Published in the Sunday Sakal on 7 January, 2024
इंटरलाकन म्हणजे निसर्गसौंदर्याचा सरताज. प्रत्येक भारतीयाला युरोपला जायचं असतं, युरोपमधल्या स्वित्झर्लंडला डोळे भरून पाहायचं असतं आणि स्वित्झर्लंडमधल्या इंटरलाकनला भेट द्यायची असते. हे फक्त आपल्या भारतीयांचंच स्वप्न नाही तर ते जगातल्या प्रत्येक माणसाचं प्रवाशाचं पर्यटकाचं स्वप्न आहे. अशा ह्या इंटरलाकनमध्ये आम्ही पंधरा दिवसांपुर्वी म्हणजे अॅक्च्युअली ख्रिसमसलाच होतो. चोवीस डिसेंबरचा आमचा कार्यक्रम होता ’ग्रिंडेलवाल्ड फर्स्ट’ ह्या ’टॉप ऑफ अॅडव्हेंचर’ ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी भेट द्यायचा. बर्नीज ओबरलँडमधल्या युंगफ़्राउयॉक रीजनमधल्या ’विंटर स्किइंग पॅराडाइज’ आणि ’समर हायकिंग पॅराडाइज’ म्हणून ओळखल्या जाणार्या ह्या ’फर्स्ट’ ला आम्हीही फर्स्ट टाइम जाणार होतो. ह्या दिवसाकडे डोळे लावून बसलो होतो, कारण आम्हाला ही भेट घडवून आणणार होता युंगफ़्राउयॉकच्या प्रचंड एम्पायरचा सीईओ उर्स केसलर.
सगळं जग ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये हॉलिडेचा आनंद घेत असताना उर्स आणि त्याची पत्नी रिटा आमच्यासोबत संध्याकाळपर्यंत असणार होते, त्यामुळे आम्ही आल्प्सच्या क्लाउड नाइन वरच होतो जणू. इंटरलाकनमधलं अतिसुंदर पॅलेशियल हॉटेल ग्रँड व्हिक्टोरिया युंगफ्रावच्या लॉबीत आम्ही उर्सची वाट बघत होतो. स्विस लोकं टाईमचे पक्के त्यामुळे आणि अदरवाईजही आम्ही सर्वत्रच दहा ते पंधरा मिनिटं आधीच तयार असतो. आपल्या देशाला चिकटलेला ’इंडियन टाइम’चा शिक्का पुसायचाय नं. प्रत्येक भारतीयाने वेळ पाळली आणि वेळेआधी तयार असण्याची सवय लावली तर ’इन इंडिया एव्हरीवन इज इन अ हरी बट नो बडी इज ऑन टाइम’ हा शिक्का पुसायला मदत होईल. नवीन वर्ष सुरू झालंय, लेट्स स्टार्ट प्रॅक्टिसिंग ’बीइंग बिफोर टाइम’. सो, आम्ही येणार्या प्रत्येक लक्झरी कारकडे बघत होतो. मोठ्या गाडीतून एखादा युनिफॉर्मवाला स्वीस शोफर आम्हाला घेऊन जाईल उर्सकडे असं चित्र मनात रेखाटत असताना उर्स आणि रिटा आमच्यासमोर हसत हसत उभे राहिले. आजुबाजूला असलेले हॉटेलचे ऑफिशिअल्स उर्सला मेरी ख्रिसमस करण्यासाठी अगदी हसर्या चेहर्याने आले. उर्सप्रती असलेला आदर आणि त्याला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. उर्स आम्हाला गाडीकडे घेऊन गेला. एक छोटी फोक्सवागेन सीडॅन कार उभी होती. मागच्या सीटवरील स्किइंग इक्विपमेंट्स ठेवण्यासाठी त्यांनी डिकी उघडली तर त्यात स्किबूट्स, पोल्स, स्नो बोर्डस, हेल्मेट अशा सगळ्या गोष्टी भरलेल्या. ’आर यू गोईंग फॉर स्किइंग?’ सुधीरने उर्सला प्रश्न केला. त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘आता चार महिने विकेंड्सना आम्ही असेच स्किइंगला जाणार त्यामुळे गाडी स्किमय होऊन जाते. ’ग्रिंडलवाल्ड फर्स्ट’ तुम्हाला दाखविल्यावर आम्ही स्किइंग करीत प्रत्येक स्कि पॉईंट वा स्टेशनवर जाणार आणि तिथल्या युंगफ़्राउयॉक च्या टीम मेंबर्सना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणार. आज सर्व स्टेशन्स पूर्ण होणार नाहीत पण येत्या चार पाच दिवसांत सर्व टीमला भेटण्याचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत’. वंडरफूल! माणसं उगाच मोठी होत नाहीत किंवा लोकप्रिय बनत नाहीत. त्यामागे असते अखंड मेहनत तसेच एकदुसर्याप्रति खासकरून आपल्यापेक्षा हुद्द्याने छोटे आहेत त्यांच्याप्रति आदर आणि अनुकंपा. उर्सची गाडी एवढी छोटी का? हा विचार करीत असतानाच माझ्या लर्निंगला सुरुवात झाली होती. तसं म्हटलं तर उर्सची ही प्रथम भेट नव्हती. गेली अनेक वर्ष जवळजवळ दर वर्षी उर्स भारतात येतोय. आल्यावर भेटतोच भेटतो. कोविड संपल्या संपल्या त्याने भारतात फेरी मारली होती. तेव्हा आमची ऑफिसेसपण सुरू झाली नव्हती, एका हॉटेलमध्ये आम्ही लंचला भेटलो होतो. त्याला अशा छोट्या मिटिंग्ज आवडतात जिथे खर्या अर्थाने बिझिनेस टॉक्स होतात, आयडियाज शेअर होतात. प्रत्येक वेळी उर्स त्याची वही उघडणार आणि संभाषणातले पॉईंट्स लिहणार, ओल्ड स्कूलमधल्या अभ्यासू विद्यार्थ्याप्रमाणे. ’उर्स मीन्स बिझनेस?’ त्याने कधी इथे आल्यावर मोठ्या पार्ट्या दिल्याचं माझ्यातरी स्मरणात नाही. ’नो शो ऑफ’ हा त्याच्या यशस्वितेच्या मंत्रांमधला एक मंत्र दिसला. आणि म्हणूनच त्याची गाडीसुद्धा छोटी होती. गरजेपुरती होती. गाडीत बसल्यावर आजूबाजूच्यांना आपली गाडी आणि आपण कसे दिसलो पाहिजे, आपला रूबाब कसा कळला पाहिजे ह्यामध्ये आयुष्य बर्यापैकी खर्च करणार्या माझ्या मनाला लाज वाटली. घर गाड्या रूबाब बडेजाव ह्यातून बाहेर आलो तर आपण आपल्या आयुष्याचं काहीतरी करू शकू ह्याची जाणीव झाली. प्रवास आणि प्रवासात भेटणारी माणसं सतत काहीतरी शिकवितात, प्रेरणा देत राहतात ते असं. मला प्रवास आवडतो तो ह्याचसाठी. वीस पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही ग्रिंडलवाल्ड फर्स्टच्या बेस स्टेशनला पोहोचलो. येता येता उर्सने त्याचं बालपण ज्या छोट्याशा गावात गेलं ते गावही दाखवलं. ’वाह! काय अभिमान असेल उर्स तुला आणि तुझ्या गावतल्या लोकांना तुझा. ज्या गावात वाढलास त्या आणि आजूबाजूच्या अनेक गावांसाठी युंगफ्राउयॉक ने जी सुविधा निर्माण केलीय, रेल्वेचं जे जाळं उभं केलंय, जगभरातल्या टुरिस्ट्सचा प्रचंड ओढा जो ह्या रीजनकडे खेचून घेतलायस, सगळंच सो इन्स्पायरिंग!’ त्याच प्रवासात उर्सने अनेक ठिकाणी बनविलेले हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स दाखविले. त्यांची रेल्वे त्याच वीजेवर चालते. त्या बाबतीत संपूर्णपणे स्वयंपूर्ण होण्याची त्याची इच्छा आहे आणि ती ते लवकरच पूर्ण करताहेत. ग्रिंडलवाल्ड फर्स्ट केबलकारमधून आम्ही पंचवीस मिनिटांचा प्रवास केला. ट्रोटीबाइक्सचं बोर्ट स्टेशन, फर्स्ट फ्लायर, माउंटन कार्ट, फर्स्ट ग्लायडरचं श्रेकफेल्ड स्टेशन क्रॉस करीत सभोवतचेे पांढर्या शुभ्र बर्फाची शाल पांघरलेले आल्प्सचे अप्रतिम पहाड बघत आम्ही शेवटच्या स्टेशनवर पोहोचलो. ’टॉप ऑफ द वर्ल्ड’ चा फील काय असतो हे आम्ही अनुभवत होतो. नेचर इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म! जस्ट इमॅजिन, पांढर्या शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या सर्वात उंच डोंगरमाथ्यावर तुम्ही उभे आहात, सभोवताली तुमच्या आयलेव्हलला तशाच डोंगरांची गर्दी आहे आणि पूर्ण ३६० डिग्री व्ह्यू तुम्हाला दिसतोय... तुमच्या आनंदाला परिसिमा उरणार नाही नं. तेच आमचं झालं. उर्सने आम्हाला व्ह्यू पॉईंटवरून हा नजारा दाखवला आणि नंतर तो घेऊन गेला अलिकडेच त्याने बनविलेल्या अफलातून फर्स्ट क्लीफ वॉक वर. असा क्लीफवॉक म्हटलं की बर्याच ठिकाणी काचेचा बॉटम करतात, जेणेकरून तो अनुभव आणखी रोमांचक होऊन जातो. सुधीरने विचारलंही, ’ग्लास बॉटम केलाय का?’ त्यावर उर्सचं उत्तर त्याचं व्यक्तिमत्व दर्शवून गेलं.’ग्लास बॉटमची अनेकांनी भीती वाटते त्यामुळे मी ते केलं नाही. जे काय आम्ही निर्माण करतोय त्याचा आनंद सर्वांना घेता आला पाहीजे.’ वाह क्या बात है! थोड्याफार प्रमाणात आमचं शॅडोइंग सुरू होतं एका सिइओचं. आनंदाची परिसीमा गाठणारा तो क्लिफ वॉक घेऊन आम्ही पोहोचलो रेस्टॉरंटला. उर्सने त्या माऊंटन टॉपवर स्पेशल लंच अरेंज केलं होतं कारण त्या दिवशी होता सुधीरचा वाढदिवस. स्वीस आल्प्समध्ये माऊंटन टॉपवर बर्थ डे सेलिबेशन करण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव. आल्पसचं मोहमयी वातावरण, युंगफ़्राउयॉक ग्रिंडलवाल्ड फर्स्ट टीमचं वॉर्म वेलकम, खुद्द उर्सची सपत्निक उपस्थिती त्यामुळे सुधीरचा वाढदिवस हा आमच्यासाठी एक चिरंतन आनंदी आठवण बनला. केक कटिंग आणि लंच झाल्यावर मी उर्ससारखी वही उघडली आणि त्याला प्रश्न विचारायला सुरूवात केली. कारण उद्या आम्ही त्याचं खरं एम्पायर बघायला जाणार होतो.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.