आपण शेक हॅन्डसाठी हात पुढे करावा तर समोरच्याने आपल्याला मिठी मारावी, आपण मिठी मारण्यासाठी पुढे जावं तर समोरच्याने आपण भारतीय असल्याची नोंद घेऊन आपल्याला नमस्कार करावा. जवळची मैत्री असली की नुसत्या शेक हॅन्डने काम भागत नाही. तेव्हा ‘व्हेन इन रोम, डू अॅज् द रोमन्स डू’ ही म्हण जगत जगभर फिरताना तिथल्या पद्धतींची, रीतीरिवाजांची नोंद घेऊन तशीच वागणूक केली तर त्या ठराविक देशाच्या लोकांनाही आनंद होतो.
‘ऑलवेज् थ्री टाईम्स इन स्वित्झर्लंड!’, हसत हसत बर्नार्डने मला मिठी मारत तीन वेळा गालाला गाल लावत, हवेत मुके घेत सांगितले. परदेशात फिरताना किंवा आमच्या ऑफिसमध्ये कुणी परदेशी बिझनेस पार्टनर्स भेट देत असतात, तेव्हा त्यांना ‘हॅलो म्हणताना’ नेमकं कसं भेटावं हा मोठा प्रश्न असतो. आपण शेक हॅन्डसाठी हात पुढे करावा तर समोरच्याने आपल्याला मिठी मारावी, आपण मिठी मारण्यासाठी पुढे जावं तर समोरच्याने आपण भारतीय असल्याची नोंद घेऊन आपल्याला नमस्कार करावा. अशा अनेक प्रसंगांना जगभ्रमंती करताना सामोरं जावं लागतं. बहुतेक वेळा जास्त ओळख नसेल तर आपण शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे करतो. पण अनेक वर्षांची ओळख असलेल्या बर्नार्डसारख्या बिझनेस पार्टनर्सबरोबर मैत्री झाल्याने नुसत्या शेक हॅन्डने काम भागत नाही. ‘व्हेन इन रोम, डू अॅज् द रोमन्स डू’ ही म्हण जगत जगभर फिरताना तिथल्या पद्धतींची, रीतीरिवाजांची नोंद घेऊन तशीच वागणूक केली तर त्या ठराविक देशाच्या लोकांनाही आनंद होतो.
स्वित्झर्लंडमध्ये हॅलो म्हणजेच, ‘ग्रुएत्झी’ असे म्हणत तीन वेळा तरी गालाला गाल लावत चीक किसिंग करण्याची पद्धत आहे. स्वित्झर्लंडबरोबरच स्लोवेनिया, बेल्जियम, नेदरलॅन्डस्सारख्या काही देशांमध्येदेखील भेटताना तीन वेळा चीक किसिंग करण्याची पद्धत आहे तर शेजारच्या इटली, फ्रान्स, स्पेनसारख्या देशांमध्ये दोनदाच किस केले जाते. फ्रान्समधल्या प्रांता-प्रांताप्रमाणे ही पद्धत बदलत जाते. पॅरिसमध्ये दोन वेळा, दक्षिणेकडच्या प्रोवान्स भागात तीन वेळा आणि लूआर व्हॅलीमध्ये चार वेळा किस केले जाते. पश्चिम स्वित्झर्लंडमधल्या ‘ले डियाब्लरेट्स’ या भागात बर्फाच्छादित पर्वतरांगांवर बांधलेल्या केबल कार व स्कि रीसॉर्ट ग्लेशियर ३०००चा मॅनेजर बर्नार्डने गेल्या आठवड्यात वीणा वर्ल्डच्या ऑफिसला भेट दिली तेव्हाचा हा प्रसंग. नेहमीच दिलेली वेळ पाळण्याचा स्वीस लोकांमधला गुण जणू उपजतच. मुंबईत फिरताना बर्नार्ड इथल्या ट्रॅफिकवर कसा मात करणार ह्याचा विचार मी करीत होते. पण ठरलेल्या वेळेवर जेव्हा बर्नार्ड पोहोचला, तेव्हा एखाद्या गोष्टीतलं सातत्य राखणं आणि समोरच्याला आपल्यावर अवलंबून राहता येईल असा विश्वास निर्माण करून देणं, ह्या स्वीस लोकांच्या क्वालिटीज्वर जगात कुठेही डोळे झाकून अवलंबून राहता येईल ह्याची मनोमन मला खात्री पटली. एकदा स्विस ट्रेनला झ्युरिक स्टेशनवर पोहोचण्यास एक मिनिटाचा उशीर झाला तेव्हा तिथल्या ट्रेन मॅनेजरने आमची दहादा तरी क्षमा मागितली. एखाद्या स्विस व्यक्तीने आपल्याला घरी ६.३० ला जर बोलावले तर वेळेच्या एक मिनिट आधी म्हणजे ६.२९ला किंवा ठरलेल्या वेळेपेक्षा दोन मिनिटे उशीर म्हणजे ६.३२ पर्यंत पोहोचणे योग्य ठरते, असे स्वित्झर्लंडमध्ये कळले. वेळेची किंमत ओळखलेल्या स्विस लोकांबरोबर वेळेतच मिटिंग संपविलेली योग्य ठरेल हा विचार करत मी बर्नार्डचा निरोप घेतला, तेव्हा तो मला परत तीन वेळा किस करीत गूडबाय म्हणू लागला, पण यावेळी मात्र माझी पूर्ण तयारी होती. ‘ऑलवेज् थ्राईस इन स्वित्झर्लंड’ अशी पुन्हा एकदा मला आठवण करून देत बर्नार्डची भेट संपन्न झाली.
