आजूबाजूचं जग झपाट्याने बदलतंय, जागतिकीकरण आणि स्पर्धा ह्याची अदृश्य अशी भिती प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात कुठेतरी दडलेली आहेच पण रोजची चॅलेंजेसही वाढायला लागली आहेत. आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि वातावरणच बदलून जातं. पुन्हा नवा विचार, नवी मांडणी, नवी गणितं. कधी एखाद्या गोष्टीवर केलेली मेहनत वाया जाते तर कधी आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागतं. पण ह्या सगळ्यात अडकून न पडता नवा जोश स्वतःमध्ये आणि समूहामध्ये जागवावा लागतो.
एप्रिल मे जून म्हणजे आम्हा पर्यटन संस्थांचा पीक सीझन. शाळांना सुट्ट्या त्यामुळे ग्रुप टूर्सद्वारे जाणार्या किंवा कस्टमाईज्ड हॉलिडे घेऊन इंडिपेंडन्टली जाणार्या पर्यटकांची आमच्या सर्वच कार्यालयात गर्दी. प्रत्येक टीम मेंबरवर आणि डीपार्टमेंटवर कामाचं प्रेशर, एक्स्ट्रा लोड. त्यात रोज जगाच्या आणि देशाच्या कानाकोपर्यात काहीतरी घडतच असतं. ह्या संपूर्ण सीझनच्या प्रत्येक दिवसातील रोजच्या कामांना आणि अचानकपणे समोर उभ्या ठाकणार्या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी तयार रहावं लागतं. त्याच उद्देशाने साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही प्री सीझन मीट घेऊन एकमेकांची मानसिक आणि शारिरीक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या वर्षी ही प्री सीझन मीट आम्ही आमच्या घरातच घेतली होती. आता संस्था वाढलीय, ह्यावर्षी प्रत्येकी तीनशे- साडे तीनशे जणांच्या तीन बॅचेसमध्ये ही मीट आम्हाला डीव्हाईड करावी लागली. इतकी वर्ष आम्हीच आम्हाला एकमेकांना प्रेरीत करीत होतो. ह्यावर्षी त्या दिवसाचा थोडा वेळ आम्ही श्री मनीष गुप्ता-मोटिव्हेेशनल स्पीकर ह्यांना बोलावलं, ज्याचा अर्थातच फायदा झाला मीटिंगला, आगळी रंगत आली. हसत खेळत शालजोडीतले टाकीत त्यांनी दिलेली सोल्युशन्स सगळ्यांनाच भावली. सतत काहीतरी वेगळं करीत राहिलं पाहिजे, बाहेरून वेगळा इंटेलिजन्स आपल्यात घालत राहिला पाहिजे ह्या उद्देशाने टाकलेलं हे पाऊल यशस्वी झालं. ह्याच मीटिंगमध्ये त्यांनी आम्हा टीमला एक प्रश्न टाकला की आता मी खूप बोललो, तुम्ही तुमचा एखादा रोजच्या पर्सनल-प्रोफेशनल लाईफमधला प्रॉब्लेम किंवा चॅलेंज सांगा ज्यावर मला तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन देता येईल. असा काही प्रश्न आला की सगळे प्रॉब्लेम नाहीसेे झाल्यासारखे होतात किंवा पटकन काही सुचत नाही. त्या बॉलरूममध्ये शांतता. समोरच बसलेल्या, सप्तखंडांचे व्हिसा करण्यासाठी सहाय्य करणार्या शंभर जणांच्या टीम मधल्या साउथ ईस्ट, फार ईस्ट एशिया सेक्टरचा इन्चार्ज असणार्या अभिषेक ज्ञानेने प्रश्न केला कि, स्वतःला उत्साही कसं ठेवायचं दिवसभर? व्हिसा देणं हे काम प्रत्येक देशाच्या कॉन्स्युलेटच्या अखत्यारित येत असल्याने ह्या डीपार्टमेंटमधली चॅलेंजेसही भरपूर. एखादी गोष्ट अशा पद्धतीने करायची असं ठरवल्यावर अचानक कॉन्स्युलेटच्या नियमांमध्ये किंवा सिस्टिममध्ये बदल होतो. अशावेळी आधीचं काम विसरून नव्याने गोष्टी करायच्या, टीमला त्याचा अवेरनेस द्यायचा, पर्यटकांना ते कळवायचं... असं काहीसं रोजच चालू असतं. थोडक्यात डीपार्टमेंट ऑफ हाय अलर्ट असं