कोणतीही पहिली गोष्ट ही आपली एक आठवण बनून जाते. मग तो शाळेचा पहिला दिवस, युनिफॉर्मला बाय बाय करून आवडत्या कपड्यांमध्ये कॉलेजची चढलेली पहिली पायरी, नोकरीचा पहिला दिवस, तिची आणि त्याची पहिली ओळख... अशा सगळ्या छान छान गोष्टींसोबत आता एक अपरिहार्य गोष्ट झालीय ती म्हणजे पहिला परदेशप्रवास. देशाच्या बाहेर टाकलेलं पहिलं पाऊल. देशाची सीमा ओलांडायची म्हणजे आधीच धडधड सुरू होते. अनेक काळज्यांनी आपण घेरले जातो. आठवून बघा बरं, तुमचा पहिला परदेशप्रवास... आनंद आणि भीती ह्यांचं मिश्रणच असतं ते. अनेक प्रश्न असतात आणि म्हणूनच आज वाटलं की ह्याच विषयावर लिहूया.
जगातल्या कोणत्याही एअरपोर्टवर जा, माणसांची ही गर्दी. अहो, एअरपोर्टवरच कशाला अगदी आपल्या शेजारच्या घरात डोकावलं तरी त्यांचं कुणीना कुणी कुठेतरी दुसर्या देशात स्थायिक झालेलं असतं आणि त्यांचीही परदेशवारीची तयारी सुरू असते. बॉलिवूड चित्रपटांनी, टीव्हीने, इंटरनेटने जग जवळ आणलंय आणि आपल्याला त्याची भुरळ पाडलीय. आणि त्यात कमी होतं म्हणून की काय आम्ही ‘काहे दिया परदेस’च्या शीव-गौरीसोबत तुम्हाला स्वित्झर्लंडची वारी घडवली आणि आता ‘चला हवा येऊ द्या’ टीमसोबत आपलेही अनेक जण वीणा वर्ल्डसोबत विश्वदौरा करताहेत. जर परदेशप्रवास अपरिहार्यच आहे तर त्याची तयारी अगदी अथपासून इतिपर्यंत करूया.
परदेशप्रवासाला सर्वात प्रथम आवश्यक आहे तो पासपोर्ट-पारपत्र. आपण भारतीय नागरिक असल्याचा एक अतिशय महत्वाचा दाखला. त्यामुळे प्रत्येकाजवळ पासपोर्ट असायलाच हवा, भले तुमचा परदेशप्रवासाचा विचार नसेल पण पासपोर्ट हा प्रत्येकाकडे असणं मस्ट आणि आता सरकारच्या प्रयत्नांनी पासपोर्ट काढणं खूपच सोप्पं झालंय. त्यामुळे अजिबात विलंब न करता पासपोर्ट काढून ठेवा बरं. एकच खबरदारी, पासपोर्ट आल्यानंतर तो चेक करा. त्यावरचं तुमचं नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख आदी संपूर्ण तपशील चेक करून मग व्यवस्थितपणे पासपार्ट कडीकूलपात ठेवून द्यायचा. ऐनवेळी धावपळ नको.
पासपोर्ट आला की परदेशवारी करण्यासाठी आपल्याला ग्रीन सिग्नल मिळतो. आपण मग कुठेही जायचं ठरवू शकतो. आमचा सल्ला असा असतो की सुरुवातीला जवळचे छोटे देश पादाक्रांत करावे कारण आपल्याला मोठ्या प्रवासासाठी तयार व्हायचं असतं. पहिल्या पहिल्यांदा आपण थोडे बिचकतो त्यामुळे युरोप अमेरिका साधारणपणे तिसर्या चौथ्या क्रमांकावर असली की आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हलला सरावलेलो असल्याने जास्त चांगल्या प्रकारे त्या जरा महागड्या, लांबच्या देशांचा आस्वाद घेऊ शकतो. असो, तर ज्या देशात जायचा आपण विचार करतो त्या देशाचा व्हिसा म्हणजे त्यांची परवानगी आपल्याला घ्यावी लागते व्हिसाच्या रुपात. (VISA-व्हिझिटर इंटेंडिंग टू स्टे अब्रॉड). व्हिसाचे खूप प्रकार आहेत त्यात खोलात न जाता आपण टुरिस्ट म्हणून जाणार्यांसाठी लागणार्या व्हिसाकडे लक्ष देऊया. थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशस... ह्या देशांना फक्त पासपोर्ट असल्यास तुम्ही प्रवास सुरू करू शकता कारण तिथे पोहोचल्यावर तुम्हाला व्हिसा मिळतो ज्याला ‘ऑन अरायव्हल व्हिसा’ म्हटलं जातं.
