त्याचा तो विचारवंत चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर तसाच हुबेहुब उभा राहतो. आपल्या तळहाताकडे अगदी गंभीरपणे लक्षपूर्वक तो बघत बसला होता, आमच्या तिथे असण्याची त्याने साधी दखलही घेतली नाही. आमच्या इतक्या जवळ असण्याचा जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःच्या जगातच मग्न होता. आपल्या तळहाताला खाजवताना दिसणारा तो, चक्क फ्रेंच शिल्पकार ऑगस्ते रोडान च्या द थिंकर या जगप्रसिद्ध मूर्तीची प्रतिकृतीच वाटत होता.
आपल्या परिवाराची वाट पहात मुकिझा बराच वेळ बसून होता. पण पुढच्या काही क्षणात त्यांना आव्हान देण्यासाठी तो त्याच्या पाच फूट सहा इंचाची उंची दाखवत उठला, अनं किंगकाँग चित्रपटातल्या गोरिलासारखेच आपली छाती ठोकत त्याने जोरात आवाज दिला. जणू मी मुकिझा, या जागेचा मालक, आणि तुम्ही मला व माझ्या परिवाराला भेटायला माझ्या जागेवर आला आहात याची तो आम्हाला जाणीव करून देत होता. त्याचा तो जबरदस्त आवाज ऐकताच अंगावर काटा उभा राहिला. 150 किलो वजनाच्या वीस वर्षांच्या सिल्वरबॅक गोरिला असलेल्या मुकिझा बरोबर आम्ही बिचारे मनुष्यप्राणी कसला पंगा घेणार. आपल्यासमोर अगदी तीन फुटांवर उभा असलेला मुकिझा हा एक भारदस्त गोरिला आहे ह्याची आम्हाला जाणीव झाली, आणि त्यानंतर तो संपूर्ण अनुभव फारच थरारक व रोमांचक वाटत होता. हे सगळे खरेच घडतेय याची जाणीव झाली ती आमच्या थकलेल्या पायांमुळे व भिजलेल्या शरीरामुळे. सुमारे दोन तास त्या घनदाट जंगलामध्ये चालल्यानंतर आम्हाला मुकिझाचा परिवार गवसला होता. पण त्यातला प्रत्येक क्षण हा कायम लक्षात राहील असाच होता. नावाप्रमाणेच युगांडा देशातलं विंडी इमपेनिट्रेबल फॉरेस्ट हे खरंच अत्यंत घनदाट होते. वाहतुकीच्या रस्त्यावर आम्हाला आमच्या फोर व्हील ड्राईव्ह जीपने सोडले आणि आम्ही जंगलाची वाट धरली. थोडे पुढे जाताच वाट वळली आणि लगेचच ह्या फॉरेस्टचे नाव इमपेनीट्रेबल फॉरेस्ट का ठेवले आहे त्याची जाणीव झाली. उंच-उंच झाडांखाली अनेक झाडे झुडपे वाढली होती आणि त्या स्वच्छ हवेत जंगलातला एक वेगळाच सुगंध आणि कानावर येणारे आवाज सारंच मोहक वाटत होतं. पुढे हाईक करत जाताना हळूहळू पाय दमू लागले, पण हाँ यही रस्ता है तेरा, पाएगा जो लक्ष्य है तेरा हे गाणे मनात वाजू लागले आणि आपोआप पाय चालू लागले. त्यात जंगलातल्या पर्वतांवरचे चढ-उतार तर आम्ही पार करीत होतोच पण काही ठिकाणी पुढे जायला रस्ताच नव्हता. अशावेळी आमचा गाईड समोरची झाडेझुडपे कापून आमच्यासाठी वाट बनवत होता.
