IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

क्या है रे तू!

18 mins. read

Published in the Sunday Sakal on 25 February, 2024

मागच्या लेखात ओपन हाऊस’ विषयी लिहिलं होतं, ते ओपन हाऊस खूपच छान आकार घेतंय. जेव्हा मुंबईत असते तेव्हा आठवड्यातून एकदा वीणा वर्ल्डमधल्या ज्यांना कुणाला भेटायचंय त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. कोणत्याही अजेंड्याशिवाय तसंच कामाचं काही बोलायचं नाही हा अलिखित नियम. जस्ट गप्पा मारायच्या. मागच्या आठवड्यात कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची टीम आली होती. गप्पांच्या ओघात तन्वी चुरीने प्रश्न केला, ‘तुमचा आवडता देश कोणता?‘ कठीण असतात नं असे प्रश्न. आईला जर विचारलं, तुला तुझ्या मुलांमधलं कोण जास्त आवडतं तर जी अवस्था होईल तीच अवस्था माझीही झाली. प्रत्येक देश वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतो. ह्यावर आम्ही थोडावेळ चर्चा केली. पण माझ्या उत्तरावर मीच समाधानी नव्हते. कुणी प्रश्न केला तर अचूक उत्तर तर द्यायला पाहिजे. हा प्रश्न मनात घोळत राहिला. आयुष्याच्या उत्तरार्धात एक चांगली सवय लागलीय. चांगल्या सवयी एवढ्या उशीरा का लागतात हा प्रश्न आहेच. तर ह्या सवयीत मनात चलबिचल करणारा एखादा प्रश्न असेल तर घरी जायचं, सकाळपर्यंत मोबाईलसोबत घटस्पोट घ्यायचा, एका जागी शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि त्या प्रश्नावर एकचित्त व्हायचं. त्याबरहुकूम मी मनाला प्रश्न केला. कोणता देश आवडतो मला? पीटर पॅन किंवा अल्लादिनचं जादूचं कार्पेट घेऊन मी सप्तखंडांवर विहार करून लागले. सगळे देश आय अ‍ॅम द वन’ म्हणत हात वर करताना दिसायला लागले. कठीण होतं ते कारण प्रत्येक देशाने कितीतरी चांगल्या आठवणी माझ्यासाठी आनंदी बनविल्या होत्या. त्यांना नाही नाही, यू आर नॉद द वन‘ हे कसं सांगायचं? बहुत ना इंसाफी है! पण मला आज ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच होतं. विनर एकच हवा होता त्यामुळे कठोर व्हावं लागत होतं प्रत्येक देशाप्रती. ‘निर्णय झालाच पाहिजे‘ ही दुसरी चांगली सवय तशी बर्‍यापैकी आधी लागली होती व्यवसायात असल्यामुळे. त्यामुळे इथेही निर्णय झालाच पाहिजे हे त्यावेळी माझ्या मनात बसलेल्या त्या परीक्षकांच्या तुकडीला बजावून सांगत होते. परीक्षकांमध्येही मतांतरं होत होती पण ते हळूहळू करीत उत्तराकडे मार्गक्रमणा करीत होते. ऑडिशन्स, सिलेक्शन, क्वॉलिफाईंग मॅचेस, क्वार्टर फायनल, सेमी फायनल करीत परिक्षकांनी फायनलला दोन देश माझ्यासमोर ठेवले. एक ऑस्ट्रिया आणि दुसरा जपान. आता मी सुप्रीम कोर्ट जज असल्याने निर्णय मला घ्यायचा होता. हू इज द वन? आणि मग ह्या दोन देशांमध्ये घमासान युध्द झालं. दोघंही प्राण पणाला लावून लढत होते. कधी ह्याची सरशी तर कधी त्याची, पण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो आणि तो असायलाच पाहिजे त्याप्रमाणे इस्त्राइल-पॅलेस्टाईन, रशिया -युक्रेनसारखं युद्ध नेव्हर एंडिंग स्टोरी’ करायचं नव्हतं. इसपार या उसपार नो डायलेमा, नो कन्फ्यूजन आणि जपान आणि आस्ट्रियामध्ये युद्धविराम झाला. जपानने बाजी मारली. ऑस्ट्रिया मागे हटला आणि माझा आवडता देश ठरला जपान. मी डोळे उघडले. मला उत्तर मिळालं होतं. निर्णय झाला होता आणि मन एकदम मोकळं झालं, हलकं झालं. एखाद्या फूलपाखरासारखं आनंदात विहार करायला लागलं.

