नवीन वर्षाचं स्वागत करायला उगवत्या सूर्याचा देश, ‘लँड ऑफ द रायझिंग सन-जपान’ कसा वाटतो तुम्हाला? की भारतात जिथे सूर्याची किरणं प्रथम पडतात ते अरुणाचल प्रदेश, म्हणजेच नॉर्थ ईस्ट तुम्हाला खुणावतंय? सर्वात शेवटी उजाडूनही जगाच्या पुढे राहणार्या भव्यदीव्य अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क’मध्ये जायला आवडेल? की एका दिवसात सर्वात पहिलं न्यू ईयर सेलिब्रेशन न्यूझीलंडला करून तिथून युएसएला जाऊन पुन्हा एकदा म्हणजेच दिवसातून दोनदा न्यू ईयर सेलिब्रेशन करायला तुम्हाला मजा येईल?
महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी थंडीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. थंडी सुरू होतेय म्हणून हायसं वाटतं पण हुरहुरही लागते, कारण आत्ता-आत्ता कुठे सुरू झालेलं नवीन वर्ष संपायला आल्याची जाणीव होते. कधी कधी एक तास किंवा एक दिवस संपता संपत नाही असं वाटताना वर्ष मात्र पटकन संपून जातं, हे कोडं काही उलगडत नाही. जानेवारी ते डिसेंबरमध्ये पहिले सहा महिने कामाचे आणि पुढचे उत्सवाचे अशीच काहीशी परिस्थिती आपल्याकडे असते. गणपती, दसरा आणि या आठवड्यात दिवाळीपण संपली. आपला प्रत्येक उत्सव हा आमच्या पर्यटनक्षेत्रात पीक सीझन, कारण सुट्टी. दिवाळीची सुट्टी म्हणजे समर व्हेकेशननंतरचा मोठा सीझन पर्यटकांसाठी, पर्यटन संस्थांसाठी, हॉटेल इंडस्ट्रीसाठी आणि एअरलाईन्ससाठी. यावर्षी दिवाळीत सर्वच ठिकाणी पर्यटकांचा महापूर आला आहे. नेहमीपेक्षा जास्त गर्दी प्रत्येक पर्यटनस्थळी अनुभवायला मिळणार आहे. तरीही आम्ही सुट्ट्यांव्यतिरिक्तच्या कालावधीत सर्वच ठिकाणी प्रमोशनल प्राईसमध्ये पर्यटन घडवून ह्या गर्दीत होणारी भर कमी करण्याचा प्रयत्न करतो. आजही माझा आग्रह असतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी पीक सीझन सोडून सहलीला चला, पैशाची बचत करा आणि निवांतपणे पर्यटनस्थळाचा आनंद लुटा. एकूणच पर्यटन वाढत चाललंय हे मात्र क्षणोक्षणी जाणवतंय. एका वर्षात दोन नव्हे तर किमान तीन वेळा हॉलिडेला जाणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होतेय. एकावेळी पर्यटक तीन ते पाच सहली बूक करताना दिसतात. दोन वर्षांपूर्वी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्याची बातमी सर्वत्र झळकल्यावर एका पत्रकाराने प्रश्न केला होता की, ‘ह्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल असं वाटत नाही तुम्हाला?’ म्हटलं, अजिबात नाही कारण सरकारने खूप आधीपासून पॅन कार्ड नंबर घेतल्याशिवाय कॅश घ्यायची नाही हे जाहीर केलं होतं. त्यामुळे सर्वांनाच सवय झालीय. तसंच ऑनलाईन ट्रॅव्हल इंडस्ट्री सर्वत्र फोफावतेय त्यासाठी तर कॅश ट्रॅन्झॅक्शनचा सवालच नाही. अभिमानाने मला सांगावसं वाटतं की, पर्यटनक्षेत्र हे बाय अॅन्ड लार्ज कधीही काळ्या पैशाच्या आधाराने चाललं नाही. आता दोन वर्षांनंतर पर्यटन आणखी वाढलं. पैशाची साठवणूक करण्यापेक्षा पर्यटनासारख्या व्यक्तिमत्व समृद्ध करणार्या गोष्टींवर पैसा खर्च करण्याकडे कल वाढला. असो. आज मी लेखणी हातात घेतली ती उत्सवी पर्यटनासंबंधी लिहिण्यासाठी, कारण आत्ता येतोय आणखी एक सुट्टीचा बहाणा पर्यटकांसाठी आणि आमच्यासाठीही आणि तो आहे ‘न्यू ईयर सेलिब्रेशन’. ‘प्रत्येक उत्सवात पर्यटन शोधा किंवा प्रत्येक पर्यटनाचं उत्सवीकरण करा’ ही वनलाईन स्ट्रॅटेजी आहे. आमची प्रॉडक्ट डीझायनिंग टीम तसंच डेस्टिनेशन मॅनेजमेंट टीम प्रयत्न करतेय की हे सर्वत्र कसं शक्य करता येईल.
