एका गोष्टीवर एका वेळी एका ठिकाणी एकचित्त होणं, एकाग्रतेने त्या गोष्टीचा फडशा पाडणं हे यशस्वी आणि समाधानी आयुष्याचं इंगित आहे आणि ते ज्याने साध्य केलं त्याला सर्वच बाबतीत आभाळ ठेंगणं झालं. अर्थात हे करायला स्वत:ला काबूत ठेवायला लागतं आणि मुख्य म्हणजे जे काही करु ते अगदी जीव ओतून करावं लागतं.
गेल्या सोमवारी बँकॉकला होते. वुमन्स स्पेशलला गेलेल्या पावणे तीनशे महिलांना भेटायचं होतं गाला इव्हिनिंगला. मंगळवारी सीनियर्स स्पेशलच्या तरुणाईला भेटणं आणि त्यानंतर लंगकावीला मलेशियामध्ये वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल, असा आठवड्याचा दौरा केला. बँकॉकच्या अवनी अॅट्रीयमच्या प्रशस्त बॉलरुममध्ये एन्ट्री केली आणि ‘सेलिब्रेशन ऑफ लाईफ’ म्हणजे काय असतं ह्याचा प्रत्यय आला. सतरा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतची प्रत्येक मुलगी ‘मीच माझी राणी’-‘आय अॅम द क्वीन’ हे त्या आठ-दहा दिवसात जगली होती. तिच्या चेहर्यावरुन, हास्यावरुन मला ती खूशी जाणवत होती. सर्वांना वेलकम करीत असतानाच एक सखी माझ्याजवळ येऊन ‘एक्सक्यूज मी’ म्हणत चक्क माईक घेऊन बोलायला लागली. तिच्या ‘अहो’ नी तिच्या नकळत तिला ही सहल भेट दिली होती आणि अशातर्हेने पहिल्यांदा तिने घरच्यांना सोडून प्रवास केला होता. एकूणच त्या आनंदाविषयी किती बोलू आणि किती नको असं तिला होऊन गेलं होतं. सोबत टूर मॅनेजर्सना तिने धन्यवाद दिले आणि मग समोरची एकेक जण माझ्या पाठी येऊन उभी राहिली, ‘मलापण बोलायचंय’ करीत. आठ बसेसमधली एक एक रिप्रेझेंटेटिव्ह येऊन तिच्या टूर मॅनेजरचा उदो उदो करीत होती आणि त्याला संपूर्ण बॉलरुम टाळ्या शिट्ट्यांचा आवाज करीत पाठिंबा देत होतं. कुणाला थांबवताही येत नव्हतं, ह्या ‘उत्साही दाद’मुळे कार्यक्रम मात्र पंचेचाळीस मिनिटं उशीरा सुरू झाला. दुसर्या दिवशी लवकर उठायचं नव्हतं म्हणून मी सुद्धा त्यांना अडवलं नाही. हाच फीडबॅक हवा असतो. त्यात नवीन काय ऐकायला मिळतं म्हणून माझे कान आसूसलेले असतात आणि ज्यावेळी आपण असं काही छान विचारधन मिळेल म्हणून वाट बघत असतो तेव्हा ते ते गवसतंच. पुण्याची अस्मिता ठकार म्हणाली, ‘वीणा वर्ल्डचा पिवळा रंग हा टूर मॅनेजर्ससाठी फक्त रंग नाही तर त्या सोबत येणारी जबाबदारी त्यांच्या विचार आणि आचारात आहे. पिवळा रंग हा फक्त डोळ्यांना दिसतो तर जबाबदारी वर्तनातून जाणवते. रीस्पॉन्सिबिलिटी त्यांनी स्विकारलीय फ्रॉम द हार्ट!’ मेंदू आणि हृदय, डोकं आणि दिल, टँजिबल इन्टॅन्जिबल, भौतिक आणि नैतिक निर्णय घेताना तो ‘हेडने’ घ्यायचा की ‘हार्ट’ने हा विचारांचा लढा सतत चालूच असतो त्यात रीस्पॉन्सिबिलिटी हा भाग बर्याच अंशी मेंदूच्या अखत्यारित येतो. व्यवहारात आणि व्यवसायात तो परफॉर्मन्स मेजरमेंटचा क्रायटेरिया ठरतो. त्यामुळे ‘रीस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम द हार्ट’ स्विकारण्याची गोष्ट माहीत नव्हती असं नाही पण पुन्हा एकदा नव्याने त्याची आठवण करुन दिली अस्मिताने.
