्षण आणि कुतूहल होते हे कळले. आम्ही त्याच्या स्टॉलवर ज्यूस घेतोय, हे बघताच त्याने हट्टाने आम्हाला स्टॉलवर चढून तो ज्यूस कसा काढतोय हे पाहण्यास आमंत्रित केले. ती अतिशय साधी प्रक्रियासुद्धा त्याने कलात्मकरित्या सादर केली. आमच्या हातात ज्यूस ठेऊन त्याने आमच्याबरोबर फोटो काढण्याचा आग्रह धरला आणि ‘उद्या नक्की परत या’अशी प्रेमाची मागणीसुद्धा केली. अशा अहमदला सोडून दुसरीकडे ज्यूस पिणे म्हणजे आम्ही त्याचा विश्वासघात करतोय की काय, असं उगाचच वाटू लागलं. पण तहान लागली होती आणि त्या स्टॉलवरचा विक्रेतासुद्धा आमच्याकडे आशेने बघत होता. तिथे ज्यूस घेऊन थोड्या वेळानंतर फिरत-फिरत जेव्हा आम्ही अहमदच्या स्टॉलजवळून जात होतो, तेव्हा ‘आज ज्यूस नको’ हे सांगायच्या आधीच हातात कलिंगडाचा ताजा ज्यूसचा कप घेऊन अहमद माझ्या मागे आला, आणि आग्रह करीत तो ज्यूसचा कप माझ्या हातात देत ‘ही माझ्याकडून भेट समज, मला तुझ्याकडून पैसे नको आहेत’ असे म्हणत स्टॉलवर परतला. त्याक्षणी वाटलं, ‘आपण आधीचा ज्यूस का घेतला? आपण थोडा वेळ थांबलो असतो तर काय बिघडले असते?’ उगाच मनाला हुरहुर वाटू लागली. अहमद ज्यूस स्टॉलवर फार काही कमवत नसेल पण तरीसुद्धा त्याची ही उदार वृत्ती मनाला भावून गेली. काही गोष्टींचे, वागणुकीचे मोल हे पैशात मोजता येत नाही, कारण त्यांची किंमत त्यापेक्षा कैकपटीने मौल्यवान असते. अशा ह्या वागणुकीला कुठलाच प्राईसटॅग लावता येत नाही. हल्लीच भेट दिलेल्या मोरोक्को या देशाच्या प्रेमात पडण्याचं, हे माझं प्रथम क्रमांकाचं कारण ठरलं, हे वेगळं सांगायला नको.
सातही खंडांवरील अनेक देशांना भेट दिल्यानंतर काही ठिकाणांच्या आठवणी ह्या पुसटश्या झाल्यात. स्थलदर्शनांच्या जागा आणि त्यांची नावंही अनेकदा विसरायला होतात पण लक्षात राहतात ती अहमदसारखी माणसं. फाईव्ह स्टार व लक्झरी हॉटेल्समध्ये नेहमीच आपले लाड केले जातात व सर्व्हिस उत्तमच मिळते. पण शिकवलेल्या वागणुकीपेक्षा जेव्हा मनापासून केलेलं आदरातिथ्य अनुभवायला मिळतं, तेव्हा हीच खरी ‘हॉस्पिटॅलिटी’ आहे हे प्रकर्षाने जाणवतं. मोरोक्कोमध्ये फिरताना मला हे ठीक -ठिकाणी जाणविले आणि अनुभवायला मिळाले. माराकेशचा ‘जेम्मा-एल-फना’ हा मुख्य चौक या शहराचा केंद्रबिंदु ठरतो. या चौकाला लागूनच इथलं प्राचीन शहर ‘मदिना’ आहे, तिथेच ट्रेडिशनल ‘सूक’ म्हणजे प्राचीन बाजारपेठाही पाहायला मिळतात. मदिनामधील अनेक गल्लीबोळांमध्ये प्राचीन घरांचे छोट्या छोट्या हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे, ज्याला ‘रियाद’ म्हणतात. अरेबिक भाषेत ‘रियाद म्हणजे बगीचा’. मोरोक्कोच्या या मदिनाची स्थापना साधारण सातव्या-आठव्या शतकांमध्ये झाली व त्यानंतर इस्लामिक, फ्रेंच आणि स्पॅनिश आक्रमणांमुळे मोरोक्कोेवर त्या-त्या परंपरेचा प्रभाव पडत गेला. स्पेनच्या आन्दालुसिया भागातल्या घरांसारखेच या रियादमध्ये घराच्या मधोमध कोर्टयार्ड असते. या कोर्टयार्डमध्ये