कुणाला कळणार नाही, कुणी बघणार नाही हा प्रश्नच कुठे येतो. मी मलाच स्वत:ला बघतेय, जोखतेय, आजमावतेय, कुठे चुकले तर बरोबर करतेय. त्यात जर माझ्या चुका दाखवणारं कुणी भेटलं तर त्याचे आभार मानून सुधारणा करते. कुणी बघेल म्हणून एक वागायचं आणि बघणार्याची पाठ वळताच दुसरं वागायचं हे खूप स्ट्रेसफुल आहे आपल्याला स्वत:ला आणि इतरांनाही. साधं सरळ आनंदात सुखात आयुष्य जगता येत असेल तर व्हाय नॉट?!
गेल्या आठवड्यात लेह, तिथून बँकॉक, बँकॉकवरून दिल्ली आणि दिल्लीहून सॅनफ्रान्सिस्को व तिथून परत मुंबई असा जगाच्या ह्या टोकावरून त्या टोकावर प्रवास केला. हॉॅटेलमध्ये तीन रात्री आणि प्रवासात चार रात्री. ह्यामध्ये वुमन्स स्पेशलला लेह, बँकॉक, युएसएमध्ये गेलेल्या चारशे सख्यांना भेटले, त्यांच्यासोबत गाला इव्हिनिंग पार्टी एन्जॉय केली. प्रवासात आजच्या रविवारच्या वृत्तपत्रांची आर्टिकल्स लिहिली. त्या त्या ठिकाणच्या असोसिएट्सना भेटून एकूणच बिझनेससंबंधी चर्चा झाली, पुढच्या सीझनसाठी नव्याने काय करायचं, काय खबरदारी घ्यायची ह्याचा आढावा घेतला. त्या त्या टूर्सवर असणार्या आमच्या टूर मॅनेजर्स टीमला भेटले. बँकॉकच्या टीमसोबत रात्री दीड वाजता बाहेर जाऊन फूड लँड-तूक ला दी ह्या साध्या स्वस्त मस्त चोवीस तास चालणार्या रेस्टॉरंटमध्ये थाय डिनर घेतलं, सॅनफ्रान्सिस्कोच्या वुमन्स स्पेशलच्या हॉटेलमध्ये आणखी तीन फॅमिली ग्रुप्सही होते वीणा वर्ल्डचे त्यामुळे एकाच ठिकाणी पाच टूर मॅनेजर्स एकत्र भेटल्यावर हॉटेलच्या रीसेप्शनमध्ये रात्री गप्पांचा फड रंगला नसता तर नवल. सहलीवर येणारी चॅलेंजेस आणि घडणार्या गमतीजमती ह्या सर्वांची चर्चा करता करता हसता-हसता पुरेवाट झाली. स्ट्रेसबस्टर होती ती आमची मध्यरात्रीची गप्पांची मैफील. तिथेच आपल्या पर्यटकांना भेटायला आलेल्या युएसए स्थित मराठी मंडळींशीही भेट झाली. आणि हो, लेहच्या एका दिवसात आमच्या तेथील लोकल पार्टनरच्या नवीन ऑफिसचं उद्घाटनही केलं. आपल्यासोबत आपले असोसिएट्सही प्रगती करताहेत, टुगेदर वुई ग्रो ही वीणा वर्ल्डची संस्कृती चांगल्या तर्हेने पुढे जाताना दिसतेय. हो बघानं, वीणा वर्ल्डला उभं केलंय पर्यटकांनी, जगभरातील असोसिएट पार्टनर्सनी आणि वीणा वर्ल्डच्या टीमने. पर्यटकांना जगाचं पर्यटन मोस्ट अफोर्डेबल तर्हेने घडवणं, चांगल्या असोसिएट पार्टनर्सना दरवर्षी गतवर्षीपेक्षा जास्त बिझनेस देणं, आणि सतत चांगल्या मार्गाने बिझनेस वाढवत राहून वीणा वर्ल्ड टीमच्या हाताला काम असणं आणि त्याद्वारे त्यांची प्रगती होणं हे चक्र व्यवस्थित सुरू राहिलं पाहिजे. अॅटलिस्ट वीणा वर्ल्ड सुरू झाल्यानंतर सहा वर्षांनी पर्यटकांच्या सदिच्छा, असोसिएट्सचे सहकार्य आणि टीमच्या मेहनतीने राईट ट्रॅकवर आहोत हेही नसे थोडके. त्रिकोणाचे हे तीन कोन जोपर्यंत व्यवस्थित आहेत तोपर्यंत घोडदौड सुरूच राहणार. असो.
