‘हूग नाही, ‘ह्यूगऽऽऽ’ म्हणून बघ दोन-तीन वेळा’. आमच्या स्कॅन्डिनेव्हिया टूर्सचे आयोजन करणारा आमचा डेनिश पार्टनर डॅनियल ह्या डेनिश-नॉर्वेजियन शब्दाचा योग्य उच्चार शिकवत होता. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हॅप्पीनेस रीपोर्टप्रमाणे गेले काही वर्ष वारंवार डेन्मार्क,फिनलँड व त्याचबरोबर स्वीडन,आईसलँड हे नॉर्डिक देश जगातल्या सर्वात हॅप्पी देशांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावित आहेत. २०१९ च्या वर्ल्ड हॅप्पीनेस रीपोर्टप्रमाणे जगातला सर्वात हॅप्पी देश म्हणून फिनलँड व दुसर्या क्रमांकावर डेन्मार्कची निवड करण्यात आली. नेमके काय बरं घडते या देशांमध्ये की हे देश जगातले सर्वात समाधानी-आनंदी देश ठरतात. या विषयावर डॅनियलबरोबर आमची चर्चा सुरू होती. डेन्मार्कमध्ये तर ‘हॅप्पीनेस रीसर्च इन्स्टिट्युट’ नावाची एक संस्था आहे जी याचा शोध घेत आहे की काही समाज इतर समाजांपेक्षा अधिक सुखी का असतात. केवळ मटेरियलिस्टिक आनंद नव्हे तर मनुष्याचे आयुष्य अधिक सुखी बनविण्यासाठी हॅप्पीनेस या गोष्टीकडे लक्ष वेधून जगभरातील नागरिकांचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न ही इन्स्टिट्युट करते. आणि ह्याच पार्श्वभूमीवर डेन्मार्कमध्ये ‘ह्यूग’ ह्या संकल्पनेला फार महत्त्व दिले जाते असे डॅनियलकडून समजले. ‘ह्यूग’ हा शब्द ‘एखाद्या क्षणाला किंवा भावनेला’ संबोधित करण्यासाठी वापरतात. हा क्षण किंवा ही भावना आपल्याला एकटे असताना किंवा मित्रमंडळींसोबत असतानासुद्धा अनुभवता येते. मग ते घरी असो किंवा बाहेर असो, तो क्षण किंवा ते फीलिंग हे फारच ‘कोझी आणि चार्मिंग’ ठरते. म्हणजे अगदी गुलाबी थंडीत हॉट चॉकलेटचा स्वाद घेत हलके पांघरूण ओढून बसण्यासारखे.
ही ‘ह्यूग’ ची कल्पना मला फार आवडली. जर हे सर्व नॉर्डिक देश हॅप्पीनेस इंडेक्सवर उत्तम क्रमांक मिळवत असतील तर ह्या देशांमध्ये हॉलिडे करताना आपण सुद्धा ‘ह्यूग’ टूर नक्कीच अनुभवू शकतो. ‘नाहीतरी आपण हॉलिडे का घेता? आपल्या फॅमिलीच्या सुख-समाधानासाठीच ना?’ पण ‘ह्यूग’च्या शोधात हॉलिडे घ्यायचा असेल तर आपली हॉलिडे करण्याची पद्धत थोडीशी बदलायला हवी. धावपळ करत घाई-गडबडीत ‘ह्यूग’ची कल्पना समजून त्याचा आनंद डेन्मार्क मध्येच काय कुठल्याही हॉलिडेवर घेणे अशक्य. त्यासाठी थोडेसे आरामात हळूहळू प्रत्येक गोष्टीची चव घेणे, त्या लँडस्केपमध्ये किंवा तिथल्या आर्किटेक्चरमध्ये पूर्णपणे स्वतःला हरवून देऊन त्याठिकाणी