सीनियर्स स्पेशल ह्या वीणा वर्ल्डच्या सहलींची लोकप्रियता वाढतेय. जास्तीत-जास्त ज्येष्ठ मंडळी जगाची भ्रमंती करताहेत, ही चांगली गोष्ट आहे. अर्थात, तो व्यवसायाचा भाग आहे पण ज्येष्ठ मंडळींची सहल ही काळाची गरज आहे. एका वर्षात तीन ते चार सहली करणारी ज्येष्ठ मंडळी ह्याचं उदाहरण आहेत. ज्येष्ठ मंडळींच्या वाढत्या पर्यटनाची, एकामागून एक देश पालथे घालण्याची कारणं शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या.
पूर्वी पर्यटन करणं ही श्रीमंतांची मक्तेदारी होती. संस्थानिकांच्या परदेश पर्यटनाच्या कथा आज अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात. त्यांनी आनंदासाठी वा दृष्टीकोन व्यापक करण्यासाठी पर्यटन करायचं आणि इतरांनी फार-फार तर तीर्थक्षेत्रांचं पर्यटन किंवा वारी करण्यात धन्यता मानायची, ही मानसिकता नकळतपणे रुजली गेली. पर्यटन म्हणजे नुसती उठाठेव, पर्यटन म्हणजे वेळेचा अपव्यय, पर्यटन म्हणजे भटकमपंची, पर्यटन हे रिकामटेकड्यांचं काम, पर्यटन म्हणजे पैशाची अकारण उधळण... अशा अनेक विचारांनी आपल्यावर किंवा गेल्या अनेक पिढ्यांवर इतका जबरदस्त पगडा बसविला होता, की पर्यटनाला ‘चैन’ह्या जोखडातून बाहेर येऊन ‘गरज’ ह्या प्रकारात सन्मानाने समाविष्ट व्हायला दशकं लागली.
मागच्या शतकात जग झपाट्याने बदलायला सुरुवात झाली. टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्रांतीसोबतच मानसिक आणि वैचारिक क्रांती मोठ्या वेगात घडून आली, जग जवळ आलं, प्रवास अपरिहार्य ठरायला लागला आणि त्याच्या पुढची पायरी होती ती पर्यटनाची, त्याला चालना मिळाली. जगात ठीक-ठिकाणी पर्यटनाचा विकास हा मागच्या शतकाच्या पूर्वार्धातच झाला होता. तिथेही बालपण-शाळा-कॉलेज-करियर-कुटुंब-स्थैर्य-प्रापंचिक जबाबदारीतून मुक्तता ह्या क्रमानेच जीवनचक्र फिरलं, मात्र कौटुंबिक कर्तव्यपूर्तीनंतर ‘स्वत:चा आनंद’ ही गोष्ट मानसिकतेतच रुजली असल्यामुळे ज्येष्ठांचं पर्यटन प्रचंड मोठ्या प्रमाणावर खूप आधीपासूनच सुरू झालं होतं. आजही युरोप अमेरिकेत पर्यटन करणार्या पर्यटकांमध्ये ज्येष्ठांचं प्रमाण जास्त दिसतं. अलास्का करिबीयन-मेडिटरेनियन-बहामाज् अशा सर्व क्रुझेसवर जर तुम्ही कधी पर्यटन केलं असेल तर तिथे एकदम नटून-थटून स्वत:वर प्रेम करीत आयुष्याचा मुक्त आनंद लुटताना ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने तुमच्या दृष्टीस पडली असतील. सततच्या भ्रमंतीमध्ये ही ज्येष्ठ भ्रमंती नजरेस पडत होती आणि त्यातूनच निर्माण झाली ‘ज्येष्ठांची श्रेष्ठ सहल’ बारा वर्षांपूर्वी. एका तपाच्या सातत्यानंतर ह्या सहलीवर सीनियर पर्यटकांनी आणि त्यांच्या घरच्यांनी ‘ट्राईड-टेस्टेड-एन्जॉईड’ हा शिक्का मारल्यामुळे सीनियर्स स्पेशल सहली रशियापासून ऑस्ट्रेलियापर्यर्ंत आणि जपानपासून अमेरिकेपर्यंत, तसंच भारतात काश्मिरपासून अंदमानपर्यर्ंत मुक्त संचार करीत आहेत. संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम आणि आमचे टूर मॅनेजर्स त्यासाठी कसून मेहनत घेताहेत हे ओघाने आलंच. त्यातच तर परिपाक आहे, वीणा वर्ल्डच्या सीनियर्स स्पेशल सहली इतक्या लोकप्रिय होण्याचा. ‘सीनियर्सची लेह-लडाख किंवा अंटार्क्टिका सहल कधी काढणार?’, अशी विचारणा होतेय. म्हणजे बघानं, पर्यटनाची इच्छा आणि उमेद किती वाढलीय ती.