विंडी इमपेनीट्रेबल फॉरेस्ट हे तसे स्वतः एक अद्भुत आकर्षण आहे. युगंाडाच्या कानुंगु डिस्ट्रिक्टमध्ये स्थित असलेले हे फॉरेस्ट ईस्ट आफ्रिकन रिफ्ट या 3806 ते 8553 फूट उंचीच्या पर्वतरांगांवर बघायला मिळते. विंडी हा इथल्या रुन्यकितारा भाषेतला शब्द व ह्याचा अर्थ अभेद्यअसा आहे. हे नाव या जंगलातील मोठ्या हार्डवूड झाडांच्या मधोमध उंच बांबूचे जंगल बघायला मिळते त्यावरून पडले आहे. हे इतके घनदाट आहे की याला प्लेस ऑफ डार्कनेस म्हणूनही ओळखले जाते. दुर्मिळ होत चाललेल्या माऊंटन गोरिलाज्ची जगातील निम्मी लोकसंख्या जैविक वैविध्य लाभलेल्या याच जंगलात आढळते. त्या गोरीलांना त्यांच्या स्वतःच्या घरात अगदी खुल्याने वावरताना पाहणं हे खरंच अविस्मरणीय ठरतं. जगातले सत्तरहून अधिक देश बघून झाले तर आता काहीतरी नविन अनुभव घेण्याचा माझा शोध हा कायमच सुरू असतो. त्या इच्छेतूनच हा गोरिला ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी या ट्रिपचे प्लॅनिंग सुरू झाले. बहुतेक करून आफ्रिका म्हटलं की आपल्या समोर केनिया, साऊथ आफ्रिका आणि टांंझानिया ह्या देशांचे चित्र उभे राहते. पण आता आफ्रिकेतील इतर बरेच देश सुद्धा भारतीय पर्यटकांसाठी सुसज्ज झाले आहेत. त्यात व्हिक्टोरिया फॉल्सचे घर असलेले झांबिया-झिंबांब्वे, आणि बोट्सवाना, नामिबिया, रवांडा, युगांडा तसंच अगदी वेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन उत्तरेकडे मोरोक्को, टयुनिशिया आणि अर्थातच इजिप्तसुद्धा आपल्यासाठी तयार आहेतच.
यावेळी मात्र माझं ध्येय होतं की गोरिला ट्रेकिंग करीत जंगलातल्या माऊंटन गोरिलाज्ना त्यांचं मूळ निवासस्थान असलेल्या ठिकाणी भेट देऊन नैसर्गिक वावरताना पाहणं. त्यामुळे युगांडा किंवा रवांडा या देशांची निवड करायची होती. माऊंटन गोरिलाज् हे युगांडा, रवांडा व डेमोक्रेटिक रीपब्लिक ऑफ काँगो या तीन देशांमध्ये आढळतात. रवांडा व युगांडा हे शेजारी असल्याने आपण या दोन्ही देशांना एकाच ट्रिपमध्ये सुद्दा भेट देऊ शकता. गोरिलांच्या परिवाराचा शोध घेत जंगलात फिरत जाणे, ज्याला आपण इंग्रजित ट्रेक करणे म्हणतो, अशा ह्या गोरिला ट्रेक्सची सुरुवात 1993 पासून झाली आणि टूरिझमसाठी ही एक अनोखी सफारी ठरली,ठरतेय आणि ठरेल. काही गोरिला परिवारांना माणसांचा सहवास लाभल्याने त्यांना माणसांपासून धोका वाटत नाही आणि म्हणूनच अगदी जवळून आपण त्यांना बघू शकतो. हे गोरीलाज् पाळीव नसून जंगलीच आहेत पण केवळ तिथल्या गाईड्सची त्यांना सवय झाली आहे त्यामुळे त्यांना ह्यात काही धोका वाटत नाही. इथले गाईड व रेंजर कायम या गोरिलाज्च्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात व त्यांच्याशी संवाद साधायला ते जवळ-जवळ सोळा प्रकारचे अनेक फोनेटिक आवाज काढून गोरिलाज्शी संपर्क साधतात. गोरीलाज्पर्यंत पोहोचायला एक ते दोन तासांचा ट्रेक करावा लागतो. शारिरीकदृा सुदृढ व अॅक्टिव्ह लोकांना तसा हा ट्रेक सहज शक्य आहे. युगांडापेक्षा रवांडामधल्या जंगलातला ट्रेक थोडा अधिक सोपा आहे पण इथल्या पार्क फीस् वेगळ्या आहेत आणि दोन्ही अनुभव तसे वेगळे ठरतात. सोबत जाताना कुठल्याही ट्रेकला निघू त्याप्रमाणे कपडे व चांगले ट्रेकिंग शूज आणि रेनकोट असणे आवश्यक आहे. इथे जंगल पार करायला आपण पोर्टर सर्व्हिसही घेऊ शकतो. ते आपला बॅकपॅक इ. सामान तर उचलतात पण लागेल तिथे आपल्यालासुद्धा हात देत गोरिलापर्यंत यशस्वीरित्या नेऊन पोहोचवतात. नॅशनल पार्कला पोहोचताच आपल्यासाठी एका गोरिला फॅमिलीची नेमणूक केली जाते. गोरिला ट्रेकिंगच्या पार्क परमिट फार कमी असल्याने ह्या टूरचे बुकिंग मात्र खूप आधी करायला हवे. इथल्या पोर्टर्समध्ये महिला बघून मला गम्मत वाटली. माझ्या पोर्टरचे नाव ग्लोरिया होते. इतर वेळी ती बटाट्याची लागवड करत शेती करते व दोन मुलांना वाढवते हे कळले. ग्लोरियाला एक महिन्यानंतर पोर्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या कामाने त्यांच्या आयुष्याला थोडासा का होईना आपला हातभार लागतो आहे हे पाहून बरे वाटले. आमची गोरिला फॅमिली होती ती मुकिझा या वीस वर्षांच्या गोरिलाची. नेमकं आधीच्या रात्री मुकिझा परिवार जंगलात आणखीन आत गेल्याने आम्हाला त्या विंडी इमपेनीट्रेबल फॉरेस्टमध्ये दोन तासांचा ट्रेक करण्याचा लाभ मिळाला. काही लोकांना चालायचा कंटाळा येत होता, पण मी मात्र त्या शुद्ध हवेच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लाभलेल्या जंगलात चालायला मिळाल्याबद्दल मनोमनी फार खूश होते. त्यात ग्लोरिया मला कधी खेचून वर ओढत असे तर कधी मला मागनं हसत-हसत धक्का आणि चापटी मारत असे.
