आपण रोज करीत असलेल्या कामाचा वर्तमानावर तसेच भविष्यावर कुठेना कुठे परिणाम होत असतो. सर्वप्रथम आपलं काम अशा कोणकोणत्या गोष्टींना स्पर्श करतं त्या सर्वांची आपल्याला कल्पना आहे का? जर असेल तर मग आपण त्या प्रत्येक गोष्टीला न्याय देतोय का? अनावधानाने आपल्याकडून काही राहून गेलंय हे समजण्यासाठी आपण थोडंसं थांबून-मागे वळून अवलोकन करतो का? मागे बघताना त्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टींकडे आपण कसं बघतो? मागे वळून अवलोकन करणं हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढच ते धोकादायकही...
हाच विषय होता आमच्या मागच्या आठवड्यातील प्रॉडक्ट टीमसोबतच्या एका मीटिंगचा.
आम्ही इतक्या छान व्यवसायात आहोत नं, की खरंच मला त्याचा अभिमानही आहे आणि आनंदही. इथे रोजचा दिवस वेगळा असतो. नवा असतो. रोज कुठेतरी काहीतरी घडत असतं, नव्याने गोष्टी उमजत असतात. भारतात आणि जगभरात टूर्स सुरू असतात. योजनाबद्ध पद्धतीने आखीव-रेखीव स्वरूपात कामं चाललेली असतात. सगळं काही सुसंयोजित रितीने करायचा प्रत्येक टीमचा प्रयत्न असतो, त्याप्रमाणे सगळं घडतही असतं. बरं कुठे पासपोर्ट हरवला, परदेशात कुणी आजारी पडलं, एखाद्या ठिकाणी लँडस्लाईड झालं, कुठे मोर्चा वा रास्ता रोको झालं... अशा अचानक येणार्या प्रत्येक अडचणींवर काय उपाययोजना करायची हे ही ठरलेलं आहे, त्यासाठी आमचं गेस्ट रीलेशन डीपार्टमेंट आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट डीपार्टमेंटची टीम चोवीस तास आमच्या टूर मॅनेजर्स आणि तेथील लोकल असोसिएट्ससोबत जोडलेली असते. ह्या टीम्स सुंदर समन्वयाने आपापली जबाबदारी सांभाळत असतात म्हणूनच एकावेळी युरोपमध्ये साठ ते पासष्ट, अमेरिकेत पंधरा ते वीस, साउथ ईस्ट एशियात पंचेचाळीस ते पन्नास आणि काश्मिर कुलूमनाली लेहलडाख नॉर्थ ईस्टपासून दक्षिणेकडच्या अंदमानपर्यंत शंभर ते सव्वाशे सहली व्यवस्थित सुरू असतात आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यटक आनंदात असतात. नुकतीच गेस्ट रीलेशनच्या टीममध्ये जॉईन झालेली शिल्पा पाटील रीव्ह्यू मीटिंगमध्ये प्रांजळपणे बोलली, ‘आपले टूर मॅनेजर्स काय जादू करतात टूरवर कोण जाणे, पण आलेल्या पत्रांची पोच म्हणून आपल्या गेस्टना फोन करते तेव्हा त्यांचा आनंद आणि आपल्या टूर मॅनेजर्सबद्दलचे अतिव समाधानाने दिलेले रीमार्क बघून आपण सगळे मिळून एक खूप चांगलं काम करतोय ह्याचा अभिमान वाटतो. मलाही आय अॅम अॅट द राइट प्लेस असं वाटतं त्यामुळे’. शिल्पा पाटीलचा रीमार्क कँडिड होता पण ऑर्गनायझेशनच्यादृष्टीने महत्त्चाचा होता. नवीन टीम मेंबरला असं वाटणं ही समाधानाची गोष्ट आहे. ऑर्गनायझेशनमध्ये माणसं येत-जात असतात, पण जी दीर्घकाळ राहतात त्यांना सतत हे समाधान मिळत राहीलं तर अॅकच्युअली वीणा वर्ल्डचा ऑर्केस्ट्रा छानतर्हेने वाजत राहील. गेल्या पाच वर्षांत वीणा वर्ल्ड पर्यटनक्षेत्रात दिमाखात उभं राहीलं पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट घडवून आणण्यात संपूर्ण टीम यशस्वी झाली, ती वीणा वर्ल्डच्या नैतिक मूल्यमापनाला धरून संस्कृतीची रुजवात करण्यात. अजून मोठा पल्ला गाठायचाय. आत्ता कुठे त्या रुजवातीतून छोटसं रोपटं उभं राहीलंय, त्याचा वृक्ष बनायला खूप वेळ लागणार आहे आणि त्यासाठीचा संयम, शांतपणा, चिकाटी आमच्या सर्वांमध्ये बाणवावी लागणार आहे.
