संध्याकाळी सगळे जण आपापल्या घरी गेले की एकदम शक्ती गेल्यासारखी वाटायची. आम्ही सकाळची वाट बघत बसायचो. एकदा का सकाळी एकेक जण यायला लागले की सलाईन भरल्यासारखी शरीरात ताकद यायला लागायची. पाच वर्षांपूर्वीची आमची ही अवस्था. मागे वळून बघायचं नाही हा निर्णय घेतला होता, पण पुढचा रस्ता प्रॅक्टिकली अनभिज्ञ होता. एक-एक मेंबर माळेतल्या मण्यासारखा रोज जोडला जात होता. ऑफिस कुठे घ्यायचं? रजिस्ट्रेशन कसं करायचं? कंपनीचं नाव काय ठेवायचं? पैसे कुठून आणायचे? असंख्य प्रश्न समोर असूनही टीम मेंबर्स जॉईन होत होते आणि तीच आमची शक्ती होती, प्रेरणा होती. एकेकजण एकेका कामाची जबाबदारी सांभाळत होतो. अशात एक दिवस सकाळी दिनांक २२ एप्रिल, २०१३ रोजी पुण्याची एक व्यक्ती पियुष धोका आमच्या घरी म्हणजे त्यावेळच्या माहीमच्या आमच्या कार्यालयात दाखल झाली, आणि म्हणाली, ‘आम्हाला तुमचं सेल्स पार्टनर बनायचंय. आम्ही डीपॉझिट चेक घेऊनच आलोय’ ‘‘अरे, अजून आमचा कशात काय पत्ता नाही, कंपनीचं नावही ठरलं नाही आणि रजिस्ट्रेशनही झालं नाही. अशावेळी आम्ही सेल्स पार्टनर ह्या गोष्टीचा विचारही केला नाहीये, आणि काहीही नसताना पैसे द्यायला तुम्हाला भिती नाही वाटत?’’ तर म्हणाला, ‘त्याची काळजी आम्हाला अजिबात नाही, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, आणि तुम्ही आम्हाला पार्टनर करून घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही’. पियुषच्या प्रेमळ धमकावणीने आम्ही पहिल्या सेल्स पार्टनरची नोंदणी केली. तोपर्यंत आमचा अशोक पेडणेकर जॉइन झाला होता. त्याला म्हटलं, ‘‘आता तू आपल्या प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची साखळी बांधायला घे’’. तोही एकदम खूश झाला आणि म्हणाला, ‘माझ्याकडे ऑलरेडी विचारणा करताहेत काहीजणं, आता मी लागतो फुल्ल फ्लेज्ड कामाला’. आणि अशोकने कंपनी रजिस्टर होण्याआधी पहिल्या पंधरा प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची यादी तयार केली. १५ मे, २०१३ ला त्यांची मीटिंग ठरवली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा येथील बँक्वेटमध्ये. दैवी योगायोग असा की त्याचदिवशी पहाटे दोन वाजता ‘वीणा वर्ल्ड’ ही कंपनी रजिस्टर झाल्याचं ऑनलाईन कळलं आणि त्या पहिल्या मीटिंगला ‘वीणा वर्ल्ड प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स कॉन्फरन्स’ हे ऑफिशियल नाव मिळालं. आजही प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची संख्या दोनशेच्या घरात पोहोचलीय. आता यावर्षी आम्ही जिथे जिथे आमचे प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स नाहीत अशा ठिकाणी आणखी शंभर पार्टनर्ससाठी नोंदणी सुरू करतोय.