बहुतेक युरोपियन देशांमध्ये असे ‘एअर किसिंग किंवा चीक किसिंग’ करत भेटण्याची पद्धत आहे. ब्रिटनमध्ये बहुधा ‘हॅलो-नाईस टू मीट यू’ म्हणत शेक हॅन्ड केला जातो, अमेरिकेत ‘हे’ किंवा ‘हाय’ म्हणत शेक हॅन्ड किंवा मिठी मारली जाते, तर फ्रान्स-स्वित्झर्लंडमध्ये ‘बॅनजूर, ग्रुएत्झी’ म्हणत एअर-किसिंग केले जाते. बर्याच अरब देशांमध्येसुद्धा एकमेकांना भेटताना दोन्ही गालांवर किस करत भेटतात, पण मुख्य फरक हा आहे की अरब देशांमध्ये दोन पुरूषच एकमेकांना भेटताना किस करतात, जे युरोपीयन देशांमध्ये क्वचितच दिसते.
पण शेक हॅन्ड करण्याची पद्धत ही जगात सगळीकडेच दिसते आणि फॉर्मल ग्रीटिंग्स्मध्ये कदाचित सर्वात जास्त वापरली जाते. शेक हॅन्ड करण्याची ही पद्धत ग्रीसमध्ये पाचव्या शतकापासून सुरू आहे. ग्रीस आणि रोमन एम्पायरमध्ये दोन व्यक्ती भेटल्यावर कुणाकडेच हातात शस्त्र लपवलेले नाही नं, ही खात्री करून घेण्यासाठी एकमेकांचा हात धरुन चाचपडण्याची पद्धत सुरू झाली आणि हॅन्ड शेक हे एक शांततेचं प्रतिक झालं. आजसुद्धा लहान मुलं भांडली तर त्यांच्यातील भांडण मिटविण्यासाठी त्यांना शेक हॅन्ड करायला सांगितलं जातं. अनेक वर्षांमध्ये तसं मानवी वागणुकीत फार काही बदल झाले नाही, नाही का?
जून महिन्यामध्ये मी अमेरिकेत एका ट्रॅव्हल एक्झीबिशनसाठी भेट दिली होती तेव्हा अमेरिकन लोकांच्या फ्रेन्डली स्वभावाची जवळून ओळख झाली. ‘हाय! हाऊ आर यू’ हे उत्साहाचे उद्गार ऐकताच आपली जणू अनेक वर्षांची ओळख आहे असे वाटू लागते. अमेरिकेत अगदी घट्ट शेक हॅन्ड करत बर्याच वेळा तिथल्या ‘ग्रिझली बेर्स’ प्रमाणेच ‘बेअर हग’ द्यायची पद्धतसुद्धा प्रकर्षाने जाणवते. अमेरिकेत बरेच वेळा अगदी अनोळखी लोकांना भेटल्यावर सुद्धा ‘हाय! हाऊ आर यू!’ असे ग्रीटिंग केले जाते. या प्रश्नाचे उत्तर तसे अनपेक्षित असते. शेक हॅन्ड आणि हग्स्बरोबरच अमेरिकेत ‘फिस्ट बम्प’ सुद्धा आज लोकप्रिय होतेय. ‘फिस्ट बम्प’ म्हणजे हाताची मूठ वळून एकमेकांच्या हातांना अतिशय हळुवारपणे टक्कर देणं तेसुद्दा स्टाईलमध्ये. आजकाल अमेरिकेत बिझनेसमध्येसुद्धा फिस्ट बम्प देत एकमेकांना भेटणे योग्य समजले जाते. यू ट्यूबवर अमेरिकेचे माजी प्रेसिडेन्ट माननीय श्री. बराक ओबामांचे लहान मुलांबरोबरच