ज्याचं नावच एवढं ऐतिहासिक आहे त्या रस्त्यावर अनेक ऐतिहासिक इमारती बघायला मिळणार हे सांगायला नकोच. त्याच रस्त्यावर आहे माझे सर्वात आवडते दुकान, जे आहे एक वाण्याचे दुकान. पण हा वाणी ऐरागैरा नसून शाही वाणी आहे, ‘फोर्टनम अॅण्ड मेसन’. एका छोट्याशा वाण्याच्या दुकानापासून आज हे एक लोकप्रिय डीपार्टमेन्ट स्टोर झाले आहे.
परवाच मी लंडनला भेट देऊन परत आले तर माझ्या पंधरा वर्षाच्या मुलीने विचारले, ‘काय मग, सगळे ठीक आहे ना, काय म्हणतात आपल्या राणीसाहेब?’. तिच्या या प्रश्नाचे खेळकरपणे उत्तर देत मी तिला सांगितले की, “सर्व ठीक आहे आणि राणीसाहेबांबरोबरच बकिंगहॅम पॅलेसच्या इतर मंडळींनीसुद्धा तुला त्यांचे आशिर्वाद व प्रेम पाठवलं आहे”. त्यानंतर काही वेळ ब्रिटिश उच्चारात गप्पा मारत आमची मौजमस्ती सुरू होती. आजच्या आधुनिक युगात नव्या पिढीमध्येही राजघराण्याचे तितकेच आकर्षण टिकून आहे हे बघून गम्मत वाटली. तसे आजकालच्या या पिढीत प्रसिद्ध असलेल्या नेटफ्लिक्स या इंटरनेटद्वारे आपल्या घरापर्यंत आंतरराष्ट्रीय टी व्ही शोज् व सिनेमा येऊन पोहचलेत. ह्या माध्यमांमुळे हल्लीच अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘द क्राउन’ या मालिकेमधील
‘क्वीन एलिझाबेथ II’ यांच्या आयुष्याची सुंदर झलक सगळ्यांनाच पहायला मिळाली आहे. त्यात मे महिन्यात घडलेल्या प्रिन्स हॅरी व हॉलीवूडची स्टार मेगन मार्कल यांच्या परिकथेतल्या शाही लग्नामुळेही राजघराणे व राजा-राणीच्या गोष्टी या आजसुद्धा उत्सुकता निर्माण करतात. युनायटेड किंग्डम म्हणजेच ग्रेट ब्रिटन हा देश आज एक कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की आहे. जनतेने निवडून आणलेले पार्लमेंट देश चालवते पण राज्याचे प्रमुख स्थान राणीचे आहे. जसे या राजघराण्याचे आकर्षण काही केल्या कमी होत नाही तसेच लंडन शहराचे आकर्षणदेखील दिवसागणिक वाढतच जातेय. काही शहरांना एकदा भेट देऊन आपले समाधान होते. सर्व स्थलदर्शनाची ठिकाणे पाहून त्या शहराची लगेच ओळख पटते. काही शहरांना दोन-तीन फार तर फार चार-पाच वेळा भेट देऊन समाधान होते. पण लंडन हे एक असे शहर आहे की कितीही वेळा भेट द्या पोट भरतच नाही. गेली वीस वर्ष मी लंडनला नियमितपणे भेट देते आहे पण आजसुद्धा तिथे कामासाठी भेट दिली तर एक-दोन दिवस तरी जास्त राहून या शहराचा कोणता न कोणता नवीन पैलू बघायला मिळतोच.
