लेह लडाखचे अजस्त्र पहाड, अव्वाच्या सव्वा पसरलेला पँगाँग लेक, मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्याचं काळं करणारं रणरणतं ऊन... हजारो पर्यटकांना लेहला नेऊन आणल्यामुळे लेहबद्दल पर्यटकांच्या मनात असलेली भीती सपशेल काढून टाकण्यात वीणा वर्ल्डची गेल्या पाच वर्षांची मेहनत सार्थकी लागली असं मी म्हणेन.
यावर्षी तीन वेळा मला लेह लडाखची वारी करायचीय. त्यातली पहिली भेट या आठवड्यात पार पाडून मी मुंबईत परत आले, एकटीच नव्हे तर माझ्यासोबत एकशे चाळीस महिलांना घेऊन. लेह लडाख सहलीवरून परत येताना सर्वांच्या चेहर्यावर ‘यस! आय हॅव बीन टू लेह लडाख’चा आनंद समाधान आणि विजय अशा सर्व छान छान भावना होत्या. या सहलीने निश्चितपणे आमचा प्रत्येकीचा कॉन्फिडन्स वाढला होता. आणि हे यावर्षीच नाही तर गेली पाच वर्ष हजारो महिलांना लेह लडाखची यशस्वी सफर घडवून एक आगळी अनुभूती देण्यात वीणा वर्ल्ड यशस्वी झालंय. सर्वांसाठी असलेल्या फॅमिली टूर्स तर सध्या रोजच सुरू आहेत पण महिलांसाठीच असलेल्या लेह लडाखच्या तीन सहलींपैकी एक आत्ता समर व्हेकेशनमध्ये जाऊन आली, दुसरी निघतेय १९ जुलैला आपल्या जवानांच्या साक्षीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी आणि तिसरी आहे आपला स्वातंत्र्य दिन सोहळा लेह लडाखला पार पाडणारी १२ ऑगस्टची वुमन्स स्पेशल.
ह्यावेळी मला जाणवलेला फरक म्हणजे लेहची इंटरनेट कनेक्टिविटी बर्यापैकी सुधारलीय. गेल्यावर्षी गेले तेव्हा आठ दिवस इंटरनेट कनेक्शन ठप्पं होतं. फोन बंद.व्हॉट्सअॅप बंद, इमेल बंद. मेल डाऊनलोड व्हायला काही सेकंदाचा वेळ लागला तरी पॅनिक होणार्या आमच्या सरावलेल्या मनाला असा संपर्क तुटणं म्हणजे आकाश कोसळल्यासारखी अवस्था. आधी बेचैन व्हायला झालं पण मग परिस्थितीची जाणीव होण्याइतपत माझी बुद्धी स्थिरावली. इथली लोकं ‘इंटरनेट चालू झालं तर शिमगा, नाहीतर जे आहे त्यात आनंद’ मानतात, आणि आपण मात्र आपल्या गरजा आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता किती वाढवून ठेवलीय? इथे लेहला इंटरनेटच नाही तर आयुष्यच सहा महिने बंद होतं. ही माणसं सहा महिने त्यांचं लडाखी आयुष्य जगतात आणि थंडीचे सहा महिने स्वतःला घरात बंदिस्त करुन घेतात किंवा चक्क दुसरीकडे बस्तान हलवितात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही मधे मधे बंद होऊन जातो, मग साठवलेल्या सुकवलेल्या भाजीपाल्यावर निभवावं लागतं. कधी दरड कोसळली तर रस्तेही बंद. पण आकांडतांडव नाही की नाराजी नाही, कोणत्याही परिस्थितीत भागवायचं, जमवून घ्यायचं. ही सहल मला कायम जमिनीवर आणते. मस्तीभरी मुशाफिरी करणार्या आणि अनेक महिलांना ती करायला लावणार्या माझ्या मनाला रिअॅलिटीची जाणीव करुन देते ही ‘लेह लडाखची’ सहल. आलिशान हॉटेल्स, गुळगुळीत रस्ते, दिमाखदार लक्झरी कोचेस ह्या सगळ्यांच्या संपूर्ण विरुद्ध असं लेह आकाशात विहार करणार्या मला एकदम वास्तवात घेऊन येतं.