तर अशा ह्या अॅक्शन पॅक्ड आठवड्यात बँकॉकमध्ये दोनदा थाई मसाजही घेतला. मन कायम उत्साही असतंच पण शरीरालाही थोडं रीज्युविनेशन नको का. उल्हासित मनाला आणि रीज्युविनेटेड शरीराला क्लाऊड नाईनवर नेऊन ठेवायचं असेल तर आणखी एका मोठ्या ड्रगचीही सोय आहे, ती म्हणजे शॉपिंग. त्या दिवशी गाला इव्हिनिंगला भेटलेल्या दिडशे महिलांना म्हटलं, तुम्ही छान तर दिसताच आहात, पण तुमच्या चेहर्यावर आज एक वेगळंच तेज आहे, इसका राज क्या है? तर एकमुखाने त्या म्हणाल्या, शॉपिंग!. किती पावरफुल ड्रग आहे बघा शॉपिंग हे. माझीही सुटका कशी होणार त्यातून. त्यामुळे बँकॉकला जायचं असलं की मी माझीही शॉपिंग लिस्ट तयार ठेवते. इथे मुंबईत वेळ मिळतच नाही त्यामुळे प्रवासात तीही गोष्ट मी करून घेते. बहाणेबाजी म्हणा किंवा काहीही पण बँकॉकला शॉपिंग होतंच. मी माझ्या गाईडला-रोझीला घेऊन शॉपिंगला गेले सेंट्रल डिपार्टमेंटल स्टोअरला. मला एक कॅरी ऑन फोर व्हिलर घ्यायची होती, एकच एक बॅग सारखी वापरून कंटाळा आला होता. अभी थोडी कुछ नई स्टाईल हवी होती. आधी मॉलमध्ये बर्यापैकी भटकले. नवीन ट्रेंड्स काय आहेत, काय इनोव्हेशन्स आली आहेत ह्याचा आढावा घेतला. थोडक्यात विंडो शॉपिंग. नंतर बॅग आणि एक दोन आवश्यक गोष्टी घेतल्या (हो अनावश्यक वस्तू मग ती कितीही चांगली असो तिची घरात अडगळ करायची नाही हे उशीरा का होईना पण कळलं त्यामुळे पैशाचा अपव्ययही थांबला). पर्यटक असल्यामुळे तेथील लोकल लोकांना लागणार्या व्हॅल्यु अॅडेड टॅक्स - वॅट मधून आपल्याला एक्झेम्पशन मिळतं. त्याची एक छोटीशी प्रोसिजर त्या मॉलमध्ये करून आपल्याला वॅट सर्टिफिकेट मिळवून एअरपोर्टवर चेकइनपूर्वी वॅट कार्यालयात स्टँप मारून घ्यायचा असतो आणि इमिग्रेशननंतर वॅट रीफंड विंडोवरून तो रीफंड आपल्याला मिळतो, म्हणजे तिथे जाऊन आपण तो घ्यायचा असतो. मी शॉपिंग करीत असताना रोझीनेही तिचं काही शॉपिंग केलं होतं. वॅट रीफंडची रीसीट घेण्यासाठी मी माझ्या शॉपिंग रीसीट्स एकत्र करीत होते तेव्हा रोझी म्हणाली, थांबा थांबा माझीही रीसीट घ्या, मला नकोय ती रीसीट, तुम्हाला वॅट रीफंड मिळेल त्याचा. रोझीचा हेतू होता मला वॅट रीफंड मिळेल त्या रीसीटचा, व्हाय टू वेस्ट? गोष्ट चुकीची होती पण तिच्या मनात पाप नव्हतं. मी तिला म्हटलं, रोझी ती रीसीट मी घेऊ शकत नाही कारण ते शॉपिंग मी माझ्यासाठी केलेलं नाही. मग मी त्याचा रीफंड कसा घेऊ शकते? माझ्या मानसिकतेत ते बसत नाही. त्यावेळी इनोसंटली ती म्हणाली, बट व्हाय नॉट? नो वन विल नो, हू इज गोईंग टू चेक? प्रश्न कुणी चेक करण्याचा किंवा कुणाला ही गोष्ट माहीत नसण्याचा नव्हताच. प्रश्न माझा आणि माझ्या तत्वांचा होता. कुणालाही माहीत नव्हतं तरी मला तर माहीत होतं. जे माझं आहे ते पण सोडून देता आलं पाहिजे, आणि जे माझं नाही त्याच्याप्रती मनात इच्छा उत्पन्न होणंही पाप आहे हे तिला मी थोड्याफार प्रमाणात समजावू शकले.
कुणाला कळणार नाही, कुणी बघणार नाही हा प्रश्नच कुठे येतो. मी मलाच स्वत:ला बघतेय, जोखतेय, आजमावतेय, कुठे चुकले तर बरोबर करतेय. त्यात जर माझ्या चुका दाखवणारं कुणी भेटलं तर त्याचे आभार मानून सुधारणा करते. कुणी बघेल म्हणून एक वागायचं आणि बघणार्याची पाठ वळताच दुसरं वागायचं हे खूप स्ट्रेसफुल आहे आपल्याला स्वत:ला आणि इतरांनाही. रोझीच्या नो वन विल नो ने बँकॉक-दिल्ली प्रवासात माझ्या विचारांना चालना दिली होती. असं म्हणतात की कुणीही बघत नसताना, कुणालाही कळणार नाही ही खात्री असताना माणूस जे वागतो ते असतं त्याचं खरं व्यक्तिमत्त्व. कुणाला कळणारही नाही, कुणी अजिबात बघतही नाही हे पक्कं माहीत असूनही आपल्या कॉन्शन्सला जागून आपण चुकीचं वागत नाही किंवा कोणतीही चूक करीत नाही तेव्हाच आपण एक आत्मिक समाधानी आयुष्य जगू शकतो. आपण प्रत्येकाने स्वत:ला चेक केलं पाहिजे की आपण जगाच्या कॅमेर्यासमोर असताना जसे वागतो तसेच तो कॅमेरा बाजूला झाला की असतो का? त्या दोन्हीमध्ये जर फरक असेल तर मग आपण दुटप्पी व्यक्तिमत्त्व झालो नाही का. आय मस्ट थिंक अँड इम्प्रुव्ह मायसेल्फ. साधं सरळ आनंदात सुखात आयुष्य जगता येत असेल तर व्हाय नॉट?!
