‘खरंच काही अडलंय का एवढं तिथे जायचं? अगं, तुझ्यासमोर सगळा भारत पडलाय आणि तो कमी असेल तर जग आहे नं! मग इथेच जायचा अट्टाहास का? तू ऐकणार नाहीस पण सांगणं माझं कर्तव्य आहे...’ मला तिकडे जायचंय! म्हटलं की हा संवाद घराघरात सुरू होतो. नाही म्हटलं तरी त्याचं एक छुपं दडपण येतं, पण एकदा का स्वारी फत्ते झाली की जो काही आनंद मिळतो त्याचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य.
परवा पुन्हा एकदा मी लेह लडाखला चाललेय. हल्ली वर्षातून माझ्या तीन फेर्या होतात लेह लडाखला. एक मे महिन्यात, एक कारगिल विजय दिवस म्हणजे सव्वीस जुलै दरम्यान आणि एक स्वातंत्र्यदिनाच्या वेळी. लडाखच्या प्रत्येक भेटीनंतर वीणा वर्ल्डचा विजयी ध्वज आकाशात आणखी उंच फडकल्याची एक आगळी अनुभूती मिळते, पुढच्या वाटचालीसाठी ती उर्जा असते. वुमन्स स्पेशलच्या लेह लडाख सहलीवर मी आवर्जून हजेरी लावते, कारण अगदी सात वर्षांपासून सत्तर वर्षांच्या आमच्या महिला तिथे हिमतीने आलेल्या असतात. प्रत्येकीने घरातल्यांचा दृश्य-अदृश्य असा काळजीसदृश विरोध सहन केलेला असतो. छुपी चिंता त्यांच्याही मनात घर करून असते. पहिल्या दिवशी लेहला पोहोचल्यावर, अॅक्लमटायझेशन प्रोसेसमध्ये भितीही वाटते पण जशी जशी सहल पुढे जाते तसतशी काळजी कुठच्याकुठे पळून जाते. आनंदाची लहर रोमारोमात सळसळायला लागते आणि एकदा का सहल संपली की ‘यस् आय हॅव डन इट!’ चा विजयी आनंद प्रत्येकीच्या चेहर्यावर बघायला मिळतो. डर के आगे जीत है | ही कोणत्यातरी जाहिरातीतली लाईन खरी वाटते. गेल्या पाच वर्षांत पंधराशेहून अधिक महिलांना लेह लडाख सफर घडवून, ती शंभर टक्के यशस्वी करून दाखविण्यात आमच्या टूर मॅनेजर्सनी कोणतीही कसर सोडली नाही. आज लेह लडाखच्या ह्या वारीत आपल्या जवानांसोबतची भेट, अतिशय खडतर परिस्थितीशी मुकाबला करीत आपल्या सीमेचं रक्षण करण्याची, वादळ वारा पाऊस थंडी ह्या सर्व अतिरेकी वातावरणाशी जुळवून घेत दुर्गम भागात खडा पहारा देण्याची त्यांची
जिद्द सर्वांना हेलावून टाकते आणि आपलाही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकते, सकारात्मकरित्या तो व्यापक करते. सहा-सात महिने आयुष्य खुलेआम जगायचं आणि उरलेले चारपाच महिने घरात बंदिस्त करून घ्यायचं किंवा स्थलांतर करायचं हे स्थानिकांचं जीवनही खूप काही शिकवून जातं. पेशन्स म्हणजे काय हे जर अनुभवायचं असेल तर लडाखला जावं, त्यांच्यात रहावं, मोबाईल-इंटरनेटशिवायही रहाता येतं हे वास्तवही अनुभवावं. लेह लडाख हे एक आधुनिक तीर्थक्षेत्र आहे, असं मला वाटतं आणि म्हणूनच हे उर्जेचं स्थान प्रत्येक महिलेने बघावं ह्यासाठी माझा आग्रह असतो. अर्थात जेवढ्या जास्त महिला ह्या लडाख मिशनमध्ये सामिल होताहेत तेवढा अवेअरनेस वाढतोय आणि दरवर्षी लडाखला फॅमिली टूर्समध्ये आणि वुमन्स स्पेशलमध्ये जाणार्या महिलांची संख्या वाढतेय. भारताच्या ह्या टोकावरच्या दुर्गम भागातलं टूरिझम वाढविण्यासाठी वीणा वर्ल्ड आमच्या ह्या सर्व प्रकारच्या पर्यटकांद्वारे खारीचा वाटा उचलतेय याचाही सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठी आमच्या पर्यटकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते.