वर्षभर किंवा दर महिन्यालाच सीनियर्स स्पेशलच्या अनेक सहली सुरू असतात. त्यातील बर्याच सहलींना एखाद्या पर्यटनस्थळी मग ते कोचीन असेल किंवा श्रीनगर, जयपूर असेल वा स्वित्झर्लंड, थायलंड वा लॉस एंजेलिस... एका दिवसासाठी का होईना पण प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचं प्रयोजन करते. ‘काय चाललंय, कसं चाललंय, ठरवलंय त्याप्रमाणे होतंय की नाही, पर्यटक खूश आहेत नं?... ‘हे सगळं एका भेटीत जाणता येतं. आयुष्याची वीस वर्ष मी स्वत:ही भारतात आणि परदेशात टूर मॅनेजरशीप केल्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं आकलन व्हायला ती एका दिवसाची भेट पुरी पडते आणि महत्त्वाचीही ठरते. माझं कॅलेंडर दीडेक वर्ष आधीच ठरून जातं आणि पन्नास टक्के वेळ व्यापून टाकतं ते ह्यामुळे. व्यवसायानिमित्त किंवा संशोधनात्मक होणारी भ्रमंती उरलेलं पंचवीस टक्के कॅलेेंडर व्यापून टाकते, आणि कार्यालयीन कामासाठीचा वेळ कमी होऊन जातो. थँक्यू टू अवर जनरल मॅनेजर, मॅनेजर्स, इन्चार्ज टीम आणि अर्थातच टेक्नो-इंटरनेट रीव्हॉल्युशनला. जगात कुठेही असलो तरी कामं थांबत नाहीत, निर्णय प्रक्रिया लांबणीवर पडत नाही. ‘सच अ वंडरफूल वर्ल्ड, थँक्यूू गॉड फॉर एव्हरीथिंग’, असं अगदी मनापासून म्हणावंसं वाटतं.
मॉरिशसच्या सीनियर्स स्पेशल सहलीवर ब्रेकफास्टच्या वेळी पर्यटकांना भेटत होते, विचारपूस करीत होते, तेव्हा एक ताई म्हणाल्या, ‘वीणा तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय, बाजूला येशील का?’ सहलीवर सर्व काही मस्त चाललेलं दिसत होतं, तक्रारीला जागा दिसत नव्हती. ताईंना काय बरं खटकलं किंवा कुठे बरं त्रास झाला, असा विचार करीत, मी आणि त्या ब्रेकफास्ट रूममधून बाहेर आलो. आणि लॉनवर येऊन संवादाला सुरूवात केली. कान टवकारून पूर्ण एकाग्रतेने मी त्यांचं बोलणं ऐकू लागले. ‘वीणा मला सांग, पर्यटन करणं हे चुकीचं आहे का? माझ्या यजमानांना फिरण्याची अजिबात आवड नाही आणि मला खूप काही बघायचंय. एकदा मनाचा हिय्या करून मी पर्यटनाला बाहेर पडले, तर यजमानांनी नाराजी दर्शवलीच पण घरच्या इतरांनी येता-जाता त्यांची नाराजी कधी टोमण्यांमधून तर कधी तिरकस शेर्यांनी ऐकवून दाखवलीय. जरी पर्यटन करायचंच हे मी ठरवलेलं असलं तरी मनात अपराधीपणाची भावना आहे ती काही केल्या जात नाहीये...’ एकंदरीत सहलीचा आनंद घेत असताना ताईंच्या मनाच्या एका कोपर्यात दडून बसलेली ही ‘गिल्ट’ कुठेतरी कधीतरी डोकं वर काढत होती आणि मन:स्वास्थावर घाला घालीत होती. ज्येष्ठांच्या सहलीत हे मी पहिल्यांदाच ऐकत होते, पण ह्या ‘गिल्ट’ची सवय होती. एकतर सततच्या भटकंतीत मलाही ही गोष्ट अधूनमधून सतावायची. वुमन्स स्पेशलच्या सहलींवर माझी पहिली काही वर्ष कौन्सीलिंग करण्यात जायची, अनेकींना ही गिल्ट असायची, ‘यजमानांना सोडून एकटी भटकंती करतेय’, ‘मुलांचं कसं होत असेल?’ ‘असं एकटीने फिरणं-मजा करणं गैर तर नाही?’ अशा अनेक विचारांनी त्रस्त होऊन कधी मध्येच अचानक रडू लागायच्या, आता परिस्थिती बरीच बदललीय. हे प्रकार इतिहासजमा व्हायला लागलेत कारण घरच्यांनाही पर्यटनाचं आणि त्या तर्हेच्या रीज्युविनेशनच्या गरजेचं महत्त्व पटलंय. ताईंसोबतच्या गप्पात त्यांच्या मनातला सल कमी करण्यात मला बर्यापैकी यश आलं. आपला आनंद आपण शोधणं आणि तो मिळवणं ह्यात गैर काही नाही, खासकरून कौटुंबिक जबाबदार्या (एकमेकांच्या साथीने-एकमेकांनी मिळून) व्यवस्थित पार पाडल्यानंतर. ‘ज्येष्ठ वयात काही गोष्टी ऐकून न ऐकल्यासारख्या करणे’, हा रामबाण उपाय आपलं मनःस्वास्थ न बिघडवण्यासाठी.
