आजच्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये, सर्वांची डोकी लॅपटॉप-मोबाईलमध्ये खुपसून बसलेली बघून सुप्रसिद्ध वाक्य आठवलं ‘वाचाल तर वाचाल’ आणि म्हणावसं वाटलं, ‘बोलाल तर वाचाल’. एसएमएस, ई-मेल व्हॉट्स अॅपनी आयुष्य व्यापलंय. बाजूला बसलेल्या सहकार्याशीही आपण ह्या माध्यमातून बोलतोय. म्हणूनच वीणा वर्ल्डमध्ये आम्ही नियम केलाय, एकाच गोष्टीवर तिसरं मेल करायची वेळ आली की...
यावेळी ठरवून सुधीर आणि मी बाहेर पडलो. गणपतीच्या दिवसात कामांचा दबडगा कमी असतो त्याचा फायदा घेतला आणि सेंट्रल आणि ईस्टर्न युरोपमधल्या न पाहिलेल्या छोट्या-छोट्या पण देखण्या शहरांना भेट दिली. युरोपमधलं कोणतंही शहर ज्या तर्हेने अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान चायनाच्या पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेते ते पाहिलं की आश्चर्यात पडायला होतं. अर्थात त्यांच्याकडच्या ऐतिहासिक -भौगोलिक-सांस्कृतिक वारशाचा आणि नैसर्गिक वरदानाचा वापर त्यांनी पर्यटनाच्या विकासासाठी केला आणि टूरिझम ही मुख्य इंडस्ट्री ठरवली, बनवली, त्याची जपणूक केली, त्यात सातत्य राखलं आणि सतत त्याचा विकास आणि विस्तार करीत राहीले. युरोप एक खंड म्हणून जगातले सर्वात जास्त पर्यटक आपल्याकडे खेचून घेतं त्याचं मर्म ‘पर्यटक देवो भव:’ हे त्यांनी सर्वार्थाने आणि खर्या अर्थाने जाणलंय ह्यात आहे.
एखाद्या स्थळाचं पर्यटन वाढतं हे ‘गूड वर्ड ऑफ माऊथ’मुळे. मला एखादी गोष्ट आवडली की मी भरभरून दुसर्याला ती सांगते. आजच्या जगात सोशल मीडियाद्वारे ती दाखवते. ‘मी तिकडे जाऊन आलेय, तुम्ही नाही गेलाय अजून’ असं खिजवतेही. हॉलीवूड बॉलीवूड टॉलीवूड मॉलीवूड सारख्या जगभरातल्या अनेक दिग्गज फिल्म इंडस्ट्रीज्नी त्यात प्रचंड भर टाकली. भारतामध्ये स्वित्झर्लंडचं प्रेम वाढायचं कारण तिथे चित्रित झालेले चित्रपट आणि त्यातली गाणी. यश चोप्रांचा स्टॅच्यू स्वित्झर्लंडमध्ये आपण बघतो ते त्यांच्या योगदानाचं स्वित्झर्लंड टूरिझमने जाणीवपूर्वक केलेलं कौतुक म्हणून. स्वित्झर्लंडचा बॉलीवूडला कृतज्ञतापूर्ण सलाम म्हणता येईल. असाच सलाम त्यांनी श्रीदेवीलाही करायचं ठरवलंय आणि काही दिवसात ते स्मारकही आपल्याला स्वित्झर्लंडमध्ये बघायला मिळेल. संगम, इव्हिनिंग इन पॅरिस, प्रेम पूजारी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, बचना ऐ हसीनों, धूम अशी अनंत सिनेमांची नावं घेता येतील ज्यांनी भारतीयांचा ओघ स्वित्झर्लंडकडे वळण्यासाठी योगदान दिलंय. अलिकडची उदाहरणं म्हणजे ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’नंतर भारतीयांची स्पेन बघायची उत्कंठा वाढली. ‘कहो ना प्यार है’नंतर न्यूझीलंडला जाणारे भारतीय पर्यटक वाढले. ‘दिलवाले’नंतर आमच्याकडे आईसलँडची चौकशी सुरू झाली. शाहरूख आणि काजोलचं ‘गेरूआ’ साँग जिथे चित्रित केलंय तिथे आपण जातो का? अशी विशिष्ट चौकशी व्हायला लागली किंवा हिृतिक रोशनने जे-जे काही स्पेनमध्ये केलंय ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’मध्ये ते सर्व आम्हाला करायचंय, तसं पॅकेज बनवून द्या असा आग्रह धरणारे पर्यटक वाढले. डेस्टिनेशन किंवा एखादा देश आपल्या भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जर प्रमोट करायचा असेल तर बॉलीवूडचा सहारा घ्यायचा किंवा त्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही हे आता जगाला कळलेलं आहे. त्यामुळे बॉलीवूडसाठी प्रत्येक पर्यटनसमृध्द देशाने मोठ्या मनाने-खुल्या दिलाने ‘मोस्ट वेलकम्’ म्हणत रेड कार्पेट पसरवून ठेवलंय.