सुंदर गार्डन व सिरॅमिक टाईल्सने सजवलेले फाऊंटन्स् आणि संत्र्याची किंवा लिंबाची झाडे लावलेली दिसतात. कोर्टयार्डस्भोवती दोन-तीन मजल्यांची घरे बांधलेली आहेत. बाहेरून मातीच्या किंवा चिकणमातीच्या अगदी साध्या दिसणार्या भिंती त्या मदिनामधील गरीब-श्रीमंतांमधील दरी मिटवतात. बाहेरून आपल्याला आतल्या सौंदर्याची काहीच कल्पना येत नाही. आपल्या मालमत्तेचा गर्व किंवा दिखावा करू नये ही यामागची परंपरागत चालत आलेली भावना. ‘रियाद’ ही त्या काळातल्या श्रीमंत लोकांची घरे होती व आज अनेक रियादांचे छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये रूपातंर झालेले आहे. मोरोक्कोच्या ‘फेस्’ शहरात तिथल्या लक्झुरियस ‘रियाद फेस्’मध्ये राहण्याची संधी मला मिळाली. अर्थातच जसे अपेक्षित होते तसे एका लक्झरी हॉटेलची सर्व्हिस मला ‘रियाद फेस्’च्या अलौकिक सौंदर्याने सजलेल्या रूम्समध्ये राहताना मिळालीच. पण गम्मत म्हणजे माराकेशमधल्या एका छोट्याशा ‘रियाद दान्का’मधला माझा अनुभव अविस्मरणीय ठरला. ‘जेम्मा-एल-फना’ स्क्वेअरमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे आम्ही हा चौक लागताच उतरलो व एक हातगाडी चालवणारा पोर्टर करून त्याच्या हातगाडीत आमच्या बॅग्ज टाकून ‘रियाद दान्का’च्या शोधात निघालो. चौकातून पुढे मदिनात शिरल्यावर त्या अलिबाबाच्या गुहेप्रमाणे खजिन्यांनी भरलेल्या ‘सूक’, म्हणजेच बाजारपेठेच्या गल्ल्या पार पाडत एका अतिशय छोट्या गल्लीत असलेल्या ‘रियाद दान्का’ जवळ येऊन पोहोचलो. चेक-इन करण्यासाठी सईद आमची वाट बघतच होता. ‘बी माय गेस्ट-माझे घर हे तुमचे घर आहे असे समज. कुठल्याच गोष्टीचा संकोच करू नकोस. सकाळी तुम्हाला किती वाजता ब्रेकफास्ट करायला आवडेल एवढे कळवा. छतावर एक छोटा स्विमिंग पूल आहे व आरामखुर्च्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. आणि हो, ही घराची चावी घ्या. जर तुम्हाला फेरफटका मारून परत यायला उशीर झाला तर चावीचा वापर कर. तुम्हाला आमच्या रियादमध्येे वास्तव्य करायला नक्कीच आवडेल ही आशा करतो’, असे म्हणत सईदने रियाद दान्कामध्ये आमचे स्वागत केले आणि आमच्या बॅगा जिने चढत रूममध्ये नेऊन ठेवल्या. त्या रियादमध्ये केवळ सहा रूम्स होत्या आणि छोटे असले तरी अतिशय मनापासून लक्षपूर्वक ते रियाद सजविलेले होते. त्या रियादच्या मध्यभागी छोट्याशा कोर्टयार्डमध्ये ब्रेकफास्ट टेबल्स् आणि अजून एक स्विमिंग पूल होता. सुंदर फर्निचर, मोरोकन लँटर्नस् व सिरॅमिक टाईल्स्ने ते रियाद सुशोभित केले होते. आमची रूमसुद्धा मोरोकन आर्टपीसेस्ने सुंदर प्रकारे सजवली होती व बाथरूममध्ये शॉवर आणि बाथटबसुद्धा होता. पण त्यापेक्षाही सईदने जेव्हा घराची चावी माझ्या ताब्यात दिली आणि स्वत:चा फोन नंबर मला देत, ‘काहीही लागले तरी फोन कर, संकोच करू नकोस’ असं हक्कानं-विश्वासानं-प्रेमानं सांगितलं, तेव्हा मामाच्या गावाला अर्थात आजोळी राहायला आल्याचा आनंद मला झाला.
