मित्रत्त्वाच्या भावनेने जपानने १९१० मध्ये अमेरिकेला चेरी ब्लॉसमची झाडं पाठवली. त्यांच्यासोबत डासांचा शिरकाव झाला आणि रोगराई पसरली ह्या कारणाखाली ती झाडे अमेरिकेने जाळायचं ठरवलं. स्थानिकांनी मात्र त्यावर नापसंती दर्शवली. पुन्हा एकदा १९१२ मध्ये जपानने तीन हजार झाडे पाठवली वॉशिंग्टनला आणि आता डी सी चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल अमेरिकन्सचा फेव्हरेट झालाय. युएसएमधील जॉर्जियाच्या मॅकन शहरात जगातली सर्वात जास्त म्हणजे तीन लाख चेरी ब्लॉसमची झाडं आहेत पण चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलसाठी जपानला जायची इच्छा आणि पहिली पसंती जगातल्या प्रत्येक पर्यटकाची असते.
मागच्या वर्षी वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या जपान चेरी ब्लॉसम सहलीतल्या पर्यटकांना हिरोशिमाला भेटले. आम्ही जपान पाहिलंचा वेगळा आनंद प्रत्येक पर्यटकाच्या चेहर्यावर होताच पण आम्ही चेरी ब्लॉसमही पाहिला ह्या गोष्टीने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. सर्वांशी संवाद साधताना मी असाच प्रश्न विचारला की, सर्वांची ही पहिलीच सहल जपानची? की कुणी आधी येऊन गेलंय? एका कोपर्यातून हात वर आला, तिथे बघितलं तर अरे हे तर आपले प्रकाशजी दिवाकर. वीणा वर्ल्डसोबत पाच वर्षांत त्यांनी चोवीस टूर्स केल्या. ते म्हणाले, गेल्यावेळी मी जपान चायना एकत्र केली. आता चेरी ब्लॉसम बघायला खास आलोय आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा जपानला येणार आहे अल्पाईन रूट बघायला. तीन वेळा जपान? माझे डोळे मोठे झाले आणि समोरच्या सर्वच पर्यटकांचे. आम्ही मजेने प्रकाशजींना त्यांच्या हसण्याच्या स्टाईलवरून मोगॅम्बो म्हणतो. प्रत्येक सहल केल्यानंतर त्यांचं एक छोटं आणि एक मोठं पत्र येणार हे ठरलेलं. छोटं पत्र एक दोन ओळींचं, त्यात लिहिलेलं असतं मोगॅम्बोे खुश हुआ। म्हणजे समजायचं सहल नेहमीप्रमाणे छान झाली. कारण इतक्या सहली केल्यानंतर त्यांना बरेच टूर मॅनेजर्स माहीत आहेत, वीणा वर्ल्डची पद्धत माहीत आहे. एखादी गोष्ट खटकली तरी लागलीच सांगणार. ह्यावर्षीही आता ते निघालेत हवाई विथ मेक्सिको तसंच ईस्टर्न युरोपच्या एस्टोनिया बेलारुस युक्रेन सहलीला. त्यांच्या प्रत्येक सहलीनंतर आम्हाला मोगॅम्बो खुश हुआच्या त्या छोट्या पत्राची वाट पहायची सवय लागलीय. त्यांचं दुसरं पत्र असतं ते भलंमोठ्ठं. ई-पत्र-थोडक्यात टॅ्रव्हल ब्लॉग, ज्यामध्ये सहलीचं संपूर्ण वर्णन असतं. पॅशनशिवाय ह्या गोष्टी सातत्याने होत नाहीत. प्रकाशजींच्या पर्यटनप्रेमाला साक्षात दंडवत आणि त्यांनी वीणा वर्ल्डवर जो विश्वास दाखविला वीणा वर्ल्डच्या सुरुवातीच्या वर्षात, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
जपानला गेल्यावर प्रत्येकाचंच असं होतं, एका सहलीत जपान बघून होत नाही. जपान आहे खूप महाग. त्यामुळे पूर्वीपासून आपल्या पर्यटकांनी जपानकडे पाठ फिरवली होती. कुणी फारसा विचारच करीत नव्हतं जपानचा. आपण जपान पाहिला होता पूर्वरंगात पुलंच्या लेखणीतून आणि त्यांच्या दृष्टीतून. कुतूहल होतं पण जाणं होत नव्हतं. जेव्हा पहिल्यांदा जपानला गेले तेव्हा जपान खूपच वेगळा वाटला. जग एका साईडला आणि जपान दुसर्या साईडला असा. तसं बघायला गेलं तर जपान अठराव्या शतकापर्यंत जगापासून अलिप्तच होतं. ह्या शतकाच्या मध्यावर थोड्या नाराजीनेच त्यांनी आपल्या देशाची दारं पाश्चिमात्यांसाठी खुली केली. जगातल्या चांगल्या गोष्टी, खासकरून युरोप अमेरिकेतल्या तंत्रज्ञानातल्या तसेच उद्योगक्षेत्रातल्या त्यांनी