‘बाय अँड लार्ज’ आता प्रत्येक वीणा वर्ल्ड टीम मेंबरला त्याचं-त्याचं काम कळलेलं आहे. आपण काय करतो? आपल्याकडून ऑर्गनायझेशनला काय अपेक्षा आहेत? आपल्या कामातून अंतिम रीझल्ट काय हवा आहे हे प्रत्येकाला उमजलंय. थोडक्यात आमच्या प्रत्येक मॅनेजरने आणि ह्युमन रीसोर्सच्या टीमने त्यांचं काम चोख बजावलंय. हा झाला वीणा वर्ल्ड ‘लक्ष्य’कडे पोहोचण्याचा पहिला पडाव, फर्स्ट माईलस्टोन. मागे याच सप्तरंगमध्ये श्री. संदीप वासलेकरांच्या लेखात वाचलेलं एक वाक्य डोक्यात बसलंय, ‘प्रत्येक माणसाला आपण काय करतो हे बर्यापैकी माहीत असतं पण आपण ते का करतो हे जोपर्यंत उमजत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला-कामाला पूर्णत्व येत नाही’ वर्ष-दीड वर्षापूर्वीच्या लेखात हे वाचल्याचं आठवतं, पण त्यानंतर ते इतक्या वेळा कोणत्याही गोष्टीचा हेतू किंवा उद्देश स्पष्ट होण्यासाठी आम्ही वापरलंय की काही विचारू नका, आणि त्याचा खूप फायदाही झालाय. श्री. वासलेकरांना खास धन्यवाद.
आता वीणा वर्ल्डचा आणि प्रत्येक टीम मेंबरचा प्रवास ‘काय’ कळल्यानंतर ‘का’कडे सुरू झालाय किंवा केलाय. आमच्या प्रॉडक्ट टीमच्या मंथली मीटिंगचा यावेळचा अजेंडाही तोच होता. प्रॉडक्ट टीम म्हणजे तसं बघायला गेलं तर ऑर्गनायझेशनमधलं महत्त्वाचं डीपार्टमेंट. नित्यनवं काही शोधणारी टीम आणि ते शोधावच लागतं, कारण आज पर्यटनक्षेत्रात-देशविदेशातील टूरिझम बोर्डस्चा वीणा वर्ल्डकडे बघण्याचा दृष्टीकोन हा चांगला आहे. ज्यावेळी सर्वजण आपल्याकडे एक चांगली संस्था म्हणून बघत असतात तेव्हा आपली जबाबदारी वाढते. सतत वेगळं आणि यशस्वी असं काही करीत रहावं लागतं. आज वीणा वर्ल्डकडे अमेरिकेच्या एकसे एक वीस प्रकारच्या ग्रुप टूर्स, युरोपचे ग्रुप टूर्ससाठी तब्बल पंचाहत्तर प्रकारचे यशस्वी सहल कार्यक्रम, साउथ ईस्ट एशियाच्या तीस प्रकारच्या सहली, भारतातील पन्नास प्रकारच्या सहली आणि हजारांहून अधिक कस्टमाईज्ड हॉलिडे आयटीनरीज, हे जेव्हा वेबसाईटवर बघायला मिळतं तेव्हा कुणालाही आश्चर्यात पडायला होतं. थोडक्यात वीणा वर्ल्डसाठीच नाही तर पर्यटनक्षेत्रातल्या कुणालाही ह्या वेगवेगळ्या कल्पकतापूर्ण कार्यक्रमाचा फायदा होतो. जरी वीणा वर्ल्डकडे कस्टमाईज्ड हॉलिडे डीपार्टमेंट असलं तरी आमचीही अनेक मित्रमंडळी आहेत जी स्वत:च स्वत:चा कार्यक्रम आखून सहलीला जातात. त्यांना माझा सल्ला असतो की, आधी वीणा वर्ल्ड वेबसाईटवरचे कार्यक्रम बघा, तिथे तुम्हाला साजेसा एकतरी कार्यक्रम मिळेलच, त्याचा अभ्यास करून तुमचा कार्यक्रम ठरवा. वेळ वाचेल आणि कार्यक्रमाची आखणीही नीट करता येईल. चूक होणार