खरंच कसा देश आहे हा आणि का बरं त्याने अव्वल नंबर मिळवला माझ्या मनात आणि इतर देशांच्या तुलनेत? एका बाजूला शांत, हळूवार, नम्रतेच्या सर्व कसोट्या पार करणारा तर दुसर्‍या बाजूला एवढासा चिमुकला असूनही बलाढ्य अमेरिकेशी दोन हात करणारा, क्वालिटी आणि प्रिसिजनच्या बाबतीत जगात अग्रेसर राहणारा, अत्याधुनिकतेची आस असणारा पण संस्कृती आणि परंपरांचा आदर करणारा जपान मला माझ्यासाठी आदर्श वाटतो. प्रेरणा फक्त एखाद्या व्यक्तीकडूनच मिळते असं नाही तर ती कधी निसर्गाकडून, कधी वस्तुकडून तर कधी अशा जपानसारख्या देशांकडून मिळू शकते वा मिळवता येते. जपान एखाद्या छानशा व्यक्तीसारखा वाटतो मला. त्याची अगणित वैशिष्ट्य पाहून खरंच म्हणावसं वाटतं, ‘क्या है रे तू!‘. एक बाजू अतिशय नम्र तर दुसरी बाजू अतिशय कणखर, जे मिळालंय त्यात समाधान पण जे स्वत:ला निर्माण करायचंय त्यात कायम असमाधानी. कर्तृत्वात आणि कर्तव्यात तडजोड नाही. वयाची शंभरी गाठली तरी जपानी माणसाची कार्यमग्नता लीन पावत नाही, किंवा कार्यमग्न असल्यामुळेच जास्तीत जास्त जपानी माणसं आयुष्याची शंभरी गाठतात. दीर्घायुषी बनण्याचा फॉर्म्युलासुद्धा त्यांनी खूप सोप्या पद्धतीने जगाला दिलाय. भरपूर भाज्या खा. अन्न शिजवताना स्टीमिंग, फर्मेन्टिंग, स्लो कुकिंग, ग्रिलिंगचा वापर करा. फ्रेश ताजं अन्न खा. छोट्या प्लेट्समधून खा, हळू हळू खा, पोट थोडं रीकामं ठेवा. भरपूर चाला. रोज सकाळचा व्यायाम आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. सुशी, किमोनो, सुमो रेसलिंग, बेसबॉल, सामुराई, बुद्धीझम, शिंतोईझमसारख्या गोष्टींचा आभिमान बाळगा.

