आपल्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जडणघडणीत कधी गतकाळातील थोर व्यक्ती तर कधी रामायण महाभारतातील व्यक्तीरेखा तर कधी आपल्याच काळातील यशोगाथा आपल्याला प्रेरणा देत असतात, आपला मानसिक-वैचारिक विकास घडवीत असतात. त्यांना कृतज्ञतापूर्ण सलाम करतानाच मला आणखी एका मोठ्या प्रेरणास्थानाला किंवा स्थळाला, अॅक्च्युअली शब्दात बंदिस्त करता न येणार्या गोष्टीला धन्यवाद द्यायचेत, ते म्हणजे हिमालयाला. त्यानेच तर आम्हाला व्यवसायात आणलं, शिकवलं, घडवलं, यशाच्या मार्गावर आणलं, त्याचा सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाही.
मागच्या आठवड्यात दुबईला होते, वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या यंग अॅन्ड एनर्जेटिक-अतिउत्साही मुलामुलींना भेटायला. कधी दर आठवड्याला तर कधी महिन्याला मी कुठेना कुठे म्हणजे वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल किंवा सीनियर्स स्पेशलद्वारे पर्यटक जगाच्या किंवा भारताच्या कानाकोपर्यात जिथे-जिथे जातात तिथे बर्याच ठिकाणी भेटायला जाते. तिथला उत्साह बघून मी प्रफुल्लित होते आणि अधिक जोमाने कामाला लागते. ह्या भटकंतीत माझाच स्वार्थ जास्त आहे. दोन इव्हेंट्स करायचे होते संध्याकाळी, त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोन पूर्ण दिवस मला फ्री मिळाले. खरंतर दुबई शॉपिंग फेस्टिव्हल सुरू होता आणि शॉपिंगच्या पंढरीत मी आले होते. जगभरातल्या सगळ्या ब्रँडस्चं सगळ्या प्रकारचं शॉपिंग इथे हात जोडून उभं आहे. पण सध्या वजन कमी करण्यासोबत गरजा कमी करण्याचाही वीडा उचलल्यामुळे शॉपिंगला जाण्यासही मन तयार नव्हतं. हो, एकदा ठरवलं की ठरवलं. ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो फिर मै अपने आपकी भी नहीं सुनता’ माझ्या बॉलीवूड प्रेमी मनाला सलमान खानचा डायलॉग आठवला. सो दुबईमधल्या आमच्या सहलीच्या त्या आलिशान हॉटेलमधल्या सुंदर रूममध्ये मला मस्त निवांतपणा मिळाला. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्याकडे एकचित्ताने तसंच तटस्थपणे बघता आलं. वर्तमानकाळातल्या घडामोडी आणि भविष्यकाळातील आव्हानं ह्यांनी जीवन इतकं व्यापून टाकलंय की भूतकाळात डोकवायलाही वेळ मिळत नाहीये. अर्थात ते चांगलंच आहे. भूतकाळात अडकून पडणं आणि भविष्यकाळातल्या स्वप्नांमध्ये रंगून जाणं हे दोन्हीही वर्तमानाला घातक. धोक्याची घंटाच ती. संभाव्य परिणामांची शक्यता लक्षात घेऊन आम्ही आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमधल्या भिंतीवर लिहूनच ठेवलंय. भूतकाळात अडकून न पडता त्यापासून शिका, भविष्यावर नजर ठेवतानाच वर्तमानकाळावरची पकड जराही ढिली होऊ देऊ नका. वैचारिक श्रीमंतीमध्ये गडगंज संपत्ती निर्माण करण्याचंही ध्येय आम्ही ठरविल्यामुळे ठरवून काही सुभाषितं आणि सुविचार आमच्या जीवनाचा तसंच व्यावसायिक आयुष्याचा अपरिहार्य हिस्सा बनवले. आजही मला ते दिवस आठवतात जेव्हा मी सुधीर सुनिला नील शिल्पा अॅनी आणि टीम एक महिनाभर कोणती सुभाषितं, कोणते सुविचार, कोणती तत्त्व आपल्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्याचा भाग बनवायचे ह्यावर चर्चा करीत होतो, कारण ज्या गोष्टी हस्तगत होणार नाहीत आणि येणारी अनेक वर्ष आपल्याला मार्गदर्शन करीत राहतील त्याच गोष्टी आम्हाला हव्या होत्या. त्या सगळ्यांविषयी लिहिनंच एकदा कधीतरी किंवा टप्प्याटप्प्याने. भूत-वर्तमान-भविष्यावरची ती भिंत माझ्या आवडीची आहे. आणि असा निवांत वेळ मिळाला तर भूतकाळात डोकवायला आणि भविष्यकाळाचा अंदाज घ्यायला आवडतं. त्यादिवशी त्या निवांत-शांत एकचित्तात माझ्या नजरेसमोर आला तो अवाढव्य-अजस्त्र- अतूलनीय- अप्रतिम असा हिमालय. हा आपल्या भारताचाच नाही तर मलाही माझा पाठीराखा वाटला.