यावेळी आम्ही वास्तव्य केले ते लंडनच्या हाईड पार्कसमोरच्या ‘लंडन हिल्टन ऑन पार्क लेन’ या हॉटेलमध्ये. आपल्या रूममधूनसुद्धा हाईड पार्कचं किंवा दुसर्या बाजूला लंडन आय व लंडन सिटी स्कायलाईनचे दर्शन हवे असल्यास या हॉटेल्सची निवड करा. त्यात लंडनमधल्या मेफेअर या उत्कृष्ट भागात राहण्याची संधी मला फार आवडते आणि सगळ्या महत्वाच्या ठिकाणी चालत जाता येते यासारखे सुख नाही. जेट एअरवेजचे विमान अगदी पहाटे पोहचत असल्याने आपल्याला गेल्या गेल्या तर चेक-इन करायला मिळणार नाही हे मला ठाऊकच होते. तेव्हा हॉटेलमध्ये सामान ठेवून समोरच्या हाईड पार्कमध्ये सायकलिंग, जॉगिंग करणार्या लंडनर्स बरोबरच सर्पेंटाईन लेकमध्ये पोहणार्या बदकांना बघत तिथल्याच कॅफेमध्ये कॉफी घेत प्रवासाचा थकवा नाहीसा झाला. या हॉटेलपासून एका बाजूला लंडनचे शॉपिंग पॅराडाईज म्हणजेच ‘ऑक्सफर्ड स्ट्रीट’ आहे तर दुसर्या बाजूला ‘पिकॅडिली सर्कस’कडे जाणारा रस्ता म्हणजेच पिकॅडिली. बर्याच वेळा लंडन ‘सिटी टूर’ करताना बहुतेक साईटसिईंग
बसेस लंडनच्या मुख्य स्थलदर्शनाचे स्टॉप्स घेत ‘पिकॅडिली’ या रस्त्यावरून प्रवास करतात पण बरेच टूरिस्ट इथे थांबत नाहीत. पण पिकॅडिली या रस्त्यावर अनेक खजिने लपलेले आहेत. ग्रीन पार्क हे लंडनच्या रॉयल पार्कस्मधलं एक पार्क, त्याच नावाचे ट्युब स्टेशन देखील इथेच आहे. पिकॅडिली या रस्त्याचे नाव काही काळ ‘पोर्तुगाल स्ट्रीट’ असे होते. याचे नाव पिकॅडिली का पडले असेल याचे उत्तर बहुधा इतिहासातच आहे. १६२६मध्ये या रस्त्याचे नाव ‘पिकॅडिली हॉल’ म्हणून ओळखले गेले कारण इथल्या एका घरात रॉबर्ट बेकर हा टेलर, त्या काळात शर्टला लागणार्या कट-वर्क लेसच्या कॉलर विकण्यासाठी प्रसिद्ध होता. या कॉलर्सना पिकॅडिल्स म्हणतात व त्याचमुळे कदाचित या रस्त्याचे नाव ‘पिकॅडली हॉल’ व नंतर ‘पिकॅडिली’ असे ठरले. ज्याचं नावच एवढं ऐतिहासिक आहे त्या रस्त्यावर अनेक ऐतिहासिक इमारती बघायला मिळणार हे सांगायला नकोच. अनेक हॉटेल्स जसे इंटरकॉन्टिनेंटल, अथेनीयम, शेरटन, ली मेरिडियन आणि लक्झरीचा उच्चांक म्हणून ओळखले जाणारे ‘द रिट्स’ याच रस्त्यावर आहेत. त्याच बरोबर रॉयल अकॅडमी ऑफ आर्टस, रॉयल एअर फोर्स क्लब, युनायटेड किंग्डममधले सर्वात पहिलं बुकशॉप म्हणून ओळखलं जाणारं वॉटरस्टोन्स् या कंपनीचे ‘हॅचडर्स’ हे सर्वात जुने बुकस्टोर आणि त्याचबरोबर माझे सर्वात आवडते दुकान, जे आहे एक वाण्याचे दुकान. पण हा वाणी ऐरागैरा नसून शाही वाणी आहे. ‘फोर्टनम अॅन्ड मेसन’ ह्या ग्रोसरी शॉपचा पाया तीनशे वर्षांपूर्वी १७०७ मध्ये रचण्यात आला. एका छोट्याशा वाण्याच्या दुकानापासून आज ‘फोर्टनम अॅण्ड मेसन’ हे एक लोकप्रिय डीपार्टमेन्ट स्टोर झाले आहे. उत्कृष्ट दर्जाच्या फूड प्रोडक्टस्, चहा, वाईन्स, पिकनीक बास्केेट्स, गिफ्ट हॅम्पर्स इ. अनेक ब्रिटिशमेड गोष्टींसाठी फोर्टनम अॅण्ड मेसन प्रसिद्ध आहे. ह्यूग मेसन आणि रिचर्ड फोर्टनम यांनी सुरू केलेले छोटेसे हे दुकान आज पिकॅडिलीची शान आहे. फोर्टनम हा ‘क्वीन अॅन’च्या घरी फुटमन होता, राणीच्या अर्ध्या वापरलेल्या मेणबत्या विकून ह्या उद्योगधंद्याची प्रॉफिटेबल सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या तीनशे वर्षात उत्तम दर्जाचे सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ, चहा-बिस्किट्स इ. बरोबर १८३९ मध्ये जनरल पोस्ट ऑफीस तयार होईपर्यंत पन्नास-एक वर्ष हे दुकान पोस्ट ऑफीस म्हणून सुद्धा काम करत होते. वेगवेगळ्या कारणांसाठी टूरिझम हे अनेक वर्ष सुरूच आहे आणि पर्यटकांच्या मागण्या लक्षात घेत वेगवेगळे शोधही लावण्यात आले. साता समुद्रापार प्रवास करणार्या पर्यटकांची गरज ओळखून १७३८ साली ‘फोर्टनम अॅन्ड मेसन’ मध्ये ‘स्कॉच एग्ज’या चविष्ट प्रकाराचा शोध लागला. दीर्घ काळ टिकावे म्हणून उकडलेल्या अंड्याला सॉसेस मीटमध्ये बांधून वरून ब्रेडक्रंब्स् लावून तळण्यात आले, आणि जगातले पहिले स्कॉच एग्ज जन्माला आले. या दुकानातले चहासुद्धा जगप्रसिद्ध आहेत. १९०२ साली किंग एडवर्डसाठी तयार करण्यात आलेल्या फोर्टनम्सर् रॉयल ब्लेन्ड चहासाठी श्रीलंकेच्या चहा बरोबर आसामचा चहा मिसळून एक सुंदर ब्लेन्ड तयार करण्यात आला होता. आज या दुकानात जगभरातून पर्यटक गिफ्टस् घेण्यासाठी व ब्रिटनचा प्रसिद्ध ‘आफ्टरनून टी’ म्हणजेच सॅण्डविचेस्, स्कोन्स्, क्रीम, जॅम व अनेक प्रकारचे चहा ह्या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी इथे गर्दी करतात.