स्टीव्ह जॉब्ज जपानी तत्वज्ञानाचा चाहता झाला, त्याने झेन मेडिटेशन बुद्धीझमचा शिरकाव आयुष्यात करून घेतला आणि असं म्हटलं जातं की अ‍ॅपल प्रॉडक्टस्चं सिम्लिस्टिक डिझाइनचं इन्स्पिरेशन तिथूनच आलं. आतातर जग वेडं झालंयजापनीज फिलॉसॉफी‘ आणि जापनीज वे ऑफ लाइफ’ च्यापाठी. सोप्या भाषेत सर्वांना समजेल उमजेल आणि आत्मसात करता येईल अशा जापनीज फिलॉसॉफीची मी सुद्धा खूपच चाहती आहे. त्यावरील किमान वीस एक पुस्तकं आमच्या लायब्ररीत असतील. आयुष्याचं प्रत्येक दिवसाचं एक उद्दीष्ट असलं पाहिजे सांगणारं इकिगाई’, हा क्षण पुन्हा येणार नाही म्हणून तो पूर्ण जगूया सांगणार इचिगो इचि’, चेंज ही गोष्ट आयुष्यात एक अपरिहार्य हिस्सा बनवा आणि न थकता न दमता सातत्याने सुधारणा करीत रहा सांगणारं कायझेन’, कितीही संकटं आली तरी धीराने आणि धैर्याने त्याचा सामना करा सांगणारं गामन’, अपूर्णतेचं सौंदर्य जाणून त्यात आनंद मिळवायला सांगणारं वाबीसाबी‘, चला उठा सोडून देऊ नका आणि मिळालेल्या आयुष्याचं काहीतरी छानसं करा सांगणारं गनबात्ते वा गम्बारे’, फुटलेल्या वस्तुला चांदी किंवा सोन्याचा वर्ख लावून ती अधिक सुंदर करता येते सांगणारं  किन्स्तुगी’, स्वत:ची दुसर्‍याशी तुलना करू नका सांगणारं ओहबायटोरी’, सिम्प्लिसीटी, माईडफूलनेस आणि क्लटर फ्री आयुष्याचं महत्व सांगणारं कान्सो’, प्रत्येक रीसोर्स मग ती वेळ असेल, वस्तु वा अन्न वाया जाऊ देऊ नका सांगणारं मोट्टाईनाई’, निसर्गाचं महत्व सांगणारं शिनरिन योको’...ही लिस्ट मोठी आहे पण खूपच प्रेरणादायी आहे हे सर्व काही.

जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, सर्वात महागडा देश, समर आणि विंटर ऑलिम्पिक्स भरविणारा पहिला आशियाई देश, उच्च राहणीमानाचा देश, सर्वात जास्त आयुर्मान असलेला देश, बालमृत्यूचं प्रमाण नगण्य असणारा देश, प्रचंड मोठ्ठं जगातलं आठवं मिलिटरी बजेट असणारा देश, आयात निर्यातीच्या बाबतीत जगातल्या चौथ्या क्रमांकावर असलेला देश, जगातली तीन नंबरची इकॉनॉमी म्हणून मिरवणारा देश, आजच्या मॉडर्न जगातही सम्राटाला मानणारा कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की सांभाळणारा देश, ९८.५% जापनीज लोकांचा देश,  बाँबहल्लात बेचिराख होऊनही पुन्हा उसळून उठणारा देश, स्वत:च्या जपानी भाषेचा गर्व असणारा देश, जागतिक महायुद्धामध्ये महत्वाची भुमिका बजावलेला देश, प्रतिचौरस किलोमिटर्समध्ये जास्तीत जास्त माणसांची घनता असलेला देश, भूकंप आणि त्सुनामीशी सतत दोन हात करणारा देश, देशाचा पंच्याहत्तर टक्के भाग जंगलांनी  आणि पर्वतांनी व्यापलेला असूनही निसर्गाची हानी न करणारा देश, जवळजवळ सातशे आयलंड्सचा देश, सायंटिफिक रिसर्चमध्ये अग्रस्थानी असलेला देश, प्लॅनिंग एक्झिक्यूशन डेडीकेशन परफेक्शनच्या बाबतीत कुणीही हात धरू शकणार नाही असा देश, छोटा असूनही एकशे पंच्याहत्तर एअरपोर्टस् असलेला देश, बुद्धिझम मानणारा देश, संस्कृती परंपरा जपणारा देश, भरपूर कॉफी पिणारा देश, ऑटोमोबाइलचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश, जगातलं सर्वात मोठं फिश मार्केट असणारा देश, ९९% साक्षर लोकांचा देश, ९६% एम्लॉयमेंट असलेला देश... जपान जगाचं आकर्षण ठरला आहे.