जेवढा मी त्यावर विचार करते तेवढा हिमालय मला जीवनाचा अविभाज्य भाग वाटतो किंवा आमच्या सर्वांच्या जीवनातलं त्याचं अढळ स्थान जाणवायला लागतं. हिमालय होता म्हणून भारतात पर्यटनाला सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साठेक वर्षांपूर्वी माझ्या काकांनी काश्मिर सहली सुरू केल्या. नंतर वडिलांनी ते काम पुढे नेलं आणि आता आमची पिढी तसंच आमच्या पुढची पिढीही त्यात उतरलीय. काळानुरूप व्यवसाय वेगळे झाले पण अचल-अढळ राहिलं ते पर्यटनक्षेत्र आणि हिमालय. शाळेतल्या भुगोलाच्या पुस्तकानंतरची माझी आणि हिमालयाची प्रत्यक्ष ओळख चाळीस वर्षांपूर्वीची. दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी काश्मिरला गेले होते तेव्हा पहिल्यांदा बर्फाची शाल पांघरलेले पहाड पाहिले. पहिल्यांदा प्रत्यक्षात जेव्हा आपण हे बर्फाच्छादित पहाड बघतो तेव्हा आनंदाने अक्षरश: वेडे होऊन जातो. आठवून तर पहा तुमचं पहिलं एन्काऊंटर ह्या हिमालयाच्या स्नोई माऊंटन्ससोबतचं. इट्स अमेझिंग फिलिंग! त्या आनंदाची आणि अनुभूतीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
पूर्वी फक्त काश्मिर एके काश्मिर सहली होत्या. काकांसोबत भरपूर स्पर्धा चालायची. कुणाच्या सहली उत्कृष्ट? कुणाचे पर्यटक जास्त खूश? ह्यावरून अदृश्य खडाजंगी सुरू असायची. तेव्हा अॅक्च्युअली माझ्या मनात पहिल्यांदा विचार आला की काश्मिरवरून रस्सीखेच करण्यापेक्षा आपण काही वेगळं निर्माण करूया. पण त्या वेगळ्यामध्ये बर्फ-स्नो-पहाड-थंड हवा-नद्या-नाले ह्यांना अढळ स्थान होतं कारण पर्यटक त्यासाठीच तर पर्यटन करायचे. मी हिमाचल प्रदेश ह्या शांत निसर्गरम्य राज्याचा दौरा केला आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकदृष्टीने हिमाचल प्रदेशाच्या सहली सुरू केल्या. मी स्वत: टूर मॅनेजर म्हणून जायचे सहलीवर. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त पर्यटक हिमाचल प्रदेशात जायला लावण्यात आम्ही मोलाची कामगिरी बजावली. स्पर्धेमध्ये आम्ही एका बाजूला काश्मिर-काश्मिर खेळत होतोच पण हिमाचलने-हिमालयाच्या पायथ्याशी बसलेल्या ह्या निसर्गसुंदर राज्याने व्यवसायबाजीची संकल्पना डोक्यात रुजवली. मग मला नादच लागला हिमालयाच्या पायथ्याशी असलेली निसर्गसुंदर ठिकाणं शोधायची आणि त्याच्या सहली सुरू करायच्या. नैनिताल, सिक्किम-दार्जिलिंग, नेपाळ, भूतान ही त्याचीच परिणीती होती. एकाच गोष्टीमध्ये अडकून पडणं, त्यात स्पर्धा करीत राहणं म्हणजे व्यवसायाचा आणि आपल्या उर्जेचा र्हास. बरं झालं हे खूप आधी लक्षात आलं व्यवसायात उतरल्या उतरल्याच. काश्मिर आम्ही सुरू ठेवलंच होतं पण हिमाचल, नैनिताल, सिक्किम, दार्जिलिंग ही राज्य आणि हिमालयाची मालकी असलेले भारताच्या जवळचे नेपाळ, भूतानसारखे देशही आमच्या पर्यटकांसाठी काबीज करून ठेवल्यामुळे जेव्हा काश्मिर काही काळापुरतं बंद झालं होतं तेव्हा आम्हाला फटका जरूर बसला पण व्यवसाय बंद नाही करावा लागला. बिझनेस कंटिन्यू राहिला. कालांतराने बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करताना ह्याला ‘बिझनेस कंटिन्युअल स्ट्रॅटेजी’ म्हणतात हे कळलं. इथे चपखल लागू पडतं ते म्हणजे, आम्ही भूतकाळात फक्त काश्मिरमध्ये अडकून पडलो नाही, अर्थात वर्तमानात त्यावरची पकड ढिली होऊ दिली नाही पण भविष्यकाळावर नजर ठेवून इतर गोष्टी निर्माण केल्या ज्यामुळे बिझनेस आजतागायत सुरू राहिला, अनेक स्थित्यंतरं होऊनही.