नाही. हे उत्तमोत्तम कार्यक्रम तयार करण्याचं काम आमची प्रॉडक्ट टीम करीत असते. कितीही उत्कृष्ट कार्यक्रम असला तरी त्यात दरवर्षी वेगवेगळे बदल करावे लागतात. पर्यटनस्थळात बदल घडत असतात, काही गोष्टी आऊटडेटेड होतात तर काही नव्याने येतात, पर्यटकांचे ट्रेंड्स बदलतात, काळानुरूप आवडी-निवडींमध्ये बदल होत राहतो, ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. हे सगळं काम खरंतर ऑगस्टमध्येच झालं होतं कारण आम्ही या सप्टेंबरमध्ये २०१९ च्या सहली लाँच केल्या होत्या.
आता पुढची पायरी होती ती दृष्टीकोन आणखी व्यापक बनविण्याची. केरळ आमचा महत्त्वाचा सेक्टर. आम्ही-आमचे पर्यटक-आमचे केरळचे हॉटेलीयर्स-ट्रान्सपोर्टर्स सर्वच केरळच्या पर्यटनासाठी असलेल्या महत्त्वाच्या सीझनकडे डोळे लावून बसलेले असताना तिथे आलेल्या महाभयंकर पुराने सर्वांच्या आशेवर पाणी फिरवलं. केरळची पाहणी करण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मी, सुधीर आणि आमची टीम केरळमध्ये फिरत होतो तेव्हा केरळ पूर्णपणे पूर्वपदावर आल्याचं बघून आनंद झाला पण दिवाळीचा मोठा सीझन म्हणावा तसा नाही भरला. गो एअरवेज, जेट एअरवेज, इंडिगो एअरलाईन्स, स्पाईस जेट ह्या सर्वांनी खूप सहकार्य केलं. त्या पर्यटकांच्या भविष्यातल्या सहलीसाठी तिकीटांचा उपयोग करण्याची परवानगी देऊन आमच्यावर आणि आमच्या पर्यटकांवरही कृपादृष्टी दर्शवली हे बरं झालं. पण आमचा एक केरळचा असोसिएट भेटल्यानंतर जे बोलला ते हृद्यापर्यर्ंत वेदना देऊन गेलं. ‘तुम्हाला एक केरळ सेक्टर एका सीझनमध्ये नाही चालला तर फरक पडणार नाही पण इथे आम्ही जे तुमच्या पर्यटकांकडे डोळे लावून बसलोय त्यांनी काय करायचं, तुम्हाला अनेक आहेत पण आमच्यासाठी फक्त तुम्ही आहात’. त्यांना तसं वाटणं साहजिक आहे, पण केरळ हा वीणा वर्ल्डसाठी एक बिझनेस सेक्टर म्हणून अतिमहत्त्वाचा आहेच पण केरळसारखी हिरवीगार सुजलाम सुफलाम नेत्रसुखद सृष्टी आमच्या पर्यटकांनाही तेवढीच हवी आहे. ‘केरळ नाही पाहिलं तर तुम्ही काय पाहिलं?’ इतकं ते महत्त्वाचं आहे. पण परिस्थिती वेगळी असल्याने मी माझे विचार माझ्याजवळच ठेवले. त्याची वेदनाच एवढी मोठी होती की तिथे माझी फुंकर कामी येणार नव्हती. डिसेंबरपासून केरळला जास्तीत जास्त पर्यटक कसे नेता येतील आणि तिथल्या नुकसानीला कसा हातभार लावता येईल यासाठी आमच्या प्रॉडक्ट टीमची जबाबदारी आता वाढलीय. आनंदाची गोष्ट केरळच्या सहली सुरू झाल्यात व आता ५ सहली तिथे आहेत. केरळच्या सहली वाढवायच्या हे काम झालं, पण ते ‘का’ करायचं ह्याचा हेतू स्पष्ट झाल्याने आता तेच काम वेगळी अनुभूती देऊन जाईल.