प्रीफर्ड सेल्स पार्टनर्ससाठी रजिस्ट्रेशन ओपन करण्याचं कारण म्हणजे गेल्या पाच वर्षांत आम्ही पाह्यलं की प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स प्रगती करताहेत, आणि त्यामुळे वीणा वर्ल्डच्या प्रगतिलाही हातभार लागतोय. जिथे आम्ही पोहोचू शकत नाही तिथे महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा अशा सर्व ठिकाणी आमचे हे प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स वीणा वर्ल्डचा झेंडा डौलाने फडकवताहेत, तेथील पर्यटकांना त्यांचं जग बघण्याचं स्वप्न वीणा वर्ल्डतर्फे पूर्ण करण्यासाठीची जी एक प्रोसेस आहे त्याचं माध्यम बनताहेत. आज जवळ-जवळ पन्नास हजार पर्यटक दरवर्षी आमच्या प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सद्वारे वीणा वर्ल्डकडे येताहेत ही निश्चितच मोठी अचिव्हमेंट आहे आमच्या पार्टनर्सची. आणि त्यासाठी वीणा वर्ल्ड आमच्या ह्या सार्या पार्टनर्सना कृतज्ञपूर्वक सलाम करते जरी ते वीणा वर्ल्डचे टीम मेंबर्स असले तरी. आपल्या माणसांनाही मनःपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत नाही का, बर्याचदा आपण ते विसरतो. खरंतर अशा ह्या सर्वच पार्टनर्सचे फोटोज् इथे यायला हवेत पण जागेअभावी ते देता येत नाहीत त्यामुळे काही प्रातिनिधिक कॉन्ट्रिब्यूटर्सचे-पार्टनर्सचे फोटोज् इथे देत आहोत.
पाच वर्षांपूर्वी पर्यटनक्षेत्रात वीणा वर्ल्ड नावाची संस्था दाखल झाली आणि पर्यटनक्षेत्रातल्या स्पर्धेला एक चांगला स्पर्धक मिळाला. हे मी अशासाठी म्हणते की हेल्दी कॉम्पीटिशनचा फायदा नेहमी ग्राहकाला मिळतो. आणि वीणा वर्ल्ड पर्यटनक्षेत्रात जरी एक मजबूत स्पर्धक मानला जात असला तरी आम्ही आमचं लक्ष्य हे स्पर्धेच्या पुढे, थोडंसं बियाँड ठेवलंय ते म्हणजे आमच्या पर्यटकांकडे. त्यांच्या गरजा, त्यांची सोय, त्यासाठी आपली सर्व यंत्रणा राबवली जाण्यावर भर दिलाय. असो, हा झाला व्यवसायाचा भाग पण वीणा वर्ल्ड उभं राहिलं आणि त्यासोबत अनेक महिला उद्योजिका आमच्या प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सद्वारे उदयाला आल्या, ज्यांनी कौटुंबिक जबाबदारीतून वेळ काढून त्यांच्या एरियात स्वतःचं ऑफिस थाटलं आणि वीणा वर्ल्डच्या माध्यमातून त्या नुसत्या उद्योजिकाच नव्हे तर यशस्वी उद्योजिका बनल्या. त्यांचेही काही प्रातिनिधिक फोटोज् इथे दिले आहेत. त्यांनी स्वतःला आता कोशातून बोहर येऊन उद्योजिका म्हणून घडवलंय. आज त्या ह्या उद्योगातील परफॉर्मन्सच्या जोरावर त्यांचंही जग बघण्याचं स्वप्न पायरी पायरीने पूर्ण करताहेत. ‘जगाची सफर ही व्यक्तिमत्त्व विकासाची एक यशस्वी कार्यशाळा आहे’, असं मी नेहमी अभिमानाने म्हणते कारण ह्यात आम्ही स्वतःला घडवतोय आणि आमच्या ह्या यशस्वी उद्योजिकाही. आत्ताच पुण्याला पार पडलेल्या द्विवार्षिक प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स कॉन्फरन्समध्ये एकीने दिलेली प्रतिक्रिया ऐकून मलाही बरं वाटलं, करीत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटलं. ती म्हणाली, ‘जेव्हा मी पार्टनर बनले चार वर्षांपूर्वी तेव्हा कशाला नसते उद्योग? किंवा काय आहे हे वीणा वर्ल्ड? असं विचारलं जायचं. पण आज तीच मंडळी ‘अरे वा! छान वाढवलास बिझनेस, आम्हालाही तुझ्यासारखं काहीतरी करायला मिळालं पाहिजे. लकी आहेस, असं म्हणतात तेव्हा चार वर्षात घेतलेल्या कष्टांना न्याय मिळाला असं वाटतं’. हे जे प्राऊड फीलिंग आहे ते माझ्यादृष्टीने आणि वीणा वर्ल्डच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे. पर्यटनात भारतभर असं महिला उद्योजकांचं जाळं जर पसरविता आलं तर वीणा वर्ल्डच्या असण्याला आणखी अर्थ येईल. ही सुप्त इच्छा आहेच माझी.
