व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. मला एखादी गोष्ट आवडली म्हणून दुसर्याला ती आवडायलाच पाहिजे असं काही नाही. मला माझं मत आहे आणि तुला तुझं, आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे. अर्थात बहुतेक पतीदेवांना हे अमान्य असेल कारण त्यांच्यामते घर एकमताने चालतं आणि ते एक मत असतं त्यांच्या सौ. चं. असो, पण प्रत्येकाच्या मताचा आदर हा सशक्त कुटुंबाचा पाया आहे. कोणत्याही किंवा आमच्या बाबतीत पर्यटन व्यवसायाशी ह्याचं काही घेणंदेणं आहे का?
वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा मी आणि सुधीरने भारत अक्षरश: पिंजून काढला. दर आठवड्याला आम्ही आणि आमचा एक टूर मॅनेजर चेतन, निलेश किंवा विवेक असं त्रिकूट जिथे सहली नेणार होतो तिथे देशाच्या कानाकोपर्यात हॉटेलियर्सना, ट्रान्सपोर्टसना, टॅक्सी युनियन्सना, रेस्टॉरंट्सना भेटी देत होतो, आमची नव्याने ओळख करून देत होतो. नवी विटी नवं राज्य समजावून सांगत होतो. त्यानंतर आम्ही युरोप आणि साउथ ईस्ट एशिया जिथे जास्त पर्यटक जाणार होते त्याचाही दौरा केला आणि जणू आमच्या जहाजाची शिडं अॅडजस्ट केली. पर्यटकांनी जशी आम्हाला प्रचंड साथ दिली तशीच साथ आमच्या देशातल्या आणि परदेशातल्या सर्व पार्टनर्सनी दिली आणि पाच वर्षात वीणा वर्ल्ड चांगल्या प्रकारे पर्यटनक्षेत्रात आपलं स्थान निर्माण करू शकलं. सुरुवातीचा अखंड दौरा झाल्यानंतर प्रवास सुरू होता तो देशविदेशात वेगवेगळ्या ठिकाणी वुमन्स स्पेशल किंवा सीनियर्स स्पेशल सहलींवर गेलेल्या पर्यटकांना भेटण्यासाठी. सहलीचा फर्स्ट हॅन्ड रीपोर्ट प्रत्यक्ष बघण्यासाठी आणि जाणण्यासाठी. पर्यटकांशी संवादातून-भेटण्यातून खूप गोष्टी कळतात. त्यांना काय आवडतं? काय हवंय? काय नकोय? हे ही कळतं. पर्यटकांच्या चेहर्यावरची खुशी सर्व काही सांगून जाते, कुठे नाराजी असेल तिही कळते आणि त्याची जड़ शोधून काढून ती उखडता येते. एकूणच सततचा प्रवास वीणा वर्ल्डसाठी फायद्याचा आहे.
पर्यटनक्षेत्रात स्थिरावण्याची पाच वर्ष झाल्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा मी वेगळ्या तर्हेने प्रवासाला सुरुवात केलीय. गेल्या पाच वर्षात जग खूप बदललंय. टेक रीव्हॉल्युशनमुळे आणि एव्हीएशनमधल्या क्रांतीने माणसांच्या सवयी, आवडीनिवडी, पद्धती हे सगळं ढवळून निघालंय, अर्थातच चांगल्या तर्हेने. देशांमध्ये, शहरांमध्ये, स्थळांमध्येही क्रांतीकारी बदल झाले आहेत. इथे मला एक किस्सा आठवला. एकदा ‘मलेशिया-टली एशिया’च्या लाँच इव्हेंटमध्ये मलेशियाच्या टूरिझम मिनिस्टरसोबत डिनर होतं. जेवताजेवता त्यांना मी प्रश्न केला की, “जाहीर आहे सिंगापूर आणि मलेशियामध्ये टूरिझमच्या बाबतीत प्रचंड स्पर्धा आहे. त्यांनी एखादी गोष्ट केली की त्याच्या वरताण तुम्ही काहीतरी नवं निर्माण करताय, तरीही मला सिंगापूरचा टूरिझम अॅट्रॅक्शन्स निर्माण करण्याचा वेग जास्त वाटतोय. दरवर्षी ते काहीतरी नवीन घेवून येताहेत. तेवढा स्पीड तुमचा आहे असं तुम्हाला वाटतंय का?” त्यांचं लागलीच उत्तर होतं, ‘सिंगापूर जर वर्षाला बदलत असेल तर आम्ही मिनिटाला बदलतोय.’ आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्या दोन्ही देशांमध्ये चुरस लागलीय टूरिझममध्ये कोण पुढे ह्यासाठी. सिंगापूर उगाचच नाही दुसर्यांदा नव्याने भेट देण्याचं एक हॉट डेस्टिनेशन ठरलंय. अशाच तर्हेने जगात बदल घडताहेत. जे काल आवडत होतं ते आज नावडतं झालंय, जे आज महत्वाचं आहे ते उद्या कदाचित आपल्या खिजगणतीतही नसेल. आता पुन्हा माझं नव्याने पयर्टन सुरू झालंय नव्या दमाच्या अधिक आग्रही अशा आमच्या पर्यटकांसाठी, आयटिनरी अपग्रेडेशनसाठी, आऊटडेटेड गोष्टी काढून टाकण्यासाठी, नव्या गोष्टींचा समावेश करण्यासाठी. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी ‘चलो, बॅग भरो, निकल पडो!’.