दुबई-अबूधाबी म्हणजेच युएईसारख्या देशांना पासपोर्टची कॉपी त्यांच्या देशात पाठविल्यावर इलेक्ट्रॉनिकली तुमचा व्हिसा येतो, आणि तुम्ही त्यांच्या देशात प्रवेश करू शकता. ऑस्ट्र्रेलिया, मलेशियासारख्या देशांना ऑनलाईन व्हिसाची सोय आहे, इलेक्ट्रॉनिकली हे सगळे व्यवहार होतात. जपान, चायना, साउथ आफ्रिका.. आदी देशांचे व्हिसा त्यांच्या इथल्या कॉन्स्युलेटमधून करून घ्यावे लागतात. युरोपच्या अनेक देशांसाठी लागणारा शेंगेन व्हिसा, इंग्लंड किंवा युनायटेड किंग्डमसाठी लागणारा युके व्हिसा आणि अमेरिकेसाठी लागणारा व्हिसा इथेच भारतात करून घ्यावा लागतो. ह्यामध्ये युके, शेंगेन आणि युएस व्हिसासाठी स्वत:ला जावं लागतं बायोमेट्रिकसाठी आणि युएस व्हिसाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी. व्हिसासाठी लागणारी कागदपत्रं ही जरा कटकटीची गोष्ट असते पण ती सर्वांनाच करावी लागते. त्याला इलाज नसतो त्यामुळे माझं म्हणणं असतं की जर आपल्याला एखादी गोष्ट करावीच लागणार आहे तर मग हसतहसत का करू नये? आणखी एक व्हिसाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं ते म्हणजे फुकाचे घाबरवणारे सल्ले ऐकायचे नाहीत, अगदी युएसच्या व्हिसासाठी सुद्धा. कॉन्स्युलेट एवढी कडक बंधनं घालतात कारण त्यांच्या देशात वाढत असणारं अनऑथोराइज्ड पॉप्युलेशन. त्यांना एकच खात्री करायची असते की भारत देश सोडून तुम्ही त्यांच्या देशात तर ठाण मांडून राहणार नाही? आणि त्यामुळे तुम्ही इथे परत यायचे-तुमच्या मालमत्तेचे-इथल्या कमिटमेंट्सची कागदपत्रं ते पारखून बघतात. आपली कागदपत्रं व्यवस्थित असतील, आपण कोणतीही लपवाछपवी केली नाही, खोटं बोललो नाही तर नव्याण्णव टक्के पर्यटकांना व्हिसा मिळतो. सो व्हिसाची अजिबात भीती बाळगायची नाही. अहो पंचेचाळीस-पन्नास हजार लोकांचे व्हिसा दरवर्षी आम्ही करतोच की. समजा अगदी एखादा टक्का पर्यटकाला व्हिसा नाही मिळाला तरी नेव्हर माईंड अख्खं जग पडलंय आपल्याला पर्यटनासाठी, आणि कधीतरी ह्या देशांचा व्हिसा मिळणारंच की. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचीय ती म्हणजे ऑस्ट्रेलियासारखी कॉन्स्युलेट कदाचीत अॅप्लीकेशन केल्यावर तुम्हाला फोन कॉल करते. तो कॉल तुम्ही नक्की उचलायचाय.
पासपोर्ट आला, व्हिसा झाला की तिसरी पायरी असते ती अॅक्च्युअल विमानप्रवासाची, एअरपोर्ट फॉरमॅलिटीजची. आपला मुंबई दिल्लीचा एअरपोर्ट किंवा त्या अनुशंगाने जगातला कोणताही एअरपोर्ट हा साइनबोर्डज् आणि सूचनांनी एवढा परिपूर्ण असतो की हरवायचं म्हटलं तरी माणूस हरवणार नाही. हा क्रम फक्त लक्षात ठेवायचा, ‘एअरपोर्ट एन्ट्री-आपला एअरलाइन चेकइन काऊंटर-बॅग चेकइन-बोर्डिंग पास-सिक्युरिटी-इमिग्रेशन-बोर्डिंग गेट-बोर्डिग-टेकऑफ-इनफ्लाइट सर्व्हिसेस-लँडिंग-इमिग्रेशन-बॅग कलेक्शन-कस्टम्स-एक्झिट’. अर्थात ह्या प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम आणि सूचना आहेत. त्याविषयी वेगळं लिहीनंच कारण इथे आज तेवढी जागा नाहीये. पण एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचीय ती म्हणजे शिस्त पाळणं. मग ते रांगेत शांतपणे उभी राहण्याची असो, हळू आवाजात बोलण्याची असो, वेळ पाळण्याची असो... ती आपण प्रत्येक ठिकाणी पाळायचीय. खरंतर हे सगळं आपल्या रोमारोमात भिनलेलं असलं पाहिजे पण समहाऊ आपण त्यात कमी पडतो आणि आपल्या वागण्यामुळे संपूर्ण देशाला-आपल्या भारताला दुषण लागतं. ‘इंडियन टाइम’ ह्या सारकॅस्टिक गोष्टीचा उदय तिथूनच झाला. हे कुठेतरी थांबायला हवं. आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताविषयी-आपल्या देशाविषयी अपशब्द आपण काढायचा नाही. एकदा एका सिंगापूरच्या गाईडने मला विचारलं होतं ‘भारतातले लोक स्वत:च्या देशाविषयी असे वाईट कसं बोलतात? असं मी कुठच्याच देशाच्या लोकांच्या बाबतीत पाहयलं नाही. प्रत्येक देशाचे प्रॉब्लेम्स असतात पण अशी जाहीर बदनामी?’ तेव्हापासून आमच्या टूर मॅनेजर्सच्या ट्रेनिंगमध्ये एक गोष्ट आम्ही सक्तीची केली की आपल्याकडून चुकूनही कधी भारताविषयी वाईट बोललं जाणार नाही पण कुणी बोलत असेल तर त्यांनाही नम्रपणे थांबवायचं. ‘आय लव्ह माय इंडिया!’. हे मनापासून असलं पाहिजे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.