न्यू ईयर सेलिब्रेशन प्रत्येक धर्मासाठी वेगळं आहे. बघानं, आपला विचार केला तर हिंदू कॅलेंडरप्रमाणे आपण ‘गुढी पाडवा आणि दीपावली पाडवा’ अशा दोन वेळी एकमेकांना हॅप्पी न्यू ईयर करतो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस अनेक राज्यांमध्ये न्यू ईयर म्हणून सेलिब्रेट केला जातो. कुठे गुढीपाडवा म्हणून तर कुठे त्याला आपण ‘उगाडी’ म्हणतो. आसाममध्ये एप्रिलच्या मध्यावर ‘बिहू’ हा नवीन वर्षाचा दिवस असतो. तामिळनाडूमध्ये ‘पुथंडू’ हा नववर्ष दिवस आणि केरळमध्ये ‘विशू’ याचवेळी साजरा होतो. त्याचवेळी पंजाबमध्ये ‘बैसाखी’ आणि बंगालमध्ये ‘पॉइला बैशाख’. साधारण वेळ तीच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने न्यू ईयर साजरं केलं जातं आपल्या भारतात.
भारताबाहेर विचार केला तर इंडोनेशियात एक सेलिब्रेशन इस्लामिक न्यू र्ईयरप्रमाणे आणि दुसरं एक जानेवारीला होतं. चायनीज लोकांचं न्यू ईयर जानेवारी-फेब्रुवारीत येतं. पर्यटनक्षेत्रात ‘चायनीज न्यू ईयर’ सगळ्या जगाचं लक्ष बनलंय कारण वर्षाला साडेनऊ कोटी चायनीज पर्यटक चायनामधून परदेशात पर्यटनासाठी बाहेर पडतात, त्यातील जास्तीत जास्त ‘चायनीज न्यू ईयरला’ म्हणजेच त्यांच्या मोठ्या सुट्टीच्यावेळी. त्यामुळे ह्यावेळी जगात सर्वच पर्यटनस्थळी गर्दी असते. रेट्स वाढलेले असतात. काही-काही पर्यटनस्थळी तर आम्हाला हा चायनीज न्यू ईयरचा कालावधी बादच करावा लागतो. रशियामध्ये जास्तीत जास्त लोकं ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे चौदा जानेवारीला न्यू ईयर सेलिब्रेट करतात. आपल्या संक्रांत-संक्रमणाशी ह्याचा संबंध असावा कदाचित. थायलंडला एप्रिलमध्ये ‘सोंगक्रान’ हे बुद्धिस्ट सेलिब्रेशनचे तीन दिवस एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून, चेहर्याला पांढरा रंग किंवा पीठ लावून सेलिब्रेट केलं जातं. कोरीयामध्ये न्यू ईयर सेलिब्रेट केलं जातं एक ते तीन जानेवारी दरम्यान, तीन दिवस. इराणमध्ये मार्च एकवीसला न्यू ईयर सेलिब्रेट केलं जातं. व्हिएतनाममध्ये न्यू ईयर फेब्रुवारीमध्ये साजरं केलं जातं. इस्त्रायली लोकं सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दहा दिवसांचा उत्सव करतात न्यू ईयरचा. जपानमध्ये पूर्वी चायनीज लूनार कॅलेंडरप्रमाणेच न्यू ईयर सेलिब्रेशन व्हायचं पण अठराशे त्र्याहत्तरनंतर त्यांनी ते बदलून एक जानेवारी हा दिवस न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी घेतला. चायनीज न्यू ईयरची तारीख दरवर्षी बदलते आणि त्यामुळे देशाचं सगळं शेड्यूलही. सिस्टेमॅटिक जपानला जगाच्या पुढे राहण्यासाठी ही दरवर्षी बदलणारी न्यू ईयरची तारीख पल्ले पडली नसावी त्यामुळे व्यवस्थापनाच्यादृष्टीने त्यांनी ती बदलली असावी, असो. पण लहान मुलांना पैसे देण्याची पद्धत ह्या जपानी उत्सवात आहे.