एकरूप व्हावे लागेल. अर्थात आपल्या हातातला वेळ, सर्व स्थलदर्शनांची ठिकाणे बघण्याची इच्छा, आपले बजेट ह्या सर्व गोष्टींचे भान ठेवून आपण एका उत्तम हॉलिडेचा आनंद घेऊ शकतो. अर्थात सर्व काही चांगल्या प्लॅनिंगने शक्य आहे. आता डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनच घ्या ना. कोपनहेगनला भेट दिली की आपण तिथल्या ‘मस्ट सी’ अशा मुख्य स्थलदर्शनांना तर भेट देणारच. अर्थात ‘अमालिएनबोर्ग पॅलेस’ जे इथल्या राणी मार्गारिटाचे रॉयल पॅलेस आहे, हे आपल्या लिस्टवर सर्वप्रथम असणारच. ह्या पॅलेसचे आंगण अष्टकोनी असून त्याभोवती चार पॅलेस बिल्डिंग्ज् बांधलेल्या आहेत. चौकाच्या मध्यभागी अमालिएनबोर्गचे संस्थापक ‘किंग फ्रेडरिक V’ चे स्मारक आहे. ‘अमालिएनबोर्ग पॅलेस’ हे मूळतः चार नोबल फॅमिलीज्साठी बांधले गेले होते, पण १७९४ मध्ये जेव्हा ख्रिसचिआनबोर्ग पॅलेस जळाला तेव्हा रॉयल फॅमिलीने हा पॅलेस विकत घेतला. ‘ख्रिसचिआनबोर्ग पॅलेस’ कोपनहेगनमध्ये स्लॉटसोल्मेन या बेटावर बांधलेला एक राजवाडा आहे, जिथे आत तिथल्या पंतप्रधानांचे कार्यालयसुद्धा आहे. ही सुंदर इमारत म्हणजे केवळ ‘डेनिश पार्लमेंट’ नसून ती ‘सुप्रिम कोर्ट ऑफ डेन्माकर्’या नावानेही प्रसिद्ध आहे. अजूनही इथले रॉयल स्टेबल्स, रॉयल रीसेप्शन रूम्स आणि पॅलेसचे चॅपल हे रॉयल फंक्शनसाठी वापरले जातात. ख्रिसचिआनबोर्ग हे डेन्मार्कच्या एक्झिक्युटीव्ह,ज्युडिशिअल आणि लेजिसलेटिव्ह या तिन्ही सुप्रिम पावर्सचे घर आहे. ही जगातली एकमेव अशी इमारत आहे ज्यामध्ये सरकारच्या तीन्ही महत्त्वपूर्ण शाखा एकाच ठिकाणी दिसतात.
या पॅलेसेस्बरोबरच कोपनहेगनमध्ये आपण टिवोली गार्डन्स् आणि लिटिल मरमेडला भेट देता. टिवोली गार्डन्स् हे जगातले एक सर्वात जुने अम्युझमेंट पार्क आहे जे आजही लहानमोठ्यांना तितकाच आनंद देते. डेनिश लेखक हॅन्स ख्रिश्चन अँडरसनच्या काल्पनिक कथेवर आधारित असलेल्या लिटिल मरमेडची भेट आपल्याशी होते ती कोपनहेगनच्या समुद्रकिनार्याच्या खडकांवर. एडवर्ड एरिकसन या शिल्पकाराने या कथेतल्या लिटिल मरमेडला पितळेच्या स्टॅच्यूच्या रूपात आपल्यासमोर इथे उभे केले आहे. ही सर्व ठिकाणे कोपनहेगनमध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाणे असून कुठल्याही डेनिश हॉलिडे प्लॅनचा अविभाज्य भाग असतात हे नक्की. पण जर डेनिश कल्चर पूर्णपणे समजून आपल्या हॉलिडेला खरंच परिपूर्ण बनवायचे असेल तर लिटिल मरमेड, टिवोली आणि रॉयल पॅलेसेस्च्या पलिकडे बघायला हवे.
