“अॅन्ड सो, माय फेलो अमेरिकन्स: आस्क नॉट व्हॉट युवर कंट्री कॅन डू फॉर यू-आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युवर कंट्री...” अमेरिकेचे पस्तीसावे प्रेसिडेन्ट जॉन एफ केनेडी यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणातलं हे सुप्रसिद्ध वाक्य जगातल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरलं आणि अनंत काळ ते राहिल, यात शंका नाही. त्याच धर्तीवर म्हणावसं वाटतं...
हल्ली जवळजवळ दर महिन्याला स्वित्झर्लंडची वारी होतेच माझी. कधी वुमन्स स्पेशल युरोपला गेलेल्या चार्मिंग ब्युटिफूल गर्ल्सना भेटायला तर कधी सीनियर्स स्पेशल युरोप सहलीला गेलेल्या यंग अॅन्ड एनर्जेटिक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांशी संवाद साधायला. जून महिन्यात चारशे सीनियर मंडळींच्या दहा सीनियर्स स्पेशल सहली सुरू होत्या, अगदी सुरळीतपणे. अर्थात त्याचं श्रेय जातं ते आमच्या सेवाभावी, तत्पर आणि हरहुन्नरी टूर मॅनेजर्सना आणि त्यांच्या बॅकअपला असलेल्या वीणा वर्ल्ड ऑफिस टीमला. ज्यावेळी युरोप टूर्सच्या ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींना दोन बॅचेसमध्ये दोन दिवस स्वित्झर्लंडला गाला इव्हीनिंगला भेटले तेव्हा प्रत्येक सहलीची मंडळी आमची सहल किती छान चाललीय, आमचे टूर मॅनेजर्स कसे उत्कृष्ट ह्याचं वर्णन करीत होते, त्यांना आशिर्वाद देत होते. मला निश्चितपणे आमच्या टीमचा अभिमान वाटत होता. हा अनुभव खरंतर मला दर महिन्याला जगाच्या किंवा भारताच्या कानाकोपर्यात जिथे जिथे सीनियर्स स्पेशलच्या सहली सुरू असतात त्या सर्व सहलींवर येत असतो. ह्या सहलींचं नाव आम्ही ‘आशिर्वाद स्पेशल’ ठेवलंय कारण खरोखरंच ह्या सहलींवर ज्येष्ठांकडून आशिर्वादांची खैरात मिळते आम्हाला, जी आमच्यासाठी सर्वात मोठी एनर्जी असते. कोणत्याही व्यवसायात ग्राहकांचे आशिर्वाद मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि ती सतत आपल्या पाठिशी असलीच पाहिजे यादृष्टीने आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.तर अशा ह्या सीनियर्स स्पेशलच्या सहलींसोबत माझा प्रवास गेली बारा वर्ष अखंड सुरू आहे. तीन-चार दिवसांच्या शॉर्ट टूर्सना किंवा ज्या सहलीमंध्ये इव्हेंट ऑर्गनाईज करायला वेळ नसतो अशा ठिकाणी माझं जाणं होत नाही पण हल्ली ही सारी ज्येष्ठ मंडळी वर्षातून किमान दोन किंवा तीन सीनियर्स स्पेशल टूर्स करतात त्यामुऴे कुठे ना कुठे एखाद्या सहलीवर त्यांची भेट घडते. ह्यात माझा फायदा म्हणजे माझी एनर्जी वाढते त्या सहलीवरचा आनंदी माहोल बघून.
