बर्याच मुलींना लग्न झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर घरी कुणी सांभाळायला नसल्यामुळे करियरवर पाणी सोडायला लागतं. मुलं थोडी मोठी झाल्यावर आता काय? हा प्रश्न आ वासून उभा ठाकतो समोर. टॅलेंट खूप असतं पण नाही पुढे जाता येत जबाबदार्यांमुळे आणि मग रीतेपणा-डीप्रेशनने ग्रासायला सुरुवात होते. ह्या महिलांनी त्यांचं टॅलेंट वाया जाऊ न देता पुन्हा करियरची सुरुवात केली पाहिजे, घरच्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे.
माणूस खर्या अर्थाने एका दिवसात किती तास काम करू शकतो? जास्तीत जास्त अभ्यासकांचं म्हणणं आहे की अडीच तास, काहीजण म्हणतात चार ते पाच तास तर काही जणांचं म्हणणं आहे सहा ते सात तास. हे जे खर्याखूर्या कामाचे सहा सात तास असतात त्यापुढे माणसाची क्षमता संपते आणि तो काम करू शकतच नाही. काहीजण आणखी पुढे जाऊन म्हणतात की, ‘जे लोक सांगतात मी दिवसातून अठरा ते वीस तास काम करतो ते लोक एकतर स्वत:ला फसवताहेत किंवा जगाला तरी’. त्यांच्यामते ‘खरं काम’ म्हणजे एकाग्रतेने हातातल्या कामावर कुठेही लक्ष विचलीत न होऊ देता काम पूर्णत्वाला नेण्यासाठी केली गेलेली मेहनत. यामध्ये इंटरनेट सर्फिंग, चॅटिंग आणि सहकार्यांशी मारलेल्या गप्पा यासारख्या अनेक अनप्रॉडक्टीव्ह गोष्टींचा समावेश नाही. त्यावर जेवढा जास्त अभ्यास केला तेव्हा त्यातलं खरंपण कळायला लागलं आणि मलाही थोडसं खजिल व्हायला झालं की आपणही कधीतरी मनातल्या मनात खूश झालोय की, ‘मी दिवसाला पंधरा ते सोळा तास काम करते’ ह्या स्वत:च निर्माण केलेल्या किंवा कुणीतरी, ‘किती काम करतेस?’ह्या केलेल्या खुशामतीवर. वरच्या थिअरीप्रमाणे विचार केला तर त्या सो कॉल्ड सोळा तासातले खरे कामाचे तास सोळा नसतीलच किंवा नव्हतेच हे माझं मलाच आकलन झालं, आणि हे ही आठवलं की जेव्हा-जेव्हा असे ‘लाँग वर्कींग डेज्’ आम्ही संपूर्ण टीमने मिळून काम केलंय तेव्हा दुसर्या दिवशी अगदी गळून जायला होत होतं, दुसरा दिवस हमखास अनप्रोडक्टिव्ह जायचा किंवा रेटला जायचा. नो डाउट, आपण करतो अनेकदा असं रात्रंदिवस काम. कधी ती डेडलाइन मॅच करण्याची आवश्यकता असते तर कधी आपल्या समोेर वाढून ठेवलेलं कामच जास्त असतं. पण जेव्हा जेव्हा या विषयाच्या जास्तीत जास्त खोलात गेले तेव्हा असं जाणवायला लागलं की ‘आपण इतके तास काम करतो हे डंका मिरवणं आधी बंद करायचं कारण शारिरीक आणि मानसिकदृष्ठ्या ते शक्य नाही आणि आत्ताच्या जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून रहायचं असेल तर प्रथम हट्टकट्ट आयुष्य किंवा तंदुरूस्त शरीर कमावणं, मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्या घटनेने किंवा सरकारने कामाच्या तासाची जी मर्यादा घालून दिलीय ती बरोबर आहे हे पटायला लागलं. ह्याला म्हणतात, ‘उशीरा आलेलं शहाणपण’. आमच्या एका मॅनेजरला बरं वाटत नव्हतं म्हणून काही मेडिकल टेस्ट डॉक्टरांनी