एचबीओवर दोन हजार अकरा मध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’ नावाची सीरिज सुरू झाली, त्याचे दरवर्षी एकेका सीझनमध्ये सात ते दहा भाग रीलिज होत गेले आणि संपूर्ण जगाला ह्या सीझन्सनी वेड लावलं. याचा पुढचा आणि कदाचित शेवटचा भाग पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे. ह्या सीरिजने सर्वात जास्त भलं कोणाचं केलं असेल तर ते स्पेन, नॉर्दन आयर्लंड, क्रोएशिया, आईसलँड, मोरोक्को या देशांचं. ह्या देशांमध्ये आता गेम ऑफ थ्रोन्स फिल्मिंग लोकेशन्सच्या स्पेशल टूर्स आहेत. मे महिन्यात युएसएत वॉशिंग्टन ते लॉस एंजिलिस प्रवासात एक हौशी पर्यटक भेटली, अमेरिकन होती. तिच्या पर्यटनाच्या लिस्टमध्ये ह्या सगळ्या देशांची नावं होती. दरवर्षी एक याप्रमाणे ती ते पूर्ण करणार होती. गेम ऑफ थ्रोन्समुळे क्रोएशिया देशाच्या पर्यटनात अमेरिकन पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
ईस्टर्न युरोपला, क्रोएशियाला येणार्या आमच्या पर्यटकांमध्ये वाढ झालेली आम्हालाही दिसली, त्यामुळे खरंतर आमच्या ह्या सहलीचा घाट आणि मी सुध्दा गेम ऑफ थ्रोन्सची फॅन असल्याने क्रोएशियातलं स्प्लिट आणि डुब्रॉवनिक आम्ही ह्या आमच्या धावत्या सहलीत समाविष्ट केलं. एकापाठोपाठ एक शहरं पालथी घालताना रोज नव्या शहरांमध्ये नवनविन गाईड भेटत होते, त्यातली लक्षात राहीली ती स्प्लिट शहरातली इव्हाना ट्रम्प, (क्रोएशियातली). भेटल्या भेटल्याच म्हणाली, ‘ती मी नव्हेच. ती स्लोव्हेनियन अमेरिकन आणि मी क्रोएशियन’ छान हसरी होती त्यामुळे प्रसन्न वाटलं तिला भेटून. क्रोएशियावर रोमन लोकांचा प्रभाव कसा होता हे सांगता सांगता म्हणाली की, ‘इटालियन्सप्रमाणेच आम्ही सुद्धा कॉफी वेडे. आमच्याकडेसुद्धा इटलीसारखंच कॉफीसोबत पाणी देतात. कारण तुम्ही जास्त वेळ बसा, गप्पा मारा, बोला एकमेकांशी असा हेतू. आम्ही एकमेकांशी बोलतो त्यामुळे आमच्याकडे डिप्रेशन नाही. आमच्याकडे सायक्लिंग आणि गेम्स-मैदानी खेळ मोठ्या प्रमाणावर आहेत आणि खेळून झाल्यावर सेलिब्रेशनस्. माणसं खूप बोलतात, हसतात, खूश राहतात.’ ‘वुई टॉक टू इच अदर’ हे तिचं वाक्य लक्षात राहीलं, म्हणजे अगदी आतपर्यत पोहोचलं. स्टारबक्स ह्या कॉफी चेनचं यश त्यातच आहे. कॉफी तो एक बहाना है | ह्या कॉफी चेनने लोकांना भेटवलं, जवळ आणलं, ‘लेट्स टॉक टू इच अदर’साठी एक ऑफिशियल-प्रेस्टिजियस कट्टा किंवा आधुनिक चावडी निर्माण केली. आपल्याकडे ‘कॅफे कॉफी डे’ किंवा ‘बरिस्ता’ ही त्याच जातकुळीतली. ‘लाईफ हॅपन्स ओव्हर कॉफी’, ‘कॉफी इज ऑलवेज अ गूड आयडिया’, ‘कॉफी व्हेन युअर ब्रेन नीड्स अ हग’ ‘अ लॉट केन हॅपन ओव्हर अ कॉफी’, ‘कॉफी मेक्स एव्हरीथिंग पॉसिबल’, ‘युवर कप ऑफ इन्स्पिरेशन...’ अशी अनेक कॉफी स्लोगन्स आठवली इवानाच्या, ‘आम्ही भरपूर कॉफी पितो. त्यासोबत पाणीही पितो, बराच वेळ बोलत बसतो आणि म्हणून आमच्याकडे डीप्रेशन नाही’ ह्या वाक्यावरून.
आजकालची मुलं बोलतच नाहीत ही अनंत आईवडिलांची समस्या. एक किस्सा आठवला. ‘आज इंटरनेट बंद होतं म्हणून घरातल्यांशी बोलत बसलो, दे सीम टू बी गूड पीपल यार...’ हा इंटरनेट खुळ्या जनरेशनचा ओव्हर द कॉफी संवाद. प्रातिनिधिक म्हणता येईल. आमच्या बिल्डिंगमधल्या एका छोट्या मुलाने एकदा मला एक लाईफ लेसन दिला, क्षणाक्षणाला आपण शिकत असतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण. आमची सोसायटी तशी नवीन, राहणार्यांमध्ये अर्धे भारतीय तर अर्धे फॉरिनर्स. सर्वांच एक गेट-टुगेदर करूया म्हणत आम्ही कामाला लागतो. तू हे कर, मी ते करते, अशा कामं वाटण्याच्या प्रक्रियेत माझ्याकडे काम आलं नेम टॅग्ज बनविण्याचं. प्रत्येकाला नाव विचारायला वा सांगायला लागू नये हा हेतू. कोरियन, जापनीज, रशियन, अमेरिकन, युरोपीयन कुणाचंही नाव चुकलं नाही पाहिजे ह्यावर माझा भर. गेट-टुगेदरच्या दिवशी नॅचरली सर्वांना नीट टॅग लावण्याचं कामही माझंच. एका छोट्याला टॅग लावायला गेले तर तो त्याच्या अमेरिकन अॅक्सेंटमध्ये म्हणाला, ‘आय डोन्ट वॉन्ट टू पूट द नेम टॅग ऑन मी, आय लाईक टू टेल माय नेम, आय वाँट टू टॉक टू पीपल’ आणि त्या पठ्ठ्याने टॅग नाही लावला. सहा-सात वर्षांचा मुलगा बरंच काही शिकवून गेला, त्यात मला लेबल लावू नका, मी माणूस आहे, माझं नाव मला प्रिय आहे, मला बोलायला आवडतं, आय रीस्पेक्ट मायसेल्फ... अशा अनेक छटा होत्या. एखादा वेगळा लेख लिहिता येईल ह्यावर.