ह्या माझ्या नव्या प्रवासातलं पहिलं ठिकाण होतं ग्रीस. वीणा वर्ल्डच्या ग्रीसच्या सहली सतत सुरू आहेत. पर्यटकांना ग्रीस आवडतंच, नो डाऊट अबाऊट इट. आमचे टूर मॅनेजर्सही प्रत्येक सहलीचा, तिथल्या घडामोडींचा परामर्श घेऊन ऑफिसला फीडबॅक देत असतात. शक्य ते बदल आम्ही लागलीच करीतही असतो. पर्यटकही इमेलद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया कळवतात पण तरीही माझ्या ह्या नव्या दृष्टीकोनातून सुरू केलेल्या ग्रीसच्या प्रवासाने मला खूप नवीन इनसाइट्स दिल्या, आणि पाच वर्षानंतरच्या ह्या नव्या प्रवासावरही शिक्कमोर्तब झालं. म्हणजे मीच ते केलं आणि सुधीरलाही त्यात सामावून घेतलं. एवढा प्रवास करायचं शक्य होणार आहे ते रीव्हॉल्युशनरी इंटरनेट कनेक्टिविटीमुळे. हल्ली ड्युएल ड्युटी किंवा मल्टिटास्किंग पद्धतीमुळे तसेही तुम्ही घरापासून-ऑफिसपासून-व्यवसायापासून दूर नसता. एवढे दिवस बाहेर राहणं त्यामुळेच शक्य होतं किंवा होणारेय. कधी कधी तर बाहेर असताना ऑफिसची कामही एकाग्रतेने करता येतात आणि तिथे जाण्याचा जो मकसद असतो तोही साध्य होतो.
ह्या नव्या प्रवासात मी ग्रीस पाहिलं ते वेगवेगळ्या अँगल्समधून. वीणा वर्ल्ड झालं तेव्हाच ठरवलं होतं की आपण जे काही करायचं ते प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी. घरातला प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याची मतं वेगळी आहेत, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. घरातल्यांनी प्रत्येकाचं ते वेगळेपण जपलं पाहिजेच पण आपण ज्या पर्यटन व्यवसायात आहोत तिथेही अशी प्रत्येक घराची आणि घरातल्या प्रत्येकाची इमोशन जपता आली तर त्याला अर्थ आहे. घरात कुणाला शॉपिंग आवडत असेल तर कुणाला खाणं, कुणाला वाइल्ड लाईफ तर कुणाला आर्किटेक्चर... व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्याचा सन्मान करण्यातूनच निर्माण झाल्या वाइल्ड लाईफ स्पेशल टूर्स, फेस्टिव्हल स्पेशल टूर्स, सिंगल्स स्पेशल टूर्स, वुमन्स स्पेशल टूर्स, हनिमून स्पेशल टूर्स, फॅमिली स्पेशल टूर्स. अजून अनेक नवनवीन सहली ह्यात नव्याने दाखल होताहेत येत्या काही महिन्यांमध्ये.
