भारताबाहेर आणि खासकरुन युरोपमध्ये फिरताना अनेक वर्ष चहा प्यायल्यानंतर ‘द परफेक्ट कप’म्हणावसं वाटेल, अशा एक कप चांगल्या चहाच्या शोधात मी अजूनही आहे. अगदी उत्कृष्ट फाईव्ह स्टार हॉटेल्स, फाईन-डाईन रेस्टॉरंट्स किंवा छोटेसे स्ट्रीट मार्केट असो, गरम पाण्यात घातलेल्या चहा पत्तीचा सुंदर रंग आला की त्यात थंडगार दूध घालून त्या चहाची पार वाट लावली जाते. चहासारखी साधी गोष्ट असली तरी हा एक कप प्रत्येक देशाची कहाणीच आपल्याला सांगून जातो.
‘एका चहासाठी सत्तावन्न पाऊंड भरायचे? हे कुठल्याच गणितात बसत नाही. एक कप चहा मिळणार की अख्खी चहाची किटली?’ लंडनच्या हॉलिडेवर निघालेल्या माझ्या मैत्रिणीचे उद्गार ऐकून मला हसू आले. लंडनमधले काही खास ब्रिटिश अनुभव तिला हवे होते तेव्हा मी तिला लंडनच्या प्रसिद्ध ‘द रिट्झ’ या हॉटेलमधील ‘आफ्टरनून टी’चा अनुभव नक्की घे, असं सुचविलं होतं. मात्र त्यानंतर लगोलग या ‘आफ्टरनून टी’ एक्सपीरियन्सची किंमत ऐकून ती ‘पाऊंड’ मोजू लागली होती. ‘खरंतर लंडनच्या द रिट्झमध्ये टी टाईम म्हणजे केवळ एक कप चहाचे सेवन करणे नव्हे, तर एका स्वप्नसुंदर दुनियेत जाऊन अस्सल ब्रिटिश पद्धतींची सुंदर ओळख करून घेणे.’ हाय सोसायटी आणि लक्झरीचे प्रतिक असलेल्या जगातल्या एका सर्वात प्रतिष्ठित हॉटेलमधल्या पाम कोर्ट रेस्टॉरंटमध्ये पियानोच्या मधुर सुरांच्या साथीने जगभरातल्या सर्वात उत्कृष्ट चहांपैकी आपल्या आवडीच्या चहाचा स्वाद घेतो. त्याच्या सोबतीला अनेक व्हेज-नॉन व्हेज सॅण्डविचेस, ताजे बेक केलेले कप केक्ससारखे स्कोन्स व क्लॉटेड क्रीम आणि स्ट्रॅाबेरी जॅम या सर्वांनी ‘आफ्टरनून टी’ संपूर्ण होतो. ‘रिट्झ हॉटेल’च्या प्रथेप्रमाणे इथे पुरुषांनी टाय व जॅकेट घालणे उचित ठरते व स्त्री-पुरुष कुणालाही स्पोर्ट्स शूज किंवा जीन्ससारखे कॅज्युअल कपडे चालत नाहीत. अर्थात या लक्झुरियस हॉटेलमधले वातावरणच इतके सुंदर आहे की आपल्याला आपोआपच छान तयार होऊन जावेसे वाटते.