केरळचा पूर, काश्मिर प्रश्न, युरो-डॉलरची वाढ, डिझेलच्या किमतीत वाढ ह्या गोष्टींनी सप्टेंबर ऑक्टोबर थोडा झाकोळल्यासारखा झाला. एअरलाईन इंडस्ट्री-हॉटेल इंडस्ट्री-पर्यटनसंस्था, नाही म्हटलं तरी थोड्या काळजीतच पडल्या. आता परिस्थिती सुधारतेय. अप-डाऊन हे चालू राहणारच, प्रशंसेने किंवा यशाने मातायचं नाही तसंच निंदेने किंवा अपयशाने खचून जायचं नाही, हे ऑर्गनायझेशनमधल्या प्रत्येकाने अंगी बाणवल्यामुळे जरी पर्यटनक्षेत्रात तेवढी स्वागतार्ह्य परिस्थिती नव्हती तरी आमची टीम तेवढ्याच उत्साहाने आणि उमेदीने काम करीत होती. दे आर नाऊ रेडी टू टेक ऑन एनीथिंग अँड एव्हरीथिंग. ‘लक्ष्य’ एकच, पर्यटकांना आनंद देत भारतातली सर्वात मोठी-सर्वांची आवडती ट्रॅव्हल कंपनी बनायचं आणि ते करीत असताना आयुष्यात सर्वांनी आर्थिक-शारीरिक-मानसिक श्रीमंती, तंदुरुस्ती, शांती आणि समाधान मिळवत यशस्वी व्हायचं.
काश्मिरला लाल चौकात, एकदा मी आणि माझे वडील एका दुकानदाराशी बोलत होतो. तो म्हणाला, ‘सीझनमध्ये सगळेच येतात पण तुम्ही ऑफ सीझनला येता हे आमच्यासाठी महत्त्वाचं. आमची ऑफ सीझनमधली रोजी-रोटीची चिंता तुम्ही मिटवता, अल्ला आपको सलामत रखे|’ त्याचं ते वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. आणि खरंतर त्यातूनच निर्माण झाल्या, ‘लो सीझन मधल्या लो प्राईसच्या सहली’. त्यामुळे आमचं-पर्यटकांचं-सप्लायर्सचं सवार्ंंचंच भलं झालं आणि भारतात तीनशे पासष्ट दिवसांचं पर्यटन राबविण्यात आम्ही यशस्वी झालो. आमचे चारशेहून अधिक टूर मॅनेजर्स ही आमची खरी वेल्थ. त्यांच्या हाताला सतत काम असणं ही आमची जबाबदारी. पर्यटकांसाठी उत्कृष्ट सहल कार्यक्रम आखणे आणि त्याचबरोबर जगभरचे सप्लायर्स, आमचे टूर मॅनेजर्स आणि संपूर्ण वीणा वर्ल्ड टीमसाठी नवनवीन सहली आणून काम निर्माण करणं हेच आमच्या प्रॉडक्ट डिपार्टमेंटचे हेतू आणि उद्दिष्ट आहेत. एकदा ते समजलं, की मग आपण करीत असलेलं तेच काम आनंद बनून जातं. हा होता मीटिंगचा पहिला पॉईर्ंट, जो साध्य झाला होता. पुढचा पॉईंट होता चमत्कार, त्याविषयी पुढच्या रविवारी.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.