अनेक महिला वुमन्स स्पेशलला येतात कारण पतीराजांना वेळ नसतो किंवा पर्यटन आवडत नाही. पण ते सन्मान करतात तिच्या पर्यटन प्रेमाचा ही महत्वाची गोष्ट. ग्रीसमध्ये गेले तेव्हा ग्रीस मला असंच वेगवेगळ्या पर्यटकासाठी वेगळं भासलं. जे सिंगल्स स्पेशल म्हणजे वीस ते पस्तीस वयोगटात आहेत त्यांच्यासाठी अॅडव्हेंचर-स्विमिंग-कयाकिंग-पॅरासेलिंग, पब्ज, बार ह्या सगळ्याची रेलचेल ग्रीसमध्ये आहे. तरुणाई दमेल पण ग्रीसची डेस्टिनेशन्स संपणार नाहीत. हनिमूनर्स पॅराडाईज म्हणजे, ‘ग्रीस, सॅन्टोरिनी इज द परफेक्ट डेस्टिनेशन’. इथलं नैसर्गिक आणि मानवनिर्मित सेटिंगच इतकं उत्कृष्ट आहे की सहजीवनाची सुंदर सुरूवात आणखी अप्रतिम तर्हेने होऊ शकत नाही इतकं ते मस्त आहे. नंतर येतात फॅमिलीज् त्यांना हवं असतं साइटसिईंग, शॉपिंग आणि भोजन त्याची तर रेलचेल आहे ग्रीसमध्ये. मग येतात आमच्या महिला, त्या तर शॉपिंगने वेड्या होतील इतकं प्रचंड शॉपिंग आहे ग्रीसमध्ये, म्हणजे अजून मी इथे वुमन्स स्पेशल का बरं आणली नाही हा प्रश्न मला पडला. सो! लवकरच आम्ही ती अनाऊंस करू. त्यानंतर सीनियर सिटिझन्स, त्यांच्यासाठी आणखी महत्वाचा असतो तो इतिहास. अॅरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेेटो, अचिलेस, हर्क्यूलस, अथेना, अॅफ्रोडाइट, अलॅक्झॅन्डर, जॉर्ज, कॉन्स्टन्टीन...अशा तत्ववेत्ते, वॉरियर्स, राजे, महाराजे, देवदेवतांनी सजलेली ग्रीक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्यांना आनंदी न करेल तरच नवल. आणि फूडीज्साठी म्हणजे खवय्यांसाठी तर ग्रीस म्हणजे पंढरी. ह्यावेळी सहलीसोबत नसल्याने आम्हीही ग्रीक जेवणाचा अगदी मनापासून आस्वाद घेतला. आणि ठरवलं की पुढच्या ग्रीसच्या सहलीत जमेल तेव्हा आपल्या ग्रुप टूर्सना भावेल असा ग्रीक मेन्यू सहलीत समाविष्ट करायचा. जगातल्या वेगवेगळ्या क्युझिन्सची माहिती काढणं, त्याचा स्वाद घेणं, त्यासाठी नवनव्या देशांमध्ये हिंडणं ही आमच्या नीलची हॉबी, त्याला म्हटलं, “ग्रीस तुझी वाट पाहतंय लवकरच भेट दे.” तर असं ग्रीस मला आमच्या वेगवेगळ्या पर्यटकांसाठी वेगवेगळं भासलं. एक ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणूनही माझी ड्युटी आहे, कुणी कसं आणि काय बघावं हे सांगण्याची. सगळ्यांना एकाच पारड्यात तोला-मापायचे दिवस आता संपले. ‘एव्हरी इंडिव्हिज्युल इज इम्पॉर्टंट अॅन्ड वुई मस्ट रीस्पेक्ट द इंडिव्हिज्युअॅलिटी’, आम्ही सुध्दा, आणि प्रत्येक व्यावसायिकानेही.
सो असा हा ‘अराऊंड द वर्ल्ड’ प्रवास सुरू झालाय. पुढच्या महिन्यात ईस्टर्न युरोपवर धाड टाकायचीय. आय अॅम लुकिंग फॉरवर्ड टू एस्टोनिया, क्रोएशिया, लिथुआनिया, लॅट्विया, रोमानिया, सर्बिया, बेलारूस, स्लोव्हाकिया, अर्मेनिया. वेस्टर्न युरोपची सहल झाली की सध्या सर्वांचे डोळे लागतात ते ह्या देशांकडे त्यामुळेच आमचीही स्वारी वळतेय तिथे. काही देश बघायचे राहिलेत ते आधी बघणं सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचं कारण ‘अंडर वन रूफ’ वीणा वर्ल्डकडे सगळ्या गोष्टी साग्रसंगित देता आल्या पाहिजेत.
रोजच्या कामात मी असा थोडासा बदल केलाय, दृष्टीकोन आणखी थोडा व्यापक केलाय आणि माझं मलाच एकदम उत्साही वाटायला लागलंय. थोडासा बदलही आयुष्य आणखी इंटरेस्टिंग करतो नाही? असे छोटे मोठे बदल आपण करीत राहिलं पाहिजे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.