कुठेही स्थैर्य आलं की देव म्हणतो, ‘चला, आता आणखी काही नवीन करा’. आणि देवाचं आम्ही शांतपणे ऐकतो कारण एक कळलंय, ‘देवाचं आणि माझं एक सुंदर नातं आहे जिथे मी देवाकडे काही मागत नाही आणि देव मला काही कमी पडू देत नाही’. त्याप्रमाणे देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही वीणा वर्ल्ड सुरू केलं. आता पुन्हा तीच परिस्थिती येणार होती पस्तीस वर्षांपूर्वीच्या काश्मिर-काश्मिर रस्सीखेचीची. इलाज नव्हता. पण तरीही पुन्हा एकदा फक्त जे होतं त्यातच अडकून पडायचं नव्हतं. आणि तिथे मदतीला धावून आला हिमालय. त्याच्या पायथ्याशी असलेल्या नॉर्थ ईस्टच्या सेव्हन सिस्टर्सच्या सहली सुरू केल्या आणि त्या अवघड अनडेव्हलप्ड राज्यांमध्येही हजारो पर्यटकांना नेऊन आणलं. त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर आम्ही हिमालयाच्या माथ्यावरच्या म्हणजे लेह लडाखच्या सहली सुरू केल्या. आत्तापर्यंत तिथे वुमन्स स्पेशल नेली नव्हती. पहिली सहल ‘वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल लेह लडाख’ जाहीर केली आणि दोनशेहून अधिक महिलांनी ती एका महिन्याच्या आत हाऊसफुल्ल करून टाकली. आता चार वर्षांनी ही संख्या महिलांनी मिळून दरवर्षी साडेतीनशेच्या घरात पोहोचवलीय. त्यांच्या ह्या एवढ्या मन:पूर्वक प्रतिसादामुळे मीही त्यांना भेटायला वर्षातून तीन-तीन वेळा लेह लडाखला जात असते. पुन्हा इथे माझाच स्वार्थ असतो. लेह लडाख हे ‘टू बी ऑर नॉट टू बी’वालं डेस्टिनेशन. घरात चर्चा ठरलेलीच, ‘जायलाच पाहिजे का?’ मनात एक वेगळीच भिती दबा धरून बसलेली. मी पण भेटणार आहे तिथे म्हटल्यावर ती थोेडी कमी होते ग्रीन सिग्नल मिळायला. आणि आतातर गेल्या पाच वर्षांत हजारो पर्यटकांना लेह लडाखला नेऊन आणल्यावर तिथे पर्यटक बिनधास्त यायला लागलेत. स्थानिकांच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्यात फूल ना फुलाची पाकळी म्हणून हातभार लागल्याने त्यांचंही चांगलं सहकार्य लेह लडाखच्या कारगिल, नुब्रा, पँगाँगसारख्या सर्व स्थलदर्शनाच्या ठिकाणी मिळतं. अजस्त्र पहाडांची, दर्याखोर्यांची, उंचीची भिती घालवायची असेल तर लेह लडाखला जरूर जावं, ‘डर के आगे जीत है।’ हे प्रत्येक महिलेच्या चेहर्यावर मला दिसतं.‘येस आय डिड इट!’ हा एक वेगळाच कॉन्फिडन्स रोमारोमात भरला जातो लेह लडाखमध्ये. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण नुसते जायला जिथे घाबरतो तिथे आपले जवान अतिशय खडतर परिस्थितीत आपली सरहद टिकवून ठेवण्यासाठी कशी जीवाची बाजी लावताहेत हे जेव्हा नजरेला पडतं तेव्हा आपल्या खूजेपणाची आणि त्यांच्या जीवाची बाजी लावणार्या निर्धाड छातीची-साहसाची आपल्याला जाणीव होते आणि नतमस्तक व्हायला होतं. ही आगळी अनुभूती जीवनकलहात खंबीरपणे टिकून ठेवण्याला कारणीभूत ठरते. ‘जय जवान’ ही मनापासून आरोळी मारताना हिमालयाच्या त्या पहाडांसमोर दोन्ही हात जोडून मी म्हणते, ‘तू आहेस म्हणून!’.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.