नव्हे तर त्यांच्या सहकार्यांबरोबरचे पण फिस्ट बम्प करतानाचे फोटो आणि व्हीडियो प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. बेसबॉल व हॉकीसारख्या ग्रुप गेम्समध्ये खेळाडू एकमेकांना प्रोत्साहित करताना फिस्ट बम्प वापरू लागले व हळूहळू बिझनेसच्या जगातही फिस्ट बम्पला ग्रीटिंगचा दर्जा मिळाला. अमेरिकेतले अजून एक स्पोर्टस्मधूनच आलेले ग्रीटिंग म्हणजे ‘हाय फाईव्ह’, हवेत हात उंच धरत एकमेकांना टाळी देण्याची हाय फाईव्हची पद्धत लहान-मोठ्यांमध्ये लोकप्रिय आहे. अमेरिकेतल्या त्या ट्रॅव्हल एक्झीबिशनमध्ये फिरताना अनेक वेळा मी हाय फाईव्ह, फिस्ट बम्प, हग्स् आणि अर्थातच हॅन्ड शेक्स करत अनेक बिझनेस मिटिंग्स् पार पाडल्या, तेव्हा एकंदरितच इथल्या कॅज्युअल वातावरणाची गम्मत वाटली. युरोपमध्ये फिरताना कायम सूट, जॅकेट इ. चा पोशाख करून हॅलो, बॉनजूर, ग्रुएत्झी, गुटन टागचा वापर करत फॉर्मल वागणूक असते तर अमेरिकेत स्पोर्टस् शूज आणि शॉर्टस्मध्ये आपण जवळ-जवळ कुठेही भेट देऊ शकतो.
अमेरिकेत अनोळखी लोकांनासुद्धा उत्साहाने भेटले जाते तर जपानमध्ये ओळखीच्या लोकांनासुद्धा शांतपणे, संयम राखून भेटले जाते. ‘कोनीचिवा’ असे म्हणत कमरेपासून वाकून एकमेकांना आदराने भेटण्याची जपानी सवय मला खूप आवडली. जपानी लोकांमध्ये लहानपणापासून सर्व बाबतींमध्ये इतकी शिस्त दिसते की त्याचे नवल वाटते. टोकियोच्या मेट्रो स्टेशनवर उभे असताना ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यावर ट्रेनचा दरवाजा कुठे उघडणार ही खूण बघून बरोबर त्या पुढे एका रांगेत शिस्तित लोक उभी होती. प्रत्येकजण शांतपणे उभा होता व त्या रांगेत आम्हीसुद्धा उभे राहीलो. ट्रेन येताच काहीही धावपळ झाली नाही आणि खचाखच गर्दी असूनसुद्धा सर्वजण शांतपणे ट्रेनमध्ये शिरले. जपानमध्ये मला अजून एक गोष्ट फार आवडली ती म्हणजे गुगल मॅप्स बघावेच लागत नाहीत. भाषा फार येत नसली तरी जपानी लोकं इतकी मदतशीर आहेत, की अनेक वेळा पत्ता विचारल्यावर त्यांनी मला त्या ठिकाणी माझ्या सोबत चालत येऊन नेऊन सोडले. जपानमध्ये हॉलिडे घेणार असाल तर ‘कोनीचिवा म्हणजेच हॅलो’ आणि ‘आरिगातो गोसाईमास म्हणजेच थँक्यू व्हेरी मच’चा पुरेपूर उपयोग करा. तुमची ट्रिप नक्कीच सुंदर होईल.