फास्ट अंगिकारल्या आणि जपानला इंडस्ट्रीज आणि मिलिटरीमध्ये असं काही पावरफुल बनवलं की जगाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. मोस्ट मॉर्डन असूनही संस्कृती कला परंपरा ह्या गोष्टी हातात हात घालून वावरतात तिथे. जिथे बघावं तिथे माणसंच माणसं आणि का असणार नाहीत? अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या आहे जपानची. पण लोकांना रहायला जागा आहे ती अमेरिकेतल्या एका राज्याच्या म्हणजे कॅलिफोर्नियापेक्षाही लहान. बरं हा देश बनलाय बेटा-बेटांचा मिळून, सहा हजार बेटं आहेत जपानमध्ये. त्यातल्या चारशेपेक्षा जास्त बेटांवर अजून मनुष्यवस्तीही नाही. नॅचरली घरं लहान. त्यामुळे वस्तू कमी. सकाळी बैठकीची खोली रात्रीची बेडरूम. बर्याच ठिकाणी बेड्स भिंतीत फोल्ड करून ठेवलेले. सुधीर एकदा जपानच्या एका छोट्या गावात गेला होता. हॉटेल मॅनेजरने चावी दिल्यावर रूममध्ये जाऊन बघतो तर काय? छान सुंदर पण छोटी रूम, बाहेर झाडांचा मस्त व्ह्यू, लाकडी वूडन पॅनलिंग केलेली स्वच्छ जागा. त्या रूममध्ये फक्त जमिनीवर मांडलेली दोन मॅट्स व एक बैठं कॉफी टेबल अशी रचना. बेडच नव्हता. आणि फक्त कमोड टॉयलेट, नो शॉवर बाथ म्हणजे रूममध्ये बाथरूम नाहीच. मॅनेजरला फोन केल्यावर तो म्हणाला, रात्री बेड घालून दिला जाईल आणि आंघोळीला कॉमन स्पामध्ये जायचं. चलो ये जपान है म्हणत सुधीरने आगे आगे देखो होता है क्या? चा कुतूहलपूर्ण पवित्रा घेतला. रात्री हाऊस कीपिंगवाल्यांनी भिंतीत अडकवलेला बसका बेड खाली आणला, त्यावर जाडशी चादर टाकली आणि झाला बेड तयार. दहा इंच बारा इंच उंचीच्या मॅट्रेसेसच्या जमान्यात नो गादी हा सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंगचा जपानी मामला सुधीरने आनंदाने स्विकारला, पण आजही जपानमध्ये वीणा वर्ल्ड पर्यटकांसाठी हॉटेल रेकी करायची असेल तर तो आमच्या टीमला आवर्जून सांगतो, अरे हॉटेलमध्ये बेड्स-मॅट्रेसेस तसंच टॉयलेटसह बाथरूम्स आहेत न ह्याची खात्री करा. दूधाने तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो तशातली गत. अर्थात हा सुधीरचा त्या गावातला अनुभव. आपल्या सहलींवर अशी हॉटेल्स नसतात. आपण घेतो ती बहुतेक सर्वच हॉटेल्स खूप मोठी छान असतात. सो, काळजी करू नये.
जपान दुसर्या भेटीचं आमंत्रण देतोच हे मात्र खरंय. आत्तापर्यंत मी सुद्धा चार-पाच वेळा जाऊन आलेय. आमचा नील तर पूर्णपणे जपानप्रेमी. दोन वर्षांत तीनदा जाऊन आला. एकदा जस्ट जपान बघायला, दुसर्यांदा त्याचा बहाणा होता स्किइंग आणि तिसर्यांदा राजला घेऊन. आता तो एप्रिललाही निघालाय कारण अजून चेरी ब्लॉसमच्या सीझनमधलं जपान बघायचं राहिलंय त्याचं. आम्हाला खात्री आहे पुढचे त्याचे बहाणे असणार आहेत, जपान ऑटम कलर्सचे आणि जपान अल्पाईन रूटचे, मग पुन्हा एकदा स्किइंग डोकं वर काढेलच. त्याने कितीही कारणं सांगितली तरी एक महत्त्वाचं कारण त्याच्या भेटीचं ते म्हणजे जपानी भोजन. जपान इतकं प्युअर फ्रेश फिश आणि फूड कुठेच मिळत नाही असं त्याचं म्हणणं. तीन वर्षांपूर्वी आम्ही एअरलाईन्स आणि तिथल्या पार्टनर्सच्या मदतीने जपान आमच्या पर्यटकांसाठी अफोर्डेबल केलं आणि अक्षरश: हजारो पर्यटकांनी वीणा वर्ल्डसोबत जपान पाहिलं. जपानकडे भारतीय पर्यटकांचा ओघ वळविण्यात वीणा वर्ल्डने सिंहाचा वाटा उचललाय ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण एअरलाईन्स-टूरिझम बोर्डस् ह्यांनीही अनेकदा त्याबाबतीत वीणा वर्ल्डला गौरविलंय. आमच्या टीमचे प्रयत्न आणि मेहनत कारणी लागली आणि आपल्या पर्यटकांनी महागडं जपान पाहिलं हे महत्त्वाचं.