सहा ते सात इंच उंच उंबरठ्यावाली घरं, कमीतकमी फर्निचरवाली घरं, बाहेरून आल्यावर घराबाहेर चपला काढायची पद्धत, जमिनीवर बसून जेवणं, जेवणाआधी इतादाकीमासू म्हणजे आपलं वदनी कवळ घेता... अशा अनेक गोष्टी जपानचं भारताशी नातंही सांगतात. कमरेत वाकून आपल्या नम्रपणाचं दर्शन घडवणारी पण बिझनेसच्या बाबतीत तेवढीच श्रूड असणारी, वेळ पाळणारी, शिस्तबद्ध जीवन जगणारी जपानी माणसं हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येक देश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. जपानमध्ये सगळचं काही आलबेल आहे असं नाही पण आपण टूरिस्ट म्हणून जातो तेव्हा जेवढं त्या देशाकडून चांगलं घेता येईल ते घ्यायचा आपला महत्वाचा रोल असतो. आणि तो आपण पार पाडावा. जास्त खोलात जायची गरज नसते.

भारत रशिया अमेरिका चायना आदींच्या तुलनेत आकाराने छोटा असलेला जपान इंग्लिश भाषेचा अंकित न होता स्वत्व राखत, स्वत:ची भाषा जोपासत मोठा झाला. हिरोशिमा नागासाकीच्या अणूसंहारावर मात करीत जपान आणखी ताकदीने उभं राहिलं. कितीही संकटं येऊ दे, आम्ही अधिक जोमाने काम करीत सतत त्यावर मात करू!’ हा संदेश जपान सदैव जगाला देत राहिल. आणि म्हणूनच मनापासून म्हणावसं वाटतं, ‘आय लव्ह यू जपान!‘

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

जगाचा इतिहास आणि भूगोल बदलला तो दुसर्‍या महायुध्दाने. या महायुध्दाच्या रणधुमाळीत पूर्व युरोप मधला पोलंड हा देश अक्षरशः होरपळून निघाला. युरोपच्या मध्यवर्ती असलेल्या या देशातले सुमारे ६० लाख लोक दुसर्‍या महायुध्दात मारले गेले. महायुध्दाची सर्वात भीषण खूण आजही या देशात पाहायला मिळते ती क्रॅकोव्ह या शहराजवळच्या ऑशवित्झ कॉन्सट्रेशन कॅम्पच्या रुपाने. दुसर्‍या महायुध्दाच्या आरंभी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर क्रॅकोव्ह हे शहर जर्मन व्याप्त पोलंडचे मुख्यालय बनले. याच शहराजवळ ऑश्विएन्सिम नावाच्या गावात नाझींनी पोलंडमधला प्रमुख कॉन्सट्रेशन कॅम्प ( छळ छावणी ) उभारला जो ‘ऑशवित्झ कॅम्प’ नावाने ओळखला जाऊ लागला. वंशभेदाचे खूळ डोक्यात घेऊन नाझी राजवट काम करत होती आणि त्यांचा मुख्य रोष ज्यू धर्मियांवर होता. ऑशवित्झ कॅम्पमध्ये २० मे १९४० रोजी पहिले कैदी आणण्यात आले, जसजसा जर्मन फौजांचा प्रभाव वाढू लागला पोलंड आणि अन्य देशातून कैद्यांचा ओघ इथे सुरू झाला. सुमारे ५०० एकरांच्या परिसरात पसरलेल्या या छळ छावणीचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॅम्प, लेबर कॅम्प आणि एक्सटर्मिनेशन कॅम्प असे तीन भाग होते. या छावणीत दहा लाखांपेक्षा जास्त कैदी कोंबण्यात आले होते. जी कोठडी साधारण ७०० लोकांसाठी तयार केलेली होती त्यात १२०० जणांना कोंबले जाई. पहिली तीन वर्षे या छळ छावणीची सूत्रे रुडॉल्फ होस याच्याकडे होती. डॉ. जोसेफ मेंगेल याने याच कॅम्पमध्ये मानवतेला काळीमा फासणारे तथाकथित वैद्यकिय प्रयोग (?) केले. या छळ छावणीतल्या कैद्यांना दिवसाचे किमान ११ तास कठोर परिश्रमाची कामे करावी लागत, खायला पुरेसे अन्न मिळत नसे, पाणी ही तुटपुंजेच मिळत असे. या छावणीतील नोंदवलेल्या कैद्यांपैकी ३० टक्के कैदी महिला होत्या. या छावणीतील १० आणि ११ क्रमांकाच्या इमारतींमधली भिंत ही ‘डेथ वॉल’ म्हणून ओळखली जायची. या ठिकाणी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना उभे करुन गोळ्या घातल्या जायच्या. पाच वर्षांमध्ये ऑशवित्झ कॅम्पमध्ये एकूण आठ लाखांच्या आसपास निरपराध लोकांना किड्यामुंगीसारखे मारण्यात आले. दुसर्‍या महायुध्दाच्या अखेरीस रशियन फौजा आगेकूच करत असताना ऑशवित्झ कॅम्पजवळ २७ जानेवारी १९४५ या दिवशी आल्या आणि या छळ छावणीत जीवंत राहिलेल्या ७००० लोकांची सुटका झाली. नंतर या कॅम्पमधील भयंकर हत्याकांड जगासमोर आले.१९५५ मध्ये या कॅम्पचे रुपांतर म्युझियममध्ये करण्यात आले. मानवतेला काळीमा फासणारी अशी घटना पुन्हा घडू नये आणि निरपराधांचे बळी जाऊ नयेत म्हणून ऑशवित्झ कॅम्प सारखी ठिकाणांची स्मृती जपणे आवश्यक ठरते. वीणा वर्ल्डच्या ईस्टर्न युरोप सहलीत ऑशवित्झ कॅम्पचा समावेश असतो, या ठिकाणाला भेट देऊन तिथल्या बळींना श्रध्दांजली वहायची संधी अवश्य घ्यावी.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

