का जावं कुंभमेळ्याला भेट द्यायला? हा प्रश्न मला वारंवार विचारला गेला. मुंबईतसुद्दा तू क्वचितच देवळात जातेस, अगदी हरिद्वार-ऋषिकेशला जाऊनसुद्धा तू गंगेत जेमतेम हाताची बोटं बुडवून आलीस मग आता डायरेक्ट त्रिवेणी संगमला जाऊन गंगा स्नान आणि तेही ऐन कुंभमेळ्यात? अशाही अनेक प्रश्नांचा भडिमार माझ्यावर करण्यात आला.
तुझं डोकं फिरलंय का? दुसरे कुठलेच ठिकाण मिळाले नाही का वर्षाची सुरुवात करायला? तुम्ही राहणार कुठे, जेवायला कसं मिळेल, कसे फिरणार तुम्ही त्या गर्दीत? असे काळजीची झालर असलेले अनेक उपदेश मला माझ्या मित्र-मैत्रिणींकडून व नातेवाईकांकडून ऐकायला मिळाले. सर्वात मजेशीर तर तिथे गेल्यावर हरवू नका हं हे वाक्य. कारण आत्तापर्यंत कुंभमेळ्यात माणसं हरवतातच हे आपल्याला हिंदी सिनेमांमधनं अनेकदा बघायला मिळाले आहे. दोन आठवड्यापूर्वी प्रयागराज म्हणजेच अलाहाबादमधल्या गंगा, जमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर घडणार्या कुंभमेळ्याला मी भेट देऊन आले.
का जावं कुंभमेळ्याला भेट द्यायला? हा प्रश्न मला वारंवार विचारला गेला. मुंबईतसुद्दा तू क्वचितच देवळात जातेस, अगदी हरिद्वार- ऋषिकेशला जाऊनसुद्धा तू गंगेत जेमतेम हाताची बोटं बुडवून आलीस मग आता डायरेक्ट त्रिवेणी संगमला जाऊन गंगा स्नान आणि तेही ऐन कुंभमेळ्यात? अशाही अनेक प्रश्नांचा भडिमार माझ्यावर करण्यात आला. कुंभमेळ्याला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे अशी काय शक्ती आहे की संक्रांतीपासून मार्चपर्यंतच्या केवळ ५५ दिवसांत जर्मनी किंवा फ्रान्ससारख्या देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकं प्रयागराजला भेट देतात यामागचं कुतूहल.
आता निघालोच आहोत तर केवळ तीन तासांवर असलेल्या वाराणसी शहराला देखील भेट देऊया या उद्देशाने आम्ही आमची वाराणसी आणि अलाहाबादची फ्लाईट तिकीटं बुक केली. त्यानंतर मुख्य प्रश्न उठला तो राहायचे कुठे?. रण ऑफ कच्छह्या गुजरातमधील मिठाच्या वाळवंटात काही वर्षांपूर्वी भेट दिली तेव्हा सरकारने बांधलेल्या टेन्ट सिटीमध्ये राहिलो होतो. तशीच टेन्ट सिटी इथे देखील उभारण्यात आली होती अगदी डीलक्स टेन्टनी सुसज्ज. पण अजून काही वेगळा अनुभव घ्यावा व आपल्या भारतातल्या काही लक्झरी-सुपर लक्झरी टेन्ट्सचा अनुभव घ्यावा या उद्देशाने आम्ही TUTC-द अल्टिमेट ट्रॅव्हलिंग कॅम्प यांच्या संगम निवास आश्रमाच्या आवारात उभ्या केलेल्या लक्झरी टेन्टमध्ये बुकिंग केले. ग्लॅम्पिंग म्हणजे ग्लॅमरस किंवा लक्झरी कॅम्पिंगची कल्पना आज जगभर लोकप्रिय झाली आहे. ही कल्पना भारतात प्रत्यक्षात साकार करण्याचे काम TUTCने सुंदररित्या केले आहे. कॅम्पमध्ये पोहोचायला आम्हाला थोडा उशिर झालाच आणि त्यात सूर्यास्त लवकर होत असल्याने आम्ही TUTCमध्ये पोहोचेपर्यंत अंधार झाला होता.