कुणीच बघत नाहीये किंवा कुणाला कळणारच नाहीये ह्यावरून घडलेले अनेक किस्से माझ्या पस्तीस वर्षांच्या पर्यटन आयुष्यात मी पाहिलेयत. हल्ली तर सगळ्याच ठिकाणी कॅमेरे आलेयत. आपलं असं खाजगी काही उरलच नाहीये. वुई आर बीइंग वॉच्ड, ऑल द टाईम. प्रायव्हसी फक्त नावाला उरलीय आणि तंत्रज्ञान अजून काय काय याची देही याची डोळा बघायला लावणार आहे माहीत नाही.
शॉप लिफ्टिंग म्हणजे कुणी बघत नाहीये ह्याची खात्री करून दुकानातून वस्तू लंपास करणे. पुर्वी दुकानात कॅमेरे नसायचे, पेमेंट केल्याशिवाय कोणतीही वस्तू जर हातचलाखी करून दुकानाच्या बाहेर नेली तर सेन्सर्स किंवा डिटेक्टर्स नसायचे, त्यामुळे कुणाच्या लक्षातही यायचं नाही, आणि ह्या शॉप लिफ्टर्सचं फावायचं. आता सर्वत्र अशा तर्हेच्या चोर्या होणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली जातेय आणि तरीही अनेक ठिकाणी ह्या चोर्या होतच आहेत. परवा एका इथल्या कुर्ल्याच्या ग्रोसरी मॉलमध्ये गेले तर त्यांनी माझ्या पर्सलाच लॉक लावून टाकलं, कसंतरीच वाटलं पण ते म्हणाले कितीही कॅमेरे बसवले, डिटेक्टर्स लावले तरी काही माणसं त्याच्याही पुढची स्ट्रॅटेजी आखताहेत. दररोज अशा चोरीला गेलेल्या मालाचा आम्हाला फटका बसतोय.
गेल्यावर्षी वृत्तपत्रात एक मोठी बातमी आली होती जी तुम्हीही वाचली असेल. काही सो कॉल्ड अप्पर मिडल क्लास मैत्रीणी व्हाया टर्की युरोपमध्ये चालल्या होत्या, त्यातल्या एकीने लक्झरी शॉपमधून पैसे न भरता ग्लेअर्स पर्समध्ये टाकले. इरादा काय होता माहीत नाही पण ह्या महिलेला तिथे डायरेक्ट जेलची हवा खावी लागली. बाकी मैत्रिणींना तिला सोडून पुढे जावं लागलं. हे असं का होतं हा अभ्यास जेव्हा मानसशास्त्र्रज्ञांनी केला तेव्हा त्यातून लक्षात आलं की शॉप लिफ्टिंग हा एक आजार आहे आणि गरीब श्रीमंत, लहान, मोठे ह्यातील कुणीही त्याचे शिकार असू शकतात. पण ह्याची सुरुवात कुणी बघत नाहीये, कुणाला कळणार आहे? नो वन विल नो, इथूनच होत असेल.
शॉप लिफ्टिंग हा खूप मोठा प्रकार झाला पण जर मला मोह झाला असता आणि मी ती रीसीट रोझीकडून घेतली असती चंद कुछ रुपयोंके लिये, नो वन विल नो म्हणून, तर माझाही अपराध हा त्या शॉप लिफ्ंिटग एवढाच मोठा असता नाही का. रोझीला म्हटलं नो वन विल नो हे तुझं बरोबंर आहे पण आय नो, मग मी हे का करू? कितीही छोटी असली तरी ही चोरी आहे आणि हीच सुरुवात असते. देशविदेशात जे मोठमोठे घोटाळे नजरेस पडताहेत, माणसं देशालाच लुटताहेत त्याची सुरुवात ह्या नो वन विल नो मधूनच झाली असेल. ह्या छोट्या मोहांपासून वाचवूया स्वत:ला आणि स्वत:च्या कॉन्शन्सला. कोणत्याही गिल्टशिवाय आपण राहू शकलो तर आयुष्य किती आनंदी बनून जाईल नाही का. लेट्स हॅव अ हॅप्पी अॅन्ड गिल्ट फ्री संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.