‘सहलीसारखी सहल त्यात काय एवढं?’ असं तुम्ही म्हणाल. खरंय ते, वरवर बघता ही एक सहलीसारखी सहल आहे पण तरीही ती वेगळी आहे. या सहलीला आलेल्या मुला-मुलींची वयं साधारणपणे ५५ ते ८५ दरम्यान असतात. वयानुरूप आलेल्या ‘वेअर अॅन्ड टेअर’ मुळे ज्या काही छोट्या शारिरीक तक्रारी असतात त्या या सहलीवर पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात. अहो घरी जो वेळ मिळतो ह्या तक्रारींना गोंजारायला तो आम्ही इथे देतच नाही. ‘छोट्या शारिरीक तक्रारींचं विस्मरण होणं हाच मोठा इलाज आहे त्या सो कॉल्ड आजारांचा’. आणि हे माझं मत किंवा फिलॉसॉफी नाही तर कितीतरी ज्येष्ठ नागरिक येऊन सांगतात, ‘अगं वीणा, आमचे पाय दुखायचे घरी पण इथे इतक्या दिवसात काही जाणवलं म्हणून नाही’, ‘कंबरदुखी औषधं न घेताच कुठे पळून गेली कळलंच नाही’, ‘आम्हाला दहा वर्षांनी लहान केलंत तुम्ही’, ‘आयुष्यात पहिल्यांदा फॅशन शोमध्ये भाग घेतला’, ‘आमच्या ह्यांनी पहिल्यांदा डान्स केला’, ‘तुला माहितीय का आमची ही आयुष्यभर साडीमध्ये वावरली पण यावेळी मुलीने आग्रह केला आणि हिने पहिल्यांदा स्कर्ट-टॉप आणि जीन्स घालण्याचं धाडस केलं’. आनंदाला आलेलं उधाण बघायचं असेल तर ह्या सहलींवरच्या एकूणच माहोलचा अनुभव एकदा घ्यावा. आत्ताच्या या सहलीवर हातात काठी घेऊन स्मार्टली असा काही रॅम्पवॉक एका गुजरातमधून आलेल्या आजींनी केला की टाळ्यांच्या कडकडाटाने हॉल दुमदुमून गेला. हातात काठी असो की कमरेला बाक आलेला असो इथे प्रत्येकजण आपला राजा असतो किंवा राणी असते. ‘मीच माझा राजा’ किंवा ‘मीच माझी राणी’ हा रुबाब त्या आसमंतात पुरेपूर भरलेला असतो त्या दिवशी. युरोप किंवा अमेरिका किंवा ऑस्टे्रलियासारखी सीनियर्सची सहल म्हणजे सर्वार्थाने फिटनेस टेस्टच असते. एकदा ही सहल केली की ‘यू आर फिट अॅन्ड फाईन’ चं अदृश्य सर्टिफिकेट मिळाल्यासारखं असतं. आपण हे करू शकतो किंवा ‘तुम्हाला हे झेपणार नाही’ असं वाटणार्या आपल्या आप्तांना आपण दाखवून दिलेलं असतं की ‘अभी तो मै जवान हूँ।’ सीनियर्स स्पेशल सहल हा फिटनेस फंडा मी म्हणते तो असा.
आपणही आपल्या वयाचा अभिमान बाळगला पाहिजे. मग ते पंचावन्न असो की पंच्याऐंशी. अहो इथपर्यत पोहोचायचं भाग्य जे मिळालंय, अनेकांना नाही ते मिळत, मग हा विजय नाही का? चला, आता वय मिरवूया. आणि आयुष्य आणखी आनंदाने कसं जगता येईल ह्याचा प्लॅन करू या. चांगल्या आठवणींच्यात रमून जातानाच आणखी छान छान आठवणींची साठवण करू या. भविष्यासाठी चांगल्या आठवणी निर्माण करणं हे तर आपल्या हातात आहे मग वेळ कुठे आहे आपल्याला कुरकूर करायला? वय माणसाने निर्माण केलंय, त्याचा आनंदाशी काहीही संबंध नाही. वृद्धत्व हातात नाहीये पण मनाने वृद्ध न होणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. ‘लेट्स कंट्रोल अवरसेल्व्हज’, तोच आहे आपला फिटनेस फंडा.
ही सीनियर्स स्पेशलची सहल नकळतपणे स्पिरिच्युअली फिलॉसॉफिकल बनून जाते. ‘आय लव्ह मायसेल्फ, लेट्स लव्ह अवसेल्व्हज्’ संपूर्णपणे असं वातावरण. ‘या वयात ही कसली थेरं’ हा शेरा मारायला आणि ऐकायला इथे पूर्णपणे मज्जाव. खरंतर प्रत्येक घरातनं ह्याचं उच्चाटन झालं पाहिजे. अहो सगळ्यांचं करता करता वय कधी वाढत गेलं ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा जर ती एकटी असेल किंवा तो एकटा असेल तर नटायला थटायला, आयुष्य आनंदात जगायला ‘बुढ्ढी घोडी लाल लगाम’ किंवा ‘आता ह्या वयात शोभतं का’ ह्या अलिखित पण नयन बोलले सर्व काही अशा बंधनांचा अदृश्य दबाव. बहुतांश ठिकाणी परिस्थिती एवढी वाईट नाहीये. पण जिथे आहे तिथे बदल घडलाच पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं त्यांचं आयुष्य त्यांनी आनंदात घालवलं पाहिजे यासाठी मनापासून प्रयत्न झाले पाहिजेत. एक सुविचार याबाबतीत आठवला तो म्हणजे, ‘जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा ज्येष्ठांचा सन्मान करा, जेव्हा तुम्ही शक्तीवान असता तेव्हा दुर्बलांना सहाय्य करा कारण कधीतरी तुम्हीही ज्येष्ठ होणार आहात किंवा दुर्बल होणार आहात’. वय वाढणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. पण कधीकधी वीस पंचवीस वर्षाची मुलं वृद्ध झाल्यासारखी वाटतात तर नव्वदीतल्या काहींचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा असतो. आमच्या कार्यालयात एकदा एच. आर चा एक रीमार्क आला, ‘कॅन्डीडेट इज व्हेरी ओल्ड’. म्हटलं, “किती वय?”. तर म्हणे, ‘बेचाळीस’. मी निःशब्द, म्हटलं मग ह्या कॅलक्युलेशनप्रमाणे मी तर रीटायर्डच व्हायला पाहिजे. तिशीतल्या तरुणांना चाळीस हे ‘ओल्ड एज’ वाटतं तर ज्येष्ठांमध्ये पन्नास वय म्हणजे ‘यंग एज’, किती रीलेटीव्ह टर्म आहे बघा नं.
