प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आव्हानं तर येत राहणारच. सगळं काही छान, ठरविल्याप्रमाणे जसं हवं तसं कधीच आणि कुणाच्याही बाबतीत घडत नाही. लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, येणार्या आव्हानांना कसं झेलतो-त्यावर कशी मात करतो ह्यावर अंतिम परिणाम अवलंबून असतो. केरळचा पूर, काश्मिर प्रश्न, युरो डॉलरची वाढ, डीझेल-कृड ऑइलच्या किमती ही सप्टेंबर ऑक्टोबरमधली आमची म्हणजे एअरलाईन इंडस्ट्री, हॉटेल्स, पर्यटनसंस्था ह्या सर्वांपुढची आव्हानं होती. आता केरळच्या सहली व्यवस्थित सुरू झाल्यात व काश्मिरच्याही जाहीर झाल्यात.
प्रॉडक्ट डीपार्टमेंटची ऑक्टोबर महिन्यातली मीटिंग आणखी उत्साह देऊन गेली जरी आजूबाजूची पर्यटनसदृश परिस्थिती तेवढी स्वागतार्ह्य नव्हती तरीसुद्धा. परिस्थितीवर ताबा मिळवणं हे आमच्या हातात नव्हतं पण मन:स्थिती बदलून आम्ही दृष्टीकोन अधिक व्यापक केला. आपण करीत असलेल्या कामाचा कशावर-कुणावर-कधी-कसा परिणाम होतो ह्याचं अवलोकन केलं. आपल्या कामाची व्यापकता जर एवढी विशाल असेल तर आपल्याला आणखी काटेकोरपणे, अभ्यासपूर्ण, जबाबदारीने आणि अधिक उत्साहाने काम करायला पाहिजे ह्याची जाणीव दृढ झाली किंवा करवून घेतली. प्रॉडक्ट डीपार्टमेंटचं काम म्हणजे नवनवीन संकल्पनांनी सप्तखंडातील सहलींचं आयोजन करणं. तसं बघितलं तर हे छोटं आणि साधं काम वाटतं पण जेव्हा त्यावर ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स, पर्यटकांचा आनंद, आपल्या देशविदेशातील हॉटेलियर्स आणि सप्लायर्सची बिझनेस ग्रोथ, आपले प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सचे व्यवसाय, आपल्या टूर मॅनेजर्सची करियर ग्रोथ हे सगळं अवलंबून असतं तेव्हा संपूर्ण प्रॉडक्ट टीम आणि त्यातली प्रत्येक व्यक्ती वीणा वर्ल्डची एक जबाबदार नागरिक बनून जाते. आपल्या सर्वकश जबाबदारीची जाणीव असणारी आणि त्यासदृश कर्तव्य बजावणारी व्यक्ती प्रोफेशनलच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही कधी अयशस्वी होऊ शकत नाही. मात्र आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी स्वपरीक्षा अधूनमधून किंवा ठराविक कालावधीनंतर घेण्याची सवय आपण स्वत:ला लावून
घेतली पाहिजे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जेव्हा अनेक आव्हानं अशी ‘आ’ वासून समोर उभी ठाकली होती तेव्हा कितीही म्हटलं तरी थोडंसं नाऊमेद झाल्यासारखं वाटत होतं. उत्साह वाढवायचा कसा? हा प्रश्न समोर होता. त्याला दोन सोल्युशन्सही दिसत होती, ती म्हणजे आत्तापर्यंत वीणा वर्ल्डच्या पाच वर्षांच्या आयुष्यात आपण काय काय चांगलं केलं, ह्याचा आढावा घेणं आणि दुसरं होतं ते म्हणजे यापुढील आपल्या कामाचं उद्दीष्ट वा हेतू अधिक सखोल बनवणं. आमच्या मीटिंगची सुरुवात दुसर्या गोष्टीनं झाली. ‘आपण आजपर्यंत सीझन-ऑफ सीझनप्रमाणे सहली लावत होतो. त्याने ऑर्गनायझेशन वाढली पण आपण कधीच आत्तापर्यंत आपल्या हॉटेलियर्सना, सप्लायर्सना, आपल्या टूर मॅनेजर्सना दर महिन्याला किती काम देतो ह्याचा पूर्ण अभ्यास केला नाही. आज तो अभ्यास करूया.’ वर्षाचा प्रत्येक महिना सारखा नसतो. आमच्या भाषेत ‘सुपर पीक, पीक, हाय, मिड, लो’ अशी वर्गवारी आहे. सुपर पीक महिना म्हणजे अर्थातच शाळांना जेव्हा सुट्ट्या असतात तो समर सीझननधला मे महिना. या एका महिन्यात आम्ही आठशे सहली आयोजित करतो ही संख्या विश्लेषणातून समोर आली. महिन्याला आठशे म्हणजे दिवसाला सरासरी पंचवीस ते तीस सहली. पाच वर्षात ऑर्गनायझेशन बनताना-विस्तारताना वेळच नव्हता अशी छाननी करायला. अर्थात आमच्याकडे डेटा तरी कुठे होता अभ्यास करायला? आता आमच्याकडे पाच वर्षांचा डेटा तयार झालाय. जी वीणा वर्ल्डची सर्वात मोठी संपत्ती आहे असं मी नेहमी प्रत्येक मीटिंगमध्ये सांगत असते. त्याचा अभ्यास करणं, त्याद्वारे वेगवेगळे ट्रेंडस् समजून घेणं, त्यानुसार आखणी करणं सोप्पं जाणार आहे. साडेतीन लाख पर्यटकांनी ह्या पाच वर्षात वीणा वर्ल्डसोबत प्रवास केला तसंच पाच लाखांहून अधिक लोकांची संख्या पर्यटनाचा विचार केलेल्यांची, म्हणजेच पाच लाखातल्या साडेतीन लाख पर्यटकांनी सहल केली पण अजून दीड लाख पर्यटक आहेत ज्यांनी ह्या पाच वर्षात चोैकशी केलीय पण बुकिंग केलं नाही. हे संख्याबळ ही संपत्ती नव्हे का. जेव्हा पाच वर्षांमधील प्रत्येक महिन्याचा अभ्यास केला तेव्हा जाणवलं की काही महिने आपण अक्षरश: वाया घालविलेत. काही महिन्यांमध्ये आम्ही फक्त पंचवीस ते पन्नास एवढ्याच सहली केल्यात. डेटा अॅनालिसिस आश्चर्यकारक वास्तव समोर आणतो ते असं. मे महिन्यात आठशे सहलींचं यशस्वी आयोजन करणारी वीणा वर्ल्ड टीम जर एखाद्या महिन्यात त्याच्या दहा टक्केही सहली करीत नसेल तर आपण आपल्याला म्हणायला हवं ‘डूब मरो चुल्लूभर पानी में!’ माझ्या बॉलीवूडप्रेमी मनाचा हा आवडता डायलॉग. आपल्या चांगल्या क्षमतेचा पूर्ण वापर न करणं ह्यासारखा दुसरा अपराध नाही. आणि ह्याने फक्त व्यवसायवृद्धीचंच नुकसान होत नाही तर ह्या काही महिन्यांमध्ये आपण पर्यटकांना कमी किमतीत सहली देऊ शकतो, आपल्या एअरलाईन्सना, हॉटेलियर्सना, सप्लायर्सना लो सीझनमध्ये बिझनेस देऊ शकतो. मागच्या आठवड्यात काश्मिरच्या दुकानदाराचं संभाषण मी लिहीलं होतं की ‘सीझनमध्ये सगळेच येतात, तुम्ही ऑफ-सीझनला पर्यटक आणून आमच्या रोजी रोटीची भ्रांत दूर करता ह्यासाठी तुमचं महत्व आम्हाला जास्त’. म्हणजे ह्या सर्व बाबतीत आपलं दुर्लक्ष झालंय. पाच वर्षात आपली धावपळ खूप झाली. वेळ नाही मिळाला पण आता येत्या नवीन वर्षात, म्हणजे जानेवारी २०१९ पासून आपण अशा चुका घडू द्यायच्या नाहीत. आपले टूर मॅनेजर्स ही आपली दुसरी संपत्ती. त्यांच्या हाताला सतत काम देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे यापुढे एकही महिना असा शिथिल जाणार नाही ह्याची खबरदारी घेऊया. ‘टुगेदर वुई ग्रो’ हा आपला नारा सर्वार्थाने यशस्वी झाला पाहिजे. आपण काय काम करतोय आणि ते का करतोय हे स्पष्ट होत होतं. सर्वांच्यासाठी सर्वांनी मिळून काही करायचंय ही जबाबदारी आता तणावपूर्ण न राहता आनंददायी होत होती. एकेक चेहरा उल्हासित आणि प्रफुल्लित होताना दिसत होता.
