रोज काहीतरी नवीन करायला मिळालं पाहिजे, केलं पाहिजे किंवा आपल्याला तशी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे. पर्यटन व्यवसायात आम्हाला ह्या तीनही गोष्टी करायला मिळतात. जगाच्या कानाकोपर्यात सहली सुरू असतात, कुठेना कुठे काहीतरी घडत असतंच. नेहमीचं असेल तर एक्स्पर्ट टीम आहेच त्यावर सोल्युशन काढायला. एखादी नवीन केस आली तर आम्हीही त्यात भाग घेतो, सर्वानुमते निर्णय घेऊन ते सोडवतो आणि आधीच्या अनेक केसस्टडीजमध्ये त्याची वर्णी लावून टाकतो, पुढे कधी तसंच काही घडलं तर त्याचा उपयोग होतो, या व्यवसायामुळेच आम्हाला रोज काहीतरी अनपेक्षित असं नवीन करायला मिळतं. दुसरी गोष्ट असते ती आम्ही काहीतरी नवीन करण्याची, त्यासाठी तर इतके अॅव्हेन्यूज आहेत की विचारू नका, जगाच्या दाही दिशा खुल्या आहेत आमच्या वेगवेगळ्या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या आयटिनरीज तयार करायला, त्यामुळे काळानुरूप त्यात बदल करणं, अपग्रेडेशन्स करणं हे चालूच असतं. जसं आयटिनरीजचं तसंच ऑर्गनायझेशनचंही, तिथेही सर्वांची निर्णय क्षमता वाढवणं, जगाच्या वेगाबरोबर आपल्या वेगाला अॅडजस्ट करणं, नीतीमूल्यांची जपणूक करीत तीच कार्यालयीन जीवनशैली बनवणं, कधी आमची कुणाची गाडी रूळावरून घसरली तर ती पूर्वपदावर आणणं ह्या सगळ्या गोष्टी अखंड चालू असतात. कुणाला त्यात कंटाळा येत नाही कारण परिस्थिती किंवा मानसिकताच तशी निर्माण केली आहे. ह्या तीनही गोष्टी इतक्या छान तर्हेने सुरू असतात की रोज ऑफिसला जायला प्रत्येकाला उत्साह असतो. ‘लेट्स डू समथिंग न्यू!’ हा अॅटिट्युड घेऊनच आम्ही सकाळी ऑफिसमध्ये प्रवेश करतो आणि संध्याकाळी काहीतरी छोटी मोठी अचिव्हमेंट गाठी बांधून समाधानाने घराकडे निघतो.
पुढच्या रविवारी ‘वुमन्स डे’ आहे. हा दिवस आम्हाला सर्वांना आमच्या हक्काचाच नव्हे तर मालकीचा वाटतो. ‘वुमन्स स्पेशल’ द्वारे हजारो महिलांच्या देशविदेशातील पर्यटनाचं स्वप्न जे आम्ही पूर्ण करतो. वुमन्स स्पेशल सुरू करून यावर्षी चौदा वर्ष होतील. वीणा वर्ल्ड झाल्यावर तर आमची पहिली-वहिली सहल ही वुमन्स स्पेशलचीच गेली. बावीस ऑगस्ट दोन हजार तेराला गोव्याला एकशेवीस महिला आणि आमची नवी नवेली वीणा वर्ल्ड गँग धम्माल करून परत आली आणि वीणा वर्ल्डच्या सहलींचा श्रीगणेशा झाला किंवा सर्व महिलांनी पाठिंबा देऊन एकत्र येऊन वीणा वर्ल्डची मुहूर्तमेढ रोवली म्हणायला हरकत नाही. सर्वप्रथम महिला एका महिलेच्या पाठी उभ्या राहिल्या ज्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि वीणा वर्ल्ड चल पडी! थोडक्यात महिलांनी महिलांना सपोर्ट केला आणि असं वीणा वर्ल्डसारखं काहीतरी निर्माण होऊ शकलं. आमची संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम ह्यासाठी महिलांची नेहमीच ॠणी राहील.