‘द रिट्झ’चा ‘आफ्टरनून टी’ सोहळा हा अनेक सेलिब्रेशन्ससाठी इतक्या अॅडव्हान्समध्ये बुक होतो की त्याचा आनंद घेण्यासाठी इथूनच जाण्यापूर्वी बुकिंग केलेले बरे पडते. खरं म्हणजे, हा केवळ एक चहाचा कप नसून एक संपूर्ण जेवणच बनते. मग या सोहळ्याला ‘आफ्टरनून लंचच’ का नाही म्हणायचे? हा प्रश्न मला नेहमीच पडायचा. एडरीयन या माझ्या ब्रिटिश मित्रामुळे मला याचे कोडे उलगडले. मला जेवणाचे आमंत्रण करताना एडरीयन नेहमी ‘जॉईन मी फॉर टी’असे म्हणायचा. संध्याकाळच्या जेवणाला ‘सपर’ किंवा ‘डिनर’ न म्हणता ‘टी’ का म्हणायचे यावरून आमचा नेहमीच वाद व्हायचा. पण ब्रिटनमध्ये साग्र-संगीत संपूर्ण जेवणाला ‘डिनर’ म्हणतात मग ते दिवसात कधीही घ्या, आणि हलक्या जेवणाला दुपारी घेतल्यास लंच आणि रात्री घेतल्यास ‘सपर’ म्हणतात असे कळले. आणि बरेच वेळा ‘टी’ म्हणजेच जेवण, कारण नुसता चहा क्वचितच घेतला जातो. चहा बरोबर सॅन्डविचेस किंवा सॅलड्स इ. घेतलेच जातात म्हणून ‘जॉईन मी फॉर टी’ म्हणजेच ‘आपण जेवायला जाऊ या’ असा अर्थ होतो, असे एडरियनने समजाविले. ब्रिटनची ही दुपारच्या चहाची सवय साधारणपणे १८३० ते १८४०च्या दरम्यान सुरू झाली. ब्रिटनमधल्या बेडफर्डची डच्चेस अॅना मारिया रसल हीने ‘आफ्टरनून टी’ चा शोध लावला असे म्हणतात. दुपारच्या हलक्या-फुलक्या जेवणानंतर रात्रीचे जेवण घेण्यापर्यंतच्या मधल्या काळात डच्चेस अॅनाला भूक लागली तेव्हा तिने दुपारी चहाबरोबर काही स्नॅक्स मागविले. बघता बघता ब्रिटनच्या हाय सोसायटीत ही प्रथा पसरली व सॅन्डविचेस, केक्स इ. खाद्य पदार्थांबरोबर ‘आफ्टरनून टी’ प्रसिद्ध झाला. गंमत म्हणजे या ‘टी’ ला ‘लो टी’ असेही म्हटले जाते, कारण त्या काळच्या डच्चेस व इतर शाही घराण्यातल्या स्त्रिया तेव्हा ‘लो आर्मचेअर’ म्हणजेच बसक्या खुर्च्यांमध्ये बसून चहाचे सेवन करीत असत. ‘आफ्टरनून टी’ किंवा ‘लो टी’ची ही पद्धत जर हाय सोसायटीमुळे सुरू झाली, तर या उलट ‘हाय टी’ ची पद्धत खालच्या दर्जाच्या समाजापासून सुरू झाली. दिवसभर काम करुन राबणारे कामगार आपली कामं संपवून दिवसातून एकदाच चहा आणि जेवण एकत्रच घ्यायचे आणि हे प्रॉपर डायनिंग टेबलवर सर्व केले जात असल्याने ह्याला ‘हाय टी’ म्हणण्याची पद्धत सुरू झाली. आजकाल अनेक कॉर्पोरेट्स आपल्या बिझनेस व इन्सेंटिव्ह टूर्सवर ‘हाय टी’ ची मागणी करतात. जेवणासोबत उत्तम नेटवर्किंग होऊन बिझनेस अपॉर्च्युनिटीस् वाढतात, यासाठी आज लंच आणि डिनरसोबत हा पूर्वकाळापासून सुरु झालेला ‘हाय टी’ अगदी पॉप्युलर भाग ठरतो माईस टूर्सचा.
‘हाय टी’ असो की ‘लो टी’ असो, भारताबाहेर आणि खासकरुन युरोपमध्ये फिरताना अनेक वर्ष चहा प्यायल्यानंतर ‘द परफेक्ट कप’म्हणावसं वाटेल, अशा एक कप चांगल्या चहाच्या शोधात मी अजूनही आहे. अगदी उत्कृष्ट फाईव्ह स्टार हॉटेल्स, फाईन-डाईन रेस्टॉरंट्स किंवा छोटेसे स्ट्रीट मार्केट असो, गरम पाण्यात घातलेल्या चहा पत्तीचा सुंदर रंग आला की त्यात थंडगार दूध घालून त्या चहाची पार वाट लावली जाते. जगभ्रमंती करता करता मग काळा चहा प्यायची किंवा चहाऐवजी सरळ कॉफीच प्यायची सवय आपोआपच लागते.
पण जवळ-जवळ भारतासारखा चहा मला मिळाला तो मलेशियामध्ये. मलेशियाच्या कुठल्याही रेस्टॉरन्टमध्ये जाऊन आपण ‘ते तारिक’ मागायचे. उकळलेल्या चहामध्ये कंडेन्सड मिल्क घालून एका भांड्यातून दुसर्या भांड्यात हा चहा ओतून त्याची धार काढून एक छान गरमागरम फेसाळलेला गोड चहाचा कप तयार होतो. या धार काढण्याच्या क्रियेमुळेच या चहाचे नाव ‘ते तारिक’ असे पडले. भारतातून मलेशियामध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिम लोकांनी रबर प्लान्टेशनमध्ये काम करण्यार्या कामगारांसाठी हा चहा विकायला सुरुवात केली. हा चहा बनवायची प्रक्रिया आज स्वत:च एक टूरिस्ट अटॅ्रक्शन बनली आहे आणि मलेशियात वेळोवेळी या ‘ते तारिक’ बनविण्याच्या कॉम्पीटिशनसुद्धा भरतात. मलेशियाच्या नॅशनल पेयाचा दर्जा मिळालेल्या या ‘ते तारिक’ची चव आपल्या पुढच्या मलेशिया हॉलिडेवर नक्की घ्या!