करायला सांगितल्या. सगळे रीपोर्टस् नॉर्मल आल्यावर आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्चास टाकला पण त्याचबरोबर डॉक्टरांनी तिला औषधोपचार कशासाठी दिला असेल तर तो रात्री आठ तास झोप मिळावी ह्यासाठी. सध्या तीन महिने ह्या औषधोपचाराने तिने रोज आठ तास झोप घ्यायचीय आणि नंतर तिला ती सवय लागेल आणि कमी झोपेमुळे जी काही शरीराची हानी झालीय ती भरून निघेल, पुन्हा ती फिट अॅन्ड फाईन होईल. वा! अशा तर्हेचा उपाय सर्वांनाच लागू पडेल नाही का. असं म्हणतात की एखादी गोष्ट एकवीस दिवस सलग केली की त्याची सवय लागते, आणि नव्वद दिवस म्हणजे तीन महिने केली की ती लाईफ स्टाइल बनून जाते. आमच्या पार्ल्याच्या डॉक्टर सरीता डावरे ज्यांना डॉक्टरपेक्षा ‘लाईफ स्टाइल चेंजिंग एक्सपर्ट’ म्हणणं मला जास्त सयुक्तिक वाटतं. त्या म्हणतात, ‘रात्री दहाला झोपणं आणि सकाळी पाचला उठणं, रोज एक ते दीड तास व्यायाम म्हणजे शारिरीक अॅक्टीव्हिटी करणं हे मस्ट आहे. हे जर तुम्हाला जमत असेल तरच माझ्याकडे या’. आणि ही सवय लागते बरं का. लाईफ स्टाइल चेंज होते. अर्थात दोनेक वर्षात डीरेलमेंट होते मग पुन्हा एकदा डॉक्टरांच्या छडीसमोर जाऊन उभं रहायचं आणि गाडी रुळावर आणायची, हे असं चालू आहे माझचं नव्हे तर अनेकजणांचं. पण एकूणच सात ते आठ तास झोप आपल्या प्रत्येकासाठी मस्ट आहे ही बॉटमलाईन.
सो! सरकारने आखून दिलेली कामाची मर्यादा आहे आठ तास डेस्क वर्क अधिक लंचब्रेक किंवा कोणतेही असे छोटे ब्रेक्स. वीणा वर्ल्ड कल्चरमध्ये एक बंधन आम्ही घालून घेतलंय ते म्हणजे सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे काम करायचं, कुठेही-डीफॉल्ट करायचा नाही, होऊ द्यायचा नाही. त्याप्रमाणे सुरुवातीपासूनच सर्वांसाठी आठ तास डेस्क वर्क अधिक लंच ब्रेक पंचेचाळीस मिनिटं ही गोष्ट आम्ही अगदी तंतोतंत पाळतोय. आत्ताच मागच्या महिन्यात आम्ही ‘संडे ऑफिस बंद’ हाही निर्णय घेऊन टाकला. ह्याविषयी सविस्तर वृत्तांत मी लिहिला होताच. ‘संडे बंद’ हे व्हायचं कारण आमची मॅनेजर्स मीट एप्रिलमधली. आधी सर्व सेल्समंडळी उत्साहात आम्हाला संडे सुरू पाहिजे म्हणून मागे लागली आणि व्हायचा तोच परिणाम झाला. टोटल चर्निंग आऊट. पूर्णपणे रोजच्या कामातून ब्रेक देणारी एक रविवारची सुट्टी मस्ट आहे प्रत्येकाला. शरीराला आणि मनाला आराम मिळालाच पाहिजे. रविवारी ऑफिसचं काम सोडून दुसरं काहीतरी वेगळं आवडतं काम करा आणि रीफ्रेश होऊन सोमवारी ऑफिसला या, ऑर्गनाईज्ड पद्धतीने काम करा आणि उत्साहात रोज वेळेत घरी जा ही पद्धत मला स्वत:ला आवडते, पण सेल्सच्या संडे ओपनच्या उत्साहावर मी तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं नाही कारण माहीत होतं की हेच एकदिवस येऊन ‘संडे बंद’ची हाक देणार आहेत. म्हणजे अजूनही काहीजणं संडे ओपन पाहिजे म्हणून डोकं वर काढताहेत पण वेेटो वापरलाय, म्हटलं ‘नाऊ एन्जॉय रेन्स!’