TUTC ला पोहोचताच आमचे सामान त्यांनी ताब्यात घेतले आणि हॉटेलच्या टीमने आमचे आरती ओवाळून स्वागत केले. गळ्यात जपमाळ घातली, तुळशीच्या गरमागरम चहाने आमचे स्वागत झाले. तेव्हा आपण परफेक्ट ठिकाणी आलो आहोत ह्याची शाश्वती वाटली. हवेत हलका हलका फुलांचा वास दरवळत होता, चंद्र आकाशात दिसू लागला होता व कुंभमेळ्यात श्लोक-मंत्राचे स्वर आणि घंटेचा नाद ऐकू येत होता. कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलच्या रूमला लाजवेल इतका मोठा आमचा टेन्ट होता. उत्कृष्ट जाड मॅट्रेस, अतिशय कम्फर्टेबल बेड्स, बेडसाईड रीडिंग लाईट्स, टेबल लॅम्पस्, कपाटांवरसुद्धा लेदर होते. रीसेप्शनला फोन करण्यासाठी मोबाईल ठेवला होता. एक पडदा उघडताच बाथरूम दिसले. इथेसुद्धा लेटेस्ट स्टाईलचे स्टेनलेस स्टीलचे रेन शावर,२४ तास गरम पाणी, लेदर स्टूल आणि अतिशय सुंदर-सुबक असे बेसिन व वॅनिटी एरिया होता. छोट्यात छोट्या गोष्टीचा विचार केला होता. पायात घालण्यासाठी स्लिपर्स, बाथरोब्स, थंडीसाठी लोकरी पाँचो आणि इतकेच काय तर बाहेर फिरायला जाताना आपल्या वापरासाठी कापडी पिशवी, हॅट, सनस्क्रीन, इन्सेक्ट रीपेलंट, हॅन्ड सॅनिटायझर सर्वकाही ठेवले होते. टेन्टमधल्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करीत असताना आम्हाला त्यांनी अजून एक छोटी पिशवी दिली. त्यात डोळ्यावर लावण्यासाठी स्लिपिंग मास्क व कानात घालण्यासाठी इयर प्लग्स् होते. मंत्र ऐकायला किती चांगले वाटले तरी तुम्हाला रात्री चांगली झोप लागणे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे ही त्यांनी घेतलेली काळजी बघून मन फारच सुखावले. जेवणासाठी डायनिंग टेन्टमध्ये गेलो तेव्हा सुंदर झुंबर लावलेल्या टेन्टमध्ये इंडियन व इन्टरनॅशनल अशा सर्व प्रकारच्या जेवणाने मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले. अगदी डाळ, भाजी, भात, चपातीबरोबर पाव भाजीपासून इटालियन व्हेज लसान्या ते मशरूम टोस्टपर्यंत सर्वकाही आम्हाला आग्रह करून वाढले जायचे. भारतात फिरताना नेहमीच उत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी अनुभवायला मिळते याचं हे उत्तम उदाहरण. जगातल्या कुठल्याही फाईव्ह स्टार टेन्टच्या तोडीचे हे लक्झरी टेन्ट भारतात पाहून माझी मान ताठ झाली. दुसर्या दिवशी आमच्या दिवसाची सुरुवात झाली ती अतिशय सुंदर योगाच्या क्लासने. त्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो त्रिवेणी संगमाकडे.
ह्या ट्रिपवर मी जायचे ठरवल्यावर एक हजार वेळा तरी मला विचारले गेले की, तू गंगेत डुबकी मारणार का?ह्या आधी अनेक वर्षांपूर्वी मी न्यूझीलंडला गेले तेव्हा, तू बंजी जंम्पिंग करणार का?असा प्रश्न केला गेला आणि आता गंगेत डुबकी मारणार का हा प्रश्नसुद्दा काहीसा तसाच वाटला मला. मीडियामध्ये गंगेविषयी ऐकलेल्या काही चूकीचा समज पसरवणार्या गोष्टी तसंच याआधी भेट दिलेल्या लोकांकडून ऐकलेल्या कहाण्यांनी पाण्यात पाय तरी ठेवता येईल का अशी भिती मनात होतीच. पण न्यूझीलंडमध्ये जर डोंगरावरून बंजी जम्प करू शकते तर गंगेत डुबकी मारणे किती कठीण आहे, इट्स अ लीप ऑफ फेथ माय फ्रेन्ड! असे TUTC मध्ये भेटलेल्या एका ऑस्ट्रेलियन माणसाने मला सांगितले. हे ऑस्ट्रेलियन जोडपे भारताचा आविष्कार पाहण्यासाठी आले होते व आमच्यासारखेच कुंभमेळ्याचे कुतूहल त्यांना इथे खेचून घेऊन आले होते. मनापासून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि स्वतःला त्या शक्तीच्या स्वाधीन केले की पुढचे सगळे काही सोपे होते. मग ते बंजी जम्प असो किंवा कुंभमेळा असो. यमुना नदीच्या काठी अनेक बोटी लागल्या होत्या आणि प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेट घालून लोकं सैर करीत होती. पोलिस बोटीमधून फिरत लोकं लाईफ जॅकेट घालण्याच्या नियमाचे पालन करीत आहेत की नाही ते तपासत होते. गम्मत म्हणजे ती जागा स्वच्छ-निर्मळ शुद्ध होती. त्रिवेणी संगमात डुबकी मारल्यानंतर कपडे बदलण्यासाठी ठिकठिकाणी तात्पुरते चेंजिंग रूम्स बनविले होते. TUTC कॅम्पतर्फे आम्ही एका प्रायव्हेट प्लॅटफॉर्मवर जाऊन त्या त्रिवेणी संगमाच्या पवित्र पाण्यात डुबकी मारली व नंतर प्रायव्हेट बोट कम चेंजिंग रूममध्ये कपडे बदलून छोटीशी पूजा करून बायोडीग्रेडेबल द्रोणातली फुलं वाहिली. तिथे गर्दी होती पण गोंधळ नव्हता. लोकांमध्ये भक्तीभावनेतनं आलेली शांतता जाणवली तर पोलिस व भारत सरकारचे उत्तम नियोजन प्रत्येक ठिकाणी जाणवत होते. भारताने ठरविले तर खरंच जगाला मागे टाकू ह्या विश्वासाने मी तिथून परतले.