लेह लडाख जशी एक महिलांची आगळी वेगळी टूर तशी वुमन्स स्पेशल ही संकल्पनाच अफलातून. गेली बारा वर्ष सातत्याने ह्या सहली मी करतेय, पण कधीही ह्या सहलीचा मला कंटाळा आला नाही की ‘अब बस हो गया ’ अशी भावना आमच्या कुणाच्याही मनात आली नाही कारण प्रत्येक सहलीसोबत वुमन्स स्पेशलची लोकप्रियता वाढतेच आहे. ‘दिल मांगे मोर’ ह्या महिलांच्या आनंदी आग्रहातूनच वीणा वर्ल्ड सुरू झाल्यावर अंदमान नेपाळ भूतान राजस्थान शिमला मनाली अमृतसर नार्थ ईस्ट अगदी इन्दौरपर्यंतच्या शॉर्ट टूर्सची भर पडली आणि महिलांचं अखंड पर्यटन सुरू झालं. त्याआधी युरोप अमेरिका आणि थायलंडच्याच सहली मी करीत असायचे. पण आता त्याची व्याप्ती ऑस्ट्रेलिया, स्कॅन्डिनेव्हिया, रशियापर्यंत पोहोचलीय. युरोप अमेरिकेच्या वुमन्स स्पेशलला आलेल्या महिलांना भेटायला वर्षातून दोनदा किंवा कधी कधी तीनदा माझी स्वित्झर्लंड आणि सॅन फ्रान्सिस्को किंवा लॉस एंजेलिसची ट्रिप असते. या महिन्याच्या अखेरीसही मला जायचंय. त्यानंतर मात्र सिलसिला सुरू होतोच भारतातल्या वुमन्स स्पेशलचा, राजस्थान नॉर्थ ईस्ट अंदमान शिमला मनाली आणि नेपाळ भूतान ह्या शेजारच्या देशातील वुमन्स स्पेशलचा. अर्थात आता सप्टेंबरला आणि डिसेंबरला ‘ऑल टाईम ग्रेट’ साउथ ईस्ट एशिया म्हणजे सिंगापूर थायलंड मलेशिया ह्या सहली दरवर्षीप्रमाणे आहेतच. अजूनही ज्यांनी परदेशप्रवासाचा श्रीगणेशा केला नाही त्यांना गणपतीनंतर वुमन्स स्पेशल थायलंड मलेशिया सिंगापूरची चांगली संधी आहे, ती दवडू नका. ह्यातील काही सहलींवर तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक असते आणि येणारच आहे. आपली भेट होईलच कुठेतरी एखाद्या सहलीवर.