लक्षात आहे नं, आपल्याला तीन वर्षात भारतातली किमान पंधरा राज्य करायची आहेत. आपल्या पंतप्रधानांनी तसं आवाहनच केलंय. आणि का नाही? आपला भारत आपण पाहिलाच पाहिजे. जाणून घेतला पाहिजे. पंतप्रधानांचं आवाहन भारतीयांनी पूर्ण मनावर घेतलंय बरं का. भारतातील पर्यटनस्थळांवरची गर्दीच आपल्याला ह्या उसळलेल्या पर्यटनपूराची महती सांगतेय. युरोपमध्ये जसे वेगवेगळ्या संस्कृतीचे, परंपरेचे, धर्माचे लोक मिळून एक एक देश बनलाय तसंच आपल्या भारताचंही आहे. प्रत्येक राज्य वेगळं. प्रत्येकाची भाषा, संस्कृती, कला, परंपरा सगळंच आगळं वेगळं. युरोप जसा संपूर्ण जगाला वेड लावतो, अक्षरश: खेचून आणतो देशोदेशीच्या पर्यटकांना तसाच आपला भारतही जगाला आपल्याकडे खेचून घेऊ शकतो. पर्यटनात देशात क्रांती घडू लागलीय आणि पर्यटनक्षेत्रातील बदलांचा हाच वेग कायम राहिला पुढची काही वर्ष तर भारत पर्यटनाच्या बाबतीत आश्चर्यकारक प्रगती करेल. आणि हा कल्पनाविलास नाही तर हे वास्तव येत्या पंधरा वीस वर्षात आपल्याला अनुभवायला मिळेल. आम्ही आमचा खारीचा वाटा उचलतोय आपल्या भारतीयांना भारताचं विलोभनीय दर्शन घडवून. आपल्या देशातील पर्यटनस्थळांच्या छोट्या मोठ्या उद्योगांना चालना त्यातूनच मिळणार आहे. एक पर्यटक आठ माणसांना काम देतो वा रोजगार निर्माण करतो हे इंटरनॅशनल टूरिझम स्टॅटिस्टिक्स सागतं. आपण एका राज्यातले लोक दुसर्‍या राज्यात फिरू लागलो तर किती रोजगार निर्माण होईल बघा नं, मग आपल्या देशातील ह्या पर्यटन उद्योगक्रांतीचा घटक बनणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. थंडी सरत चाललीय आणि उन्हाची धग जाणवायला लागलीय. फेब्रुवारीत ही अवस्था तर एप्रिल मे मधला उन्हाळा मी’ म्हणणार आहे. घाबरायचं कारण नाही कारण अवाढव्य पसरलेल्या आपल्या भारताला बलाढ्य हिमालयाने उत्तरेकडे आपल्या माथ्यावर बर्फाची चादर जी ओढलीय. आत्मनिर्भर भारत आहे नं आपला. आपल्या प्रॉब्लेम्सवर सोल्यूशन्सपण त्याच्याकडेच आहेत. सो, या उन्हाळयाच्या सुट्टीत किमान एक राज्य तरी पालथं घाला हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं. काश्मीर, लेह लडाख, हिमाचल, उत्तरांचल, दार्जिलिंग, सिक्किम, अरूणाचल आदि राज्य ‘बाहे पसारे‘आपल्या स्वागताला तयार आहेत. ते झालं असेल तर नेपाळ आणि भूतान आहेतच आपले शेजारी देश, पण आपल्यापेक्षा अगदी वेगळे. थक्क व्हाल तुम्ही ही हिमालयाच्या पायथ्याशी असलेली आपली पर्यटन संपत्ती बघून. मात्र एअरफेअर्स खूपच वाढताहेत तेव्हा शुभस्य शिघ्रम!