आमच्या सर्व ऑफिसेसमध्ये सध्या युरोप अमेरिका किंवा हिमालयीन भारतीय सहलींच्या तोडीस तोड कोणत्या सहलीच्या बुकिंगची गर्दी असेल तर ती चेरी ब्लॉसम स्पेशल-जपान सहलींची. एक हजार पर्यटक ह्यावेळी वीणा वर्ल्डसोबत चेरी ब्लॉसमवालं जपान बघणार आहेत. ह्यामध्ये वेगवेगळ्या सहली आहेत. सहा दिवसांची मोस्ट पॉप्युलर जपान ज्वेल्स, नऊ दिवसांची जपान कोरिया, बारा दिवसांची जपान चायना, आठ दिवसांची जपान विथ युझावा अॅन्ड हाकोने आणि सात दिवसांची चेरी ब्लॉसम-साउथ कोरिया विथ जेजु आयलंड. वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलही आहेत. जपान ज्वेल्सच्या बर्याच सहली ऑलरेडी फुल्ल झाल्या आहेत. ज्यांनी-ज्यांनी ह्यावर्षी जपानला जायचा विचार केलाय त्यांनी लागलीच बुकिंग करणं गरजेचं आहे. ज्यांना परीक्षांमुळे मार्च एप्रिल जमणार नाही त्यांच्यासाठी मे मध्येही जपान ज्वेल्स किंवा जपान अल्पाईन रूटच्या सहली आहेत, पंधरा दिवसांची जपान कोरीया तैवान ही सहलही आहे. त्वरीत निर्णय फायद्याचा, पैसे वाचविण्याचा, लवकर बुकिंग केल्याने पैसे वाचत असतील तर का नाही वाचवायचे?
जी हजार पर्यटकमंडळी आता आमच्यासोबत जपानला साकुराच्या निमित्ताने निघाली आहेत त्याविषयी थोडंसं जाणून तर घेऊया. चेरी हे जपानचं नॅशनल फ्लॉवर. त्याला साकुरा म्हणतात जपानी भाषेत. चेरी ब्लॉसमचा बहर टोकियो ओसाकासारख्या पर्यटनस्थळी मार्च अखेर व एप्रिलच्या सुरुवातीस असतो, संपूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून. दरवर्षी साधारण हा पीरियेड कधी असेल हे नॅशनल चॅनेलद्वारे पब्लिश केलं जातं. पंधरा ते वीस दिवसांचा हा साकुरा वसंत ॠतूच्या आगमनासोबतच सारा आसमंत नवचैतन्याने भरून टाकतो. आशा आणि नवनिर्माणाचं प्रतिक बनलंय साकुरा. आयुष्य आनंद दु:ख ह्या सगळ्याची क्षणिकताही दाखवतं साकुरा. ह्या पंधरा-वीस दिवसांत जपानी लोकं आयुष्य जगून घेतात अगदी. चेरी ब्लॉसमच्या बागांमध्ये उत येतो पिकनिक्सना. ह्या पिकनिक्सना हनामी म्हटलं जातं. रात्रीच्या वेळी झाडांवर कंदील लावून ह्या पिकनिक्स केल्या जातात, ज्यांना योझाकूरा किंवा नाईट साकुरा म्हणतात. चेरी ब्लॉसमच्या दोनशे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. सोमेई योशिनो म्हणजे पाच पाकळ्यांचं सिंगल फ्लॉवर, फिक्या गुलाबी रंगाचं. यामाझाकुरा हे पहाडांमध्ये फुलणारं चेरी ब्लॉसम. शिदारेझाकुरा म्हणजे वीपिंग चेरी, चेरी ब्लॉसमच्या बहाराने लगडलेल्या जमिनीवर झुकणार्या फांद्यावालं चेरी ब्लॉसम, कझान म्हणजे चाळीस- पन्नास पाकळ्यांचं भडक गुलाबी रंगाचं चेरी ब्लॉसम, युकॉन म्हणजे हळद, त्या कलरचाही साकुरा बघायला मिळतो. पांढर्या गुलाबी रंगाने सजलेला जपान, वार्याबरोबर सभोवताली हवेत उडणार्या, जणू डान्स करणार्या साकुराचं जपान बघणं केवळ अवर्णनीय. साकुरा केक, साकुरा डिझाईनचे कपडे, साकुराची पेंटिंग्ज, फिल्म अॅनिमेशन्स, टॅुज, ड्रिंक्स, परफ्युम्स एवढंच काय मॅकडॉनल्डस्कडे चेरी ब्लॉसम बर्गर्स विकले जातात.
साकुराची मजा शब्दात पकडणं केवळ अशक्य त्यामुळे तुमच्या पर्यटनाच्या यादीत एकदातरी जपान असायलाच हवं, आणि ते चेरी ब्लॉसमच्या वेळी असेल तर सोन्याहून पिवळं.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.