आम्ही त्यांना म्हणतो. आमच्या पर्यटकांचे एक लाखाहून अधिक व्हिसा ही टीम प्रतीवर्षी करीत असते. नव्याण्णव टक्के पर्यटकांचे व्हिसा मिळतात ज्यामध्ये ह्या व्हिसा टीमची मेहनत आणि पर्यटकांचं सहकार्य ह्या दोन्ही गोष्टींचा सहभाग असतो. कठोर परिश्रमांना पर्याय नाही कारण ह्या व्हिसावर तर पर्यटकांचा हॉलिडे आणि त्याचा आनंद अवलंबून असतो, जे एक पर्यटन संस्था म्हणूून आमचं अंतिम ध्येय व कर्तव्यही आहे. अभिषेकने प्रश्न आणखी थोडा उकल करून सांगितला, सकाळी उत्साहात मी ऑफिसला येतो, संपूर्ण दिवसात हे हे करायचं ह्याची लिस्ट समोर असते, किंवा मनात ठरवलेलं असतं, कामाला सुरुवातही होते आणि मधूनच अचानक काहीतरी SOS काम समोर येऊन आदळतं, जे न करून चालण्यासारखंच नसतं, मग होतं असं की ठरवलेलं काम मागे पडतं आणि संध्याकाळी ऑफिसमधून निघताना लक्षात येतं की ठरवलेल्या कामांपैकी अर्धीच कामं झालीयेत. अशावेळी उदास व्हायला होतं. हाऊ टू हँडल धिस?
इथे अभिषेकने तसं बघायला गेलं तर आजच्या युगातल्या आपल्या प्रत्येकाचंच प्रातिनिधित्व केलं होतं. रोज अशाच काहीशा सिच्युएशनमधून आपण जात असतो. हाऊ टू कीप अप ऑल द टाईम? हा प्रश्न आहेच. मला ह्यावेळी अजून एक गोष्ट आठवली. एप्रिल मे जून ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला जाणार्या पर्यटकांचं प्री डिपार्चर गेट टुगेदर पुण्याला सुरू होतं. मी बाहेर होते पण लाईव्ह स्ट्रिमिंगवर मला ते दिसत होतं. आत्माराम लाड आमचा सीनियर टूर मॅनेजर पर्यटकांना काही टिप्स देत होता. बॅग कशी असावी, किती आणि काय काय सामान सोबत घ्यावं हा विषय सुरू होता. एअरलाईन जरी वीस किलोची चेक इन बॅग आणि सहा किलोची हॅन्डबॅग अलाव करीत असली तरी तुम्ही चेक इन बॅग पंधरा किलो व हॅन्डबॅग तीन किलोचीच करा, तेवढंच सामान सोबत घ्या कारण तुम्ही सहलीला निघालाय, छोटी-मोठी किंवा भेटवस्तूंची खरेदी होतेच. त्यासाठी जागा असली पाहिजे, आणि नाही झाली खरेदी तर कमी वजनामुळे बॅगेची ने-आण सोपी होते संपूर्ण सहलीवर.... आत्मारामच्या ह्या टिप्समध्ये अभिषेकच्या उत्साहाचं उत्तर दडलं होतं. सकाळी ऑफिसला येताना आपल्या कामांच्या लिस्टची बॅग ही फुल्ल-भरगच्च भरून आणायचीच नाही. सीझनमध्ये दररोज पाच ते सहा हजार पर्यटक भारताच्या किंवा जगाच्या कानाकोपर्यात फिरत असतात. एअरलाईन्स, हॉटेल्स, बसेस आदींवर अवलंबित व्यवसाय असल्याने छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात. दिवसभरात येणार्या अशा अनेक अचानकपणे उद्भवलेल्या चॅलेंजेससाठी त्यात थोडी रिकामी जागा ठेवायची आणि म्हणायचं, येऊ दे काय नवीन चॅलेंेजेस यायची ती, माझ्या बॅगेत जागा आहे त्यांना सामावून घ्यायला. दिवसाच्या शेवटी बॅगेचं ओव्हरलोड नाही आणि मनावरही त्याचा ताण नाही. घरी जाताना जे ठरवलं होतं ते तर केलंच पण आलेल्या चॅलेंजेसनाही हसत हसत झेलत त्यावरही तोडगा काढला हे समाधान आणि ह्या समाधानी मनाने घरी गेलो तर घरच्यांशीही छान सुसंवाद तसंच घरात खुशीचा माहोल घडविण्याची शक्यता आणखी वाढली नाही का, आणि हे छान वातावरण शांत झोपेसाठी कारणीभूत ठरतं आणि उद्याच्या उत्साहासाठीही. उदासीनतेला घालविण्यासाठी आपणच स्वतः तोडगा काढू शकतो. आपल्या पर्सनल - प्रोफेशनल आयुष्यातला आनंद आपणच वाढवू शकतो.