#VeenaWorldTravelMission

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय बाई खाऊ... कसं गं खाऊ!

जगाच्या पाठीवरील प्रत्येक खंडाच्या खाद्य संस्कृतीमध्ये एक, दोन पदार्थ असे असतात जे त्या खंडाचे फूड आयकॉन ठरतात.  युरोप बद्दल सांगायचं तर ब्रेडचे इतके प्रकार तिथे तयार केले जातात की ब्रेड हीच युरोपियन जेवणाची ओळख ठरली आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील कोणताही देश असला तरी तिथले मुख्य अन्न म्हणजे भात हे समीकरणच आहे. सहाजिकच वेगवेगळ्या आशियाई देशांमध्ये त्या त्या देशातल्या घटक पदार्थांना सोबत घेऊन भाताचे अनेक प्रकार बनवले जातात. आता हजारो बेटांनी बनलेला इंडोनेशिया तरी त्याला कसा अपवाद असेल? विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना मिळून हिंदी महासागराने पॅसिफिक ओशनमध्ये मिळून इंडोनेशियातील बेटे पसरली आहेत. त्यातले पर्यटकांच्या हिट लिस्ट वरचे  बेट म्हणजे बाली.  याच बाली बेटावरची पारंपारिक डिश ’नासी चॅम्पुर’ ही आज जगभरात इंडोनेशियाची ओळख बनली आहे.  इंडोनेशियाची राष्ट्रीय भाषा बहासा इंडोनेशिया ही मलेय भाषेवर आधारित आहे.  या भाषेत नासी म्हणजे मिक्स मिश्र आणि चॅम्पुर म्हणजे शिजवलेला भात. नावाप्रमाणेच नासी चॅम्पुरमध्ये भातात ग्रील्ड ट्यूना फिश, तळलेले टोफू,  बीफ  किंवा मटणाचे तुकडे, काकडी, पालक, मक्याचे दाणे, चिली सॉस, रस्सा भाजी असं खूप काही मिक्स केलेलं असतं.  नासी चॅम्पुर ठराविक अशी रेसिपी नाही.  इंडोनेशियात तुम्हाला नासी चॅम्पुर बरोबर भाज्या मासे,माशांचे प्रकार सर्व्ह केले जातात. रस्त्यावर केळीच्या पानात गुंडाळून नासी चॅम्पुर दिला जातो. इतकीच बाली मधील लोकप्रिय डिश म्हणजे ‘नासी अयाम‘. या डिशमध्ये भातात चिकन मिक्स करतात कारण अयाम म्हणजे चिकन. अर्थात चिकन बरोबर भाज्या, फिश, सातेय, शेंगदाणे, उकडलेली अंडी याचाही समावेश या भातात असतो. किंचित तिखट पण मुख्यतः गोडसर चवीचा हा पदार्थ आता परदेशातही लोकप्रिय झाला आहे. अशा नाविन्यपूर्ण पदार्थांची लज्जत चाखण्यासाठी वीणा वर्ल्डच्या बाली सहलीत जरूर सहभागी व्हा. देशविदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट लाइफ‘ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टूर आणि हॉलिडे