लेह लडाख हे तसं नेहमीचं प्लेजर टूरचं डेस्टिनेशन नाही बरं, पण तरीही मी जेंव्हा पहिल्यांदा लडाखला गेले तेव्हा माझी अवस्था ‘आय वेंट, आय सॉ अॅन्ड आय फेल इन लव्ह’ अशी झाली, तेंव्हाच ठरवलं की अशा अद्वितीय ठिकाणी आमची वुमन्स स्पेशलची गँग यायलाच पाहिजे आणि गेल्या पाच वर्षात वीणा वर्ल्डसोबतच्या महिलांनी आणि आमच्या सर्वच पर्यटकांनी लेह लडाख दणाणून सोडलं. आज इथे वीणा वर्ल्डच्या पंधरा वीस सहली सुरू आहेत ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. हजारो पर्यटकांना लेहला नेऊन आणल्यामुळे लेहबद्दल पर्यटकांच्या मनात असलेली भीती सपशेल काढून टाकण्यात वीणा वर्ल्डची गेल्या पाच वर्षांची मेहनत सार्थकी लागली असं मी म्हणेन.
मे पासून नोव्हेंबरपर्यंत लेह लडाखच्या वेगवेगळ्या सहली सुरु असणार आहेत. त्यामध्ये आहे सात दिवसांची लेह लडाखची मोस्ट पॉप्युलर अशी सहल. ज्यांच्याकडे जास्त दिवस आहेत त्यांच्यासाठी दहा दिवसांची पँगाँग-नुब्रा-कारगिलला वास्तव्य करणारी मुंबई-लेह-मुंबई ही सहलही आहे आणि सिंगल्स स्पेशल सहलींच्या यशानंतर आम्ही वीस ते पस्तीस वयोगटातल्या सिंगल ट्रॅव्हलर्सना घेऊन जातोय चौदा ऑगस्टला लेह लडाखला.
लडाखच्या भेटीत सगळ्यांनाच वेध लागलेले असतात ते पँगाँग लेक पाहायचे. ‘पँगाँग त्सो’ या तिबेटी भाषेतल्या नावाचा अर्थ ‘लांब, चिंचोळा, जादुई तलाव’ असा आहे. या तलावाची जादू त्याच्या काठावर उभं राहिल्यावर प्रत्येकाच्या मनावर अंमल करते. निलमण्यांचा रस असावा तसा निळ्या पाण्याचा हा तलाव आणि सूर्यकिरणांमुळे घडीघडी बदलणार्या त्याच्या रंगछटा आपल्याला मोहवून टाकतात. चौदा हजार फूटांवरच्या या पँगाँग लेकच्या क्षणाक्षणाला बदलणार्या निळाईच्या छटा, एकीकडे माथ्यावर बर्फाचे मुकूट मिरवणारे आणि पायथ्याशी वाळूचे डोंगर सांभाळणारे उंच उंच पहाड, वळणावळणावर रंग बदलणारे कधी जांभळी तर कधी सोनेरी कधी हिरवी तर कधी तपकीरी रंगछटा उधळणारे डोंगर, मध्येच दिसणार्या भव्य बुध्द मूर्ती आणि ओम मणि पद्म हुमचा जागर करणार्या प्राचीन मॉनेस्ट्रीज अशा लडाखच्या लँडस्केपचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे वर्षाच्या कोणत्याही काळात, कोणत्याही ऋतूत, कशाही हवामानात जराही विचलीत नं होता भक्कमपणे उभा ठाकलेला आपला भारतीय जवान.
लेह लडाखची सीमा आपले दोन्ही सख्खे शेजारी चायना आणि पाकिस्तान ह्यांना भिडलेली आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा सगळा प्रदेश अतिसंवेदनशील आहे. साहजिकच इथे एकवेळ स्थानिक दिसणार नाहीत पण आपले जवान कर्तव्यदक्षतेनं पोस्ट सांभाळताना दिसतात. लेह शहरातील हॉल ऑफ फेम तर प्रत्येक पर्यटकासाठी मस्ट आहे. भारतीय जवानांच्या शौर्याचे चित्रमय प्रदर्शन घडवणारे हे सभागृह आणि तिथे दाखवली जाणारी कारगिल युध्दावरची डॉक्यूमेंट्री बघितल्यावर प्रत्येकाचा उर अभिमानानं भरुन येतो.
देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमेचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण सियाचेनच्या रस्त्यावर, खार्दुंगलाच्या छावण्यांमध्ये सजग असणार्या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खूजे आहोत ह्याचीही जाणीव होते.
लडाखच्या सहलीत या भूप्रदेशाचे आणखी एक पूर्ण वेगळं रुप पाहायला मिळते ते नुब्रा व्हॅलीमध्ये. या परिसरात चक्क वाळूच्या टेकड्या आहेत. अॅडव्हेंचरवाल्यांसाठी लडाखमधल्या या सँड ड्यून्समध्ये सवारी करायला डबल हम्पड कॅमल्स असतात. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. आपण लकी असलो तर हिमालयातल्या कोल्ड डेझर्टचा कायम लक्षात राहणारा असा हा अनुभव मिळतो.
जुलेऽऽऽ! अरे हो, विसरलेच की, हे ‘जुलेेऽऽऽ’ प्रकरण म्हणजे लडाखी लोकांचा ‘नम्र नमस्कार’. जेव्हा कुणीही एक दुसर्यांना भेटतात तेव्हा एकमेकांना ‘जुलेेऽऽऽ’ म्हणून ग्रीट करतात. प्रथेप्रमाणे जो वयाने लहान असतो त्याने आधी जुलेेऽऽऽ म्हणायचं. लडाखी माणूस जपानी माणसासारखा सतत नम्रपणे थोडासा झुकून बोलणारा, शांत आणि सोबर, पेशन्स जणू त्यांच्या रक्तारक्तात मुरलेला. कदाचित तिथल्या अतिखडतर अशा आयुष्याशी झगडताना तो आपोआप त्यांच्यात भिनला असावा. आपल्यालाही ‘पेशन्स’ अंगात बाणवायचा असेल तर अशा खडतर आयुष्याशी-निसर्गाच्या लहरींशी चार हात करणार्या लोकांच्यात जाऊन राहावं काही दिवस, कोणत्याही स्पिरिच्युअल क्लासला जायची गरज भासणार नाही, खात्रीने सांगते.
लेह लडाखच्या सहलींमध्ये जसे भारतीय जवानांचे, मिलिटरी कॅम्पचे, लष्करी कॉनव्हॉयचे दर्शन ठिकठिकाणी घडत असते, त्याचप्रमाणे मॉनेस्ट्रीज, स्तुप आणि भव्य बुध्द मूर्तीही पाहायला मिळतात. ११व्या शतकातील वॉल पेंटिंग्जनी सजलेला आल्ची गोम्पा, डिस्कीट येथील उघड्यावरची १०६ फूट उंचीची मैत्रेय बुध्दाची मूर्ती, लडाखमधील सर्वात मोठा हेमिस गोम्पा या सगळ्यातून इथल्या लोकजीवनाचे रंग अनुभवता येतात. लडाखचं पारंपरिक लोकनृत्य पाहाताना त्यातील संथ लयीतल्या हालचाली मोहवून टाकतात.
या दोन्ही सहलींसाठी मुंबई ते मुंबई आणि पुणे ते पुणे पर्याय उपलब्ध आहेत. दरवर्षी या सहलींना जोरदार प्रतिसाद मिळतो, पण लेह लडाखच्या मर्यादा लक्षात घेऊन मर्यादित बुकिंग घ्यावे लागते त्यामुळे आता उशीर करू नका, लगेच आपली सीट बुक करा. या सहलीमुळे तुम्ही आजादीचा अनुभव घेणार आहातच, त्याबरोबर आपल्या आजादी के रखवाले असलेल्या जवानांनाही भेटणार आहात.
सो, हिमालयाच्या अनोख्या निसर्ग सौंदर्याबरोबरच आगळ्यावेगळ्या अनुभवांनी खचाखच भरलेली, जवानांच्या दर्शनाने पुनित करणारी ही अफलातून सहल तुम्हाला साद घालतेय, आज नाही ठरवलं तर एक वर्ष थांबावं लागेल. तेव्हा बॅग भरो, निकल पडो! भेटूयाच लेह लडाखला, वुमन्स स्पेशलच्या सहलीवर.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.