पिकॅडिलीवरच अजून एक जागा या ‘आफ्टरनून टी’ साठी प्रसिद्ध आहे ती म्हणजेच ‘द रिट्स’ हॉटेल. १९०२ पासून लक्झरी हॉटेल्सचा ताज असणार्या द रिट्स्च्या पाम कोर्टमध्ये ‘आफ्टरनून टी’चा सोहळा हा लाइफटाईम एक्सपीरियन्स आहे. बर्थडे, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी लंडनमधल्या सर्वात लोकप्रिय गोष्टींमध्ये द रिट्सच्या आफ्टरनून टीची गणना होते. ‘द रिट्स’ आणि ‘फोर्टनम अॅण्ड मेसन’ सारखेच आणखीन एक ब्रिटिश ट्रेडिशनमधले लोकप्रिय इन्स्टिट्यूशन म्हणजे ‘पेन्हालिगन्स’् हे पर्फ्यूम स्टोर. १८७०मध्ये विलियम पेन्हालिगन या नाव्ह्याने स्थापन केलेले हे पर्फ्यूम स्टोर आज क्वालिटी पर्फ्यूमसाठी प्रसिद्ध आहे. इथेसुद्धा महाराजांसाठी पर्फ्यूम बनवला गेला आहे पण तो चक्क जोधपूरच्या महाराजांसाठी. महाराजांच्या नातीचे नाव ‘वारा’ या पर्फ्यूमला देण्यात आले व पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये हा पर्फ्यूम लाँच झाला. दहा पाऊंडपासून दोनशे पाऊंडपर्यंत सर्व प्रकारचे पर्फ्यूम इथे मिळतात.
‘फोर्टनम अॅण्ड मेसन’ आणि ‘पेन्हालिगन्स्’ या दोनही दुकानांची खासियत अशी की ही दुकाने रॉयल फॅमिलीला सामानाचा पुरवठा करतात. त्यांचा उत्कृष्ट दर्जा ओळखून त्यांना रॉयल वॉरन्ट मिळालेलं आहे. म्हणजे ‘By appointment to her royal majesty’ असा खिताब यांना मिळालेला आहे. आपल्या क्वालिटीची अशी ओळख मिळाल्यानंतर आपल्याकडे पर्यटक व लोकल ग्राहक आकर्षित होणार हे नक्कीच नाही का? पिकॅडिलीवर फिरता फिरता पिकॅडिली सर्कसकडे लंडनच्या थिएटर डिस्ट्रिक्टमध्ये कुठे जेवावे म्हणून मी झोमॅटो हे अॅप ओपन केले. त्यावर रेस्टॉरन्टस्ना जनतेने दिलेले झोमॅटोवरचे रेटिंग बघत मी रेस्टॉरन्टची निवड करत होते तेव्हा हे रेटिंग जणू नवीन प्रकारचे आजच्या युगाचे रॉयल वॉरन्टच आहे असे वाटले. आजच्या या आधुनिक युगात जनताच एखाद्या गोष्टीच्या दर्जावर त्याची लोकप्रियता ठरवते नाही का? लंडनच्या केवळ एका रस्त्याचा आविष्कार पाहायला मला पाच दिवस पुरले नाहीत तर संपूर्ण लंडन पालथे घालायला मला हा जन्म पुरेल का? असा विचार करत मी या शहराला वंदन केले.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.