आत्ताच मागच्या आठवड्यात ‘टेड टॉक्स’च्या व्हिडियोजमधला हारवर्ड बिझनेस स्कूलचे प्रोफेसर श्री रोहीत देशपांडे ह्यांचा व्हिडिओ पाहिला. ताज हॉटेलच्या 26/11 अटॅकच्या वेळी सर्व टीमने दाखवलेली एकजूट किंवा तिथून घाबरुन पळून न जाता कसं त्यानी सर्व गेस्टना मदत केली ह्याचा अॅनालिसीस बघून सुन्न व्हायला झालं. ‘रीस्पॉन्सिबिलिटी विथ द हार्ट’चं आणखी चांगलं उदाहरण कोणतं असेल? टेररिस्ट घुसलेत कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, प्राण जाऊ शकतात अशा वेळी ताजमहाल पॅलेस हॉटेलची सर्व एक्झिट्स माहीत असूनही एकही टीम मेंबर पळून गेला नाही? हे कोणतं रसायन आहे? अॅट्रीशन आणि रीटेंशनवर जगभर भलेभले मॅनेजमेंट गुरूज लेक्चर झोडत असताना ताजचं हे उदाहरण आपल्या विचारांना एका वेगळ्या लेव्हलवर नेऊन ठेवतं. ताजची काम करण्याची पद्धत काय आहे ह्याचा आम्ही अभ्यास केला होता वीणा वर्ल्ड जेव्हा झालं तेव्हा. आम्ही लहान असलो तरी मोठे आदर्श सतत आपल्यासमोर असले पाहिजेत ही मानसिकता झालीय. कोणत्याही संस्थेला जेव्हा पाय घट्ट रोवून वर्षानुवर्ष अखंडपणे उभं राहायचं असतं तेव्हा पीपल-कल्चर-स्पीड-इनोव्हेशन ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यातील स्पीड इनोव्हेशन ह्या मेंदूच्या-डोक्याच्या साइडला जातात पण पीपल आणि कल्चर डायरेक्ट हार्ट शी रीलेटेड आणि ते घडवायला वर्षामागून वर्ष जातात. प्रचंड पेशन्स लागतात. पेशन्सवरून आठवलं ह्याच थायलंडच्या वुमन्स स्पेशल मधली पुण्याची वसुंधरा फुंडकर म्हणाली की, ‘एवढ्या सगळ्या मुलींना सांभाळताना ह्या सगळ्या टूर मॅनेजर्सनी जे पेशन्स दाखवले ते खरोखरच कौतुक करण्यासारखं’. मला आता इथेही कनेक्शन दिसतंय ते म्हणजे जर तुम्ही रीस्पॉन्सिबिलिटी, ही ‘फ्रॉम द हार्ट’ स्विकारली असेल तर पेशन्स अंगी बाणतो हळूहळू. मोठी कामं करण्यासाठी पेशन्स ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपण अंगिकारली पाहिजे. मी सुद्धा तशी शॉर्ट टेंपर, पण पर्यटकांच्या सहली करता करता, येणारे प्रॉब्लेम्स सोडवता सोडवता पेशन्स कधी वाढत गेला हे कळलंही नाही आणि आयुष्य खडतर असलं (ते कोणाला नाही?) तरी सुखावह बनत गेलं. असो. तर जर तुम्हाला वेळ असेल तर हा ‘टेड टॉक्स’ व्हिडीओ जरुर बघा. आजंच बरं का, नाहीतर राहून जातो.