भारतातून परदेशी स्थायिक झालेल्या अनेक भारतीय बंधु-भगिनींना मला अनेक वेळा धन्यवाद द्यावेसे वाटतात. भारताबाहेर त्यांनी आपला घर-संसार स्थापन केला आणि काही भारतीय पद्धतींना जगभर पसरवले, मग त्यात काही लोकल फ्लेवर्सचे मिश्रण झाले आणि संपूर्ण जगालाच काही नाविन्यपूर्ण गोष्टी मिळाल्या. जर मलेशियात ‘ते तारिक’चा शोध लागला तर दुबईमध्ये ‘करक चाय’चा. दुबईतल्या ट्रॅव्हल मार्टमध्ये दिवसभर बिझनेस मीटिंग्स् करून दमल्यावर एक कप चहाची गरज जाणविली तेव्हा आपल्याला भारतीय रेस्टॉरंट शोधावे लागेल असे वाटले. तेवढ्यात दुबईच्या आमच्या बिझनेस पार्टनर्सने ‘करक चाय’ची एक ग्लास देऊन ही तलफ मिटवली. अगदी आपल्या चहासारखाच चायपत्ती उकळवून त्यात दूध, साखर, लवंग, इलायची, आले, दालचिनीसारखे मसाले घालून केलेला हा दुबईचा ‘करक चाय’ घरची आठवण करून देतोे.
चहासारखी साधी गोष्ट असली तरी हा एक कप प्रत्येक देशाची कहाणीच आपल्याला सांगून जातो. हल्लीच एका लक्झरी ट्रॅव्हल शोसाठी मी आफ्रिकेतल्या उत्तरेकडच्या मोरोक्को देशाला भेट दिली. तेव्हा तिथे मला असली ‘मोरोकन मिंट टी’ चाखायला मिळाला व त्यानंतर संपूर्ण ट्रिपभर मी हा पुदिन्याचा चहाच पसंत केला. उकळलेल्या काळ्या चहामध्ये ताज्या पुदिन्याची काडी घालून काचेच्या आकर्षक ग्लासेस्मध्ये हा चहा दिला जातो. या चहाला म्हणतात ‘टुआरेग टी’. पारंपरिकरित्या हा ‘टुआरेग टी’ जेव्हा सर्व्ह केला जातो तेव्हा तो पाहुण्यांना तीन वेळा दिला जातो. सर्वप्रथम थोडा हलका, नंतर थोडा कडक व तिसर्या ग्लासला हा चहा अगदी स्ट्राँग कडक चहा असतो. मोरोकन्स ची समजूत आहे की, पहिला ग्लास आयुष्यासारखा सौम्य आहे, दुसरा ग्लास प्रेमासारखा स्ट्राँग आहे आणि तिसरा हा मृत्युसारखा कडू. आयुष्याचे रहस्य चहाच्या कपातच दडलेले आहे ना?
मोरोक्कोसारखेच टर्कीमध्येसुद्धा चहा घेणे हा एक समारंभच असतो. काचेच्या ग्लासेस्मध्ये लाल गडद रंगाचा चहा दिला जातो आणि बर्याच वेळा त्या चहाच्या ग्लासवर साखरेचे एक शुगर क्युब देतात, जो जिभेखाली ठेवून मग चहाचे सेवन करतात. ‘चहाशिवाय गप्पा मारणे म्हणजे, आकाशात चंद्र नसल्यासारखे आहे’, असे टर्कीत मानले जाते.