जसं महिलांचं पर्यटन वाढतंय तसं आता एक गोष्ट करणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय आणि ती म्हणजे महिलांनी आपल्या पर्यटनाचं एक वेळापत्रक बनवायचं आणि त्यानुसार प्रवास करायचा. प्रवास आनंद देतो, प्रवास व्यक्तिमत्त्व विकास घडवतो, प्रवासाने आत्मविश्वास वाढतो हे सगळं आता तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, आपण सर्वांनी ते अनुभवलंय, त्याविषयी बोलायची गरज नाही. एका आयुष्यात सातही खंडांसह शंभर देश बघून होतात जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर, अर्थात हे झालं खंद्या पर्यटकाचं काम. पण आधी पंचवीस देश आणि पाच खंड नंतर पन्नास देश आणि सात खंड आणि मग अजूनही पर्यटनाची खुमखूमी राहिली जिवंत तर पंच्याहत्तर देश बघून होऊ शकतात. आता एवढे देश बघायचे म्हणजे प्रश्न येतोे पैशाचा. तर त्यासाठीही नियोजन आवश्यक आहे. लातूरचे शिक्षक बाबा भातंब्रेकरांचं उदाहरण मी अनेकदा दिलंय की ह्या व्यक्तीने आपल्या प्रत्येक पगारातला साठ टक्के भाग घरखर्चासाठी, दहा टक्के भाग औषधोपचारासाठी आणि तीस टक्के भाग पर्यटनासाठी राखून ठेवला आणि आज त्यांनी अंटार्क्टिकासह सातही खंड, ऐंशीहून जास्त देश आणि दोनतीन वेळा एव्हरेस्ट बेस कॅम्प केलाय. पर्यटन हे पॅशन आणि मिशन असल्यावर ६०+१०+३० ह्या टक्केवारीने काहीही अशक्य नाही हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची कार्यशाळा असलेल्या ह्या पर्यटनाच्या प्रांतात प्रत्येकीने शिरकाव करण्याची गरज आहे, त्याचं प्लॅनिंग करणं जरूरीचं आहे.
प्रत्येक महिला सुंदर आहे आणि हे सौंदर्य खुलविण्यातही वुमन्स स्पेशलने अंशत: हातभार लावलाय हे मी अभिमानाने म्हणेन. गेल्या बारा वर्षात ती ट्रान्सफॉर्मेशन मी बघितलीयत. आचारात विचारात पेहरावात पुढचं पाऊल टाकण्यासाठी वुमन्स स्पेशल सुरू झाली. जिने महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकलं नाही तिला किमान गोव्याला घेऊन जायचं, जिने देशाबाहेर पाऊल टाकलं नाही तिला थायलंड सिंगापूर वा युरोपवारी घडवायची आणि जिने ऑलरेडी पर्यटन सुरू केलंय तिला जगप्रदक्षिणा घडवायची, सप्तखंडांची वारी करायला सहाय्य करायचं हे वुमन्स स्पेशलचं ध्येय. तसंच नऊवारीतून सहावारी, सहावारीतून पंजाबी, पंजाबीतून मिडी मॅक्सी गाऊन वनपीस, शॉटर्स स्कटर्स ते अगदी स्विमिंग कॉश्च्यूम घालून बिनधास्तपणे आयुष्याचा आनंद घेणं म्हणजे आपण कोणतंही पाप करीत नाही तर हे किमान वर्षातून एकदा करणं जरुरीचं आहे हा विचार मनामनात रुजू केला. सुरुवातीला ‘मी एकटी सहलीला निघालेय’ म्हटल्यावर आधी घरातल्यांच्या आणि नंतर शेजारच्यांच्या भुवया उंचावायच्या. महिलाही सहलीवर कुटुंबाला सोडून खासकरून मुलाबाळांना सोडून एकटे आलोय ह्याची एक गिल्ट घेऊनच वावरायच्या. एखाद्या चागंल्या कार्यक्रमाच्या वेळी रडायच्या घरची आठवण येऊन. आपण इथे मजा मारतोय, मुलांचं कसं चाललं असेल तिथे? आपल्याला हे असं वागणं शोभतं का, अशातर्हेची ती खंत असायची. हळूहळू चित्र पालटलं. वर्षातले सात आठ दिवस काय हरकत आहे बाहेर जायला. थोडा बदल, थोडी रीफ्रेशमेंट आणि थोडं रीज्यूविनेशन महत्वाचं आहे हे पटायला लागलं आणि गिल्ट कमी झाली. घरच्यांना ह्या ‘ब्रेक’ची गरज आहे हे जाणवलं आणि त्यांनी मनापासून पाठिंबा द्यायला सुरुवात केली. शेजारच्यांच्या उंचावलेल्या भुवया खाली आल्या, आणि आतातर मी आणि माझ्या शेजारणी मिळून ग्रुपने सहलीला यायला सुरुवात झाली. सध्या माहेरपण कमी झालंय पण हे आधुनिक माहेर आम्हाला जास्त भावतंय. आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सहलीवर झालेल्या मैत्रिणीचं सध्या एकत्रित पर्यटन सुरू झालंय. सिलसिला जारी आहे ह्या वुमन्स स्पेशलचा आणि महिला पर्यटनाचा.