पावणे तीनशे महिलांची सर्व व्यवस्था बघणं हे टूर मॅनेजरचं काम, जगातला कोणताही टूर मॅनेजर ते करीतच असतो. टेक्निकली ती सहल करणं हा कामाचा भाग असतो. ते करावंच लागतं. मी माझ्या आयुष्यात पंधरा-वीस वर्ष टूर मॅनेजर म्हणून होतेच त्यामुळे हक्काने सांगू शकते की बाय अँड लार्ज कोणत्याही देशातल्या-कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीच्या टूर मॅनेजरला एकसारखीच कामं असतात. बाहेरुन ग्लॅमरस वाटत असलं तरी टूर मॅनेजरचं करिअर खूप कष्टाचं आहे, मेहनत आहे त्यात. मात्र ज्याने मनापासून स्विकारलंय त्याच्यासाठी कष्ट आणि मेहनत हा आनंदाचा भाग बनून जातो आणि तोच फरक असतो पर्यटकांना अमूक एक टूर किंवा एखादा टूर मॅनेजर का आवडतो ह्यामध्ये. आज वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल्स हा जगातला एक रेकॉर्ड झालाय. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या सहली कुठेही आयोजित केल्या जात नाहीत. आणि ह्या सहलींचं प्रमाण वाढण्यामध्ये टूर मॅनेजर्सनी महत्वाची भुमिका बजावलीय. आता बघानं ह्या सहलीच्या टूर मॅनेजर्स सुविधा देसाई, गुरदीप कौर-मोरे, प्राची प्रधान, मेघा शिंदे, संपदा गौरखेडे, कादंबरी देवल, विशाखा शाह आणि आलोक लोखंडे ह्यानी टेक्निकली सहल तर केलीय पण त्यांच्या बसमधल्या प्रत्येक मुलीमध्ये जो आनंद भरला, ‘मीच माझी राणी’ म्हणून त्यांना शाही थाटात ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगनमें’... असा खराखूरा फील देण्यासाठी जी वातावरण निर्मिती केली ती कौतुस्कापद. हे शक्य झालं कारण ह्या सगळ्यांचं त्यांच्या टूर मॅनेजर ह्या कामावरचं प्रेम किंवा वेड. आम्ही सारेच त्या वेडाने झपाटलेले आहोत. अर्थात ह्या वेडाला आम्ही नेहमी ट्रेनिंगद्वारे चॅनलाइज करीत असतो ते महत्वाचं. मी, सुधीर, सुनिला, नील आम्ही ट्रेनिंग देत असतो आणि घेतही असतो. विवेक कोचरेकर हा आमच्या टूर मॅनेजर्सचा मॅनेजर एकदा ट्रेनिंग देताना म्हणाला, ‘आपण आपल्या स्वत:च्या इच्छेने, कोणत्याही दडपणाखाली न येता टूर मॅनेजर बनण्याचा निर्णय घेतलाय. आई-वडिलांनी आपल्याला इथे ढकललं नाहीये मग जर स्वेच्छेने आपण इथे आलोय तर आपल्याला हे काम मनापासून करायचंय. मनापासून केलं तर त्यात आनंद मिळेल आणि आपल्याला आनंद मिळाला तर आपण आनंद देऊ शकू. आनंद देणं, सहलीवर आनंदाचा माहोल तयार करणं हे आपलं महत्वाचं काम आहे’. वा! आम्ही सारे एकमेकांपासून शिकतो ते असे. माझा ट्रेनिंगचा रोख मग त्या दिशेनेच गेला, ‘तुम्ही स्वत: निर्णय घेतलाय टूर मॅनेजर बनण्याचा मग पेटून उठा आणि एक सर्वात चांगले टूर मॅनेजर बना. आज आपल्याकडे साडेचारशेहून अधिक टूर मॅनेजर्स आहेत, प्रत्येकाला चांगलं काम करायचंय, चला आपल्यातच एक्सलंसीची स्पर्धा लावूया, हेल्दी कॉम्पिटिशन’. आणि हे घडताना दिसतंय. रीस्पॉन्सिबिलिटी नुसती नं घेता ‘रीस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम द हार्ट’ हे तत्व बनलंय. अगदी मनापासून काम करणारे आमचे टूर मॅनेजर्स जगातल्या वेगवेगळ्या सहलींवर वीणा वर्ल्डचा झेंडा अगदी डौलाने फडकवताहेत.
बँकॉकलाच दुसर्या दिवशी सीनियर्स स्पेशलची गाला इव्हिनिंग होती. कार्यक्रमाच्या शेवटी सहलीच्या यशस्वीतेचं आणि ज्यांचे कुणाचे बर्थडेज असतात त्याचं सेलिब्रेशन आम्ही करतो केक कापून. कोण येतंय केक कटींगसाठी? त्यावेळी एकमुखाने आवाज आला सर्व ज्येष्ठ मंडळींकडून ‘सुबोध’. सुबोध जाधव आमचा टूर मॅनेजर, त्याचा काल वाढदिवस होता पण एका गेस्टना हॉस्पिटलाईज करावं लागल्यामुळे त्यांच्यासोबत त्याचा संपूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये गेला होता. सर्वांनी त्याची जाणीव ठेवली कारण सुबोध त्याचं काम मनापासून आनंदाने करीत होता हे त्यांंनी अनुभवलं होतं. गाला इव्हिनिंगनंतरचा केक सुबोधने कापताना तो आनंदी झाला होता पण मला समाधान मिळालं होतं.वीणा वर्ल्डचं कल्चर डेव्हलप होतंय, शेप घेतंय. शेवटी काय तुमच्या आवडीचं काम करा आणि ते नाहीच जमलं तर तुम्ही जे करताय त्यात आवड निर्माण करा. जे काही करु ते जर ‘फ्रॉम द हार्ट’ केलं तर प्रत्येक दिवसाचं आणि क्षणाचं आपण सोनं करु. ‘लेट्स लव्ह लाईफ फ्रॉम द हार्ट!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.