एकदा वुमन्स स्पेशलच्या आमच्या जाहिरातीतली हेडलाईन होती, ‘मुलींनी मुलींना सपोर्ट केला तर जग बदलेल’ कुणा कॉपी रायटरकडून घेतलेली ही लाईन नव्हती तर आमच्या कृतज्ञतेतून मनापासून ती आली होती. महिलांनाही ती भावली होती. थोडक्यात असं अनुभवातून आलेलं खरं काही लिहिल्यामुळेच ती जाहिरात हिट झाली होती. शेवटी जाहीरातीचा हेतूच तो असतो की ज्यांच्यासाठी ती केलीय त्यांना आवडली पाहिजे, त्यांनी अॅक्शन केली पाहिजे, सहलींचं बुकिंग वाढलं पाहिजे. आणि आपण जे त्या जाहिरातीत लिहिलंय ते सर्व आपल्याला सहलीवर डिलिव्हर करता आलं पाहिजे. मला वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या काही सहलींवर जाऊन गाला इव्हीनिंगला पर्यटकांना भेटायची संधी मिळते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मी डायरेक्ट प्रश्न करते, ‘आम्ही जे जाहिरातीत लिहिलंय त्याप्रमाणे सगळं पार पडतंय नं? की आम्ही जाहिरातीत एक लिहितो आणि सहलीवर तुम्हाला दुसरंच काही अनुभवायला मिळतं?’ खरंतर असा प्रश्न करणं धाडसाचं, कुणी जर त्यावेळी तक्रार केली तर अक्षरश: माझ्या आणि वीणा वर्ल्डच्या इज्जत का फालूदा! पण त्या भीतीपेक्षा ऑफिस टीम आणि टूर मॅनेजर्सनी केलेल्या नियोजनावर आणि मनापासूनच्या मेहनतीवर भरोसा असतो. त्याहीपुढे जाऊन जर आपल्याकडून काही चुकीचं झालं असेल तर ते फर्स्ट हँड ऐकण्याचंही धाडस असतं, ‘लेट्स फेस द रीअॅलिटी अॅन्ड इम्प्रूव्ह’ ह्या मानसिकतेमुळे मी पूर्ण तयारीनिशी तो प्रश्न विचारते, आणि मला अभिमान आहे की युरोप असो वा अमेरिका, लेह लडाख असो वा हिमाचल मला कधीही सर्वांच्या टाळ्यांच्या गजराशिवाय आणखी वेगळं असं काही ऐकायला मिळालं नाही. इथे म्हणावसं वाटतं ‘थँक्यू वीणा वर्ल्ड टीम! लेट्स कीप डुइंग अवर बेस्ट!’ तसाही माझा ईमेल आयडी दर रविवारी मराठी गुजरातीतील सहा मुख्य वृत्तपत्रात छापला जातो ह्या आर्टिकलसोबत तो पर्यटकांकडे असतोच आणि पर्यटकही ईमेलद्वारे कनेक्टेड असतात, कधी प्रशंसेसाठी तर कधी एखाद्या तक्रारीसाठीही. मी प्रत्येक ईमेलला उत्तर देऊ शकले नाही तरी काही इश्यू असेल तो सोडविण्यासाठीचं मार्गदर्शन गेस्ट रीलेशन्स वा सेल्स कंट्रोल टीमला करीत असते.
‘वुमन्स डे’ साठी काय करायचं ह्याचं प्लॅनिंग खूप आधीपासून सुरू असतं कारण ‘वुमन्स डे’ला महिलांना बाहेर जायचं असतं आणि आम्हालाही त्यांना बाहेर काढायचं असतं. त्यासाठी आमच्या आत्ताच्या जाहिरातीतील हेडलाईन आणि कॉपी होती ‘तुम्ही कुठे असणार आहात?... घरात? ऑफिसमध्ये? देशात? परदेशात? वुमन्स डे येतोय, ठरवा लवकर आणि चला वीणा वर्ल्डसोबत! विश्वासाने, आनंदाने...’ पुन्हा एकदा किंवा नेहमीप्रमाणेच ही जाहिरातही हिट झाली आणि ह्या आठ तारखेला वुमन्स डेच्या दिवशी सात वर्षांपासून सत्तर वर्षांपर्यंतच्या यंग गर्ल्स असणार आहेत जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी. एक वुमन्स स्पेशल ह्या ‘वुमन्स डे’ च्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ‘वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप’ फायनल मॅच बघणार आहे. दुसरी वुमन्स स्पेशल सिंगापूर थायलंड मलेशियाची सहल करीत असेल. तिसरी वुमन्स स्पेशल बालीच्या भटकंतीवर असणार आहे, चौथी वुमन्स स्पेशल सिंगापूर मलेशियावर स्वारी करेल. पाचवी वुमन्स स्पेशल थायलंडला दे धम्माल करणार आहे. सहावी वुमन्स स्पेशल अमृतसर अट्टारी वाघा बॉर्डरवर तिरंग्याला सलाम करीत असेल, सातवी वुमन्स स्पेशल हिमालयाकडे कूच करीत अमृतसर डलहौसी धरमशालातील गुलाबी थंडीचा आनंद लुटत असेल, आठवी वुमन्स स्पेशल कोस्टल टाऊन पाँडिचेरीतील देखण्या समुद्र किनार्यांवर मजा करीत असेल. पाहिलंत आम्हाला का खूप आधीपासून ह्या ‘वुमन्स डे आऊट टूर’चं प्लॅनिंग करावं लागतं ते. आणखी एक डीमांड असते ती म्हणजे ‘वन डे-फन डे’ची. ज्यांना लांबच्या सहलींना जाणं जमत नाही त्यांच्यासाठी किंवा ‘एक ब्रेक तो बनताही है’ म्हणणार्या बीझी-बीझी गर्ल्ससाठी दरवर्षी एक दिवसाची वुमन्स डे पिकनिक असते. यावर्षी आम्ही इमॅजिका ह्या सुंदर अॅम्युझमेंट पार्कमध्ये हे एक दिवसीय सेलिब्रेशन करणार आहोत. आणि ह्या एक दिवसाच्या धम्मालीसाठी पण भरपूर महिला येतात. आणि हो ह्यातील साऊथ ईस्ट एशियाच्या सहलीवर गेलेल्या गर्ल्सना भेटायला मीही थायलंडला असणार आहे, आणि जमलं तर तिथून ऑस्ट्रेलियाला, तेथील टूरिझम बोर्डच्या आग्रहास्तव तसंच वर्ल्डकप बघायला आमच्या ऑस्ट्रेलिया टूरवरील गर्ल्सनाही भेटायला. लेट्स सी.