आत्तापर्यंत वीणा वर्ल्डच्या जाहिरातीत आम्ही ‘देखो अपना देश’ चा नारा लावलेला तुम्ही पाहिला असेल आणि आम्ही मनापासून ते म्हणतो बरं का ’देखो अपना देश, दिल से प्यार से सम्मान से! आजचं ह्या लेखाचं टायटल वेगळं आहे. ‘दिखाओ अपना देश‘. भारतात दरवर्षी आम्ही पन्नास ते पंचावन्न हजार भारतीय पर्यटकांना वेगवेगळ्या राज्यात पर्यटन घडवून आणतो. ते अव्याहतपणे सुरू आहे. पण आपला सुजलाम सुफलाम भारत विदेशी पर्यटकांना दाखवणं हे आमचं काम आहे आणि कर्तव्यसुद्धा, आणि ते आम्ही करतोय. ’वीणा वर्ल्ड इंडिया इनबाउंड’ ह्या आमच्या डिव्हिजनद्वारे युरोप अमेरिकेतूनच नव्हे तर अगदी कोलोंबिया ब्राझिलवरूनही विदेशी पर्यटक वीणा वर्ल्डच्या साथीने आपल्या भारताची सैर करतात. फॉरिनर्सना आपला भारत देश उत्कृष्ट तर्‍हेने दाखविण्यात वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स एकदम एक्सपर्ट आहेत. परदेशातून येणार्‍या प्रत्येक फॉरिनर्सचा ग्रुप दे धम्माल करून परत त्यांच्या देशी पाठविणे हे आमचं लक्ष्य आहे, कारण ते खुश होऊन स्वदेशी परतले तरच ते त्यांच्या आप्तस्वकियांना भारतात पाठविणार पर्यटनासाठी. फ्रान्समध्ये सर्वात जास्त म्हणजे आठ कोटी पर्यटक येतात, आपण भारताने अजून एक कोटीचा माइलस्टोनही पूर्ण केला नाहीये. सो आम्ही त्या लक्ष्यासाठी फुल ना फुलाची पाकळी योगदान देतोय. आपले अनिवासी भारतीयसुद्धा ’वीणा वर्ल्ड इंडिया इनबाउंड’तर्फे भारताची ओळख करून घेत आहेत. वीणा वर्ल्डच्या नेहमीच्या टूर्सपेक्षा हे वेगळं काम आहे पण त्यात आनंद आणि समाधान ह्या दोन्ही गोष्टी आहेत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्