संध्याकाळी आम्ही कुंभ सिटीला भेट दिली. २५०० हेक्टर एरियामध्ये १२ कोटी लोकांची सोय केली होती. अनेक वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळे भाग होते. बहुतेक साधू कुठल्या न कुठल्या आखाड्याचे मेम्बर होते. त्या सर्वांसाठी व त्यांना भेटायला आलेल्या यात्रेकरूंसाठी एक लाख बावीस हजार टॉयलेट्स,हॉस्पिटल,आणि तिथे पोहोचण्यासाठी ८०० स्पेशल ट्रेन्सचे नियोजन पाहून डोळे दिपले. अनेक लोकांसाठी पुढील काही महिन्यांची तरी रोजी-रोटी कमवायचा हा एक अनोखा मौका होता. या आखाड्यांमध्ये भाविकांसाठी निःशुल्क जेवणाचे भंडारे लागले होते. इथे सर्व काही त्याग केलेले नागासाधू सुद्धा होते. एकही कपडा न घातलेले हे नागासाधू आपल्या परिवारातल्या सर्वांचे पिंडदान करून शेवटी स्वतःचेसुद्धा पिंडदान करीत सगळ्या गोष्टींचा त्याग करतात. जर कुठल्या गोष्टीचा त्यांनी त्याग केला नसेल तर तो दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून असलेल्या आत्म्याचा. त्यांच्याशी बोलण्याचा योग आला तेव्हा कळले की एकाने १२ वर्ष उभेच रहायचा पण केला आहे. तो कधीच बसत नाही. नऊ वर्ष पूर्ण झाली तेव्हा तीन वर्ष काय कठीण आहेत? एकाने आपला उजवा हात कायम वर ठेवायचा पण केलेला दिसून आले. हे सर्व बहुतेक शॅवाईट म्हणजेच शिवाचे भक्त आहेत हे कळले आणि त्यामुळेच शिवशंकराप्रमाणेच काही जण पोशाख करतात हेही प्रकर्षाने दिसून आले. समुद्र मंथनातले विष प्राशन केलेल्या शंकराला हे सर्व आपला देव मानून त्रिवेणी संगमात पडलेल्या अमृताच्या शोधात अमरत्व प्राप्त करण्याच्या ध्येयामागे लागलेले दिसतात. त्यात एका विमानकंपनीचा माजी वैमानिक, जपानवरून आलेली जॅपनीज् योगमाता व एक ऑस्ट्रेलियन बाबासुद्दा दिसला. हिंदू धर्म हा सनातन धर्मच रहावा याचे प्रतिक होता तो कम्प्युटर बाबा. नव्या पिढीच्या पावलावर पाऊल ठेवून हा सर्व काही कम्प्युटरवर सांगतो. कपडे नसले तरी ह्या सर्वांची स्टाईल कमी नव्हती. कुणाच्या डोक्यावर टोपी होती, तर कुणी गॉगल लावून होते. ह्यांना कुठलेच बंधन नाही. हे सगळे नक्की इथे का येतात? या माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे मिळाले. ते इथे येतात आपल्या पर्वाचे विचार पुढे चालवायला, पुढच्या पिढीतल्या साधू होऊ इच्छुक लोकांना आकर्षित करायला, आपापसात विचारांचे आदान-प्रदान करायला सुद्धा! थोडक्यात हे यांचे ज्यात सगळ्यांना कोणतेही शुल्क न भरता निमंत्रण होते. हे सर्व सुखसोईंचे त्याग करून असे का बनतात याचे उत्तर एका बाबाने मला दिले की, इट्स अ कॉलिंग! वेळ आली की पावलं आपोआप तिथे जातात. त्याचे ते उत्तर ऐकून मला प्रयागराज व वाराणसीच्या माझ्या ट्रिपचा उद्देश उमजला. नेहमीची ठिकाणं व नेहमीचे साईटसिईंग न करता या ठिकाणी जगाचा त्याग केलेल्या आपल्यासारख्याच लोकांकडून कधीतरी संयम व शक्ती घेण्याचे कदाचित माझेही हे कॉलिंग असावे. अतुल्य भारता! तुला माझा प्रणाम!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.