जपानसारखेच अजून एक शांतताप्रिय देश म्हणजे न्यूझीलंड. न्यूझीलंडमध्ये सेल्फ ड्राईव्ह टूरवर असताना तिथल्या सुंदर कोस्टल रोडवर काहीच वर्दळ नसल्याने गाडी चालवायला मजा येत होती. शिवाय भारतासारखीच राईट हॅन्ड डाईव्ह कार असल्याने कसलीच चिंता नव्हती. अशा वातावरणात पुढचे दोन-तीन तास सुद्धा आरामात ड्राईव्ह करत आम्ही फिरलो असतो, पण दिलेल्या पत्त्यानुसार आमचे डेस्टिनेशन समोरच होते. गाडी पार्क करून आम्ही त्या घरी पाऊल ठेवणार इतक्यात तिथला घर मालक ‘माहाका’, आमचे स्वागत करण्यास पुढे आला. पुढे जे घडणार होते त्यासाठी आमची काहीच तयारी नव्हती. आमच्या नाकाला नाक लावून ‘किया ओरा! वेलकम’ असे म्हणत माहाकाने आम्हाला घरात बोलावले. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरच्या ‘काइकुरा’ या कोस्टल शहरात आम्ही व्हेल वॉचिंगसाठी भेट दिली होती. न्यूझीलंडचे मूळचे रहिवाशी म्हणजेच इथले ‘माओरी’. इतर स्थलदर्शनांबरोबरच न्यूझीलंडमध्ये लोकलस्ना भेटण्याची संधी मला मिळाली तेव्हा माओरी कल्चरची ओळख मला करून घेता आली. कपाळाला कपाळ आणि नाकाला नाक लावून भेटण्याच्या या पद्धतीला ‘हाँगी’ असे म्हणतात. एका फॉर्मल हॅन्ड शेकऐवजी माओरी लोक एकमेकांना हाँगी करून भेटतात. एकमेकांचा श्वास मिसळला की मनुष्यातल्या जीवाला जीव भेटला अशी माओरी लोकांची समजूत आहे. माओरी कल्चरमध्ये ‘हा’ म्हणजेच ‘द ब्रेथ ऑफ लाईफ!’ (थेट देवाकडून प्राप्त झालेले) यांच्या पौराणिक कथेप्रमाणे देवाने धरतीमधून स्त्रीला घडवले व त्यांच्या ‘ताने’ ह्या देवाने तिच्या नाकात श्वास भरून तिला जन्म दिला. ती स्त्री शिंकली आणि पहिल्या मनुष्यरुपी स्त्रीचा जन्म झाला, असे माओरी लोकांची समजूत आहे. यापुढे पिढ्यानपिढ्या आपण ह्या श्वासाचे हस्तांतरण करत पुढच्या पिढीला जन्म देतो म्हणून एकमेकांना भेटताना ‘हाँगी’ करत भेटले जाते. एखाद्या माओरी व्यक्तीने आपले असे स्वागत केले, की आपण परके नं राहता ‘तांगाता फेनुआ’ म्हणजेच त्या धरतीच्या लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी एकरुप होते.
न्यूझीलंडमध्ये नाकाला नाक लावतात तर तिबेटमध्ये एकमेकांना भेटल्यावर जीभ बाहेर काढून दाखवण्याची पद्धत आहे. तिबेटमध्ये ह्याला एकमेकांना चिडवणं म्हणत नाहीत तर आदराने वेलकम करणं, स्वागत करणं म्हणतात. इथल्या प्रथेप्रमाणे नव्या शतकात तिबेटचा राजा ‘लँग दरमा’ हा त्याच्या क्रुरतेसाठी ओळखला जात असे. त्याची जीभ काळी होती. तिबेटीयन लोक हे पूनर्जन्मावर विश्वास ठेवतात. म्हणूनच आपला जन्म म्हणजे ह्या राजाचा पूनर्जन्म नाही, आपली जीभ काळी नाही, ह्याची खात्री एकमेकांना करून देण्यासाठीच जीभ दाखवून वेलकम केलं जातं.
जगभरात फिरताना टूरिस्टसारखे न फिरता आपण लोकल रीतीरिवाज पाळत कुठे हॅन्ड शेक, कुठे हग्स्, किसेस, फिस्ट बम्पस, नाकाला नाक लावत किंवा जीभ बाहेर काढून फिरलो तरी एकमात्र आहे, ह्याच हटके अशा वेलकम करणार्या पद्धतीमंध्ये शारिरीक जवळीक साधायची असल्याने मागे काही देशांनी एका घातक विषाणूच्या संसर्गामुऴे आपल्या देशातील लोकांना आपल्याच पारंपरिक वेलकम करण्याच्या पद्धतींवर जाहिरपणे न करण्याची सूचना दिली होती. या तुलनेत आपल्या भारताला मात्र तशी गरज भासली नाही कारण जगातला सर्वात नम्र, आदरयुक्त आणि अतिशय निर्मळ भावना असलेलं ग्रीटिंग हे नमस्कार रूपात आपल्याकडे आहे. अंजली मुद्रेत हाताला हात जोडून, एकमेकांमधल्या दिव्य आत्म्याला नमस्कार करत, समानता आणणार्या या भारतीय नमस्काराला माझा प्रणाम!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.