ह्याच मॅनेजर्स मीटमध्ये आमच्या माईस डिव्हिजनच्या अजय घागने आणखी एक गोष्ट नव्याने निदर्शनास आणली ती म्हणजे, ‘काहीतरी करा पण सकाळी पावणे दहाचं इनटाइम पकडायला जी काही घाईधावपळ, पळापळ होते ती बघून कधी कधी भिती वाटते कुणी त्या रेटारेटीत पडेल बिडेल की काय ह्याची. त्याचवेळी आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगमधील अनेक ऑफिसेस ओपन होतात त्यामुळे फक्त आपले साडेपाचशे-सहाशे लोकं नाहीत तर जवळ-जवळ दोन हजारापेक्षा जास्त लोकांची ‘ऑफिस इन टाइम’ वेळ एकच आहे. आपण काही वेगळा मार्ग काढू शकतो का?’ हूंऽऽऽऽऽ हा नवीन इश्यू होता. आमची इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टिंग हेड मोनिका कर्णिक किंवा एअर डिपार्टमेंटमधली तृषिता शिंदे ह्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेक आई, ज्यांची मुलं लहान आहेत त्यांच्या रीक्वेस्ट यायला सुरुवात झाली होतीच की त्यांना ऑफिसचं टाईम बदलून मिळेल का ह्यासंबंधी. सो एकंदरीतच अनेकांना सेट ‘दहा ते सहा’ हे ऑफिस टाईम सोयीचं होतं असं नाही हे लक्षात आलं. म्हणजे ऑफिस टाईम बदलणं ही काळाची गरज होती. त्याचसोबत कधी लेट झालं किंवा घरच्या जबाबदार्यांमुळे खूपदा लेट व्हायला लागलं तर इन टाईम चुकल्यामुळे अनेकांना गिल्टी फिलिंग यायचं. जेव्हा टीम म्हणून आपण काम करतो तेव्हा असं व्हायला नको. गिल्ट इज टू बॅड! तर एकंदरीतच कार्यालयात काम करणार्या महिलांना खासकरून चेंज इन ऑफिस टाईमची गरज होती. (आमच्याकडे टूर मॅनेजर्समध्ये जास्तीत जास्त संख्या जेन्ट्सची आहे तर कार्यालयात महिलांची) कुणाला घरची जबाबदारी आहे तर कुणाला मुलांच्या शाळेची किंवा पाळणाघराची वेळ सांभाळायचीय. कुणी असेही आहेत की ज्यांना काही एज्युकेशनल क्लासेस वा कॉलेज करायचंय किंवा ट्रेनची गर्दीची वेळ टाळायचीय. अर्थात अनेक कॉर्पोेरेट ऑफिसेसनी आणि मल्टिनॅशनल कंपन्यांनी ‘फ्लेक्सी ऑफिस अवर्स’ची सुरुवात केली होती. त्यांचा आमच्या एच आर टीमने अभ्यास करून एक प्रेझेंटेशन दिलं. काही कॉर्पोरेट्सची पद्धत आवडली ती म्हणजे अकरा ते पाच. हा ‘कोअर टाईम’, त्यात सगळे पाहिजेत म्हणजे महत्वाच्या मिटिंग्ज-कामं तेव्हा करता येतात. त्याआधारे असे वर्किंग अवर्स मॅच करायचं सर्वमताने ठरलं. सो सगळ्यांना सोयीचं होईल असं आम्ही ८.४५ ते १०.४५ इन टाईम आणि लंच धरून एकूण वेळ आठ तास पंचेचाळीस मिनिटांची केली. सेल्स ऑफिसेस्साठी ०९.४५ ते १०.४५ असं फ्लेक्सी टाइमिंग केलं. आणखी एक गोष्ट ‘सेल्फ डिसिप्लीन’ खाली त्यांना करायला सांगितली ती म्हणजे स्वत:चं इन टाईम-आऊट टाईम ठरवा. नाहीतर सकाळी उठल्यावर आपल्याला शिस्तीत काम आटपून निघायची जी सवय असते ती तुटल्यावर संभ्रमावस्था येईल. आता इन टाईम चुकेल ही भिती राहिलेली नाही. म्हणजे थोडक्यात फ्रीडम मिळालंय फ्लेक्सी टाईमचं, पण हे फ्रीडम नीट वापरलं नाही तर बेशिस्तीची रूजवात होईल. ते होऊ द्यायचं नाही. अॅक्च्युअली फ्रीडम म्हणजे जास्त रीस्पॉन्सिबिलिटी. आणखी जपून वाटचाल करावी लागते. सकाळी उठल्यावर त्या दिवसाचं टार्गेट समोर दिसायलाच पाहिजे. ‘कधीही जाऊ आणि कधीही येऊ’ असा चलता है अॅटिट्यूड एकूणच त्या व्यक्तीच्या परफॉर्मन्सवर घाला घालील त्यामुळे ‘फ्लेक्सी टाईम’ ही संकल्पना समजवून घेऊन जपून वापरावी ही कळकळ. आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे ‘नो रेग्युलरायझेशन’ इन टाईम-आऊट टाईम. संपूर्णपणे जे मशीन सांगेल त्यावर रेम्युनरेशन. मॅनेजर अॅप्रुव्हल, बायस-अनबायस फीलींग, मॅनेजर्सनाही सतत चिंता... हो कुणाला म्हणायचं आणि नाही कुणाला? तसंच लीव्ह अप्रुव्हलसाठीही वाया जाणारा टाईम ह्या सगळ्या गोष्टींचं उच्चाटन केलं. मोठ्या संस्थांमध्ये ह्या गोष्टी असतातच पण लहानकडून मोठ्याकडे वाटचाल करताना आपल्याला हे बदल करावे लागतात.
