मार्च क्लोजिंग, ईयर एंडिंग, फ्लाईट्स इश्यूूज, सीझनची सुुरुवात ह्या सगळ्यात बुडालेल्या टीमला त्या पीक सीझनवेळी थोड्या त्यांच्याशी असंबंधित गोष्टीत खेचायचं म्हणजे, आता हे काय सीझनमध्ये? इथे इतकी कामं पडलीयेत, ह्यांचं वेगळंच काही हे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, चेहर्यावर, कपाळावर किंवा मनातल्या मनात रीमार्कस् येणार हे माहीत होतं.
नावात काय आहे? किंवा नावातच सर्व काही आहे! हा तसा वादाचा मुद्दा. अर्थात कोणत्याही गोष्टीला किंवा वस्तूला नाव असलंच पाहिजे ह्यावर सर्वांचं एकमत. पण अनेकदा ऑर्गनायझेशनमध्ये काही गोष्टींना नाव द्यायचं राहून जातं आणि मग सामान्य नावानेच आपण त्याला ओळखतो. वीणा वर्ल्ड सुरू झाल्यावर अनेक गोष्टींना आम्ही नावं दिली. काही नवीन होती काही जुनीच ठेवली. कोणत्याही गोष्टीला नावं ठेवणं हा आमचा छंद, अर्थात चांगल्याअर्थाने. गेल्या आठवड्यात आम्हाला अशीच एक अनामिक गोष्ट मिळाली ज्याच्या नामकरण सोहळ्याची संपूर्ण स्टार्ट टू एन्ड प्रोसेस आनंद देऊन गेली.
पूर्वी आम्ही दरवर्षी संपूर्ण सहलींचं एक जाडजूड पुस्तक बनवायचो. ज्याला ब्रोशर म्हटलं जायचं. इंटरनेट-वेबसाईटच्या जमान्यात हे ब्रोशर मागे पडलं, जवळजवळ बंदच झालं. वेबसाईटला अपडेटेड सर्व काही मिळायला लागलं. पर्यटकांनाही वेबसाईटची सवय झाली. आमच्या दृष्टीनेही ते चांगलं झालं कारण सहली ज्या-ज्या गोष्टींवर अवलंबून असायच्या त्या म्हणजे हॉटेल, स्थलदर्शन, विमानप्रवास ह्या सगळ्यांमध्ये सतत बदल घडायला लागले. काही गोष्टी धडाधड आऊटडेटेड होत होत्या तर अनेक नवीन गोष्टींचं आगमन होत होतं. सहली अपग्रेड करायला स्कोप मिळायला लागला. एकदा ब्रोशर छापल्यावर ह्या गोष्टी एकतर बदलता यायच्या नाहीत किंवा जर बदलल्या तर ते ब्रोशर किंवा त्यातली सहल रद्दबातल व्हायची. त्यासाठी केलेली प्रचंड मेहनत वाया जायची. तसं ते कॉस्टली अफेअर असायचं त्यामुळे पैसेही वाया जायचे. अशा वेळी वेबसाईटने साथ दिली आणि कितीही क्लोज टू अवर हार्ट असलं तरी आम्ही ब्रोशर ह्या गोष्टीला तिलांजली दिली. आणि गेली चार वर्ष ब्रोशरशिवाय आमची घोडदौड सुरू राहिली. पर्यटकांनीही साथ दिली हे महत्त्वाचं, तरीही जेव्हा पर्यटक कार्यालयात येतात तेव्हा त्यांच्या समोर अॅट ए ग्लान्स वीणा वर्ल्ड काय करतं हे कळावं ह्यासाठी आम्ही एक टू फोल्ड लीफलेट तयार केलं. ब्रोशर बनविण्यात अनेक वर्ष घालविल्यानंतर हे लीफलेट माझा केंद्रबिंदू ठरलं. पर्यटकांना सगळ्या गोष्टी त्या सहा पानांमध्ये मिळायला पाहिजेत, त्यांना त्यांची सहल ठरवताना सगळे ऑप्शन्स समोर दिसले पाहिजेत हा आग्रह असल्याने दर तिमाहीला प्रत्येक क्वार्टरला नव्याने प्रिंट होणारं हे लीफलेट शेवटचा हात किंवा एक लास्ट ग्लान्स म्हणून माझ्याकडे