दुसरी गोष्ट होती ती अशी की, जेव्हा आव्हानं येतात तेव्हा थोडं चिंतित व्हायला होतं, कितीही म्हटलं तरी थोडी उदासी येतेच. शेवटी आपण सगळी माणसंच आहोत, साहजिक आहे असं थोडंसं खच्ची होणं, पण ही अवस्था फार काळ नाही राहीली पाहिजे. खरंतर आनंदाची, दु:खाची, विजयाची, पराजयाची, उद्विग्नतेची आणि उल्हासाची कोणतीच भावना सदासर्वकाळ टिकू देऊ नये. त्यात थोडंफार गुंतून किंवा रममाण होऊन शक्य तितक्या लवकर वास्तवात येणं कधीही चांगलं. जेव्हा जेव्हा असं उदास वाटतं, आव्हानांनी डोकं जास्तच वर काढलेलं असतं तेव्हा आम्ही थोडंसं मागे वळून बघतो. अशा किंवा अनेक वेगवेगळ्या आव्हानांना आपण कसे पुरून उरलो तो चलचित्रपट समोर आणतो. त्यावर कधी चर्चा-संभाषणही करतो. पूर्वी फडकवलेल्या यशाच्या पताका मनाला उमेद देऊन जातात. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे त्यात अडकून पडत नाही. पूर्वीच्या यशाची सतत वाच्यता करीत राहीलो तर त्यात वेळ वाया जाईल. सद्यपरिस्थितीतील मानसिक उदासिनतेला पळवून लावण्यापासून उभारी देण्यापर्यंतच ह्या पूर्वार्धातील यशस्वितेचा डिंगोरा पिटायचा. एकदाका ते काम झालं की दरवाजा बंद. आमच्या मीटिंगमध्येही आम्ही एकूणच वातावरण उल्हासित करण्यासाठी एक प्रयोग केला. ‘चला आठवूया आपण आत्तापर्यंत कोणकोणते अटकेपार झेंडे लावलेत ते समोर आणूया’. आणि माहोल बदलायला लागला, एकेक हात वर यायला लागले. ‘ऑस्टे्रलिया! एका महिन्यात अडीच हजार पर्यटक भारतातून पहिल्यांदाच नेण्याचा पर्यटन क्षेत्रातला अनेकांना चकीत करणारा विक्रम, त्याने एकूणच वाढलेलं ऑस्टे्रलियाचं पर्यटन’. ‘महागडं जपान अतिशय कमी किमतीत आणून मोठ्या संख्येने जपानची दारं भारतीय पर्यटकांना खुली केली ते वर्ष 2016’. ‘वुमन्स स्पेशल-जगातील एक आश्चर्य!’ ‘शिमला मनालीचं 365 daysचं पर्यटन’. ‘लेह लडाखला दरवर्षी जास्तीत-जास्त महिला न्यायचा विक्रम’. ‘युरोपमध्ये पंचाहत्तर प्रकारचे ग्रुप टूर्सचे सहल कार्यक्रम’. ‘फक्त दीड लाखात अमेरिका सहल आणून हजारो पर्यटकांचं पूर्ण केलेलं अमेरिका स्वप्न’... कॉन्फरन्स रूम आता टोटली एनर्जाइज्ड झाली होती. इनमिन तीन तासांच्या त्या मीटिंगच्या वेळातला एक तास आम्ही भूतकाळातल्या ह्या रम्य आठवणींमध्ये व्यस्त केला. ह्यापेक्षा जास्त वेळ आमच्याकडे नव्हता. आता त्यातून बाहेर येणं गरजेचं होतं. आमची जनरल मॅनेजर शिल्पा मोरे अशा वेळी वास्तवात आणण्याचं काम करते. मजेत मी तिला टाईमकीपरही म्हणते. ‘कम बॅक...