जेव्हा घरातली महिला करियर करायचं म्हणते, उद्योजिका व्हायचं म्हणते तेव्हा घरातल्या सगळ्यांनी तिला साथ दिली पाहिजे अगदी मनापासून, मग ती मुलगी असो वा सून वा बहिण वा आई अगदी आजीसुध्दा. हो! उद्योजिका व्हायला वयाची अट नाही ते सगळं मनावर अवलंबून आहे. आम्ही वुमन्स स्पेशल सहलींवर ह्याचा उद्घोष करीतच असतो. वीणा वर्ल्डच्या प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स महिलांच्या घरची मंडळी ह्याच्या एक पाऊल पुढे आहेत. त्यांनी ह्या सगळ्यांना जी लागेल ती मदत केली एक यशस्वी उद्योजिका बनायला. आमची पुणे येथील पार्टनर प्रीता कुळकर्णीने स्वत:चा बिझनेस वाढवलाच पण तिची यशस्विता बघून प्रीताचे यजमान मिलिंद तिला संपूर्ण साथ देण्यासाठी इटलीतला जॉब सोडून पुण्याला आले. त्यामुळे कुटुंब एकत्र झालं आणि पिंपरीला त्यांनी दुसरं वीणा वर्ल्ड प्रीफर्ड सेल्स पार्टनर ऑफिस सुरू केलं. आता ह्या मिस्टर अँड मिसेस कुळकर्णींमध्ये हेल्दी कॉम्पीटिशन सुरू आहे. पनवलेची स्मिता जोशीसुध्दा अशीच आमची एक लकी पार्टनर. तिला तिच्या यजमानांनी साथ दिलीच पण आता तिची पुढची जनरेशन म्हणजे आदित्य आणि आभा जोशी दोघही आईला मदत करताहेत. पुढची जनरेशन सोबतीला असणं हे आजही आपल्या आपल्या भारतीय मन:स्थितीला वरदान वाटतं. बीडचे प्रमोद चरखासुद्धा आपल्या मुलाला त्याच्या करियरसोबत ट्रॅव्हलमधलं शिक्षणही घ्यायला प्रवृत्त करताहेत. वीणा वर्ल्डच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्येही त्याने सविस्तर ट्रेनिंग घेतलं त्याच्या सुट्टीमध्ये. गुजरातमधली बॉस्की, जळगावची राजश्री झवर, आणि भोसरीची प्रीता कुळकर्णी ही काही बोलकी उदाहरणं आमच्या ह्या महिला उद्योजिकांची.
अर्थात अनेक यशस्वी पुरूष उद्योजक वीणा वर्ल्डला मोठं करण्यात सिंहाचा वाटा उचलताहेत त्यांना विसरून कसं चालेल? त्यातील काही प्रातिनिधिक फोटोज् इथे दिले आहेत. परवा मी कॉन्फरन्समध्ये हीच गोष्ट सांगितली की, ट्रॅव्हल किंवा पर्यटन क्षेत्र खूप विस्तारतेय. अजून असंख्य उद्योजकांची गरज लागणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने खऱंतर तरुण-तरुणींनी ह्यात यायला पाहिजे. पुढची जनरेशन समजा दुसर्या कोणत्याही त्यांच्या बिझनेसमध्ये गेली तरी हा प्रीफर्ड सेल्स पार्टनरचा यशस्वी उद्योग एक साईड बिझनेस होऊ शकतो. येणारं युग पर्यटनाचं आहे,त्यासाठी तयार होऊया. टूगेदर वुई कॅन अचिव्ह मोअर... लेट्स ग्रो टूगेदर!! हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.