आम्हाला वेलकम करताना नुकत्याच तोडलेल्या ताज्या पुदिन्याचा मोरोकन मिंट टी व खजूर खाण्यासाठी दिले गेले. दुसर्या दिवशी लोकल मोरोकन ब्रेकफास्ट करण्याची आमची फर्माइश पूर्ण करत रियाद दान्काच्या स्वयंपाकीण बाईंनी इथले फ्रेश चीज, जॅम बरोबर मेलोइ हे पराठ्यासारखे मोरोकन ब्रेड आमच्यासाठी बनविले. ‘रियाद दान्का’ सोडताना आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांच्या घरचा पाहुणचार घेऊन आपण परत जातोय असे वाटले. मोरोक्कोमध्येे अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मला मिळाली. फेस् आणि माराकेशसारख्या शहरांपासून वाळवंटापर्यंत आणि समुद्र किनारी स्थित असलेल्या कासाब्लंका आणि राजधानी रबातमध्ये, अगदी प्रत्येक ठिकाणी तेच आदरातिथ्य अनुभवले आणि तेव्हाच मोरोक्कोच्या बर्बर ट्राईब्जची ओळख झाली. इस्लामिक, फ्रेंच व स्पॅनिश लोकांच्या आक्रमणापूर्वीपासून मोरोक्कोत ‘बर्बर’ लोक राहत होती. ‘हॉस्पिटॅलिटी’ ह्या लोकांच्या स्वभावात ठासून भरलेली आहे, ती त्यांना शिकवावी लागत नाही. अनेक युगं लोटल्यानंतरही बर्बर परंपरेबरोबर हॉस्पिटॅलिटीही त्या लोकांना वारसा मिळाल्यागत पुढच्या पिढीकडे आपोआप जाते. भारतात आणि मोरोक्कोेमध्ये मला बरेच साम्य जाणवले. जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, जयपूरसारखेच ‘फेस्’ हे प्राचीन शहर आपल्या अनेक पारंपरिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. शेफशावेन हे ‘द ब्लू पर्ल’ म्हणजेच ‘निळे शहर’ म्हणून ओळखले जाते, माराकेशला ‘द रेड सिटी’ म्हणतात, कासाब्लंकामध्ये बरीच पांढरी घरे आहेत. कलाकुसरदेखील इथल्या लोकांमध्ये ठासून भरलेली आहे आणि भारताप्रमाणेच ‘अतिथी देवो भव:’ची भावना जपणारी अगत्यशील व प्रेमळ लोकही मोरोक्कोत भेटतात. इथल्या लोकांकडून ठीक-ठिकाणी ‘बी माय गेस्ट’ ऐकताना मला स्वतःच्याच घरी असल्यासारखं वाटत होतं, यापेक्षा वेगळा आनंद तो काय!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.