तसं बघायला गेलं तर दिवसभर आपला उत्साह टिकून राहण्यासाठी आपल्याला जी काही प्रेरणा हवी असते ती आपल्या आजूबाजूला उदंड प्रमाणात उपलब्ध असते. अगदी स्वार्थी बनून ती घ्यावीच लागते. येणार्या आयुष्यातील चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी आपल्या रोजच्या कामांचा आवाका वाढंतच राहणार आहे त्यासाठी आपली शक्ती, आपली स्फूर्ती आपणच वाढवली पाहिजे. जेव्हा जेेव्हा मी मुंबईत घरी असते तेव्हा ही शक्ती कुठून मिळते हा विचार केला तेव्हा एक एक गोष्ट नजरेसमोर आली. आमच्या घरासमोर शाळा आहे. सकाळी सहा वाजता मुलं काखोटीला भली मोठी बॅग मारून टेनिस खेळायला येतात किंवा पोहायला. त्यांना बघून मी मला ढकलते पोहायला. खरंच ढकलावंच लागतं, अहो किती कारणं मनातल्या मनात मागे ढकलत असतात विचारू नका, आज काय तर आर्टिकल लिहायचंय, स्ट्रॅटेजी बनवायचीय, काल तर गेले होते, कुणीतरी सांगितलंय आठवड्यातनं रोज नको तीन वेळाच स्विमिंग करा ह्या सगळ्या वैचारिक अडथळ्यांना दूर ढकलून उठो-आगे बढो करीत त्या शाळेतल्या छोट्या मुलांना आदर्श मानून मी जाते स्विमिंगला आणि मग दिवस आणखी शक्तीवर्धक बनून जातो. वर्तमानपत्रातील आर्टिकल लिहीणं हा असाच माझा चालढकलीचा विषय. टाईमलाईनच्या टोकाला अगदी टीपेला पोहोचेपर्यंत ताणणं सुरू असतं, मग मी त्यावर तोडगा काढला आमच्या मार्केटिंग टीममधल्या योगिता हरमळकरला नजरेसमोर ठेवून. आत्ताच तिचं लग्न झालंय, नवीन घरात सेटल होतेय, आर्टिकल वेळेत दिलं तर ती वेळेत घरी जाऊ शकेल हा विचार मनात आला आणि मी स्वतःला शिस्त लावली आर्टिकल तिच्याकडे वेळेआधी द्यायची. त्यामुळे फायदा असा झाला की, मी आणि ती दोघीही स्ट्रेस फ्री. किती करायचं यार, बस हो गया, मी दमले थकले आता नाही होत माझ्याच्याने अशी मनःस्थिती अनेक वेळा येते तेव्हा मी वीणा वर्ल्डच्या छान छान जाहिराती बनविणार्या विभूती चुरी आणि गायत्री नायककडून शक्ती मिळवते. ही दुक्कल रोज विरारहून येते विद्याविहारला. सकाळी चारला त्यांचा दिवस सुरू होतो तो रात्री अकराला संपतो. रोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असा मुंबईचा धकाधकीचा लोकल प्रवास करूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा. अशी अनेक जणं आहेत ऑफिसमध्ये, किती इन्स्पिरेशन आहे बघा नं. शक्तीयुक्त - स्फूर्तीयुक्त अशी ही टॉनिक्स आपल्या सभोवताली वावरत असतात. अगदी घरात आई-बाबा, आजी-आजोबांच्या दिनचर्येकडे पाह्यलं तरी आपल्याला हे टॉनिक मिळेल. उघड्या डोळ्यांनी, शांत चित्ताने आणि हावरट मनाने आपल्याला ह्या प्रेरणादायी गोष्टी टिपता आल्या पाहिजेत आणि त्याद्वारे शक्ती वाढवता आली पाहिजे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.