मुकिझा परिवार जवळ आहे, असं कळताच जणू हवेत एक वेगळाच रोमांच जाणवू लागला. तिथल्या रेंजर्सने गोरिला भाषेत मुकिझाला आमच्या आगमनाबद्दल कळविले. आपल्याला त्याचे जेवढे कुतूहल वाटते तेवढेच ह्याला आपले वाटत असावे का? आज कुठल्या जातीचे मनुष्य आपल्याला भेटायला आले आहेत, असा विचार त्याच्या मनात येत असेल का? असे प्रश्न उगाचच माझ्या मनात निर्माण झाले. पण मुकिझाला आमच्यात काही रुचीच नव्हती. तो स्वत:च्या जगात मस्त होता. मुकिझाची पहिली झलक म्हणजे त्याची प्रसिद्ध सुंदर पाठ. सिल्वरबॅक हा गोरिला फॅमिलीचा मुख्य नर. साधारण तेरा वर्षांचा झाल्यावर त्याच्या पाठीवरचे केस पांढरे होतात व यामुळे त्याचे नाव सिल्वरबॅक असे पडले आहे. मुकिझाला पाहताच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्याच्या चेहर्यावरचे भाव व सर्व हालचाली या अगदी हुबेहुब मनुष्यासारख्या होत्या. बराच वेळ विचार करताना त्याच्या चेहर्यावर एक प्रकारची उदासिनता वाटत होती. छाती ठोेकून आपल्या परिवाराला बोलवल्यावर सुद्धा त्याला कुणीच दाद दिली नाही हे बघून तो वैतागला आणि त्याने परत एकदा जोर-जोरात आवाज देत आपली छाती ठोकली. लगेच पानांची सळसळाट झाली आणि आमच्या भोवती तीन मादी गोरिला झाडांवरून उतरून हजर झाल्या. त्यात दोघींच्या कडेवर छोटीशी बाळं चिकटली होती. मग तर आमच्या आनंदाला व उत्सुकतेला सीमाच उरली नाही. पुढचा एक तास त्या मुकिझा गोरिला फॅमिलीच्या मागे-मागे फिरण्यात कसा गेला हे कळलेच नाही. अगदी मनुष्य जातीप्रमाणेच ते लहानांची व थोरा- मोठ्यांची काळजी घेतात, सांकेतिक भाषा वापरतात, हसतात, विचार करतात आणि त्यांची बुद्धिमत्ता आवश्यक ठिकाणी दाखवतात. यात फार आश्यर्च वाटायला नको कारण गोरिला व मनुष्याच्या डीनए मध्ये जवळजवळ शहाण्णव टक्के साम्य आहे. आपल्याशी एवढे साम्य असलेल्या या अद्भुत प्राण्याची शिकार का बरे मनुष्याला करावीशी वाटत असेल? या प्रश्नाने मनात खळबळ उठली. आज जगात केवळ हजारहून अधिक गोरिला शिल्लक आहेत त्यामुळे आपला हा अनुभव खर्याअर्थाने खास आहे ह्याची मला पूर्ण जाणीव होती. ही टूर दोन अर्थाने माझ्यासाठी फायद्याची ठरली. एक म्हणजे ही टूर करताना डिस्कव्हरी किंवा नॅशनल जीओग्राफिक चॅनलवर जो थरार आपण पाहतो तो प्रत्यक्ष या टूरमध्ये मी अनुभवला. आणि दुसरं म्हणजे या नॅशनल पार्कसाठी जी फी मी भरली त्यातनं या शिल्लक राहिलेल्या गोरिलाजच्या प्रजातीचं संवर्धन केलं जाणारं ह्याचं समाधान मला मिळालं. या पृथ्वीवरच्या मनुष्याच्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकाला मनापासून सलाम करून, त्याच्या भवितव्यासाठी प्रार्थना करत मी परतले.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.