‘आय अॅम ब्युटिफूल, आय अॅम बोल्ड, आय अॅम द क्वीन अँड आय लव्ह मायसेल्फ’हा आमच्या वुमन्स स्पेशलचा कन्सेप्ट आहे. मी माझं आयुष्य आनंदात जगतेय, तू तुझं आयुष्य आनंदात जग आणि त्यासाठी दोघींनी एकमेकींना मदत करू या आणि जीवनाच्या आनंदी सफरीवर सहभागी होऊया हा सिधासाधा मामला आहे जो वुमन्स स्पेशलवर जगला जातोय पण पुढे तो आयुष्यातही कामी येतो. आयुष्य छोटं आहे, ते सगळ्यांनाच तेवढंच सोप्प आहे किंवा तेवढंच अवघड, ते झेलायचंच आहे आणि त्यातले खाचखळगे कुणालाही चुकले नाहीत पण ते हसत हसत लिलया पेलण्यासाठीची सकारात्मक मनोवृत्ती जागृत करण्याचं बळ हे वुमन्स स्पेशलला एकमेकींकडून एकमेकींना मिळत राहतं. ‘निर्धास्त-बिनधास्त-बोल्ड’ हा नारा आम्ही लावत असलो तरी इतक्या वर्षांत कधीही ह्या वुमन्स स्पेशलची लेव्हल खाली गेली नाही. डीसेन्सी, डिग्निटी आणि सुरक्षितता ह्या गोष्टी खूप चांगल्या तर्हेने जोपासल्या गेल्या आणि वुमन्स स्पेशलवरचा विश्वास वाढतच राहिला. घरातल्यांनाही लेह लडाख असो वा लंडन, ऑस्ट्रेलिया वा अमेरिका आईला, आजीला, सासूबाईंना, बहिणीला, मुलीला, सुनेला एकटं पाठवायला भीती वाटली नाही. ‘एवढ्या महिला एकत्र जाताहेत सहलीवर, भांडणं होत नाहीत?’ हा प्रश्न मला विचारला जातो अनेकदा. अहो वेळ कुणाला आहे भांडाभांड करायला. मी माझ्यात मश्गूल आहे. वेळ कुठे मिळाला होता इतकी अनेक वर्ष स्वत:कडे बघायला? स्वत:चे लाड करायला? नटायला? सजायला? मिरवायला? हीयर ऑन टूर वुई आर डॅम बीझी! नो टाईम फॉर एनी पेट्टी इश्युज! अहो ह्या बोल्ड अॅन्ड ब्युटिफूल महिलांना सहलीवर स्माईल क्वीन, स्टाईल क्वीन, अॅटिट्यूड, कॉन्फिडन्स... तसंच मिस वीणा वर्ल्ड क्राउन जो मिळवायचा असतो. काही सहलींवर आम्ही फॅशन शो करतो तर जिथे फॅशन शोसाठी वेळ नसतो त्या सहलींवर डीजे अॅन्ड डान्स. मनमुराद आनंद लुटणं, प्रत्येक क्षण जगणं, दे धम्माल करणं आणि करायला शिकणं हे उद्दिष्ट. फॅशन शोच्या दिवशी मी ही आवर्जून जाते आणि आमच्या सख्यांना भेटते मग ते राजस्थानमध्ये असो वा स्वित्झर्लंड, मलाही रीज्यूविनेशन हवंच असतं पुढच्या वाटचालीसाठी!
तर असा आहे आमचा वुमन्स स्पेशलचा फंडा, आनंदाचा, उत्साहाचा, प्रेरणेचा, आत्मविश्वासाचा, सकारात्मकतेचा. यु आर मोस्ट वेलकम इन धिस वर्ल्ड ऑफ वुमन्स स्पेशल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.