कम बॅक, आता काय करायचंय ते बघूया’ ह्या तिच्या टेबल ठोकण्याच्या सवयीने आम्ही सगळे मीटिंगमध्ये अजेंड्यावर आलो. भूतकाळातून बाहेर येता येता प्रोजेक्ट मॅनेजर भावना सावंत म्हणाली, ‘क्रीएशन ऑफ वीणा वर्ल्ड हे सुद्धा आपलंच चांगलं काम आहे नाही का?’ सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे इतक्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या की आता, ‘आंधी आये या तुफान हम रुकेंगे नही!’ असा जोश प्रत्येकामध्ये दिसत होता.
खरंच आहे, ‘मागे वळून पाहिलं तर इतर अनेक अकम्प्लिशमेंट्सप्रमाणे वीणा वर्ल्डची निर्मिती खरंच झाली का? आपण हे करू शकलो का?’ असा प्रश्न पडतो. वीणा वर्ल्डला तीन वर्ष झाली तेव्हाच्या अॅन्युअल मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं होतं की वीणा वर्ल्डने पर्यटनक्षेत्रात खंबीरपणे पाय रोवलेयत. त्यात आनंद बाळगूया पण त्यातून बाहेर येऊया. तो आता इतिहास आहे त्याची वाच्यता नको आणि अभिमानही. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान मोठं आहे तिथे आपल्या सर्व शक्ती पणाला लावूया. मल्टिनॅशनल्सच्या तुलनेत आपली होम ग्रोन, पूर्णपणे भारतीय कंपनी अशा दिमाखात पुढे नेऊया की पर्यटनक्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याबद्दल कुणााच्याही मनात शंका राहणार नाही.
मीटिंगची सांगता करताना प्रॉडक्ट टीमला म्हटलं, ‘मागे वळून पाहिल्यावर आपलीच कामं आपल्याला चमत्कार वाटतात किंवा ती तशी वाटली पाहिजेत म्हणून आजचं आपल्या हातातलं काम एकदम चोख झालं पाहिजे. जेव्हा तीन वर्षांनी आपण मागे वळून पाहू, तेव्हा आज ह्या क्षणी जे काम आपल्या हातात आहे त्याची यशस्विता एक चमत्कार वाटला पाहिजे. तेव्हा भूतकाळातून शक्ती घेऊन बाहेर येऊया आणि भविष्याच्या दिवा स्वप्नात न रंगता वर्तमानातलं आजचं आपलं काम एका वेगळ्याच लेव्हलला नेऊन ठेवूया. आजच्या कामाचा भविष्यात पश्चाताप होणार नाही, भविष्यात कारणं द्यावी लागणार नाहीत किंवा खंतही वाटणार नाही असं काहीतरी करूया. आता बोलण्यातही वेळ नको घालवूया. चला, ‘उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आतापासूनचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, त्याचं सोनं करूया!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.