यायला लागलं. मलाही ते आवडतं त्यामुळे आनंदाने मी ते करीत असते. ह्यावेळीही ते माझ्याकडे आलं आणि नेहमीप्रमाणे पहाटे उठून मी चेकिंगला बसले. आज स्विमिंगला येणार नाही मला लीफलेट चेक करायचं आहे हे सुधीरला सांगताना मला एकदम साक्षात्कार झाला. अरे! गेली चार वर्ष आपण ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीला लीफलेट म्हणतोय. नॉट फेअर! काहीतरी नाव द्यायलाच पाहिजे. काय म्हणूया ह्याला? विचार चक्र सुरू झालं. गुगल बाबाकडे सजेशन्स मागितल्या. अनेक नावं पेपरवर लिहिली गेली. आम्ही ओल्ड स्कूलवाले त्यामुळे आमच्या हातातून पेपर आणि पेन काही सुटत नाही. चार वर्षांत ह्या लीफलेट नावाच्या बाळाने वीणा वर्ल्डच्या प्रगतीत महत्त्वाची कामगिरी बजावली पण त्याचा नामकरण समारंभच आपण केला नाही. अरेरे! बहुत नाइंसाफी है। आता आणखी वेळ घालवूया नको हे बारसं करूनच टाकूया म्हणत विचारांचं चक्र जरा जोरात फिरवलं.
वीणा वर्ल्ड झाल्यापासून कंपनीचं नाव काय ठेवायचं, आपल्या बिझनेस पार्टनर्सना काय म्हणायचं, वेगवेगळ्या डीपार्टमेंट्सची नावं काय ठेवायची अशा अनेक गोष्टींमध्ये ऑर्गनायझेशनमधल्या सर्वांचाच सहभाग होता. वीणा वर्ल्ड जसं वाढलं तसं मग नवीन गोष्टींमध्ये सर्वांनाच सहभागी करणं अशक्य होत गेलं. तरीही सर्वांनी एकत्र येऊन, चर्चासत्र झोडत, हो-नाही, टू बी ऑर नॉट टू बी करत निर्णय घेण्याची ऑर्गनायझेशनला बर्यापैकी सवय आहे. एखाद्या गोष्टीचा सर्व दिशेेने विचार होणं महत्त्वाचं असतं. कोणतीही गोष्ट सर्व अँगल्सनी विचार न करून डायरेक्टली जर लादली तर कधी-कधी त्याला इतक्या विचित्र गोष्टींचा सामना करावा लागतो की एकतर ती गोष्ट मागे घ्यावी लागते किंवा नव्याने सुधारित आवृत्ती आणावी लागते. अर्थात हे आपण सभोवताली सर्वच स्तरांवर बघतो. त्यामुळे वीणा वर्ल्डमध्ये बहुतेक गोष्टीत सर्वांना किंवा संबंधित टीम्सना समाविष्ट केलं जातंच. तरीही अशा बर्याच गोष्टी ह्या त्यांच्या कामासंबंधित असतात. माझ्या मनात येत होतं की ह्या नामकरण सोहळ्यात सर्वांना समाविष्ट करावं. मार्च क्लोजिंग, ईयर एंडिंग, फ्लाईट्स इश्यूज, सीझनची सुरुवात ह्या सगळ्यात बुडालेल्या टीमला त्या पीक सीझनवेळी थोड्या त्यांच्याशी असंबंधित गोष्टीत खेचायचं म्हणजे, आता हे काय सीझनमध्ये? इथे इतकी कामं पडलीयेत, ह्यांचं वेगळंच काही हे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, चेहर्यावर, कपाळावर किंवा मनातल्या मनात रीमार्कस् येणार हे माहीत होतं. मला मात्र दिसत होतं की, रोजच्या धकाधकीत वेगळं काहीतरी करायला मिळणार होतं, रूटिनमध्ये थोडावेळ अर्धा-एक तास ब्रेक मिळणार होता. प्रत्येक डीपार्टमेंटमध्ये कुणीतरी क्रीएटिव्ह असतंच असतं, त्या क्रीएटिव्हिटीला वाव मिळणार होता. लीफलेटला नाव ठेवणं