कोणत्याही वयाची व्यक्ती असो तिला विचारा, ‘ओल्ड एज म्हणजे किती?’ तर ती म्हणेल, ‘त्याच्या वयापेक्षा दहा-पंधरा वर्ष मोठे’. जनरल फॅमिली टूर्समध्ये यंगस्टर्सकडून एक कुरकूर ऐकू येते कधीतरी किंवा डिमांड असते की तुम्ही फक्त तरुण तरुण लोकांच्या सहली काढा. समजवावं लागतं अशावेळी. पहिला प्रश्न असतो, ‘यंग कोण आणि ओल्ड कोण?’. भारतीय संस्कृती एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर करते ज्यात छोटे मोठे ज्येष्ठ सगळे गुण्यागोविंदाने राहतात, मग सहलही त्या त्या काळापुरतं एक छोटं कुटुंबच असतं की. तरीही वेगवेगळ्या मनःस्थितीचा विचार करता आम्ही वीस ते पस्तीस वयोगटासाठी सिंगल्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल सहली आणल्या वय वर्ष पंचावन्नच्या पुढच्या पर्यटकांसाठी. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की सीनियर्सच्या सहली सुरू झाल्या त्याचं कारण तरुणांनी कुरकूर केली म्हणून नव्हे तर घरच्या जबाबदार्यांमधून थोडंफार मुक्त झाल्यावर आयुष्याचा उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी, ‘मी-माझं आयुष्य-माझा आनंद’ ह्या संकल्पनेला चालना देण्यासाठी. संकल्पनाच जेव्हा एवढी सुंदर असते नं तेव्हा त्यापासून मिळणारा आनंदही तेवढाच मोठा असतो. सीनियर्स स्पेशलची दिवसागणिक वाढणारी लोकप्रियता ह्या गोष्टींचा चालता बोलता पुरावा आहे.
बर्याच वेळा ह्या सहलींवर एखादी आई किंवा एखादे वडील किंवा आईबाबा येऊन सांगतात की आम्हाला आमच्या मुलीने किंवा मुलाने ही सहल भेट दिलीय तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचा मुलांविषयीचा अभिमान बरंच काही बोलून जातो. आज आई-वडिलांना वेळ देणं ही दुराग्रस्त गोष्ट झालीय जीवघेण्या जागतिक स्पर्धेच्या युगात. दोष कुणाचाच नाही पण मुलांच्या मनात मात्र ती एक गिल्ट असते आणि त्याचं परिमार्जन वेळ नाही तर निदान आनंद देऊन साजरं केलं जातं. आता इथे एखादी सहलच भेट द्यायला पाहिजे असं नाही तर अचानकपणे पाठवलेली सिनेमाची दोन तिकीटं, एखाद्या सुंदर रेस्टॉरंटमध्ये त्यांच्यासाठी किंवा तिच्या वा त्याच्या मित्रासोबत डिनर करण्यासाठी दिलेलं वाऊचर ह्यांनीही खूप मोठा आनंद निर्माण करता येतो. ते महत्वाचं आहे. आणि म्हणूनच जॉन एफ केनेडींचं सुप्रसिद्ध भाषण आठवलं आणि त्या धर्तीवर म्हणावसं वाटलं, ‘आस्क नॉट व्हॉट युवर पॅरेंट्स डिड फॉर यू; आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युवर पॅरेंट्स!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.