एकदा मलेशियाच्या सीनियर्स स्पेशल सहलीवर आलेल्या एका कपलने मला म्हटलं, ‘आमचा मुलगा अमेरिकेत असतो, त्याच्याकडे सहा महिन्याने जाणार आहोत, आम्ही अजूनपर्यंत परदेशप्रवास केला नव्हता, फॉरमॅलिटीज् माहीत नव्हत्या, पहिल्यांदाच एकट्याने एवढा लांबचा प्रवास कसा करणार ही चिंता होती, तेव्हा मुलानेच सुचवलं, की आधी तुम्ही एखादी छोटी परदेशवारी करा म्हणजे प्रवासातले नियम-अटी एकूणच सोपस्कारांची माहिती होईल आणि युएसला येताना त्रास होणार नाही, भीती वाटणार नाही’. माझ्यासाठी हे कारण पूर्णपणे नवीन होतं. परदेशी पहिल्यांदाच निघताना ज्येष्ठ मंडळींना मॉलमध्ये नेऊन तिथल्या एस्केलेटरची सवय करणं किंवा त्यांना ती प्रॅक्टीस करायला लावणं हे काम मुलं-नातवंडं सहलीआधी आनंदाने करतात हे पाहिलंय. पण परदेश प्रवास किंवा मलेशियाची सहल ही अमेरिकेत जाण्याची प्रॅक्टीस होती हे नवीन उदाहरण नजरेसमोर आलं.
सातार्याहून एक कपल भेटायला आलं, अमेरिकेला जायचं होतं ताईंना. म्हटलं,तुम्ही दोघंही का जात नाही? तर म्हणाले, ‘तुमची दीड लाखात अमेरिका’ ही जाहिरात वाचून आलोय. आमचा मुलगा दहा वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलाय. दहा वर्षार्ंत माय-लेकरांची भेट नाही. माझ्यापेक्षा तिचा जीव कासावीस होतोय. कसंही करून मुलाला भेटायचंय. आम्ही पैसेही जमवलेत, पण व्हिसा मिळेल का? ती एकटी जाऊ शकेल का? आम्ही घाबरलोय थोडे म्हणून तुम्हाला भेटायला इतक्या दुरून आलोय’. दहा वर्षांत माय-लेकरांची भेट नाही हे ऐकून मलाही हलायला झालं. युएस व्हिसाच्या ऐकीव महितीने घाबरू नका, खरं बोला आणि निश्चिंत व्हा, बाकी देवावर भरोसा ठेवा. तुमच्यासोबत मीही मन:पूर्वक प्रार्थना करते, की तुम्हाला व्हिसा मिळू दे. ताईंच्या युएसला जाण्याचं कारणंच इतकं जेन्युईन होतं, की व्हिसा मिळाला आणि त्या युएसला जाऊन आल्या, लेकाला भेटून आल्या. न्यूयॉर्कला मी त्यांना भेटले, त्यांच्या मुलाशी भेट होण्याच्या आदल्या दिवशी. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आजही मला दिसतोय.
दोन मैत्रिणी आल्या होत्या, ‘जिगरी दोस्त, अगदी बिगरी पासूनची दोस्ती रिटायरमेंटपर्यंत’. त्यांनी खुल्या दिलाने त्यांचं फिरण्याचं कारण सांगितलं, ‘दोघींचीही मुलं परदेशात स्थायिक झालेली, त्यांच्या- त्यांच्या व्यापात मग्न. भारतात आई घरी एकटी असते ह्याची खंत मुलांना. त्यांनी काळजी करू नये म्हणून आम्ही आमचं आयुष्य एकदम खुशीत घालवतो. आम्ही मजेत आहोत हे बघून त्यांनाही बरं वाटतं. मुलं परदेशी असणं ही बर्याच घरांमधली परिस्थिती आहे, जी बदलणार नाही म्हणून आम्ही मनःस्थिती बदलली. आमच्या आनंदाची कारणं आम्हीच ठरवली, त्यातलं एक पर्यटन. दरवर्षी एक किंवा दोन टूर्स करतो. सहा-सहा महिन्यांच्या गॅपने. एका सहलीला जायचं म्हणजे आधीचे दोन महिने जायचंय-जायचंय म्हणून उत्साहात जातात, तर आल्यानंतर त्या सहलीच्या आठवणी आणि फोटोंनी दोन महिन्यांची बेगमी होते. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्नच आम्हाला पडत नाही. पूर्वी जेवढे कामात व्यस्त होतो तेवढेच आजही आहोत, फक्त कामात नाही तर आनंदात’. वा! काय मस्त सोल्युशन स्वत:चं स्वत:च निर्माण केलेलं. मला प्रवासात अनंत गोष्टी शिकायला मिळतात त्या अशा.
आपण प्रत्येकाने प्राप्त परिस्थितीत आनंदाची कारणं शोधली पाहिजेत. सीनियर्स स्पेशल ह्या आनंदाचं, ज्येष्ठांच्या श्रेष्ठ भ्रमंतीचं कारण वीणा वर्ल्डला बनता आलं, यासाठी आमच्या ज्येष्ठ पर्यटकांचे मन:पूर्वक आभार. हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.