तर ह्या वुमन्स डे साठी बॅगेज टॅग्ज बनवायचे होते ज्यावर मेसेज काय द्यायचा म्हणून मार्केटिंग टीम समोर बसली होती. म्हटलं, ‘‘काहीतरी खूप लिहित बसू नका. जस्ट से, हॅप्पी वुमन्स डे!’’ प्रणोती, विभूती, प्रणालीच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह. ‘नाही नाही, ते आपण लिहिणारंच पण त्यावर काहीतरी इमोशनल मेसेज पाहिजे, आपल्या स्टाईलप्रमाणे’. पर्यटकहो! बी केअरफुल तुम्हाला जाळ्यात खेचण्यासाठी ही इमोशनल स्टॅ्रटेजी केली जाते बरं! त्यांना म्हटलं, बॅगेज टॅग्ज देशविदेशातील सहलींसाठी आहेत त्यामुळे ते इंग्लिशमध्ये असणार. तेव्हा जितेश तू लाईन्स बनव आणि मला दाखव. मी मराठी मीडियममध्ये शिकलेले, मराठीचा अभिमान बाळगणार्या आम्हाला शालेय जीवनात मराठी बोलताना मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापरून संवाद साधणार्या किंवा मधूनच एखादं इंग्लिश वाक्य फेकणार्या मित्र-मैत्रिणींचा काय हेवा वाटायचा. आम्हाला ते जमायचं नाही म्हणून आम्हीच आम्हाला कमी लेखायचो. पण हळूहळू आम्हीही त्यांच्यासारखं शिकलो. मागे रहायचं नाही नं! त्याने आमचं मराठी इंग्रजाळलेले झालं आणि इंग्लिश मराठमोळं. एक बरं आहे, सध्याचं युग आमच्यासारख्या धेडगूजरी लोकांसाठी एक मोठठ्ा संदेश देतंय. ‘भाषा महत्त्वाची नाही, कम्युनिकेशन झालं पाहिजे’. तरीही इंग्लिश मेसेज वा जाहिरात असली तर मी जितेश, नील, सुनिला किंवा आमची मैत्रिण निकोला पायस ह्यांचा आधार घेते. जितेश चांगल्या कॉपीज् बनवतो, फक्त माझा एकच सल्ला असतो, जितेश डायरेक्ट मेसेज, लांबण लावायची नाही, सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात आठव, ‘बुझाये सिर्फ प्यास, बाकी सब बकवास!’आणि आणखी एक उपकार केल्यासारखाही मेसेज नको. तिला उडू दे, फुलू दे, मुक्त करूया तिला बंधनातून हे सगळं बॅन. शी हॅज अराईव्हड, शी हॅज ऑलरेडी रीचड्. युवर लँग्वेज शूड बी रीस्पेक्टफुल. जितेश घाग दुपारी लाईन्स घेऊन आला, ‘आय सेलिब्रेट द वुमन अराउंड मी’, ‘सेलिब्रेट द पावरफुल वुमन इन युअर लाईफ’, ‘सेलिब्रेट हर’, ‘सेलिब्रेट स्पेशल वुमन इन युअर लाईफ’ लाईन्स चांगल्या होत्या पण तरीही समथिंग इज मिसिंग वाटत होतं. शुभेच्छा देणारा-घेणारा हयात किंचितही उपकाराची भावना नको होती. माझं आणि तुझं महत्त्व दोन्ही अबाधित राहिलं पाहिजे. आपण सर्व मिळून हे जग चालवतोय. तेव्हा एकमेकांप्रती नम्र राहत सन्मान करता आला पाहिजे ही भावना कशी आणता येईल हा प्रश्न होता. त्यांची टाईमलाईन आली होती. पेन घेतलं आणि जे लिहिलं ते वाचून जितेश एकदम भावूक होऊन म्हणाला, ‘छान आहे’. म्हटलं, ‘‘ह्याक्षणी तुला तुझी आई आठवली नं! किंवा बहिण, आत्या, मावशी ज्यांनी तुझ्या जडणघडणीत हातभार लावलाय त्या सगळ्या तुला आठवल्या असतील. तोच तर हेतू आहे ह्या शुभेच्छांचा. आपल्या कळत नकळत आपल्या आयुष्याला आकार देणार्या सर्वांना आठवून त्यांना कृतज्ञतापूर्वक मनोमन सलाम करायचा. लेट्स गो अहेड विथ द लाईन, आय अॅम बिकॉज शी इज!’’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.