मिशन सेल्फ ड्राइव्ह

self drive
self drive

जिंदगी ना मिलेगी दोबारा‘ ह्या सिनेमाने अनेक नवनवीन गोष्टी आपल्यासमोर आणल्या. पर्यटनाला तर ह्या सिनेमाने चार चांद लावले. स्पेन ह्या अतिसुंदर देशाकडे भारतीय पर्यटक तसे फारसे जात नव्हते पण ह्या सिनेमाने स्पेनला भारतीयांच्या पर्यटन नकाशावरचं एक महत्वाचं किंवा अगदी ‘मस्ट सी‘ असं डेस्टिनेशन बनवलं. त्या सिनेमातली कोस्टा ब्राव्हा ची रोड ट्रीप आठवते? अहाहा सिनेमातल्या तीन हिरोज्नी जान आणली होती त्या सेल्फ ड्राइव्ह हॉलिडेला. ह्या सिनेमानंतरच आमच्याकडे सेल्फ ड्राइव्ह हॉलिडेची मागणी वाढू लागली होती. आत्तातर सेल्फ ड्राइव्ह हॉलिडेज तसे कॉमन झालेत. म्हणजे वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत इंडिव्ह्युजवली जाणार्‍या पर्यटकांमध्ये दहा टक्के पर्यटक सेल्फ ड्राइव्ह हॉलिडे घेतात. हे हॉलिडे पर्यटक जास्त करून न्यूझीलंड, ऑस्टे्रलिया, इंग्लंड स्कॉटलंड, युरोप आणि अमेरिकेत घेतात. ह्यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. आणि कोणत्या देशात आपण जातोय तीथे लेफ्ट साइड ड्राइव्ह आहे की राइट साईड हे आधी माहीत करून घ्यायला लागतं. म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युके आपल्यासारखं म्हणजे लेफ्ट साईडने गाडी चालवतात तर युरोप आणि युएसए मध्ये राईट साईडने. राइट साईडने आपल्याला थोडी प्रॅक्टिस करावी लागते पण एकदा का अंदाज आला की पुढचा प्रवास सुखकर होतो. जनरली ह्या प्रवासाला म्हणजे सेल्फ ड्राइव्हला सुरुवात ही डेस्टिनेशनला पोहोचल्यावर लागलीच करू नये. तिथे पोहोचल्यावर रात्रीची पूर्ण झोप घ्यावी आणि मगच ह्या सेल्फ ड्राइव्ह प्रवासाला सुरुवात करावी. गाडीचा स्पीड मॉडरेट ठेवावा. आपल्याला कंट्रोल करता येईल असा असावा. रस्ता चुकणं, चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवणं असे प्रकार होतात तेव्हा शांततेने घ्यावं. आणि सेल्फ ड्राइव्ह आपण एवढ्यासाठीच घेतो की आपल्याला डेस्टिनेशनला पोहोचायचं असतंच पण तो जर्नी एन्जॉय करणं, ठिकठिकाणी थांबणं, वाटेवरच्या सुंदर गावांना भेट देणं, तिथे पाय मोकळं करीत भटकंती करणं ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. कुणीतरी म्हटलंय नं, ‘मंझिल से भी खूबसूरत है रास्ता‘ त्या रस्त्याची मजा लुटणं महत्त्वाचं. आणखी एक, सेल्फ ड्राइव्हसाठी घेतलेल्या गाड्यांमध्ये किमती वस्तु ठेवायच्या नाहीत. युरोप अमेरिकेत ह्या रेंटेड कार्समध्ये चोर्‍या होण्याचं प्रमाण वाढीस लागलंय. रेंटेड कार्स साधारणपणे दिवसाला रुपये दहा हजार ते पंचवीस तीस हजारापर्यंत असते. सेल्फ ड्राइव्हसाठी न्यूझीलंड हा संपूर्ण देशच मस्त आहे. नॉर्थ आयलंड, साऊथ आयलंड अक्षरश: डोळ्यांचं पारण फेडतील. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न व्हिक्टोरियाचा ग्रेट ओशन रोड, सिडनी ब्रिस्बेनमधला पॅसिफिक कोस्ट ड्राइव्ह केवळ अफलातून. युरोप युके आणि अमेरिका तर सेल्फ ड्राइव्हसाठी पर्वणी आहेत. कुठूनही सुरू करा आणि कुठेही संपवा तुमचा सेल्फ ड्राइव्ह. यु वील नॉट रीग्रेट अ‍ॅट ऑल! सो, जर तुम्हाला ड्रायव्हिंगची आवड असेल,तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल आणि सेल्फ ड्राइव्ह हॉलिडेमध्ये इंटरेस्ट असेल तर आजच वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्शी संपर्क साधा.

February 24, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top