ही साधी गोष्ट असली तरी ती स्टार्ट टू एन्ड कशा पद्धतीने कमी वेळात करता येते हे ज्युनियर्सना कळणार होतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही गोष्ट पर्सनल किंवा प्रोफेशनल आयुष्यात प्रत्येकाला करावी लागते त्याची एक ट्रायल संपूर्ण ऑर्गनायझेशनच्या सहभागाने होणार होती. पीपल सपोर्ट व्हॉट दे क्रीएट ह्यावर माझा खूप विश्वास आहे त्यामुळे लीफलेटचं जे काही नाव येणार होतं त्यापाठी प्रत्येक टीम मेंबरची आत्मियता राहणार होती कारण सर्वांनी मिळून ते दिलं होतं. प्रत्येक डीपार्टमेंटचे टीम मेंबर्स एकत्र येणार होते वेगळ्या गोष्टीसाठी, थोडी चर्चा करणार होते, इनव्हॉल्व होणार होते हे महत्त्वाचं होतं. आणि मी प्रोजेक्ट दिला, त्या पीक सीझनमध्ये दामटवला असं म्हणणं जास्त चपखल बसेल इथे.
कोणताही प्रोजेक्ट घेतला तर आधी 6W+2H थिअरी आम्ही वापरतो. कारण बर्याचदा काय करायचंय हे माहीत असतं पण का करायचंय ते क्लिअर होत नाही. 6W म्हणजे, व्हॉट? व्हेअर? व्हेन? हू? हूज? व्हाय? हे प्रश्न विचारायचे. त्याने संपूर्ण प्रोजेक्ट क्लिअर केल्यावर तो कसा करायचा त्यासाठी हाऊ आणि तो करताना हर्डल्समध्ये दोन गोष्टी आम्ही बघतो त्या म्हणजे, पास्ट हर्डल्स आणि प्रॉबॅबल हर्डल्स. हा प्रोजेक्ट आधी घेतला होता का? त्यावेळी काही अडचणी आल्या होत्या का? जुनाच किंवा नवीन असेल तरी त्यात रोज बदलत्या आसमंतात काही नव्या अडचणी येऊ शकतात का? ह्या गोष्टी बघितल्या जातात आणि टाईमलाईनमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण केला जातो. इथे हा प्रोजेक्ट कसा पूर्ण झाला, ह्या लीफलेटला काय नाव मिळाल हे स्टेप बाय स्टेप बघूया.
पीक सीझनमध्ये एक छोटासा प्रोजेक्ट जो डायरेक्ट कामाशी निगडीत नव्हता तो देत असल्याने पहिल्यांदाच सॉरी म्हणून घेतलं. त्यांना म्हटलं आपलं लीफलेट नावाचं बाळ आता सहा वर्षाचं झालंय पण वीणा वर्ल्ड उभं करायच्या घोडदौडीत आपण त्याचं बारसं करायला विसरलोय. त्याचं नाव ठेवणे (What) हा आपला प्रोजेक्ट. आज दिवसाच्या शेवटी (When) हे नाव पक्कं करायचंय. तुम्ही कोणत्याही लोकेशनला (Where) असाल तेथून तुम्हाला नावाचे ऑप्शन पाठवायचे आहेत. तुमच्या संपूर्ण टीमला (Who) तुम्ही ह्यात समाविष्ट करायचंय. आपल्याला आणि आपल्या पर्यटकांना (Whose) कम्युनिकेशनमध्ये हे नाव वापरायचंय. आता हे का (Why) करायचं तर हे जे लीफलेट आहे ते पर्यटकांना त्यांची सहल किंवा त्यांच्या पर्यटनाच्या पाच वर्ष-दहा वर्ंषाच्या कॅलेंडर बनविण्यात मदत करतं. आता ही सहल घेऊया, नंतर ती सहल घेऊया, पाच वर्षात एवढी राज्य किंवा एवढे देश पूर्ण करूया ह्याची आखणी करायला मदत करतं. पर्यटक जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा त्यांच्यासमोर हे ठेवल्यावर एक्सप्लेन