आम्ही शक्यतोवर ‘वर्क फ्रॉम होम’लाही नाही म्हणतो, अनलेस इमर्जन्सी असेल किंवा ऑर्गनायझेशनची गरज असेल तर म्युच्युअल अंडस्टँडिंगने तशी सोय केलीही जाईल पण हे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा खाली ठेवायचंय. घरी असाल तर घरच्यांना वेळ द्या आणि ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसच्या कामांना प्राधान्य द्या. दोघांची सरभेसळ वा गल्लत म्हणजे गोंधळाची परिस्थिती ती जेवढी दूर ठेवता येईल तेवढी ठेवायची. गोष्टी सॉर्ट आऊट करीत मार्गक्रमणा करणं म्हणजेच तर आयुष्य आहे, सध्याच्या भाषेत त्याला स्टाईलमध्ये ‘सॉर्टेड’ म्हटलं जातं. हल्ली दोघंही जॉबला असतात, नव्हे ती गरजच आहे. फ्लेक्सी टाइमिंगमुळे ‘मी मुलाला सोडते शाळेत, तू घेऊन येत जा’ अशा तर्हेनी ‘एकमेका साह्य करू’ अशी घडीही जरा व्यवस्थित करता येईल हाही फायदा. स्ट्रेस कसा कमी करायचा ह्यापेक्षा स्ट्रेस येणारच कसा नाही ह्यावर काम करणं जास्त महत्वाचं.
बर्याच मुलींना लग्न झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर घरी कुणी सांभाळायला नसल्यामुळे करियरवर पाणी सोडायला लागतं. मुलं थोडी मोठी झाल्यावर आता काय? हा प्रश्न आ वासून उभा ठाकतो समोर. टॅलेंट खूप असतं पण नाही पुढे जाता येत जबाबदार्यांमुळे आणि मग रीतेपणा-डीप्रेशनने ग्रासायला सुरुवात होते. ह्या महिलांनी त्यांचं टॅलेंट वाया जाऊ न देता पुन्हा करियरची सुरुवात केली पाहिजे, घरच्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महिलांनी भले करियर सोडलं असेल मध्येच पण घरची जबाबदारी सांभाळताना आपलं नॉलेज मात्र वाढवत राहिले पाहिजे. नेव्हर बी आऊटडेटेड! कारण करियरचा पुन्हा शुभारंभ करताना ते खूप कामी येईल. फ्लेक्सी ऑफिस अवर्स अशा महिलांना लाभदायी ठरतील असं वाटतं. आम्हीही अशा महिलांकडून अॅप्लिकेशन्स मागवलेत. ‘लेट्स लूक फॉरवर्ड टू अ बेटर लाईफ, मिनिंगफूल लाईफ!’
Atishay Pragalbhtene mandlele vichar,..aani tewdhyach samanjaspane ghetlele decision.
A very unique step for stress-less official life.
In future, if circumstances permit, I will definitely join ur organisation...TO
" लूक फॉरवर्ड टू अ बेटर लाईफ, मिनिंगफूल लाईफ!’. ABHINANDAN.
फारच छान लेख आहे. सर्व बाबींचा समवेश करून कर्मचाऱ्यांना तणावमुक्त केलेत. अभिनंदन