न्यू ईयर सेलिब्रेशनच्या अनेक आगळ्या पद्धती जगात आहेत. फिलिपाईन्समध्ये गोल फळं खाल्ली जातात आणि पोलका डॉट्सवाले कपडे घालण्याची पद्धत आहे. अमेरिकेमध्ये ‘झालं गेलं विसरून जा’ सांगणारा नीयर अँड डियरसह ‘न्यू ईयर मिडनाईट किस’ फारच पॉप्युलर आहे. आयर्लंडमध्ये बॅडलक पळून जावं किंवा ज्या मुलीचं लग्न झालं नाही तिला चांगला नवरा मिळावा म्हणून न्यू ईयरला उशीखाली मिसलटो नावाच्या बांडगूळाची पानं ठेवायची सवय आहे न्यू ईयर सेलिब्रेशनच्यावेळी. डेन्मार्कमध्ये थोडी वेगळीच पद्धत आहे. वापरलेल्या जुन्या प्लेट्स मित्राच्या किंवा शेजार्याच्या घराच्या दाराबाहेर ठेवायच्या ज्याद्वारे त्यांच्याप्रती पूर्वीपासून असलेलं प्रेम आणि आदरभाव नव्या वर्षात वृद्धिंगत होवो अशी मनोकामना करायची, तसंच ही डॅनिश लोकं उंचावरची जागा शोधतात आणि तिथून उडी मारतात, म्हणजे त्यांनी नवीन वर्षाच्या जानेवारीत प्रवेश केला. जर्मनीमध्ये दरवर्षी ‘डिनर फॉर वन’ नावाचा शो बघण्याची पद्धत आहे. टर्की म्हणजे तुर्कस्तानमध्ये गरीब अभागी लोकांसाठी पैसे गोळा केले जातात, जेणेकरून सगळेचजण आनंदी राहतील पुढचं वर्षभर. चिलीमध्ये तशी वीस पंचवीस वर्षांपासून सुरू झालेली पद्धत आहे, ती म्हणजे रात्री अकरा वाजता स्मशानात जाऊन न्यू ईयर सेलिब्रेट करायचं आपल्या दिवंगत नातेवाईकांसोबत. मेक्सिकोमध्ये तर अजब प्रकार आहे. तिथे न्यू ईयरला कलरफूल अंडरवेअर्स घातल्या जातात, ज्यांना लक पाहिजे ते पिवळ्या रंगाच्या अंडरवेअर्स घालतात. ऐकावं ते नवलंच. स्कॉटलंडमध्ये गावागावांत बॉनफायर सेलिब्रेशनमध्ये लोकं डोक्यावर फायरबॉल घेऊन मिरवणूक काढतात. हा फायरबॉल म्हणजे सूर्य...जो येणारं नवीन वर्ष एकदम प्रकाशमय, प्रफुल्लित आणि उल्हासित करणार ही भावना. पनामामध्ये लोकं सेलिब्रिटीज् आणि पॉलिटिशियन्सचे स्टॅच्युज् करून ते बॉनफायरमध्ये जाळतात. असे केल्याने नवीन वर्षाची सुरुवात एकदम ‘फ्रेश स्टार्ट’ स्वरुपात होते, ही संकल्पना. स्पेनमध्ये लोकं एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री, एक जानेवारी सुरू होताना बाराच्या प्रत्येक ठोक्याला एक अशी बारा द्राक्ष खातात. ज्याने हमखास नवीन वर्षात गुडलक येतं असं म्हणतात. जपान कोरियामध्ये बुद्धिस्ट टेंपलमध्ये जाऊन एकशे आठ वेळा बेल वाजवायची पद्धत आहे, ज्याने माणसातली सर्व नीगेटिव्हिटी निघून जाते. तसेच रात्री सोबा नूडल्स खायची पद्धत आहे, आणि ती खाताना नूडल स्ट्रिंग तुटली नाही पाहिजे हा प्रयत्न असतो, लांबच लांब नूडल स्ट्रिंग मोठं आयुष्य देते ही समजूत. रोमानियामध्ये लोक अस्वलाचा ड्रेस करून घराघरात फिरतात जेणेकरून प्रत्येक घरातली एव्हिल स्पिरिट्स पळून जातील आणि नवीन वर्ष सुखसमाधानात जाईल. खादाड लोकं इस्टेनियाच्या टॅलिनकडे कूच करतात