करणं सोप्पं जातं. जे काम वेबसाईट करते त्याच्या आधीची पायरी आहे हे लीफलेट. आपली संपूर्ण संस्था त्यावर अवलंबून आहे कारण वर्षभरातली सर्व प्रोडक्ट्स त्यात असतात. ह्या अॅक्च्युअली मूर्ती लहान किर्ती महानची किंमत लीफलेट म्हणून आपण रसातळाला पोहचवलीय. आता त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपण एक साधं-सोप्पं सर्वांना पटकन कळेल असं नाव देऊया. अनेक मॅगझिन्सना नावं असतात त्यातलाच हा प्रकार. नाव शोधा, आठवा, लिहा, वाचा, विचार करा (How). न आवडलेली नावं खोडून टाका. आवडलेली नावं पाठवून द्या. ह्यातली हर्डल्स- आज तुमचा इन्चार्ज वा मॅनेजर नसेल तर टीममध्ये दुसर्या कुणीतरी इनिशिएटीव्ह घ्या, कुणी नव्हतं म्हणून पाठवलं नाही असं व्हायला नको, काम झालंच पाहिजे. पूर्वी मोठमोठी नावं द्यायची पद्धत होती, काय आहे ते एक्सप्लेन करावं लागायचं तसं नाही झालं पाहिजे. इट शूड बी सेल्फ एक्सप्लनेटरी. वीणा वर्ल्ड नावात ट्रॅव्हल टूर्स असं कुठे नाहीये. तो संदर्भ आणलात तर उत्तम. ठरल्याप्रमाणे नावं आली. ती सगळी एका फुलस्केपवर लिहिली. त्यातली चांगली हायलाईट केली. आणि सर्वानुमते वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल प्लॅनर असं नामकरण झालं. पहिलं बक्षिस एच.आर टीमने घेतलं कारण त्यांनी एकच पक्का ऑप्शन ट्रॅव्हल प्लॅनर हा दिला होता आणि तो परफेक्ट होता. दुसरं बक्षिस मार्केटिंग टीमला, कारण तेच नाव त्यांनी अनेक ऑप्शन्समध्ये दिलं होत. उत्तेजनार्थ बक्षिस ट्रॅव्हल शोकेस नावाला मिळालं जे पुणे टीम, प्रोडक्ट टीम, सेल्स कंट्रोल आणि व्हिसा ह्यांनी सजेस्ट केलं होतं. एकूण दोनशे नावांमधून हे निवडलं गेलं. आणि आमच्या सहा वर्ंषाच्या बाळाला नाव मिळालं. लीफलेट हे नाव हद्दपार झालं. काही नावं चांगली होती पण ती आपण का निवडली नाहीत हे ही सर्वांना कळवलं. प्रोजेक्ट पूर्ण झाला.
तसं म्हटलं तर ही वीणा वर्ल्डची अंदर की बात आहे. बिझनेस सीक्रेट. पण नेहमीप्रमाणे ती मी इथे सर्वांशी शेअर करतेय कारण असंख्य वाचकांमध्ये अनेक नवउद्योजक असणार आहेत. येणार्या जागतिकीकरणात गोष्टी फास्ट होणं, वेळेबरहुकूम होणं, निर्णय घेणं, आपल्यात आणि आपल्या टीममध्ये क्लॅरिटी असणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. वीणा वर्ल्डच्या वाटचालीत ज्या गोष्टी आम्ही महत्त्वाच्या मानतो, ज्याचा फायदा होतो, मल्टिनॅशनल्सशी स्पर्धा करताना आपला आत्मविश्वास- उमेद बरकरार ठेवतो त्या सर्व, भविष्य आपल्या कवेत सामावण्याची इच्छा ठेवणार्या तरुणाईला कामी येतील असं वाटतं. माझ्या बॉलीवूड प्रेमी फिल्मी मनाला थ्री इडियट्स सिनेमातला एक डायलॉग आठवला फ्री अॅडव्हाईज है, लेना है तो लो, नही तो जाने दो। हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.