‘ह्यूग’ म्हणजे एक सुंदर ‘कोझी’ फीलिंग, ज्याचे भाषांतर करणे तसे कठीण असले आणि उच्चारसुद्धा कठीण असला तरी ते डेन्मार्कमध्ये अनुभवणे मात्र कठीण नाही. सर्व महत्त्वाची ठिकाणे बघून झाली की आपण आपल्या कोपनहेगन हॉलिडेची सुरुवात करू शकतो. स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये ‘समर’ सीझन फार कमी वेळ असतो आणि उन्हाळ्यातही हवामान तसे प्रसन्न असते. इतर वेळी थंडीवर मात करण्यासाठी स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये गरम पाण्याचे हॉट टब्स व सौना बाथ्स घेण्याची प्रथा फारच लोकप्रिय आहे. पाच ते सहा डिग्री सेल्सिअस तापमान असताना या लाकडाच्या गरम सौना बाथमध्ये आपण पूर्णपणे रीफ्रेश होतो. इथे तापमान जवळपास २५ ते ३५ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. कोपनहेगनच्या पुढच्या हॉलिडेवर या सौनाचा आनंद घेत तुम्ही चक्क कोपनहेगन हार्बरचे सुंदर पॅनोरॅमिक दृश्य बघत सेलिंग करण्याचासुद्धा आनंद घेऊ शकता. छोटा ग्रुप असेल तर दहा-बारा लोकांचे प्रायव्हेट फ्लोटिंग हॉट टब, सौना अशा बोटीत बसून आपण हार्बरजवळ तरंगत बसू शकतो किंवा डेनिश लोकांबरोबर आणि इतर टूरिस्टस्बरोबर अनेक हॉट टब्स असलेल्या बोटीवर सेलिंग करू शकतो. ह्यापेक्षा छान आरामदायी मोमेंट्स काय बरं असू शकतील.
कोपनहेगनच्या अनेक वेगवेगळ्या रंगीबेरंगी डिस्ट्रिक्टची स्वतःची वेगळी ओळख आणि खासियत आहेत. आपण या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टस् आणि नेबरहूड्सना भेट देऊन एकाच शहरात वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो. काही ठिकाणे नव्या युगाला आवडतील अशी ‘हिपस्टर’, तर काही अगदी अटीतटी न मानणारी ‘बोहीमीयन’ तर काही एकदम ‘लक्झरी आणि अपमार्केट’. आपला जसा मूड असेल तसे इथल्या डिस्ट्रिक्टस्मध्ये फिरत आपण आनंद लुटू शकतो. यातले सर्वात लोकप्रिय नेबरहूड म्हणजे ‘नायहॅवन’. हे पर्यटकांचे कोपनहेगनमधील सर्वात लोकप्रिय क्षेत्र म्हणता येईल. इथली रंगीबेरंगी टाऊन हाऊसेस् व त्यांचे सुंदर रंगीत फसाड (दर्शनीय कमानी) फारच मोहक वाटतात. इथे फिरताना हार्बरला लागून उंच जहाजे फारच आकर्षित वाटतात. एकेकाळी हे शहराचे मुख्य बंदर असून इथे बर्याच सेलर्सचा अड्डा असल्याने ते फार सुंदर नव्हते, पण आता अनेक रेस्टॉरंट्स व कॅफेज्मध्ये बसून आपण ह्या हार्बरचा सुंदर नजारा बघत छान वेळ घालवू शकतो. खरंतर कोपनहेगनमध्ये ह्याला इतर स्थलदर्शनाबरोबर ‘मस्ट डू आणि मस्ट सी’ असे आकर्षण मानून नायहॅवनला भेट दिलीच पाहिजे. ‘नायहॅवन’ हे जवळ-जवळ वीस वर्षे लोकप्रिय डेनिश लेखक हँस ख्रिश्चन अँडरसनचे घर होते. आपल्या खिडकीतून ते जवळच्या किंगस् स्क्वेअर आणि हार्बरच्या नजार्याचा आनंद घेताना दिसत असत.