न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी, कारण इथे एकतीस डिसेंबरच्या रात्री सात, नऊ किंवा बारावेळा जेवायची पद्धत आहे. बारावेळा जेवणं सर्वात लकी, कारण तेवढ्या लोकांची शक्ती म्हणे तुमच्यात येते. बरं, प्लेटमधलं सर्व संपवायची सक्ती नाही. राहीलेलं अन्न मृतात्मांसाठी, जेणेकरून तेही आनंदी होतात म्हणे. ब्राझिलमध्ये समुद्रावर जाऊन सात लाटांवर उडी मारण्याची पद्धत आहे, ज्यामुळे गुडलक येतं. साउथ आफ्रिकेत जोहॅनेसबर्गमध्ये लोकं घरातलं नको असलेलं फर्निचर आणि वस्तू खिडकीतून बाहेर फेकून देतात, त्यापासून सुटका करतात. घराची साफसफाई करून वातावरण प्रसन्न करतात. साउथ अमेरिकन ट्रेडिशनमध्ये लोकं मोठी रिकामी बॅग घेऊन चालतात ज्याला ‘सुटकेस वॉक’ म्हणतात, जे दर्शवतं की येणारं वर्ष हे फुल्ल ऑफ अॅडव्हेंचरचं असणार आहे. आमच्या ‘बॅग भरो, निकल पडो!’ सारखा प्रकार नाही का? चायनामध्ये शक्तीचं प्रतीक असलेला ड्रॅगन हा वर्षभर तसा सुस्तावलेलाच असतो, त्याला जागं ठेवण्यासाठी ह्या न्यू ईयरच्या वेळी फटाके फोडून आवाज केला जातो. ऑस्ट्रियात पाण्यामध्ये गरम शिसं टाकलं जातं आणि त्याला जो शेप येईल त्याच्यानुसार येणार्या वर्षात आयुष्यात काय काय घडणार आहे त्याचे ठोकताळे बांधले जातात. देश कोणताही असो, भाग्य-भविष्य ह्या गोष्टींभोवती फिरत असतो हे मात्र निश्चित.
न्यू ईयर सेलिब्रेशनच्या जगातल्या मोस्ट पॉप्युलर जागा म्हणजे न्यूझीलंडची कॅपिटल ऑकलंड-स्काय टॉवर आणि तिथलं फायर वर्क्स, ऑस्टे्रलियामधलं सिडनी हार्बर. कॅनडामध्ये लोकं एकत्र येतात नाथान फिलिप्स स्क्वेअरला. ब्राझिलमध्ये रिओ दी जनिरोचा कोपाकबाना बीच, न्यूयॉर्कचा टाईम्स स्क्वेअर आणि तिथला फेमस बॉल ड्रॉप, पॅरिसचं आयफेल टॉवरचं मॅजिकल फायर वर्क्स आणि स्ट्रीट डान्स, लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठावर बिग बेनसमोरचा लाइट शो, हाँगकाँगचा टाईम्स स्क्वेअर आणि तिथली मोस्ट फेमस डॅझलिंग स्कायलाईन, थायलंडचा सेंट्रल वर्ल्ड स्क्वेअर, दुबईचं सुप्रसिद्ध फायर वर्क्स, सिंगापूरचं मरिना बे... अशी अनेक ठिकाणं त्यांच्या आगळ्या-वेगळ्या चार्मने जगभरातल्या पर्यटकांना खुणावतात.
आम्ही न्यू ईयरला वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना घेऊन जात असतो. प्रत्येक ठिकाणी तेथील सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. वर अनेक ऑप्शन्स दिले आहेत त्यापैकी ठरवा तुमच्या आवडीचं ठिकाण आणि करा नवीन वर्षाचं स्वागत एखाद्या हटके ठिकाणी. तुम्ही ग्रुप टूर घेऊ शकता किंवा आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमकडून हवा तसा हॉलिडे बनवून घेऊ शकता. सो चलो, आखिर साल में एक हॉलिडे तो बनता ही है |
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.