पण जर कुठल्या देशात खरंच चहाचा समारंभ केला जात असेल तर तो जपानमध्ये. जपानला भेट देणार असाल तर जपानच्या कल्चरची ओळख ही ‘जॅपनीस् टी सेरेमनी’ पाहिल्यावर होऊ शकते. बुद्धिस्ट मॉन्कस्ने चायनाकडून चहा जपानमध्ये नेला व या टी सेरेमनीचे बुद्धिझमशी नाते जोडले गेले. ‘जॅपनीस् टी सेरेमनी’ किंवा ‘चानोयू’मध्ये स्ट्रॉच्या चटयांवर बसून जपानच्या ‘माचा’ या ग्रीन टी चे सेवन केले जाते. पण या सेरेमनीचा उद्देश चहा पिणे नसून एखाद्याचे मनापासून स्वागत करणे असते. अगदी कोरियोग्राफी केल्यासारखे, डान्ससारख्या हालचाली करत माचा चहाच्या पाउडरचे मिश्रण केले जाते व ते सर्वप्रथम मुख्य पाहुण्यांना देऊन त्यानंतर प्रत्येक जण त्याच कपमधून एक-एक घोट घेत तो कप पुढे देतात. त्याचबरोबर त्या चहाचा कडूपणा घालवण्यासाठी एक गोड पदार्थसुद्धा दिला जातो. दर स्टेपनंतर आपल्या चहा बनवणार्या होस्टला धन्यवाद दिले जातात व पाहुण्यांची खातिरदारी केली जाते. अगदी शांतपणे चालणारा हा समारंभ मेडिटेशन केल्यासारखा शांत वाटतो. ‘जॅपनीस् टी सेरेमनी’ ही शांतता, पवित्रता तसेच एकमेकांप्रती आदर व सुसंवाद साधण्याचे प्रतिक समजले जाते. या माचा चहाचे गुणसुद्धा बरेच असल्याने आपल्या प्रकृतीसाठी हा चहा उत्तम समजला जातो. हे सगळे खरे असले तरी या माचा चहापासून बनविलेले माचा सॉफ्टी आईसक्रीम मला खूप आवडले. त्याचा आपल्या प्रकृतीसाठी फार फायदा नसला तरी जिभेचे चोचले पुरविण्याचे काम नक्कीच होते. जपानमध्ये या माचा चहाचे इतके वेड आहे की तिथल्या चॉकलेटमध्येसुद्धा माचा फ्लेवर्स मिळतात.
जपानमध्ये चहाची ओळख होण्याआधी चायनामध्ये जवळ-जवळ हजार वर्षांपासून चहा घेतला जायचा. असे म्हणतात की, २७३७ BC म्हणजेच जवळ जवळ ५०००वर्षांपूर्वी चहाचा शोध लागला. चायनाचा एम्परर शेनोंग प्रवास करताना एकदा त्याचे गरम पाणी पीत होता, तेव्हा त्या पाण्यात एका झाडाचे पान पडले आणि चहाचा शोध लागला. चायनीस् ग्रीन टी, व्हाईट टी, ब्लॅक टी इत्यादींच्या फायद्यामुळे आज चायनीज टी जगात सर्वत्र प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. चायना ट्रिपवरून येताना ‘जास्मिन टी’ हे आपल्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांसाठी उत्तम गिफ्ट ठरते.
चायनाकडून चहाची रोेपं घेऊन जगभर आणि भारतातसुद्धा चहाची लागवड करण्याचे काम ब्रिटिशांनी केले. आज भारतभर फिरताना आपल्याला अनेक वेगळे चहाचे प्रकार चाखायला मिळतात. निलगिरी टी, आसाम, दार्जिलींग, काश्मिरी कहवा या सगळ्यांपासून वेगळे आहे ते ‘लडाखी बटर टी’. चहाचे खारे मिश्रण लडाख व तिबेटमध्ये तिथल्या वातावरणात ताकद देते. शेजारी श्रीलंकेत तर ‘नुआरा इलिया’ या ठिकाणी आपण एका टी फॅक्टरीमध्ये रात्रीचे वास्तव्यसुद्धा करू शकतो. जगभर फिरताना तिथल्या चहाची चव घेऊन तिथल्या परंपरेची, तिथल्या रिती-रिवाजांची ओळख नक्कीच करून घ्या. आणि घरच्या चहाची आठवण हवी असेल तर रेडीमेड इंडियन चहाची पाकिटे बॅगेत भरायला विसरू नका. असा विचार करत असताना नुकतेच थायलंडवरुन परतलेल्या आमच्या घरातल्या बच्चेकंपनीने माझ्यासमोर थाई चहा म्हणजेच ‘चा-येन’ची पाकिटे ठेवली आणि हा ‘चा-येन’ नक्की कसा बनवायचा याचा गुगलवर शोध सुरू झाला. चक्री फुलाचा स्वाद असलेल्या ‘थंडगार थाई टी’ चे ग्लास प्रत्येकाच्या हातात देताच सगळ्या बच्चेकंपनीचे चेहरे खुलले, तेव्हा या जनरेशनचं जगभर फिरताना कुठेच अडणार नाही ह्याची मला खात्री पटली.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.