कोपनहेगनच्या समाजाचे सहनशीलतेचे प्रतिक म्हणजे इथले ‘फ्रीटाऊन ख्रिसचियाना’ हे नेबरहूड. १९७० मध्ये येथील ख्रिसचियान्सहेवन हा पूर्वेचा मिलिटरी तळ काही हिप्पिस् व स्क्वाटर्सनी व्यापला, आणि अगदी आजसुद्धा ते इथे मुक्तपणे फिरू शकतात. एक आगळावेगळा प्रायोगिक व वैकल्पिक समाज बांधण्याच्या ध्येयाने फ्रीटाऊन ख्रिसचियानाची स्थापना झाली. येथे अगदी सुबक आणि क्रीएटिव्ह बेकरीज्, शाकाहरी रेस्टॉरंट्स, भूमिगत कॅफेज् जिथे आर्टिस्ट परफॉर्मन्सेस देतात.. अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. इथल्या हिप्पी कम्युनिटीने जणू जगातल्या इतर हिप्पी कम्युनिटीज्साठी एक उत्तम बेंचमार्क तयार केला आहे. इतर बर्याच गोष्टींबरोबर इथल्या लोकांचे ध्येय आहे ‘कारमुक्त समाज’. म्हणूनच सायकलला इथे फार महत्त्व आहे. तसे संपूर्ण कोपनहेगनमध्येच आपण सायकल घेऊन फिरू शकतो आणि कोपनहेगनची ‘सायकल टूर’ ही फार प्रसिद्ध आहे. पण फ्रीटाऊन ख्रिसचियानामध्ये अजून एक पाऊल पुढे टाकत आपले सर्व सामान घेऊन फिरता येईल अशी कार्गो बाईक तयार झाली, मग ते सामान असो की लहान मुले. सायकलच्या समोरच्या बाजूला लावलेल्या मोठ्या बॉक्समध्ये सामानच नाही तर चक्क माणसांना सुद्धा बसवता येते. अशी बाईक आपल्या हॉलिडेवर जरूर रेंटवर घ्या.
कोपनहेगनला भेट दिल्यावर हजारो वर्षांपूर्वीच्या जगात प्रवास करायचा असेल तर केवळ तीस मिनिटांवर असलेल्या ‘रॉसकिल्डला’ भेट द्या. इथे वायकिंग्ज्ची परंपरा व इतिहासाची झलक दिसतेच शिवाय एका वायकिंग जहाजावर सैर करत या वायकिंग योद्धांच्या नौकाविहाराच्या कलेला दाद देण्याची संधीही मिळू शकते. कोपनहेगन मध्ये अगदी साध्या कॅफेपासून ते मिशेला स्टार फाईन डाईन रेस्टॉरंट्सपर्यंत अनेक उत्कृष्ट रेस्टॉरंट्सचे प्रकार आहेत. नव्या पिढीला इथली ही रेस्टॉरंट्स, सायकलवर प्रवास करण्याची सहजता व अनेक आकर्षणांसोबतच इथलं वातावरण खूपच आवडतं. मात्र त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्या मुलांसोबत हॉलिडेवर जाताना थोडा अधिक वेळ निश्चितच काढा. जरी हा सुपरफास्ट जमाना असला तरी हॉलिडेवर का होईना थोडे स्लो डाऊन करत स्लो टूरिझमचा मनमोहक अनुभव घेऊन पाहूया. स्कॅन्डिनेव्हियामध्ये हिवाळ्यात नॉर्दन लाइट्स दिसतात तर उन्हाळ्यात मिडनाइट सन. उन्हाळ्यात थोडाच काळ मिळणार्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग करत इथे अनेक पिकनिक्स, आऊटडोअर कॉनसर्टस्, स्ट्रीट फेस्टिव्हल्स, बार्बेक्युस्चे आयोजन लोकल्स आणि टूरिस्ट्सच्या ‘ह्यूगऽऽऽ’ हॅप्पीनेससाठी केले जाते. तर हिवाळ्यात लवकर अंधार होत असताना संपूर्ण शहराची रोशणाई करत, गरमागरम हॉट चॉकलेटचा स्वाद घेत सांताक्लॉसचे स्वागत करत ‘ह्यूगऽऽऽ’ शोधण्यात वेळ घालवला जातो. डेन्मार्क असो, स्कॅन्डिनेव्हिया असो किंवा कुठलाही देश असो आपल्या हॉलिडेवर आपल्या परिवाराबरोबर आपण आपला ‘ह्यूगऽऽऽ’ शोधू शकतो बरं का!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.