टेली कॉन्फरन्सनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा जमाना आला आणि एअरलाईन्स, हॉटेल्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांना वाटायला लागलं की आता आपला बिझनेस कमी होणार कारण लोकं आता प्रवास करणार नाहीत. थोड्या काळापुरतं झालंही तसं पण आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसं बघायला गेलं तर मागे पडलंय. लोकं एकमेकांना भेटून, प्रत्यक्ष समोरासमोर बसून, चर्चा संवादाने गोष्टी करताहेत, कामं पार पाडताहेत, समस्या सोडवताहेत. मॅडनेसकडे झुकणार्या व्हर्च्युअल एजमध्ये सर्वात महत्वाचं आहे, ‘माणसांनी माणसांना भेटणं, बोलणं, चर्चा करणं, संवाद घडणं’... हे झालंच पाहिजे. अॅल्बर्ट आईन्स्टाइनचं वाक्य आठवलं, ‘आय फीअर द डे दॅट टेक्नॉलॉजी विल सरपास अवर ह्युमन इंटरॅक्शन. द वर्ल्ड विल हॅव अ जनरेशन ऑफ इडियट्स’.
वीणा वर्ल्डमध्ये आम्ही एक पद्धत अवलंबतो. म्हणजे अनुभवाने शिकलो. व्हायचं असं की एसएमएस आणि नंतर व्हॉट्स अॅप आल्यावर प्रवासात असताना त्यावर ऑफिसशी संभाषण वाढलं, फोन कमी झाले कारण फोन करणं खूप महागात पडायचं. एसएमएस-व्हॉट्स अॅपवर मेसेजेस लिहून बोटं दुखायला लागायची, बरंच बॅक अँड फोर्थ व्हायचं. तसचं ई-मेल्सचही. मजेचा भाग असा की ऑफिसमध्ये बाजूबाजूला बसलेली माणसंही ई-मेल्स किंवा व्हॉट्स अॅपवर संभाषण करायची. म्हणजे ट्रेलसाठी ते आवश्यक आहे पण कधी कधी ई-मेल फायटिंग सुरू होतात. आपण सीसी मध्ये असलो तर ‘बिट्विन द लाईन’ आपल्याला ते जाणवतं. बर्याचदा ह्या बॅक अॅन्ड फोर्थमध्ये कोण बरोबर, कोण चूक, माझी चूक कशी नाही हा वाद जास्त असतो. आमचा वेट्टो असा की, ‘जर एखाद्या गोष्टीसाठी तिसरं मेल करायची वेळ आली तर समजा आता आमने सामने बसायची वेळ आलीय नो मोअर मेल्स’... संभाषणातनं प्रश्न सोडवा. आणि आपण प्रत्येकाने अनुभवलं असेल जेव्हा हा संवाद, चर्चा, संभाषण होतं तेव्हा गोष्टी जलदरित्या पुढे जातात. रेंगाळलेल्या गोष्टी पूर्ण होतात. हल्ली प्रवासातही मी फोन करून काम पूर्ण करायचा प्रयत्न करते, आणि तसंही हल्ली फोन करणं महाग राहीलं नाही, ही जमेची बाजू.
‘वाचाल तर वाचाल’ प्रमाणे वाटतं ह्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये, ‘बोलाल तर वाचाल.’ अर्थात असं एकमेकांशी बोलताना आपलं बोलणं सकारात्मक असलं पाहिजे ह्यावर आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आपलं बोलणं जेवढं महत्वाचं तेवढंच दुसर्याचंही हे ही जाणलं पाहिजे. दुसर्याला बोलायला दिलं पाहिजे आणि तो बोलत असताना मन:पूर्वक लक्ष दिलं पाहिजे (पती-पत्नी मधला संवाद ह्याला अपवाद असू शकतो). आणि हो, आपण कधीतरी स्वत:शीही बोलायलाच पाहिजे. आपल्यालाही एक्स्पर्टस् अॅडव्हाईस लागतोच नं!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.